राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरंच एकत्र येतील? ठाकरे बंधूंची 20 वर्षांनंतर जोडी जमेल का?

    • Author, ओंकार करंबेळकर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासात अनेकवेळा बंड, फुटीचे प्रसंग आले.

छगन भुजबळ, नारायण राणे यांच्यासारखे पहिल्या फळीतले नेते शिवसेनेला सोडून गेले त्यावेळेस काही काळ शिवसनेत अस्वस्थता निर्माण झाली. तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची नक्की शिवसेना कोणती हा वादही तयार झाला.

पण एका बंडामुळे मात्र शिवसेनेत भावनिक वादळ निर्माण झालं ते म्हणजे राज ठाकरे यांचं.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीतरी एकत्र येतील अशी चर्चा सतत जागती ठेवली जाते. त्यांच्या आजूबाजूचे नेते, कार्यकर्ते किंवा नातेवाईक याबद्दल सूचक वक्तव्य करत असतात.

मात्र, आता प्रथमच या दोन्ही नेत्यांनी याबाबत उघड भाष्य केलं आहे. त्यामुळे हे नेते खरंच एकत्र येणार का? आले तर युती करणार की एकाच संघटनेत लढणार? महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना मदत करणार का असे प्रश्न, शक्यता उपस्थित झाल्या आहेत.

अचानक चर्चा का सुरू झाली?

या दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याच्या चर्चेला आज (19 एप्रिल) पुन्हा तोंड फुटण्याचं कारण म्हणजे दोन्ही नेत्यांनी केलेली वक्तव्यं.

राज ठाकरे यांनी अभिनेतेआणि सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक वक्तव्य केलं.

"कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद, भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत, महाराष्ट्र फार मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं- एकत्र राहाणं यात फार काही कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही.

परंतु हा विषय इच्छेचा आहे. हा माझ्या एकट्याच्या इच्छेचा विषय नाही. आपण महाराष्ट्राच्या एकूण चित्राकडे आपण पाहिलं पाहिजे. मला तर वाटतं सगळ्या पक्षातल्या मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा," असं राज ठाकरे म्हणाले.

एरव्ही 'लवकर प्रतिसाद देत नाहीत, फोन उचलत नाहीत', अशी तक्रार असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या वक्तव्यावर तत्काळ प्रतिसाद दिला आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी तो सशर्त प्रतिसाद आहे.

किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो. परंतु, एकीकडे त्यांना (भाजपाला) पाठिंबा द्यायचा आणि नंतर तडजोड, विरोध करायचा असं चालणार नाही.

महाराष्ट्राच्या आड जो कोणी येईल त्याचं आगत-स्वागत करणार नाही, त्याच्या पंगतीला बसणार नाही हे आधी ठरवा. मी माझ्याकडून भांडणं मिटवून टाकली पण आधी हे ठरवलं पाहिजे.

माझ्याबरोबर हिंदुत्वाचं हित होणार की भाजपाबरोबर हे मराठी माणसांनी ठरवलं पाहिजे. चोरांना गाठीभेटी, कळत नकळत त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ छत्रपती शिवरायांसमोर घ्यायची मग टाळी दिल्याची हाळी द्यायची," असं ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी विठ्ठलाबद्दल तक्रार नाही मात्र भोवतीच्या बडव्यांबद्दल आहे असं म्हणत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला.

शिवसेनेच्या सुरुवातीच्या वर्षांप्रमाणे मनसेनेही मराठीचा मुद्दा, मराठी पाट्यांचा मुद्दा वगैरे मुद्दे घेत यशही मिळवलं. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले तसेच लोकसभेतही मनसेचा सेना-भाजपा युतीला फटका बसला.

राज ठाकरेंना अंगाखांद्यावर खेळवलं आहे, त्याच्या जाण्याचं दुःख नक्कीच झालं हे शिवसेनाप्रमुखांनी मुलाखतींमध्ये बोलूनही दाखवलं. पण तरीही उद्धव आणि राज एकत्र येऊ शकले नाहीत.

त्याचवेळी लोकसभेच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपापल्या संघटना सांभाळत राहिले.

निवडणुकींच्या काळामध्ये एकमेकांवर थेट वारही करत राहिले. प्रचाराची पातळी बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या काळातल्या आहारापर्यंत येऊन पोहोचली होती. बाळासाहेब ठाकरेंना आजारपणात, तेलकट वडे खायला दिले जात, मी त्यांना चिकन सूप देत होतो असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यावरही शिवसेनेकडून प्रत्युत्तरं मिळणं असे प्रकार सुरू राहिले.

चंदूमामा ते फोडाफोडी

दोन्ही पक्षांमधून किंबहुना संघटनांमधून आजिबात विस्तव जात नसला तरी हे दोघे कधीतरी एकत्र येतील ही चर्चाही कायम राहिली. शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडणं, त्यावर मनसेने उत्तर देणं असे प्रकार सुरू राहिले. एकमेकांविरुद्ध दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकाही लढवल्या तरीही ते एकत्र येतील ही चर्चा कायम सुरू ठेवण्यात आली.

दोन्ही ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा यांनीही दोघं एकत्र यावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं होतं. कुटुंब, पक्ष, हेवेदावे, आरोप, राजकीय संघटना आणि भावना अशा विचित्र चक्रात हा एकत्र येण्याचा मुद्दा फिरतच राहिला.

अर्थात दोन्ही नेते कुटुंबातील विवाह सोहळे किंवा तशा कार्यक्रमांमध्ये जात राहिले. जवळच्या कुटुंबसोहळ्यात दोन्ही नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावल्याचं दिसलं आहे.

शरद पवारांच्या सानिध्यात

या काळात एक सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे हे दोन्ही भाऊ एका ठराविक काळासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सानिध्यात आले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाविरोधात सेना-भाजपा युती लढत होती. त्यावेळेस रितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर प्रचारात हल्ला चालवलेला होता. तर तिकडे राज ठाकरे मात्र शरद पवारांच्या जवळ गेलेले होते.

शरद पवार यांची मुलाखत घेणे, या निवडणुकीत भाजपाविरोधात आक्रमक प्रचार करण्यात असदुद्दीन ओवेसी, छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांचं मोठं योगदान होतं. मात्र निकालानंतर शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक टिकली नाही.

मराठीच्या मुद्द्याबरोबर राज ठाकरे यांनी अचानक हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला. त्यांचे बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे भगवी शाल पांघरलेले फोटोही प्रसिद्ध झाले.

तर ज्या शरद पवार यांचं कौतुक ते मुलाखतींमध्ये, कार्यक्रमांमध्ये करत होते त्याच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला अशी टीकाही त्यांनी सुरू केली.

याचवर्षी विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष निकालानंतर एकत्र आले. आता शरद पवारांच्या सानिध्यात जाण्याची वेळ होती उद्धव ठाकरे यांची.

निवडणुकीनंतर हे पक्ष अशाप्रकारे एकत्र येण्यावर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती. आजही ते या मुद्द्याचा वारंवार उल्लेख करतात.

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपाबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर संघटनेत मोठ्या हालचाली झाल्या.

नेत्यांची आयात-निर्यात, फोडाफोडी, पक्षाची कार्यालयं, चिन्ह, नाव हे सगळे वाद कोर्टात गेले. दोन्हीकडून आपणच मूळ सेना असल्याचा दावा केला जातो.

मात्र, एकनाथ शिंदे आणि मनसे यांचे संबंध चांगले म्हणावेत असेच राहिले. एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेणं, चर्चा करणं, स्नेहभोजन हे सुरूच राहिलं.

अगदी या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बाहेर पडलेले उदय सामंत यांनी राज यांची भेट घेणं, कधी दादा भुसे राज यांच्या घरी जाणं हा सिलसिला ठराविक गतीनं नित्य सुरू राहिला आहे.

आता तर एकनाथ शिंदे आणि मनसे पालिका निवडणुकीत एकत्र येतील अशीही चर्चा सुरू करण्यात आली होती.

तर उद्धव ठाकरे यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उपसलेली तलवार अधिकाधिक चालवायचं ठरवलं. एकनाथ शिंदे यांचा उल्लेख उद्धव आणि आदित्य यांनी एसंशि (एकनाथ संभाजी शिंदे) असा करायला सुरुवात केली आहे. इतकंच नाही तर आज राज ठाकरे यांना प्रतिसाद देतानाही शिंदे यांचा उल्लेख उद्धव यांनी एसंशि असा केला.

जोडी जमणार का?

राज आणि उद्धव यांनी अशी सूचक वक्तव्यं केली असली तरी गेल्या 20 वर्षांमध्ये भरपूर पाणी वाहून गेलं आहे. कडवट टीका, संघटनांमधील संघर्ष कायम राहिला.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांचे पुत्र लढत होते. दोघांचे मतदारसंघही शेजारीशेजारी होते. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना मनसेचे संदीप देशपांडे यांनी कडवे आव्हान दिलं होतं मात्र त्यात आदित्य विजयी झाले. तर माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना शिवसेना उबाठा गटाच्या महेश सावंत यांनी पराभूत केलं.

घरापर्यंत निवडणुका लढवून झाल्यावर हे नेते पुढे एकत्र येणार का? प्रश्न उरतोच. राज यांच्या वक्तव्यावर मनसेचे नेते आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी 2017चा पालिका निवडणुकीचा अनुभव पाहाता हे शक्य नाही असे वाटतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. कोणालाही युतीचा प्रस्ताव दिलेला नाही असंही देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

तर एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नेते उदय सामंत यांनी राज ठाकरे यांनी, "राजकीय स्वभाव पाहाता, कोणाच्या अटींच्या अधीन राहून ते निर्णय घेतील असं वाटत नाही, त्यांचा स्वतंत्र विचार आहे, ते त्यावर ठाम असतात. ही माझी अट आहे ती मान्य करुन माझ्याकडे ये असं कोणी सांगितलं तर ते ऐकतील असं वाटत नाही." असं मत व्यक्त केलं आहे.

दोन्ही नेत्यांच्या भूमिकेवर राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "महाराष्ट्र विरोधी शक्तीविरोधात राहाणं योग्य नाही. भाजपा आणि त्यांचे बगलबच्चे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायचं आहे. त्यांना ठाकरे हे नावच संपवायचं आहे.

अशा स्थितीत दोन्ही ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद दिला असेल तर महाराष्ट्र त्याचा स्वागत करतोय. पण आम्ही आता काय होईल याची प्रतीक्षा करू. आम्ही नक्कीच सकारात्मक दृष्टीने याकडे पाहात आहोत. सध्या वेट अँड वॉच ही आमची भूमिका आहे."

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबद्दल दिलेल्या सकारात्मक संकेतांवर, जुने शिवसैनिक आणि खंबीर नेते छगन भुजबळ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे आणि ठाकरे बंधूंची शक्ती निश्चितच वाढेल असे म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल भुजबळ म्हणाले की, 'मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे सर्वांना राज ठाकरेंसोबत राहण्याचा फायदा हवा आहे.'

भुजबळ पुढे म्हणाले की, "2014 मध्ये दोन्ही ठाकरेंना एकत्र येण्याची संधी होती, त्यावेळी सर्वजण वेगळे लढत होते, दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावे अशी अनेक लोकांची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे, पण हे इतक्या घाईघाईने होईल असे मला वाटत नाही. पण गेल्या काही वर्षांच्या राजकारणावर नजर टाकली तर काहीही होऊ शकते, एकत्र येणे त्या दोघांवर आहे, अटी मान्य होतात की नाही हे पाहणे बाकी आहे."

झुकेगा की नही झुकेगा?

"भाजपसारखा आक्रमक आणि राष्ट्रीय पक्ष केंद्रात सत्तेत असतो अशावेळेला प्रत्येकच राज्यातील प्रादेशिक पक्षांसमोर एक आव्हान निर्माण होतं. देशात सर्वत्र आपली सत्ता असावी यासाठी भाजप काम करत आहे.

अशा परिस्थितीत प्रादेशिक पक्ष वेगवेगळे लढले तर याचा फटकाही बसेल आणि आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अस्तित्व संपलं तर याचा दीर्घ काळ परिणाम होईल याची जाणीव राज ठाकरेआणि उद्धव ठाकरे यांना झाली असावं", असं मत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी व्यक्त केलं.

परंतु राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील किंवा तशा राजकीय प्रयोग होण्यासाठी प्रयत्न सुरू असतील तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हानही आहेत.

संदीप प्रधान सांगतात, "आतापर्यंत एकमेकांना खूप गोष्टी बोलून झाल्या आहेत. यामुळे आता एकत्र येताना दोघांनीही एकमेकांना स्पेस देणं गरजेचं आहे.

उद्धव ठाकरे यांचं संघटन कौशल्य आणि राज ठाकरे यांचा करिश्मा या दोन्ही पक्षांना फायदेशीर ठरू शकतो. तसंच उद्धव ठाकरे यांच्यात जी राजकीय असुरक्षितता आहे या स्वभावाला त्यांना मुरड घालावी लागेल. तर राज ठाकरे यांनाही 24 तास राजकारणाचा विचार करावा लागेल."

तीन 'सेना' एकत्र येण्याचा राजकीय प्रयोग?

शिवसेनेत फूट पडल्यानंतरचा घटनाक्रम आतापर्यंत सर्वश्रूत आहे. दोन शिवसेना पुन्हा एकत्र येणार का? असेही प्रश्न आतापर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना पत्रकारांनी विचारुन झालेत.

परंतु दोन्ही गटाकडून एकमेकांवर झालेली तीव्र टीका आणि आरोप प्रत्यारोप यानंतर हे नजिकच्या काळात कितपत शक्य आहे असाही प्रश्न आहेच.

परंतु राज ठाकरे यांचं मुलाखतीतून समोर आलेलं हे वक्तव्य या टायमिंगलाही महत्त्वाचं आहे. 15 एप्रिलला म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे निवासस्थानी स्नेहभोजनासाठी गेले होते. यानंतर शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या युतीचीही चर्चा सुरू झाली.

यामुळे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य हे या भेटीनंतर लगेचच आल्याने यामागे राजकीय डावपेच तर नाही ना? किंवा नवीन राजकीय प्रयोगाची चर्चाही सुरू झाली आहे.

यासंदर्भात बोलताना संदीप प्रधान म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांनी नुकतंच स्नेहभोजन घेतलं. यानंतर ही मुलाखत आली. यात काही भाजप किंवा यात काही राजकीय डावपेच नाही ना? हे सुद्धा तपासून पाहिलं पाहिजे.

राज ठाकरे यांनी युती करावी, काही जागा पदरात पाडून घ्याव्या, काही जागांवर उमेदवार येणार नाहीत, शिवाय, यातून बंडखोरी झाली त्याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसू शकतो.

यामुळे राजकीय डावपेच नाही ना, हे सुद्धा तपासलं पाहिजे किंवा तसं राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे."

"यातला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, मुंबई महानगरपालिका निकालानंतर मनसे आणि दोन्ही शिवसेना मिळून सत्ता स्थापन करू शकले तर तिन्ही शिवसेना पालिकेत नेतृत्त्व करू शकतात.

तिघे एकत्र आले तर शिवसेना वाढू शकते. तिन्ही पक्षाच्या युतीच्या केंद्रस्थानी राज ठाकरे राहिले तर हा राजकीय प्रयोग यशस्वी ठरू शकतो. आणि भाजपला सत्तेपासून रोखण्याचं श्रेय सुद्धा राज ठाकरे यांना मिळू शकतं,"

अर्थात या सर्व राजकीय शक्यता आहेत. पण मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना-मनसे एकत्र येण्याची शक्यता नाकारताही येत नाही, असं प्रधान म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)