लातूर महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेंचा आत्महत्येचा प्रयत्न, आतापर्यंत काय माहिती समोर आलीय?

    • Author, मुस्तान मिर्झा
    • Role, बीबीसी मराठीसाठी

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी (5 एप्रिल) रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला.

शनिवारी रात्री 11.15 च्या सुमारास मनोहरे यांनी रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर कुटुंबीयानी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं.

बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांच्यावर शहरातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिका कर्मचारी आणि इतर नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती.

नेहमीप्रमाणे कुटुंबाबरोबर जेवण

शनिवारी रात्री बाबासाहेब मनोहरे यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी नेहमीप्रमाणे त्यांच्या कुटुंबीयांसोबत जेवण केले.

जेवणानंतर बाबासाहेबर त्यांच्या खोलीमध्ये निघून गेले. त्याठिकाणी त्यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेतली.

गोळीचा आवाज आल्याने कुटुंबीय धावत खोलीकडे गेले. त्याठिकाणी बाबासाहेब जखमी अवस्थेत पडलेले होते.

कुटुंबीयांनी लगेचच त्यांना सह्याद्री रुग्णालयात दाखल केलं.

सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. हनुमंत किणीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मेंदूला इजा झाली आहे. त्यामुळं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार असल्याचं डॉक्टर म्हणाले.

बाबासाहेब मनोहरे यांनी यापूर्वी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. लातूर महानगरपालिकेत ते सुरुवातीला अतिरिक्त आयुक्त होते. नंतर बढती मिळून ते महानगरपालिका आयुक्त झाले होते.

बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.

पोलिसांनी बाबासाहेब मनोहरे यांच्या घरी जाऊनही घटनेचा पंचनामा केला. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

मनोहरे यांनी वापरलेली बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. बंदूक त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी ठेवलेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

मनोहरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण शोधण्यासाठी त्यांच्या फोन रेकॉर्ड्ससह इतर पुरावेही तपासले जाणार आहेत.

प्रकृतीबाबत डॉक्टरांनी काय माहिती दिली?

सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. हनुमंत किणीकर यांनी माहिती दिली की,

"रात्री साधारण साडेअकरा वाजता ते सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सेल्फ गनशॉट इन्ज्युरी म्हणून ॲडमिट झाले. आल्यानंतर त्यांच्या उजव्या बाजूच्या कवटीमध्ये ॲक्टिव्ह ब्लीडिंग होती आणि डाव्या बाजूलादेखील जिथे एक्झिट जखम आहे, तिथूनही रक्तस्त्राव होत होता. आल्यानंतर आम्ही लगेचच त्यांना एंडोट्रॅकील ट्यूब टाकून व्हेंटिलेटरवर घेतलं."

"स्टॅबिलाईज झाल्यानंतर सीटी स्कॅन केल्यानंतर असं दिसून आलं की उजव्या बाजूच्या कवटीमधून डाव्या बाजूच्या कवटीकडून मेंदूमधून पास झालेली दिसली आणि कवटी हाड फ्रॅक्चर होऊन मेंदूमध्ये कवटीच्या हाडाचे काही तुकडे दिसून आले. तर त्यांच्यावर आम्ही आज सर्व स्टॅबिलाईज झाल्यानंतर पहाटे शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. हाडाचे सर्व तुकडे आपण काढले. मेंदूवर जे आवरण असतं ते फाटलं होतं, ते दुरुस्त केलं. डीकॉम्प्रेशन क्रॅनिटॉमीकरून व्हेंटिलेटरवर अतिदक्षता विभागामध्ये रुग्णाला शिफ्ट करण्यात आलं."

ते पुढे म्हणाले, "आता ते आमच्या ट्रीटमेंटला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि हळूहळू त्यांची रिकव्हरी होते आहे. तरीसुद्धा आम्ही 24 तास, 48 तास त्यांच्यावर क्लोज ऑब्जर्व्हेशनमध्ये अतिदक्षता विभागात लक्ष ठेवून आहोत. नवीन काही लक्षणं आढळले तर त्यानुसार आम्ही त्यांच्यावर उपचार करून त्यांच्या प्रतिसादावर लक्ष ठेवणार आहोत."

दरम्यान, गरज पडल्यास पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलविण्याची तयारी करून ठेवण्यात आलीय.

बाबासाहेब मनोहरेंचा अल्प परिचय

बाबासाहेब मनोहरे यांनी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये काम केले आहे.

नांदेड येथे त्यांनी अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.

मागील दीड वर्षांपासून ते लातूर मनपाचे आयुक्त म्हणून काम पाहत होते.

निवडणुका न झाल्याने मनपाची पूर्ण जबाबदारी प्रशासक म्हणून मनोहरेंकडेच होती.

अतिशय स्पष्टवक्ते असलेल्या आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येच्या प्रयत्नाचे टोकाचे पाऊल का उचलावे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

दरम्यान, माजी मंत्री संजय बनसोडे, औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली.

यासह मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार अमित देशमुख यांसह वेगवेगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेब मनोहरे यांच्याबद्दल झालेल्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली. तसंच, लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या.

तर ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक केदार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यास अटक झाली पाहिजे, अशी मागणी केलीय.

महत्त्वाची सूचना

आत्महत्या हे एक गंभीर पाऊल आहे. ती नक्कीच टाळता येऊ शकते.

यासाठी तुम्ही 1800120820050 किंवा 18001024040 या क्रमांकावर मदत मागू शकता.

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)