'तीन महिन्यात 200 जणांकडून लैंगिक अत्याचार', बांगलादेशी अल्पवयीन मुलीसोबत महाराष्ट्रात काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये मानवी तस्करीचं भीषण आणि भयंकर प्रकरण समोर आलं आहे. मीरा-भाईंदर पोलीस आणि काही स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येत, वसईतील एका इमारतीतून मूळची बांगलादेशची असलेल्या एका अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.
तीन महिन्याच्या कालावधीत या पीडित मुलीवर सुमारे 200 हून अधिक जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती स्वयंसेवी संस्थांना दिली. एक्सोडस रोड इंडिया फाऊंडेशन आणि हार्मोनी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांनी या पीडितेला मदत केली.
या पीडितेवर महाराष्ट्रातील वसई, मुंबई, अहिल्यानगर आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
26 जुलै 2025 रोजी मीरा-भाईंदर पोलिसांच्या अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या टीमच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
ही पीडित मुलगी बांगलादेशातील आहे. साधारण तीन महिन्यांपूर्वी परीक्षेत नापास झाल्यानं घाबरून घरी न जाता, ती दुसऱ्या गावात गेली आणि तिथून एका महिलेने तिला भारतात आणलं, अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली आहे.
याप्रकरणी आतापर्यंत जवळपास दहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून आरोपींवर पॉक्सो, पीटा (प्रिव्हेंशन ऑफ इमोरल ट्रॅफिकिंग कायदा) आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'परीक्षेत नापास झाल्यानं घरी गेली नाही आणि...'
वसईमध्ये पोलिसांनी छापा टाकून केलेल्या या कारवाईत 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.
बांगलादेशमधल्या एका गावात राहणारी 12 वर्ष 5 महिने इतकंच वय असलेली एक अल्पवयीन मुलगी शाळेच्या परीक्षेत नापास झाली आणि घाबरून घरी न जाता जवळच्या एका गावात पोहचली. तिथे तिची भेट तिच्याच गावातल्या एका महिलेसोबत झाली.
पीडित महिलेनं तक्रारीत सगळी माहिती दिलीय. तक्रारीतील माहितीनुसार, या महिलेने 'घरी गेली तर तुला मारून टाकतील' असं सांगून आपल्या घरी दोन दिवस ठेवलं आणि नंतर बांगलादेशमधून छुप्या पद्धतीने कोलकाता येथे घेऊन आली. तिथून विमानाने मुंबईत आणलं. याठिकाणी एका घरी आणलं गेलं, जिथे पाच ते सहा मुली राहत होत्या. इथं आल्यावर एक इंजेक्शन देण्यात आले आणि मी बेशुद्ध पडले. शुद्धीवर आले त्यावेळी आपल्याला रक्तस्त्राव होत होता आणि पोटात दुखत होतं.
यासंदर्भात आपण विचारणा केल्याचंही पीडित मुलीने आपल्या तक्रारीत सांगितलं आहे. परंतु, 'तुला तुझ्या गावी जायचे असेल तर तुला काम करावे लागेल' असं सांगण्यात आलं. कामाबाबत विचारले असता 'पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील' असंही सांगितल्याचं पीडित मुलीने तक्रारीत म्हटलंय.
"माझे वडील गावी परत जाण्यासाठी पैसे पाठवतील, असं सांगत आपण अशा कामास नकार दिला, पण सुरीने दुखापत करण्यात आलं, तसंच हातावर, पाठीवर चटके देण्यात आले," असं पीडित मुलीने तक्रारीत म्हटलंय.
इतकंच नाही, तर तिचा एक व्हीडिओ बनवल्याचंही तिने सांगितलं.
दररोज वेगवेगळ्या पुरुषांकडून खराब काम करून घेत असत आणि या कामाचे जे पैसे दिले जात, तेही माझ्यापर्यंत पोहोचत नसत, असाही आरोप पीडित मुलीनं तक्रारीत केलाय.

या सगळ्या अत्याचारानंतर पीडित मुलीने महिन्याभरात तिथून पळून जायंच ठरवलं आणि 500 रुपये घेऊन ती त्या घरातून पळून एका स्टेशनला पोहोचली.
वडिलांना फोन करून आपल्याला गावी यायचं आहे, असंही सांगितलं.
वडिलांनी एका इसमाचा संपर्क दिला आणि संबंधित इसमाकडे पोहचल्यानंतर, त्याने वसई इथल्या नायगाव इथं आणल्याचं पीडित मुलीने तक्रारीत सांगितलं आहे.
'या इसमाने देखील हेच काम करायला सांगितले. गावी सोडणार नाही असं म्हटलं. कामासाठी नकार दिल्यानंतर मारहाण करत असे,' असंही तिने सांगितलं.
'पुरुषांना या खोलीवर आणलं जात होतं. तसंच दुसऱ्या ठिकाणीही घेऊन जायचे. रेल्वेने 10 ते 12 तास प्रवास करून नेलं जात असे,' असंही पीडित मुलीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
आपल्या वडिलांनी संबंधित इसमाला अनेकदा फोन करून गावी पाठवण्यासाठी सांगितलं. शेवटी त्यांनीही बांगलादेशातील खुलना मॉडल पोलीस स्टेशनला संबंधित इसमाविरोधात तक्रार केल्याचं ती सांगते.
याच कारवाईत आणखी एका 21 वर्षीय बांगलादेशी मुलीची सुटका करण्यात आली असून तिने आपण 5 ते 6 वर्षांपूर्वी बांगलादेशातून आल्याचं सांगितलं आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
वसई-विरार पोलीस आयुक्तालय येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला 26 जुलै रोजी सकाळी यासंदर्भात माहिती मिळाली.
वसईतल्या एका इमारतीत काही दलालांकडून बांगलादेशी अल्पवयीन मुलीकडून जबरदस्ती वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्वयंसेवी संस्थाकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
याप्रकरणात आतापर्यंत जवळपास दहा जणांना अटक करण्यात आली आहे. यात तीन बांगलादेशचे आरोपी आहेत.
पोलिसांनी छापा टाकल्यानंतर पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून पीडितेला रिमांड होममध्ये पाठवण्यात आले.
पोलीस निरीक्षक अभिजीत मडगे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "एकूण दोन छापे टाकण्यात आले. पहिल्या छाप्यात तीन आरोपी पकडले गेले आणि दोन पीडितांना सोडवण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या छाप्यात तिघांना अटक करण्यात आली आणि तीन पीडितांना सोडवण्यात आलं. या पीडितांपैकी एक 12 वर्षीय मुलगी म्हणजे अल्पवयीन मुलगी आहे. तिने तिचा मोबाईल काढून घेतल्याचं सांगितलं. जी महिला तिला घेऊन आली तिचं पूर्ण नाव माहिती नाही."

"वसईपर्यंत घेऊन आले. मुंबईच्या कुठल्यातरी भागात ठेवलं. तिच्यावर अत्याचार झाले. तिथून ती सुटली आणि त्यानंतर रिक्षावाल्याकडून वडिलांना संपर्क केला. वडिलांनी एका बांगलादेशी नागरिकाचा संपर्क दिला. तो ही वेश्या व्यवसाय चालवायचा. त्यानेही पैसे लागतील अशी कारणं सांगून तिला दलालाकडे पाठवलं. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. छापा टाकला तिथेच अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.
"किती लोकांकडून लैंगिक अत्याचार झाला याची माहिती अद्याप नाही. एकाच विशिष्ट ठिकाणी घटना घडत असती तर माहिती असती. पण वेगवेगळ्या ठिकाणी हे सुरू होतं. हे दलाल, ते दलाल असं होतं. तिला दहा दिवसांसाठी गुजरातलाही पाठवलं, नंतर अहिल्यानगरला पाठवलं, असं सुरू होतं. गुजरातमध्ये सांगितलेल्या पत्त्यावर तिथून एका महिलेला पकडलं आहे. तसंच, अहिल्यानगरमधूनही आरोपींना अटक केली आहे. कोल्हापूरलाही पथक पाठवलं आहे."
ते पुढे सांगतात, "वैद्यकीय तपासात मारहाण, हाताला चटके या गोष्टी दिसून आलेल्या आहेत."
'तीन महिन्यात 200 हून अधिक जणांकडून लैंगिक अत्याचार'
या पीडितेसंदर्भात हार्मनी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
यासंदर्भात हार्मनी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अब्राहम मथाई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "26 जुलै 2025 रोजी नायगाव, वसई इथून वेश्याव्यवसायातून 12 वर्षीय मुलीची सुटका झाली. या 12 वर्षांच्या मुलीने रिमांड होममध्ये दिलेल्या माहितीनुसार, तिला तस्करांनी गुजरातमधील नडियाद येथे नेलं होतं. तीन महिन्यांत वेगवेगळ्या ठिकाणी 200 हून अधिक जणांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले."
डॉ. अब्राहम मथाई हे अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्षही आहेत.
ते पुढे म्हणाले की, "अशी क्रूरता अजिबात सहन केली जाऊ नये. तसंच, लैंगिक अत्याचार केलेल्या सर्व जणांवर कारवाई झाली पाहिजे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











