ट्रम्प यांना 'धास्तावलेल्या लोकांवर दया करा' असं सांगणाऱ्या बिशप बडी कोण आहेत?

    • Author, लेबो डिसेको
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एलजीबीटीक्यू+ समुदायातील लोक आणि स्थलांतरिताप्रती दया ठेवण्याची विनंती बिशप मरियन एडगर बडी यांनी केली.

मंगळवारी अमेरिकेतल्या वॉशिंगटन नॅशनल कॅथेड्रलमध्ये आयोजित केलेल्या एका प्रार्थना सभेत त्यांनी याविषयी बोलल्या.

विशेष म्हणजे, या प्रार्थनासभेला स्वतः राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून समलैंगिक समाज आणि स्थलांतरित ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहेत. त्याविरोधी धोरणं ट्रम्प राबवत आहेत.

अशात राष्ट्राध्यक्षांसमोर बेधडकपणे आपलं म्हणणं मांडणाऱ्या बिशप बडी यांचं कौतुक केलं जातं आहे.

त्यांचं हे पुरोगामी पाऊल चांगला ख्रिश्चन धर्मगुरू कसा असतो याचं उदाहरण आहे, असंही म्हटलं जातंय.

काही परंपरावादी ख्रिश्चन लोकांनी पहिल्या प्रार्थना सभेतच त्यांनी अशी मागणी करणं बरोबर नव्हतं असंही म्हटलं. एका धर्मोपदेशकांने त्यांची ही मागणी 'चुकीची आणि लाजिरवाणी' असल्याचं म्हटलंय.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'ट्रूथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बिशप बडी यांच्याविरोधात कडवी टीका करत त्यांना 'ट्रम्प विरोधक, कट्टर डाव्या विचारसरणीच्या' असं म्हटलं. तसंच, बिशप यांनी जाहीरपणे माफी मागावी, असंही ते म्हणाले मागणी त्यांनी केली.

वॉशिंग्टनच्या एपिस्कोपल चर्चच्या बिशप यांनी 15 मिनिटांच्या भाषणात कागदपत्र नसलेले स्थलांतरित आणि एलजीबीटीक्यू समुदायातल्या लोकांना त्यांच्या भविष्याबद्दल काळजी वाटत असल्याचं म्हटलं.

राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंचर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक कार्यकारी आदेशांवर सह्या केल्या. त्यातल्याच एक आदेश अमेरिकेत स्त्री आणि पुरूष या दोनच लिंगांना मान्यता दिली जाईल असा होता.

शिवाय, बेकायदेशीर स्थलांतरित आणि अमेरिकेच्या सीमेवर आश्रयासाठी आलेल्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी त्यांनी पटापट पावलं उचलली.

या बातम्याही वाचा:

बिशप मरियन एडगर कोण आहेत?

मरियन एडगर बडी या कोलंबिया आणि मेरिलँड राज्यातल्या चार काऊंटीमध्ये असलेल्या 86 एपिस्कोपल मंडळाच्या आध्यात्मिक नेत्या आहेत.

या पदावर येणाऱ्या त्या पहिलाच महिला आहेत. यासोबतच त्या वॉशिंग्टन नॅशनल कॅथेड्रलमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांचीही देखरेख करतात.

2011 मध्ये वॉशिंग्टनच्या एपिस्कोपल डायोसीसच्या बिशप पदी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना 'बिन्धास्त उदारमतवादी' असं म्हटलं गेलं.

या मुलाखतीतही त्या समलैंगिक विवाहाच्या समर्थनार्थ बोलल्या होत्या. या मुद्द्यावर एवढा विचार करण्याचीही गरज नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.

लोकशाहीवादी भागात त्यांच्या या पुरोगामी विचारांचं अनेकांनी स्वागत केलं.

ग्लोबल एंग्लिकन कम्युनियन या जगातल्या सर्वात मोठ्या ख्रिश्चन संप्रदायाचं एपिस्कोपल चर्च अतिशय उदारमतवादी असल्याचं मानलं जातं.

"देव प्रत्येक माणासवर प्रेम करतो हे सांगण्यासाठी आणि दाखवून देण्यासाठी झटणारं चर्च" अशी त्यांनी स्वतःची ओळख त्यांच्या वेबसाईटवर करून दिली आहे. शिवाय, तिथं कोणत्याही लिंगाची आणि लैंगिकतेची माणसं बिशप, पाद्री आणि धर्मगुरू म्हणून काम करतात, असंही त्यांनी म्हटलंय.

बिशप बडी यांची ओळख करून देताना चर्चच्या वेबसाईटवर अनेक गोष्टींचा उल्लेख केला . वर्णसमानता मानणाऱ्या, बंदुकीच्या हिंसेविरोधात काम करणाऱ्या, स्थलांतरितांसाठी काम करणाऱ्या आणि एलजीबीटीक्यू+ समुदायातील लोकांच्या संपूर्ण सहभागासाठी प्रयत्न करणाऱ्या, अशी त्यांची ओळख दिली आहे.

त्यांचे हे विचार अनेक परंपरावादी ख्रिश्चन लोकांना, विशेषतः इव्हेंजेलिकल म्हणजे बायबलचं पठण जास्त महत्त्वाचं आहे असं मानणाऱ्या अनुयायांना पटत नाहीत. हे अनुयायी ट्रम्प यांचे समर्थक आहेत.

त्यांच्या मते, एलजीबीटीक्यू+ समुदायातल्या लोकांना अधिकार देणं बायबलच्या शिकवणीच्या विरोधातलं आहे. त्यांचा हा दृष्टीकोन सरकारच्या धोरणांवरही प्रभाव पाडताना दिसत आहे.

स्थलांतरितांमुळे अमेरिकेला धोका निर्माण होईल असंही या परंपरावादी लोकांना वाटतं. त्यामुळेच माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची धोरणं मानवी तस्करीला प्रोत्साहन देणारी होती असे आरोप ते लावतात.

बडी यांनी आधीही केले आहेत ट्रम्प यांच्यावर आरोप

ट्रम्प यांच्यासोबतचं बिशप बडी यांचा हा पहिलाच वाद नाही. ट्रम्प यांच्या मागच्या कारकीर्दीत, जून 2020 मध्ये जॉर्ज फ्लॉईडची हत्या झाल्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीच्या सेंट जॉन एपिस्कोपल चर्च बाहेर बायबलसोबत फोटो काढला तेव्हा बिशप बडी यांनी त्यांच्यावर कडव्या भाषेत टीका केली होती.

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, "त्यांनी जे केलं आणि म्हटलं ते हिंसा भडकवणारं होतं. आपल्याला नैतिकतावादी नेतृत्वाची गरज आहे आणि आपल्यात फूट पाडण्याचे शक्य ते सगळे प्रयत्न त्यांनी केलेत."

या सगळ्या प्रकरणाकडे ख्रिश्चन धर्म नेमका कसा आहे? हे सांगणाऱ्या अमेरिकेतल्या दोन विरोधी विचारधारांमधला संघर्ष म्हणूनही पाहिलं जातं आहे.

दुसऱ्यांचा स्वीकार करणं आणि सामाजिक न्यायासाठी लढत राहणं हा येशूनं आपल्या जीवनातून दिलेला संदेश आहे, असं पुरोगामी लोकांना वाटतं.

तर देवानं सांगितलेल्या मार्गाचं पालन न केल्यामुळे देशातली नैतिकता कमी होत असल्याचं अनेक परंपरावाद्यांचं म्हणणं आहे.

हा संघर्ष गेल्या निवडणुकीतही स्पष्टपणे दिसत होता. फ्रँकलिन ग्राहम या प्रसिद्ध इवेंजेलिकल नेत्यानं ट्रम्पचा विजय हा ख्रिश्चनांचा आणि इवेंजेलिकल लोकांचा विजय असल्याचं म्हटलं.

मंगळवारी बिशप बडी यांच्या सभेतल्या भाषणानंतरही हा संघर्ष दिसून आला.

एकीकडे एपिस्कोपल चर्च स्थलांतरितांचं पुन्हा पुन्हा समर्थन करतंय. लोकांना छळापासून वाचवण्यासाठी देवानं दुसऱ्या देशात पाठवलं होतं, या ख्रिश्चन शिकवणीपासून आपण प्रेरणा घ्यायला हवी असं ते म्हणत आहेत.

तर दुसरीकडे, रिपब्लिकन पक्षाचे संसद सदस्य माइक कॉलिन्स यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बिशप बडी यांच्यावर टीका केली आहे. "असला उपदेश करणाऱ्या माणसाचंच नाव निर्वासितांच्या यादीत घालावं," असं ते म्हणाले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)