You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल, विश्वास बसत नाही', निकालानंतर उद्धव ठाकरे भावनिक प्रतिक्रिया
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. कधी नव्हे एवढं मोठं यश एखाद्या आघाडीला या निवडणुकीत मिळाल्याचं पाहायला मिळालं.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिळालेलं बहुमत आणि जागांचे आकडे पाहता, आगामी दोन-तीन दिवसांत सत्ता स्थापनेचा दावा आणि पुढील प्रक्रिया सुरू होण्याचा अंदाजही वर्तवला जात आहे. त्यामुळं रविवारचा दिवसही राजकीय घडामोडी आणि सत्ताधाऱ्यांच्या जल्लोषाचा असणार आहे. तसंच या निकालांचं विश्लेषणही केलं जाईल.
महाराष्ट्रातील अनेक नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मात्र सपशेल अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालं आहे. महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपदही मिळेल की नाही? अशी एकूण स्थिती निकालानंतर निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला सत्ता मिळण्याची ही सलग तिसरी वेळ असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
तर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र माझ्याशी असं कसं वागला, यावर विश्वासच बसत नसल्याचं म्हटलंय.
अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं.
लाडकी बहीण योजना या संपूर्ण निवडणुकीत गेमचेंजर ठरल्याचं विश्लेषण सगळ्याच स्तरांतून केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच धार्मिक ध्रुवीकरण हाही मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा होता असं सांगितलं जात आहे.
अनेक बड्या नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामनाही करावा लागला. तर काही नेत्यांना अगदी काठावर विजय मिळवण्यात यश आल्याचं पाहायला मिळालं.
230 विरुद्ध 50
निकालातील जागांचा विचार करता महायुतीला या निवडणुकीत 230 जागावंर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 46 जागांवर समाधान मानावं लागलंय.
महायुतीच्या 230 जागांमध्ये भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर विजय मिळाला आहे.
महाविकास आघाडीचा विचार करता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवाकी काँग्रेसला 10 जागा मिळाल्या आहेत.
विरोधकांच्या जागा पाहता यावेळी विधानसभेत त्यांना विरोधीपक्ष नेतेपद मिळण्याची शक्यताही अत्यंत कमी आहे.
उद्धव ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाटेपेक्षा त्सुनामीच आली असं निकालावरून दिसत आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
त्याचवेळी हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटला की नाही? हाही प्रश्न पडलाय. हे आकडे पाहता सरकारला एखादं विधेयक विधानसभेत मांडण्याची गरजही राहणार नाही, असंही ते म्हणाले.
"भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले तसं सगळे पक्ष संपवून फक्त एकच पक्ष शिल्लक ठेवण्याच्या दिशेनं हा निकाल आहे काय? कोणत्या रागापोटी ही लाट उसळली हे कळत नाही. हा निकाल अनाकलनीय आहे. त्यामागचं गुपित काही दिवसांत शोधावं लागेल. पण लोकांनी निराश होऊन जाऊ नये किंवा खचून जाऊ नये," असंही त्यांनी म्हटलं.
काही लोकांना हा निकाल ईव्हीएमचा आहे असं वाटत आहे. कदाचित तसं असूही शकेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल, तर काहीही बोलायची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी लढत राहू, असं त्यांनी सांगितलं. वाढत्या महागाईची शाबासकी म्हणून महायुतीला हे मत दिलं का? असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
नवं सरकार लाडक्या बहिणींना ते 2100 रुपय देत राहतील, शेतकऱ्यांची कर्जमाफी करतील आणि हे जुमले होते असं न म्हणता आश्वासनं पूर्ण करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक प्रतिक्रियाही दिली. "कुटुंबप्रमुख म्हणून माझं सगळं काही ऐकणारा महाराष्ट्र माझ्याशी असा वागेल, यावर मला विश्वास नाही. नक्की काहीतरी गडबड आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे प्रेम, जिव्हाळा अतुलनीय - नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
ते म्हणाले, “एका ऐतिहासिक विजयात भाजपच्या नेतृत्वातल्या एनडीएने महाराष्ट्रात गेल्या 50 वर्षांत मोठा विजय मिळवला. राज्यात सत्ता येण्याची भाजपची ही सलग तिसरी वेळ आहे. विकासाचं व्हिजन आणि उत्तम प्रशासन यांच्याविषयी जनतेचा वाढता पाठिंबा यातून दिसून येतो.”
सलग एनडीएला सलग तिसऱ्यांदा सत्ता देणारं महाराष्ट्र हे सहावं राज्य आहे. त्यामुळे देशभरात युतीचं महत्त्व आणखी अधोरेखित होतं आहे. भारताच्या जनतेने भाजप आणि एनडीएवर पुन्हा विश्वास दाखवल्याचा पुनरुच्चार केला.
“उत्तम प्रशासनासाठी देशातल्या लोकांचा भाजप आणि एनडीएवर विश्वास आहे,” असं ते म्हणाले.
लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला - एकनाथ शिंदे
महायुतीला राज्यभरात मिळालेला कौल पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मतदारांचे आभार मानले.मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या तिन्ही नेत्यांनी आपली भूमिका मांडली.
"मोदी सरकार आमच्या पाठीमागे उभे राहिले, मोठ्या प्रमाणावर केंद्राने राज्याला लाखो कोटी रुपयांचं सहकार्य केलं. सामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला, विकास आणि योजनांची सांगड घातली", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडक्या बहिणींना सावत्र भावांना चांगलाच जोडा दाखवला आहे असंही ते म्हणाले.
'एक है तो सेफ है', हा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. जनतेने त्याला मान दिला आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
निर्णयात गडबड आहे असं शिवसेना (उबाठा) चे नेते संजय राऊत म्हणाले होते. त्यावर “EVM चा निर्णय मान्य आहे, मान्य आहे मान्य आहे.” असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.
बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का
या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालही लागले आहेत. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे मोठे नेते पराभूत झालेत. तर बच्चू कडू यांसारख्या नेत्यांनाही पराभवाचा सामना करवा लागला आहे.
संगमनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केला आहे. त्यांना एकूण 1 लाख 12 हजार 386 मतं मिळाली तर काँग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात यांना 1 लाख 1 हजार 826 मतं मिळाली.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा 39 हजार 355 मतांनी पराभव केला आहे.
माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य म्हणजे, अमित ठाकरेंनाही पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी त्यांचा पराभव केला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.
नवा मुख्यमंत्री कोण
निकालांनंतर आता महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांपैकी कुणाला मुख्यमंत्रिपद मिळणार आणि कोण उपमुख्यमंत्रिपदी राहणार, हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे.
सध्या ना-ना प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नेमकं कोण आहे आणि कुणाच्या हातात मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली जाऊ शकते, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री कोण या कळीच्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेण्याचा पुनरुच्चार केला. तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि अगदी आठवले साहेबांचाही सल्ला घेऊ", असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.