गोदावरी परुळेकर यांनी पालघरच्या वारली समुदायाला वेठबिगारीतून बाहेर काढण्यासाठी काय केलं?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

कल्पना करा... आज अखंड इंटरनेट, वीज, पाणी सुरू असलेल्या शहरात राहाणाऱ्या मुलाला, सतत मोबाईल, सोशल मीडिया वापरणाऱ्या फोनवरुन सगळं काही मिळवणाऱ्या मुलाला अचानक उद्यापासून हे सगळं बंद करुन लांबवरच्या खेड्यात काम करायचं आहे असं सांगितलं तर?... तिथं तुला संपूर्ण नव्या माणसांबरोबर राहायचं आहे, त्यांच्याबरोबर काम करायचं आहे नव्हे त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे असं सांगितलं तर? आताच्या काळात अशी परीक्षा घेणारं आणि ती देणारं फारसं कोणी पुढे येईल असं वाटत नाही.

पण जवळपास 90 ते 100 वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका मुलीनं असंच आव्हान स्वीकारलं होतं. हे आव्हान तिला कोणीही दिलेलं नव्हतं. स्वखुशी, आपमर्जीनं तिनं ते स्वीकारलं होतं आणि लढलीही होती. या होत्या गोदावरी गोखले म्हणजेच गोदावरी परुळेकर.

गोदूताई, गोदाराणी, कॉ. गोदावरी परुळेकर अशा वेगवेगळ्या नावांनी त्या प्रसिद्ध होत्या. प्रसिद्ध झाल्या म्हणण्याचं कारण त्या स्वतः प्रसिद्धीपराङ्मुख होत्या पण त्यांच्या कार्यानं महाराष्ट्रातल्या एका मोठ्या प्रश्नाची उकल झाली होती. ऐन तारुण्यात गोदावरीताईंनी वारली समाजाच्या जागृतीचं काम हाती घेतलं होतं आणि तडीस नेलं होतं.

पुराणांनुसार अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या पंचकन्या प्रातःस्मरणीय मानल्या जातात.

पु. ल. देशपांडे यांनी मात्र आधुनिक काळात दुर्गा भागवत, गीता साने, इरावती कर्वे, मालतीबाई बेडेकर (बाळुताई खरे), गोदूताई परुळेकर या पाचजणी प्रातःस्मरणीय असल्या पाहिजेत अशा शब्दांत या सर्वांचा गौरव केला होता.

गोदावरी परुळेकर यांच्या आयुष्याचा मुख्य काळ हा धामधुमीचा होता. वारल्यांच्या आयुष्यासाठी त्या तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यात (आता आदिवासी तालुके पालघर जिल्ह्यात आहेत) कार्यरत होत्या. वारल्यांच्या एका पाड्यावरुन दुसऱ्या पाड्यावर प्रवास सुरू होता.

जमीनदारांच्या, सरकारच्या जोखडाखाली अडकलेल्या वारल्यांना जागं करण्यात त्यांचा उमेदीचा काळ जात होता. तरीही 'जेव्हा माणूस जागा होतो' या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकामुळे त्यांचं नाव गेल्या पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत सर्वतोमुखी होतं.

तसेच 'रिव्होल्ट ऑफ द वारलीज' आणि 'मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात कशी आले' हे लेखन त्यांनी केलं. 'बंदिवासातील आठ वर्षे' हे त्यांचं पुस्तक अप्रकाशित राहिलं. तर त्यांच्या आयुष्यावर कादंबरीही लिहिण्यात आली आहे.

गोदावरी परुळेकर कोण होत्या?

गोदावरी परुळेकर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1907 रोजी पुण्यात झाला. त्यांचे मूळ नाव गोदावरी लक्ष्मण गोखले. लक्ष्मण रघुनाथ गोखले हे पुण्यामध्ये प्रसिद्ध वकील होते.

अनेक भावंडांच्या घरात जन्मलेल्या गोदावरी यांचं कुटुंब सर्वार्थानं सुखवस्तू होतं. कोणत्याच प्रकारच्या सोयीची कमतरता नव्हती.

परंतु तो काळच राष्ट्रवादाने भारलेला आणि समाजकार्याच्या ओढीनं चळवळीत नेणारा असल्यामुळे ही सुखावस्था स्वतःपुरती नाही तर संपूर्ण समाजासाठी वापरली जावी अशी भावना असे.

गोदावरीताई यांचं शिक्षण हुजुरपागेत झालं आणि त्या पुण्यातच वकीलही झाल्या. परंतु वकिलीचं थोडंफार काम केल्यानंतर त्या मुंबईत 'सर्व्हंटस ऑफ इंडिया'चं काम सुरू केलं. मुंबईत प्रौढ शिक्षणासाठी, कामगारांच्या शिक्षणासाठी त्या काम करू लागल्या. हा सर्व काळ भारतात कम्युनिस्ट पक्षाच्या सुरुवातीचा होता. 1925 साली भारतात कम्युनिस्ट पक्ष आला. तेव्हा अनेक मध्यमवर्गीय, सुशिक्षित लोक त्यात सहभागी झाले.

गोखले कुटुंबीयही त्याकडे ओढले गेले. गोदूताईंचे बंधूही कम्युनिस्ट होते.

प्रभाकर ऊर्ध्वरेषेंच्या 'हरवलेले दिवस' पुस्तकात असं सांगितल्याप्रमाणे, "तो सगळा काळ डाव्या विचारांनी कसा भारावून गेला होता, तरुण-सुशिक्षित त्यातही मध्यमवर्गीय घरांमधले तरुण डाव्या विचारांकडे कसे वेगानं आकृष्ट झाले होते."

मुंबईत काम करत असताना गोदूताईंचा कामगार नेते ना. म. जोशी यांच्याशी संपर्क आला. त्यांच्यामुळे कामगारांचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न यांची ओळख झाली.

वारल्यांशी संबंध कसा आला?

1945 साली टिटवाळा येथे महाराष्ट्र प्रांतिक किसान सभेचं मोठं अधिवेशन झालं. त्यावेळेस कॉ. शामराव परुळेकर किसान सभेचं काम पाहात होते. या अधिवेशनाला ठाणे जिल्ह्याच्या (तेव्हाच्या) आदिवासी भागातले वारली आले होते. या वारल्यांनी प्रथमच असा काही अनुभव घेतला होता.

आपल्यावर अन्याय होतोय, त्याविरोधात आवाजही उठवता येतो ही कल्पनाच त्यांच्यासाठी नवी होती. कॉ. परुळेकरांनी गोदूताईंना वारल्यांच्या समस्या पाहाण्यासाठी तिकडे पाठवले. तिकडे गेल्यावर त्यांना खऱ्या अर्थाने आदिवासींच्या जगाचं दर्शन झाल्याचं गोदूताई आपल्या पुस्तकात नमूद करतात.

भूक, पिळवणूक, कष्ट, अवहेलना आणि निरक्षरता अशा दुर्देवाच्या फेऱ्यात अडकलेला मोठा समाज मुंबईच्या अगदी जवळ आहे हे त्यांच्या लक्षात आलं. हे वारली एकेकाळचे जंगलचे राजे. जंगलावर अवलंबून असणारे पण सावकार आणि जमिनदारांनी त्यांना मृतप्राय पशूवत करुन टाकलं होतं.

या वारल्यांच्या जमिनी गोड बोलून, खोटं सांगून, फसवून कधी धाक दाखवून जमीनदारांनी बळकावल्या होत्या. याच आदिवासींना त्यांच्याच जागेवर सावकार, आदिवासींसाठी काम करायची वेळ आली होती.

सकाळी उजाडल्यापासून कामाला सुरुवात करायची. ते मध्ये जेवणासाठी थोडासा भात दिला जायचा तेव्हा थांबायचं. या वेळेत पळत झोपडीत जाऊन भात कांडून त्याचे तांदूळ करायचे आणि तेच जेवून (खरंतर काही शितंच प्रत्येकाच्या वाट्याला येत) परत पळतपळत कामावर यायचं.

घरातल्या सगळ्यांनी संध्याकाळ होईपर्यंत काम करायचं. रात्री जमिनीवर कुडी सोपवून झोपायचं परत दुसऱ्या दिवशी हेच. अनेक ठिकाणी कर्जासाठी अनेक वर्षं, अनेक पिढ्या सावकार कामं करुन घेत, हे वर्णन गोदावरी परुळेकर यांच्या, 'जेव्हा माणूस जागा होतो,' मध्ये आपल्याला वाचायला मिळते.

कधी लग्नासाठी काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आयुष्यभर काम करावं लागल्याची उदाहरणं होती. ही झाली पिळवणूक. पण खरं रुप आणखी क्रूर होतं ते त्यांना मिळणाऱ्या वागणुकीत. या आदिवासींना जराही मागेपुढे झालं की पाठीवर चाबकाचे, वेताचे फटके मिळत.

आज परदेशातल्या गुलामांना मिळणाऱ्या वागणुकीचे 'ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह' सारखे सिनेमे येतात तशी स्थिती आपल्याच आजूबाजूला होती. या वारल्यांना गुलामच करुन टाकले होते. त्यांची विचार करण्याची, जगण्याची, माणूस म्हणून राहाण्याची सगळी शक्ती शोषून टाकली गेली होती.

गोदूताई वारल्यांच्या समस्या सोडवतात

गोदूताईंनी हे सगळं पाहिलं. डहाणू, उंबरगाव, तलासरी या सगळ्या प्रदेशात त्यांनी वारल्यांचे संघटन सुरू केले. वारल्यांना आपल्यावर अन्याय होतोय, त्याचा प्रतिकार करायचा असतो, प्रतिकार करता येतो, आपण प्रतिकार करू शकतो इथपासून शिकवण्याची वेळ होती. ही जाणीव करुन देण्याचं महत्त्वाचं काम गोदावरी परुळेकरांनी केलं.

वारल्यांनी काही पिढ्या घाबरुन जगल्यामुळे सावकार, जमीनदार हे आपल्याला नाडायलाच आहेत, आपण काहीच करू शकणार नाही अशा मानसिकतेत होते. कोणी कधी मान वर करायचा प्रयत्न केला असेल तर मिळणारी शिक्षाही त्यांच्या स्मृतीत असे. त्यामुळे ते कधी उठाव करण्याच्या किंवा साधी मागणी करण्याचाही विचार करत नव्हते.

गोदावरी परुळेकरांनी त्यांच्या अन्यायाची जाणीव करुन दिली. या सर्व वारल्यांना अत्यंत माफक दरात गवत कापून द्यावं लागे, जमीनदारांच्या शेतात राबावं लागे, इतकंच नाही तर सरकारी जंगलातलं लाकूडही तोडावं लागे. याचा अत्यंत कमी मोबदला त्यांना मिळत असे.

गोदूताईंनी वेळोवेळी त्यांच्या मागण्या पुढे केल्या. गवततोड थांबवण्याचा, जंगलतोड थांबवण्याचा संपही करावा लागला. त्यात अनेक अडथळे आले, कोर्टकज्जे झाले पण वारल्यांना त्यांचा मोबदला मिळू लागला.

याबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो वेठबिगारीचा. आयुष्यभर सावकार, जमीनदार अनेक वारल्यांना वेठीस ठेवत. पडेल ते काम करत. अक्षरशः त्यांचा वस्तूसारखा वापर होत असे. गोदूताईंनी एक महत्त्वाचं वाक्य वारल्यांच्या मनावर बिंबवलं ते म्हणजे 'आता वेठ करायची नाही.'

वेठबिगारीला मिळालेली सार्वत्रिक सूट त्यांच्यामुळे बंद झाली. या प्रश्नातही अनेक अडथळे आले, कोर्टाच्या वाऱ्या, अत्याचार याला सामोरं जावं लागलं. सावकार, जमीनदारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं अडथळे आणायचा प्रयत्न केला. पण वारली वेठबिगारीतून मुक्त झाले.

या सर्व प्रवासात गोदावरी आणि शामराव तसेच अनेक सहकारी कॉम्रेड्सना अनेकदा कोर्टाच्या फेऱ्या घालाव्या लागत. पोलीस तक्रारी, खटले, हद्दपारी यासर्वांना ते सामोरे गेले होते.

वारल्यांच्या आयुष्यात

शहरात सुखवस्तू घरात वाढलेल्या गोदूताईंनी विशीतच कामाला सुरुवात केली होती. शहर मागं ठेवून त्यांनी वारल्यांच्या कामासाठी झोकून दिलं होतं. त्यांना एकमेव गोष्ट आवडत होती ती म्हणजे चहा. पण वारल्यांच्या जगात तोही मिळणं फार कठीण होतं.

सर्वच गोष्टीत सामावून जायचं असा स्वभाव असणाऱ्या गोदूताईंनी वारल्यांचा जसा मिळेल तसा चहा स्वीकारला.

कंदमुळं, फळं खाणारी ही मंडळी पाहिली. त्यांच्याप्रमाणेच राहाण्यासाठी मिळेल त्यात पोट भरलं.

'बालभारती' इयत्ता आठवीच्या पुस्तकात गोदावरी परुळेकरांचा 'पाड्यावरचा चहा' हा धडा आहे, त्यात चहा करण्यासाठी वारल्यांनी किती प्रयत्न केले याचे वर्णन आपल्याला वाचायला मिळते.

पाड्यावर आणि वाड्या वस्त्यांवर काम करताना गोदूताई अत्यंत मिळून मिसळून राहिल्या.

कधीकधी अंधाऱ्या खोली, कधी तबेल्याजवळ- घोड्यांच्या लिदीची तुसं बाजूला करत भात खाल्ला. या त्यांच्या मिसळून जाण्याच्या स्वभावामुळेच वारल्यांनीही त्यांना आपल्यातलंच मानलं. वारली समाजाला प्रथमच हक्काचं नेतृत्व मिळालं होतं.

गोदूताईंना सुरुवातीच्या काळात सावकार, जमीनदारांच्या भयापोटीही अनेक गावांमध्ये पाणीही नाकारलं जात होतं. हे लोक गेले की सावकार आपल्याला छळतील अशी भीती गावातल्या लोकांना वाटे, अनेकदा झाडाखाली झोपावं लागलं, कधी दोनतीन दिवस अंघोळ नाही किंवा शेवाळलेल्या पाण्यानं अंघोळ करुन त्यांनी वारल्यांच्या पाड्यांवर प्रवास सुरू ठेवला. हे सगळं त्यांच्या 'जेव्हा माणूस जागा होतो' पुस्तकात मूळरुपातच वाचणं आवश्यक आहे.

या कामाबरोबर परुळेकर दाम्पत्यानं एका लढ्यात सहभाग घेतला होता तो म्हणजे दादरा नगर हवेलीचा मुक्तिसंग्राम. पोर्तुगीजांना हाकलून देण्यासाठी झालेल्या या मुक्तिसंग्रामात कॉ. भोसले, कॉ. परुळेकर आघाडीवर होते. त्यांनी पोर्तुगीजांच्या हद्दीतले खानवेल गाव स्वतंत्र केले. यासाठी भरपावसात त्यांना लढा द्यावा लागला होता.

कॉ. शामराव परुळेकर

कॉ. शामराव परुळेकर यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1902 रोजी झाला. विजापूर आणि अक्कलकोट येथे त्यांचे घर होते. कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लिश अशा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होते. अत्यंत तरुण वयातच कॉ. परुळेकर कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे ओढले गेले, त्याआधी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी भारावले होते आणि कामास सुरुवात केली होती.

शामराव परुळेकर यांचा विवाह गोदावरी यांच्याआधी मालतीबाई यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगीही होती. तरीही शामराव आणि गोदूताई यांनी विवाह केला होता.

विवाहानंतर अपत्य झाल्यास आपल्या कामाकडे दुर्लक्ष होईल या भावनेने गोदूताईंनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला होता. मुंबईत आधी अगदी लहानशा खोलीत संसाराला सुरुवात करुन नंतर त्यांना शामसावली नावाचं घर बांधलं होतं. परंतु उतारवयात त्यांना याच घरातून बाहेर पडावं लागलं होतं.

शामराव परुळेकर कायद्याचे अभ्यासक आणि स्वतःचे खटले स्वतः लढणारे गृहस्थ होते. त्यांचा युक्तिवाद अनेक कायदेपंडितांना आकर्षक वाटत असे. ते मुंबई विधानसभेचे सदस्य होते. स्वातंत्र्यकाळानंतर 1957 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते ठाण्यातून निवडले गेले.

शामराव परुळेकर दिल्लीत गेले तरी या दाम्पत्यानं आपली साधी राहाणी, वागणं सोडलं नाही. 1962 साली भारत-चीन युद्धाच्या वेळेस कम्युनिस्टांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं. तेव्हा या दोघांनाही जेलमध्ये जावं लागलं. 1965 साली कॉ. परुळेकरांचं आर्थर रोड जेलमध्ये निधन झालं. (संदर्भ- तेजस्वी ताराः गोदावरी परुळेकर, लेखिका डॉ. सौ. उषाताई कोटबागी, पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन)

परुळेकर दाम्पत्य आणि शोषित, शेतकरी, वारली, कामगार यात काही अंतर उरलंच नव्हतं. आपण करत असलेलं काम, आपला ध्यास याच्याशी ते दोघेही एकरुप झाले होते. कोणत्याही वस्तू जमा करणे, पैशांचा संचय करणे यात ते अडकलेच नाहीत.

कॉ. शामरावांनंतर...

गोदूताईंनी वारल्यांच्या लढ्यावेळेस आलेले अनुभव लिहून काढावेत यासाठी शामराव अत्यंत प्रयत्नशील होते. मात्र त्यांच्यासमक्ष ते काही काम पूर्ण झाले नाही.

पतीच्या निधनानंतर गोदूताईंनी लेखनाचं काम पूर्ण केलं आणि 1970 साली जेव्हा माणूस जागा होतो पुस्तक प्रसिद्ध झालं. त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. शामरावांनंतरही त्यांनी कम्युनिस्ट पक्षातलं काम सुरू ठेवलं.

पतीच्या तुलनेत त्यांना दीर्घायुष्य लाभलं. 1996 साली गोदूताईंचं निधन झालं. आपली सगळी पुस्तकं, फर्निचर, घरातल्या वस्तू त्या पक्षासाठी आणि आदिवासींसाठी ठेवून गेल्या.

गोदावरीताई कम्युनिस्ट असल्या तरी त्यांना इतर पक्षांकडूनही तितकाच मान मिळाला होता. त्यांच्या कामाची दखल सर्वच पक्षांनी घेतली होती. रा. स्व. संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमातही त्यांना बोलावण्यात आलं होतं. ही तेव्हाच्या मराठी जनमानसानं त्यांना स्वीकारल्याची पावतीच होती.

गोदूताईंच्या नावाने आज तलासरीत एक महाविद्यालय आणि सोलापुरात विडी कामगाराचं घरसंकुल आहे. बाकी त्यांच्याविषयी आजच्या महाराष्ट्रात फारशी आठवण निघत असावी असं वाटत नाही.

एकेकाळी आपल्या लखलखीत प्रकाशाने पूर्ण कामगार, शोषित वर्गाचं आयुष्य उजळवून टाकणाऱ्या शलाकेचं स्मरण सतत होईल असं काहीतरी व्हायला हवं.

संदर्भ - 1. 'जेव्हा माणूस जागा होतो', लेखिका- गोदावरी परुळेकर, मौज प्रकाशन

2. हरवलेले दिवस, लेखक- प्रभाकर उर्ध्वरेषे, मौज प्रकाशन

3. तेजस्वी ताराः गोदावरी परुळेकर, लेखिका डॉ. सौ. उषाताई कोटबागी, पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.