शर्लिन चोप्रानं ब्रेस्ट इम्प्लांट का काढलं? ते कशापासून बनवतात आणि किती दिवस टिकतं?

शर्लिन चोप्रा ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

फोटो स्रोत, sherlynchopra/IG

    • Author, डिंकल पोपली
    • Role, बीबीसी पंजाबी

"माझ्या छातीवरून हे जड ओझं उतरलंय. हे माझे ब्रेस्ट इम्प्लांट आहेत. प्रत्येकाचं वजन 825 ग्रॅम होतं. शस्त्रक्रियेनंतर मला फुलपाखरासारखं अगदी हलकं वाटतंय.

तरुण पिढीला विनंती आहे की, त्यांनी सोशल मीडियाच्या मोहात पडून स्वत:च्या शरीरावर कोणतेही प्रयोग करू नयेत" असं आवाहन अभिनेत्री आणि मॉडल शर्लिन चोप्रानं सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं.

शर्लिन चोप्रानं काही दिवसांपूर्वीच 'ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी' केली. तिनं तिच्या ब्रेस्टमधून सिलिकॉन कप्स काढून टाकले आहेत.

याबाबत तिने रविवारी (16 नोव्हेंबर) सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट करत माहिती दिली. या व्हीडिओमध्ये शर्लिनने सर्जरीद्वारे काढून टाकण्यात आलेले इम्प्लांटदेखील दाखवले.

तसेच, सोशल मीडियाच्या मोहात अडकून स्वत:च्या शरीराशी अजिबात छेडछाड करू नका, असं आवाहनही तिनं केलं.

काही दिवसांपूर्वी शर्लिनने सोशल मीडियावर पोस्ट करत ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकणार असल्याचं सांगितलं होतं.

तिला यामुळे काही काळापासून सतत त्रास होत होता. त्यामुळे तिने हे इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय घेतला. शर्लिनची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

मात्र, ब्रेस्ट इम्प्लांट नेमके कशाचे बनलेले असतात आणि ही सर्जरी कशी केली जाते? त्यात किती खर्च येतो? जाणून घेऊयात.

ब्रेस्ट इम्प्लांट म्हणजे काय?

ब्रेस्ट इम्प्लांट ही एक कॉस्मेटिक शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये स्तनाचा आकार वाढवण्यासाठी, बांधा सुडौल करण्यासाठी किंवा स्तन भरीव दिसण्यासाठी सिलिकॉन किंवा सलाइनने भरलेले कृत्रिम इम्प्लांट लावले जातात.

पंरतु, आजकाल वापरले जाणारे बहुतेक इम्प्लांट सिलिकॉनचे बनलेले असतात. जे गोलाकार, लवचिक आणि जेलने भरलेल्या पॅडप्रमाणे दिसतात. त्यांना स्तनाखाली लहान चिरा देऊन सुरक्षितपणे इम्प्लांट केलं जातं.

लुधियानातील प्रोफाईल फोर्ट क्लिनिकचे मालक आणि प्लास्टिक सर्जन डॉ. विकास गुप्ता सांगतात, "मी गेल्या 15 वर्षांपासून ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करतोय. पूर्वी सलाइन भरलेले इम्प्लांटही वापरले जायचे, पण ते फुटण्याचा धोका असल्याने आता बंद झाले आहेत."

"आजकाल शस्त्रक्रियेद्वारे स्तनांमध्ये सिलिकॉनचं रोपण केलं जातं. हे सिलिकॉन इम्प्लांट इतके नैसर्गिक दिसतात की शस्त्रक्रिया झाली आहे, हेही कोणाला कळत नाही."

डॉ. विकास गुप्ता यांच्या मते, इम्प्लांट करताना रुग्णाच्या खांद्याचा आकार, त्वचेचा प्रकार, उंची, वजन आणि इतर शारीरिक रचना आदिंची तपासणी करुनच पुढचा सल्ला दिला जातो.
फोटो कॅप्शन, डॉ. विकास गुप्ता यांच्या मते, इम्प्लांट करताना रुग्णाच्या खांद्याचा आकार, त्वचेचा प्रकार, उंची, वजन आणि इतर शारीरिक रचना आदिंची तपासणी करुनच पुढचा सल्ला दिला जातो.

डॉ. गुप्ता सांगतात की, इम्प्लांट एकदा बसवल्यावर आयुष्यभर त्यांना बदलण्याची गरज नसते.

लुधियाना येथील ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमसी) आणि हॉस्पिटलमधील प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. पिंकी परगल सांगतात की, "सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे गेल्या दशकभरात ब्रेस्ट इम्प्लांट्स सर्जरीचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे."

डॉ. पिंकी म्हणतात, "अशा कॉस्मेटिक प्रक्रिया नवीन नाहीत, परंतु सोशल मीडिया आल्यानंतर त्यांचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सर्व प्रक्रिया आता सामान्य लोकांच्या आवाक्यात आल्या आहेत. त्या पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त झाल्या आहेत, ज्यामुळे बरेच लोक या प्रक्रियेकडे आकर्षित होत आहेत."

ब्रेस्ट इम्प्लांटने स्तनाचा आकार किती वाढवता येतो?

अभिनेत्री शर्लिन चोप्राने तिच्या एका ब्रेस्ट इम्प्लांटचं वजन 825 ग्रॅम असल्याचं म्हटलं होतं. पण बीबीसीशी बोलताना तज्ज्ञांनी सांगितलं की, हे इम्प्लांट मिलीलीटर या एककात मोजतात. भारतात फक्त 350 ते 400 मिलीलीटरचे इम्प्लांट्स सुचवले जातात.

डॉ. विकास सांगतात की, "या शस्त्रक्रियेपूर्वी सर्जन आधी शरीराच्या नैसर्गिक संरचनेची तपासणी करतो आणि त्या तपासणीच्या आधारे योग्य साईजचा इम्प्लांट सुचवतो. भारतीय शारीरिक रचनेनुसार 350 ते 400 मिलीलीटरपेक्षा मोठ्या इम्प्लांटची शिफारस केली जात नाही."

ब्रेस्ट इम्प्लांटचा आकार किती असावा हे रुग्णाच्या खांद्याचा आकार, त्वचेचा प्रकार, उंची, वजन आणि इतर शारीरिक रचना आदिंच्या तपासीवर अवलंबून असतं, असं डॉ. विकास सांगतात.

शर्लिनने तिच्या स्तनातून काढलेल्या इम्प्लांटचा फोटो पोस्ट केला होता.

फोटो स्रोत, sherlynchopra/IG

फोटो कॅप्शन, शर्लिनने तिच्या स्तनातून काढलेल्या इम्प्लांटचा फोटो पोस्ट केला होता.

डॉ. पिंकी परगल यादेखील हेच सांगतात. मात्र, भारतात अनेक बेकायदेशीर किंवा प्रशिक्षित नसलेले लोकही अशा कॉस्मेटिक सर्जरी करतात, ज्यामुळं ठरलेल्या वैद्यकीय नियमांचं योग्यरित्या पालन होत नाही, असंही त्या म्हणाल्या.

"कोणताही तज्ज्ञ डॉक्टर रुग्णाच्या इच्छेनुसार कोणताही आकार बसवणार नाही. ते प्रथम तपासणी करतील आणि त्यानुसारच क्लायंटला त्यांच्यासाठी कोणत्या आकाराचे इम्प्लांट योग्य राहिल याचा सल्ला देतील."

"पण असे काही अनधिकृत प्रॅक्टिशनर्सही आहेत जे पैशासाठी कोणत्याही आकाराचे इम्प्लांट बसविण्याचा सल्ला देतात."

ब्रेस्ट इम्प्लांटची गरज का?

तज्ज्ञांच्या मते, स्तनातील दोष आणि विकृती सुधारण्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.

एखादी महिली स्तनाच्या आकाराबाबत समाधानी नसेल अशावेळी किंवा ट्रान्सजेंडर व्यक्तीमध्ये स्तन प्रत्यारोपणासाठीही ही शस्त्रक्रिया केली जाते.

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. पिंकी सांगतात, "अनेकजण याकडे फक्त कॉस्मेटिक प्रक्रिया म्हणून पाहतात, परंतु, ज्या महिलांचे स्तन नैसर्गिकरित्या पूर्णपणे विकसित झालेले नाहीत त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.

पंरतु, जर कोणी सोशल मीडियाच्या प्रभावाखाली ही प्रक्रिया करण्याचा विचार करत असेल, तर त्यांनी याची खरच काही गरज आहे का? हा प्रश्न स्वतःला नक्कीच विचारला पाहिजे."

ब्रेस्ट इम्प्लांटवर किती खर्च येतो आणि किती वेळ लागतो?

डॉ. पिंकी सांगतात की, "या सर्जरीला सुमारे 50,000 ते 1,50,000 पर्यंतचा खर्च येऊ शकतो. हा खर्च इम्प्लांटच्या आकार, त्याची गुणवत्ता आणि डॉक्टरांची फी यावर अवलंबून असतो.

या सर्जरीसाठी एक दिवस लागतो. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिनाभर योग्य आहार आणि काळजी घ्यावी लागते.

एकदा रोपण केल्यानंतर, हे इम्प्लांट आयुष्यभर टिकतात. ते खराब होत नाहीत. पण जर क्लायंटला ते काढून टाकायचे असतील तर ते सहजपणे काढता येतात. योग्य काळजी घेतल्यास, ब्रेस्ट इम्प्लांट आयुष्यभर टिकू शकतात."

यात काही धोका असतो का?

डॉ. विकास म्हणतात की, यामध्ये इतर कोणत्याही शस्त्रक्रियेइतकाच संसर्गाचा धोका असतो.

" यामुळे कॅन्सरचा धोका होऊ शकतो किंवा महिलांना स्तनपान करण्यात अडचण येईल, अशी काळजी अनेक लोकांना वाटते. परंतु अशी कोणतीही अडचण येत नाही", असं डॉ. विकास यांनी सांगितलं.

शर्लिन चोप्रा कोण आहे?

शर्लिन चोप्रा ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ती हिंदी आणि तेलुगू चित्रपटांत तिनं भूमिका केल्या आहेत. 38 वर्षीय शर्लिननं 2007 साली रेड स्वस्तिक नावाच्या हिंदी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.

शर्लिन सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. ती स्वत:ची ओखळ अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्त्या, निर्माती आणि एलएलबी पदवीधर अशी सांगते.

शर्लिन चोप्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शर्लिन चोप्रा

नुकतंच तिने ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल शस्त्रक्रिया केली. इम्प्लांट्समुळे होणारा त्रास आणि समस्या लक्षात घेऊन, तिनं हे इम्प्लांट्स काढण्याचा निर्णय घेतला.

सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकून कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नका. जसे आहात तसेच असण्याचा प्रयत्न करा, स्वत:च्या शरीराशी खेळू नका, असं आवाहन तिने चाहत्यांना केलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.