You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'जुन्यात झळकणारी आणि नव्यात चमकणारी' असं बहिणाबाईंच्या कवितेबद्दल अत्रे का म्हणाले होते?
- Author, विनायक होगाडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
( महाराष्ट्राच्या नायिका या मालिकेतून आम्ही राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांची ओळख करुन देत आहोत. या लेखात कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे व्यक्तित्व आणि कार्य याची ओळख करुन दिली जात आहे.)
आपण जे गुणगुणतोय, जाता-येताना कामं करताना म्हणतोय, त्याला 'कविता' असं म्हणतात, हेच त्या बाईला ठाऊक नव्हतं.
ती आपलं दु:खं, आपलं सुख, आपले अनुभव आणि आपलं शहाणपण-सुजाणपण अखंडपणे चालीत मांडत रहायची. गुणगुणत रहायची.
पढीकतेचा जसा सुसंस्कृतपणाशी संबंध नसतो, तसाच सृजनशीलतेचाही नसतो. कविता स्फुरण्यासाठी औपचारिक शिक्षणाची अट नसते. अगदी अक्षर ओळखीचीही अट नसते, हेच या बाईनं दाखवून दिलं.
आचार्य अत्रे तिच्या कवितांबद्दल म्हणतात की, 'जुन्यात झळकणारी आणि नव्यात चमकणारी' अशी तिची कविता आहे.
तिच्या ओव्या, तिची गाणी, तिच्या कविता जर तिच्या लेकरानं नीटशा ऐकल्या नसत्या तर तिचा हा सृजन असाच काळाआड गुडूप झाला असता.
बहिणाबाई चौधरी असं या काव्यधारेचं नाव...
'गाणी गाणं हाच बहिणाईंचा सहजधर्म'
एकदा एका शेजारच्या स्त्रीनं त्यांना विचारलं, "बहिणाई, तुमचं गाणं किती मोलाचं आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का?" यावर बहिणाई सहज उत्तरल्या, "गाई-म्हशी दूध देतात, त्यांचे भाव त्यांना थोडीच माहिती असतात."
जसं फुलणं फुलाचा नि वाहणं पाण्याचा सहज गुणधर्म असतो, अगदी तसंच गाणी गाणं हा बहिणाबाईंचा सहजधर्म होता.
आपण ज्या सहजस्फुर्तपणे गुणगुणतो, त्यांना कविताच म्हणतात, याचीही सुरुवातीला त्यांना जाण नाही.
मग त्या ज्या कविता करायच्या, त्या करायच्या तरी कशासाठी? त्यामागचं प्रयोजन तरी काय होतं? असा प्रश्न पडणं साहजिक आहे.
त्या म्हणतात,
"अरे घरोटा घरोटा,
माझे दुखता रे हात
तसं संसाराचं गानं
माझं बसते मी गात"
कदाचित, गाणी गाणं हेच त्यांच्या कष्टमय जीवनातील भावनांचा निचरा करण्यासाठीचं विरंगुळ्याचं स्थान होतं.
त्यांच्या मनातून कविता जन्मली ती त्यांच्या स्वत:च्या समाधानासाठी.
मंचीय कविंप्रमाणे कविता ऐकवून लोकांची 'वाह वाह' मिळवणारी अशीदेखील एक कविता नावाची गोष्ट असते, हेच त्यांना माहिती नसावं. हे त्यांना माहिती नसतानाही त्यांच्या कवितांची सकसता वादातीत ठरली.
जेवणं, खाणं, झोपणं, काम करणं, इत्यादी गोष्टींप्रमाणेच 'गाणी गाणं' ही देखील त्यांची नित्यनेमाची दैनंदिन सहजकृती होती.
कदाचित, वरकरणी त्या या सगळ्या काबाडकष्टात रममाण राहिलेल्या असल्या तरीही त्यांचं मन मात्र कवितांमध्येच आकंठ बुडून राहिलेलं असावं.
त्या आतून आपल्याच एका निराळ्या विश्वात कशाप्रकारे रममाण झालेल्या असत, हे त्यांच्याच सुप्रसिद्ध रचनेतून दिसून येतं.
"मन पाखरु पाखरु
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात..."
खानदेशात जळगावपासून दोन मैलांवर असलेलं 'असोदे' हे बहिणाबाईंचे माहेरगाव.
गावचे पाटील उखाजी महाजन हे त्यांचे वडील होते. त्यांना तीन भाऊ आणि तीन बहिणी होत्या. बहिणाबाई कधीच शाळेत गेलेल्या नव्हत्या. जळगावमधील नथुजी चौधरी यांच्याशी विवाह होऊन त्या वयाच्या 13 व्या वर्षी जळगावला आपल्या सासरी आल्या.
सासर-माहेर अशी दोन्हीही शेतकरी कुटुंब आणि नवरा, दीर, नणंद, जाऊ, सासू-सासरा आणि मुलं एवढंच काय ते त्यांचं जग होतं.
"उठ सासुरवाशिन बाई
सुरु झाली वटवट कातावली वो सासू
पुस डोयांमधले आसू
उठ सासुरवाशिन बाई
घे सोशिसन घे घालू नको वो वाद
कर माहेराची याद"
या रचनेतून त्यांचा मर्यादीत जगाची कल्पना येते.
"अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर"
ही त्यांची रचना तर सुप्रसिद्धच आहे.
वयाची तिशी पार करण्याआधीच बहिणाबाईंच्या पतीचं निधन झालं होतं. बहिणाबाईंना तीन मुले होती.
मोठी 'काशी' ही मुलगी, मधले ओंकारभाऊ तर सर्वांत धाकटे सोपानदेव होय. याच सोपानदेवांनी आपल्या आईची काव्यप्रतिभा ओळखली आणि तिच्या कविता लिहून एकत्र करुन ठेवून दिल्या.
अशा झाल्या बहिणाईंच्या कविता अजरामर...
1952 साली बहिणाबाईंच्या कविता 'बहिणाईची गाणी' या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती निघाली होती. आचार्य प्र. के. अत्रे यांनी हा काव्यसंग्रह आकारास आणण्यामध्ये पुढाकार घेतला होता.
बहिणाबाईंचे सर्वांत धाकटे चिरंजीव सोपानदेव आणि त्यांचे मावसबंधू पितांबर चौधरी यांनी बहिणाबाईंच्या या मुखोद्गत कविता कागदावर उतरवून घेतल्या होत्या.
बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावताना त्यांना हे बाड पुन्हा सापडलं.
सोपानदेव चौधरी आणि आचार्य अत्रे यांचा जवळून परिचय होता. 1950 साली सोपानदेव चौधरी आचार्य अत्रे यांच्याकडे आपल्या आईच्या कवितांचे बाड घेऊन आले होते.
त्यांनी ते घाबरतच त्यांच्याकडे सोपवलं. अत्र्यांनी भराभर साऱ्या कविता चाळल्या, वाचल्या. त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या स्वभावाप्रमाणेच इतकी बोलकी होती की, ती त्यांच्या शब्दातच घेतलेली बरी.
अत्रे म्हणतात, 'मी सोपानदेवांना ओरडून म्हणालो, "अहो! हे तर बावनकशी सोनं आहे. हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं गुन्हा आहे.'
याबाबतचा किस्सा स्नेहलता चौधरी यांच्या 'भूमिकन्या बहिणाबाई चौधरी: एक चिंतन' या पुस्तकात नमूद आहे.
आचार्य अत्र्यांनी बहिणाबाईंच्या कवितेबाबत म्हटलंय की, "एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाईच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात असे शोध क्वचितच लागतात. सोळा वर्षांपूर्वी असाच एक मौल्यवान शोध. मराठी साहित्यात लक्ष्मीबाई टिळकांची 'स्मृतिचित्रे' प्रसिद्ध झाली तेव्हा लागला होता.
"लक्ष्मीबाईंसारखाच बहिणाईचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे. आणि मौज ही आहे की, जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे त्यांचे तेज आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे हा तर तोंडात बोट घालायला लावील, असा चमत्कार आहे," असं अत्रे यांनी म्हटलं होतं.
बहिणाबाईंच्या काव्यसंग्रहाच्या पहिल्या आवृत्ती पन्नास कविता होत्या. हा संग्रह घाईघाईत प्रकाशित झाल्यामुळे त्यात त्यांच्या सर्व कवितांचा समावेश झालेला नव्हता.
या संग्रहाच्या प्रकाशनानंतरही बहिणाईंच्या काही ओव्या, स्फुटं आणि कविता सोपानदेवांना मिळाल्या. नंतर प्राप्त झालेल्या आणि स्मरणातील या कवितांचा समावेश दुसऱ्या आवृत्तीत करण्यात आल्या.
ही दुसरी आवृत्ती 1969 साली प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीच्या प्रस्तावनेत सोपानदेवांनी म्हटलंय की, "याउपर एकही ओवी वा कविता त्यानंतर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे, बहिणाईंचे समग्र काव्य म्हणून या दुसऱ्या आवृत्तीकडेच पाहिलं जाऊ शकतं."
बहिणाबाईंच्या जितक्या कविता अशाप्रकारे शब्दरुपात पकडता आल्या आहेत, त्याहून कित्येक कविता या अशाच सुटलेल्या असतील. त्या काळाच्या पोकळीत अशाच प्रवासात राहिलेल्या असाव्यात, असं आपण म्हणू शकतो.
पण अशी काव्यमय उपमा दिली तरी बऱ्याचशा कविता शब्दरुपात संग्रहित होण्यापासून सुटल्या, हे वास्तव नाकारता येणार नाही, हेही तितकंच खरं आहे.
पण, बहिणाईंच्या कवितातील वापरलेले अलंकार, प्रतिमा, वर्णनं, आणि त्यातून मिळणारा अनुभव फार वेगळा आहे, एवढं मात्र नक्की!
बहिणाई - काव्यसंग्रह, सिनेमात गाणी नि नावाचं विद्यापीठ
खरं तर आपलं घर, आपलं गाव नि आपलं शेत, एवढंच काय ते बहिणाबाईंचं अनुभवविश्व होतं. त्याहून अधिक काही असण्याची शक्यता क्वचितच.
इतकं कमी अनुभवविश्व असतानाही, खानदेशातील ही स्त्री आपल्या संसाराची, आयुष्याची, निसर्गाची, माणसाची गाणी अविरतपणे, सहजस्फुर्तपणे गात होती.
तिच्या कविता आता शब्दरुपात आल्या आहेत आणि तिचं गाणं सिनेमातही वापरलं गेलंय. इतकंच काय, तिच्या शब्दांची जादू इतकी की आता तिच्या नावानं एक विद्यापीठही अस्तित्वात आलं आहे. 1990 साली हे विद्यापीठ आकारास आलं.
मात्र, हेच सगळं तिच्या जाण्यानंतर घडलंय, हा नियतीचा एक वेगळाच दुर्विलास म्हणायला हवा.
त्यांच्यासाठी त्यांची कविता जितक्या सहजतेनं जन्माला येत गेली, तितक्याच सहजतेनं त्यांची कविता सर्वांची झाली. त्यासाठी वेगळा आटापिटा त्यांना करावा लागला नाही.
शिवाय, त्यांच्या कित्येक कवितांच्या ओळींना तुकोबांच्या कवितांच्या ओळींप्रमाणेच सुभाषितांचा दर्जा प्राप्त झाला, ही फार मोठी गोष्ट म्हणावी लागेल.
बहिणाई म्हणतात,
"आला सास, गेला सास
जीवा तुझं रे तंतर
अरे जगनं-मरनं
एका सासाचं अंतर"
बहिणाईच्या कवितेचं वैशिष्ट्य
बहिणाबाईंच्या कविता मनाला रिझवतात, त्या अंतर्मुखही करतात, त्याचबरोबर त्या दैनंदिन जीवनातलं साधेपणही नाट्यमयरीत्या रंगवतात. त्यात वेदनेचीही किनार आहे आणि जाता जाता दिलेली मोठी शिकवणूकही आहे.
एके ठिकाणी त्या म्हणतात,
सर्व्या दुनियेचा राजा,
म्हने 'मी कोण, मी कोण?'
अशा त्याच्या मीपनाले
मसनात सिव्हासन
त्यांच्या कवितेतलं वेगळेपण समजून घेण्यासाठी आम्ही कवी इंद्रजीत भालेराव यांच्याशी चर्चा केली.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, "बहिणाबाईंसारख्या अनेक स्त्रिया या पांरपरिकच गाणी म्हणायच्या. पण, आधुनिक वाङ्मय व्यवहाराच्या कक्षेत आल्यामुळे आपण स्वतंत्र विषय घेऊन सुद्धा कविता करु शकतो, हे बहिणाबाईंच्या लवकर लक्षात आलं. म्हणून त्यांनी मन, जीव, संसार असे अनेक विषय घेतले."
बहिणाबाईंच्या कवितेत असलेलं 'अध्यात्म' हेच त्यांचं वेगळेपण होतं, हेदेखील इंद्रजीत भालेराव आवर्जून नमूद करतात.
ते सांगतात की, "त्यांच्या कवितेत अध्यात्म होतं. कारण, नंतरच्या कवींनी 'अध्यात्म' सोडल्याचं दिसून येतं. आधीच्या अध्यात्मिक कवितेमध्ये 'जीवन' नव्हतं, जे नवीन कवितेमध्ये असतं. बहिणाबाईंनी जुन्या कवितेमधलं अध्यात्म आणि नव्या कवितेमधलं जीवन एकत्र करुन दाखवलं आणि त्यामुळेच ते कवितेतलं विलक्षण रसायन ठरलं."
बहिणाबाईंची कविता कृषिसंस्कृतीमधून आलेली असल्याने त्यातलं जीवन आधुनिक असलं तरी प्रतिमा-प्रतिकं सगळी तिथली होती. यासाठी ते त्यांच्या 'खोपा' कवितेचं उदाहरण देतात.
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
एका पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
या कवितेत 'बंगला' हादेखील शब्द आलेला आहे. थोडक्यात, आधुनिक संदर्भही त्यांनी घेतले आहेत.
बहिणाई 1951 रोजी त्यांच्या वयाच्या बहात्तराव्या वर्षी निवर्तल्या. म्हणजे, जवळपास 1880 च्या सुमारास त्यांचा जन्म झाला असावा.
खरं तर, खानदेशातली एक बहिणाबाई तिच्या लेकराच्या सजगतेमुळे दुनियेसमोर आली.
पण न जाणो, आजवर कित्येक बहिणाबाई अशाच काळाच्या उदरात आपापल्या काव्यप्रतिभा प्रसवून गुडूप झाल्या असतील.
त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य सांगताना इंद्रजीत भालेराव म्हणाले की, "आचार्य अत्रेंचं त्यांच्याबद्दलचं एक वाक्य प्रसिद्ध आहे. बहिणाबाईंच्या कवितेचं वैशिष्ट्य त्या एका वाक्यात आलेलं आहे. "जुन्यात झळकणारी आणि नव्याच चमकणारी, अशी काहीतरी शक्ती त्यांच्या कवितेत होती. म्हणजे, बहिणाबाईंची कविता उचला आणि संतवाङ्मयात टाका, ती तिथली उत्कृष्ट कविता वाटेल. तसेच, त्यांची कविता उचला आणि केशवसूत, मर्ढेकरांच्या कालखंडात टाका, तिथे सुद्धा ती आपलं श्रेष्ठत्व टिकवून राहते."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.