You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नागपुरातील तरुण पहिल्याच प्रयत्नात बनला 'आयर्नमॅन', अशी केली होती तयारी?
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
साहसी खेळाच्या जगात 'आयर्नमॅन ट्रायलथन'ला एक विशेष स्थान आहे. वयाची 18 वर्षं पूर्ण झाल्याशिवाय या स्पर्धेत सहभाग घेता येत नाही पण नागपूरच्या दक्ष खंतेनी त्याच्या 18 व्या वाढदिवसालाच स्पर्धेत नोंदणी केली, स्पर्धा पूर्ण केली आणि स्वतःला एक अनोखं गिफ्ट दिलं.
ऑस्ट्रेलियात बसल्टन या ठिकाणी दक्षने 'आयर्नमॅन' ही पदवी मिळवली आहे. हे या रेसचं 20 वे वर्ष होतं. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातील 3500 अथलिट सहभागी झाले होते. दक्षची या स्पर्धेतील रँकिंग 892 इतकी आहे.
'आयर्नमॅन ट्रायलथन' ही एक अत्यंत चुरशीची स्पर्धा मानली जाते. धावणे, पोहणे आणि सायकलिंग या तिन्ही गोष्टी विशिष्ट वेळेत पूर्ण कराव्या लागतात. तेव्हा त्या व्यक्तीला आयर्नमॅन घोषित केलं जातं. या स्पर्धेसाठी जगभरातून स्त्री-पुरुष येतात. प्रसिद्ध अभिनेते मिलिंद सोमण हे देखील 'आयर्नमॅन' आहेत. तसेच IPS अधिकारी कृष्णप्रकाश यांनी देखील ही स्पर्धा पूर्ण केल्यामुळे त्यांना 'आयर्नमॅन' म्हटले जाते.
दक्षने 14 तास 14 मिनिटांमध्ये आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली असून त्यानं 1 तास 34 मिनिटांमध्ये 3.9 किलीमीटर समुद्रात पोहण्याचं आव्हान पूर्ण केलं. त्यानंतर 180 किलोमीटर सायलिंगचं आव्हान 6 तास 40 मिनिटात, तर 5 तास 36 मिनिटात 42 किलोमीटरची रनिंग पूर्ण केली.
दक्ष स्पर्धेसाठी जाणार होता तेव्हा त्याला 18 वर्ष पूर्ण नव्हती. पण, स्पर्धेच्या दिवशीपर्यंत 18 वर्ष पूर्ण झाली तरी या स्पर्धेत सहभागी होता येतं. दक्षचा वाढदिवस 1 डिसेंबरला येतो आणि स्पर्धेच्या दिवशी त्यानं 18 वर्ष पूर्ण केली आणि तो स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्यानं 18-24 वयोगटात 14 तास 14 मिनिटांमध्ये तिन्ही आव्हानं पूर्ण केली.
दक्षचे वडील अमोल खंते साहसी खेळ प्रशिक्षक म्हणून काम करतात. ते कुटुंबासोबत चार महिने मनालीला राहतात, इतर दिवस नागपुरात राहतात. त्यांचं नागपूरपासून 50 किलोमीटर दूर असलेल्या रामटेक इथं अॅडव्हेंचर्स फार्म आहे. तिथं ते साहसी खेळांचं शिबिर सुद्धा घेतात. अमोल गेली 19 वर्ष हे काम करतात.
दक्षनं गिर्यारोहणाचे प्रशिक्षणही घेतलं आहे. तो लहानपणापासून पोहण्यातही तरबेज आहे. शालेय वयापासूनच तो सायकलिंग आणि पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेत असे.
त्यानं 17 व्या वाढदिवशी स्वतःलाच एक आव्हान दिलं की आपल्याला 21 किलीमीटर धावू.
तो त्या दिवशी पहाटे 5 वाजता उठून धावायला गेला आणि त्यानं 21 किलोमीटर पूर्ण केलं. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला होता.
18 वर्षं पूर्ण झाल्यावर एखाद्या स्पर्धेत भाग घेण्याचा त्याचा विचार होता. यातूनच त्याला आयर्नमॅन स्पर्धेबद्दल कळले.
पण यासाठी तयारी देखील हवी. हा विचार करुन दक्षला नागपुरातील डॉ. अमित समर्थ यांच्या अॅकेडमीत टाकण्यात आलं असं दक्षचे वडील अमोल सांगतात.
'ते म्हणाले यू आर आयर्नमॅन तेव्हा...'
आयर्नमॅन दक्षने बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपला अनुभव सांगितला.
"आयर्नमॅन पूर्ण केल्यानंतर जगातल्या तंदुरुस्त लोकांमध्ये आपला समावेश होतो. अशा तंदुरुस्त लोकांमध्ये माझा समावेश झाल्यानं मला खूप आनंद झाला.
"मी माझ्या 18 व्या वाढदिवशी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करायचं आव्हान स्वतःसमोर ठेवलं होतं आणि हे आव्हान पूर्ण झालं तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा होता. माझी रेस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी यू आर आयर्नमॅन अशी घोषणा करताच मला काही सूचतच नव्हतं. माझं आव्हान पूर्ण झालं याचा निव्वळ आनंद होता," असं दक्ष म्हणाला.
दक्ष अभ्यासातही हुशार आहे. दहावीत 96 टक्के आणि बारावीत 86 टक्के घेऊन तो उत्तीर्ण झालाय. सध्या तो जबलपूरच्या IIIT मध्ये डिजाईनिंगमध्ये पदवीचं शिक्षण घेतोय.
त्याला मोठं डिजायनर बनायचं आहे. त्यासोबत तो आपल्या खेळावर पण लक्ष देतो.
दक्ष सांगतो, आयर्नमॅनसाठी तयारी करताना कॉलेज आणि प्रशिक्षण दोन्ही सांभाळणं थोडं अवघड जात होतं. कारण, कॉलेज जबलपूरला होतं आणि तिथं स्विमिंगसाठी चांगली सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे दर शनिवार, रविवारी मला स्विमिंगसाठी नागपूरला यावं लागायचं.
स्विमिंगचा सराव करून रात्री नागपूरवरून बसायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये जायचं. तसेच सायकलिंगसाठी पण कॉलेजपासून 25 किलोमीटर अंतरावर जावं लागत होतं. पण, कॉलेज आणि प्रशिक्षण दोन्ही व्यवस्थित सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्पर्धेसाठी मानसिकरीत्या तयार होण्यासही मदत झाली, असं दक्ष सांगतोत.
'आई-बाबांचा चेहरा आठवला आणि परत धावत सुटलो'
प्रत्यक्ष स्पर्धेतला अनुभवही दक्षने सांगितला.
तो म्हणतो, “ऑस्ट्रेलियात सध्या उन्हाळा सुरू आहे. वातावरणही चांगलं असतं. पण, रेसच्या दिवशी वारा होता आणि पाऊस पण आला होता. स्विमिंग करताना अचानक खूप वारा सुरू झाला. लाटांमुळे समोर जाऊ शकतो नव्हतो. वारा आणि लाटांच्या जोरामुळे गॉगल निघणं, दुसऱ्या स्विमरला हात-पाय लागणं अशा गोष्टी घडत होत्या. थोड्या वेळासाठी अवघड वाटलं. पण, मी स्विमिंग पूर्ण केलं. सायकलिंग करताना पण पाऊस सुरू झाला."
"वाऱ्यामुळे सायकलिंगची गती कमी होत होती. पण, तेही व्यवस्थित पूर्ण झालं. रनिंगच्या वेळी शेवटचे दहा किलोमीटर अवघड गेले. पायात क्रॅम्प आला होता. थोडावेळ थांबलो. आतापर्यंत केलेली मेहनत आठवली, आई-बाबा आणि लहान बहीण यांचा चेहरा आठवला आणि परत धावत सुटलो. तरी शेवटचे दोन किलोमीटर फार अवघड जात होते. पण, आई भारताचा तिरंगा घेऊन उभी होती. तू हे करू शकतोस असा विश्वास आईने दिला होता त्या बळावरच मी आयर्नमॅन पूर्ण केलं,” दक्ष सांगतो.
'मुलांच्या स्क्रीन टाइमपेक्षा ग्रीन टाइम वाढवा'
दक्षनं आयर्नमॅन पूर्ण केली हे माहिती होताच माझ्यासह नातेवाईक आणि शेजाऱ्यांना खूप अभिमान वाटला. हजारो मुलं आमच्या कॅम्पमध्ये येतात. त्यांना सगळ्यांना मी प्रशिक्षण देतो.
लोकांच्या मुलांसाठी वर्षभर काम करतो तेच आशीर्वाद माझ्या मुलाला मिळाले, असं दक्षचे वडील अमोल सांगतात.
निसर्गासोबत वेळ घालवल्यानं सगळ्या गोष्टींमध्ये संतुलन राखता येतं, आजकाल मुलांचा स्क्रीन टाइम वाढतोय. त्यापेक्षा त्यांचा ग्रीन टाइम वाढवा, असं आम्ही लोकांना सांगतो.
तेच आता माझ्या मुलानं सिद्ध करून दाखवलं. माझे दोन्ही मुलं अभ्यास आणि खेळ या दोनच गोष्टींवर लक्ष केंद्रात करतात. सोशल मीडियापासून फार दूर आहेत, असं अमोल सांगतात.
'त्यानं आयर्नमॅन पूर्ण करताच माझ्या डोळ्यात अश्रू आले'
दक्षने एक खेळाडू व्हावे अशी दक्षच्या आई एकता खंते देखील इच्छा होती.
एकता सांगतात, "माझा मुलगा चांगला खेळत होता. हे तिथं असलेले लोक पण म्हणत होते. मी त्यांना सांगितलं की हा माझा मुलगा आहे आणि आज त्याचा वाढदिवस आहे तर काहीजण म्हणाले इतक्या कमी वयात इतकी कठीण रेसमध्ये का सहभागी होऊ दिलं?"
"पण, निकाल लागताच माझ्या मुलानं त्याचं उत्तर दिलं. त्यानं आयर्नमॅन पूर्ण केलं तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले. आजूबाजूचे सगळे लोक शुभेच्छा देत माझी गळाभेट घेत होते. त्यावेळी वाटलं दक्ष बस्स झालं. या वयात तू आम्हाला खूप काही दिलंस. मुलाला जवळ घेतलं आणि जोरात मिठी मारली," असं दक्षची आई एकता खंते सांगतात.
जगातला सगळ्यांत तरुण आयर्नमॅन?
दक्षची 18-24 वयोगटात 66 वी रँक असून पूर्ण आयर्नमॅन स्पर्धेत त्याची रँक 892 आहे.
त्यानं वाढदिवसाच्या दिवशी आयर्नमॅन पूर्ण केल्यानं तो जगातील सगळ्यात तरुण आयर्नमॅन असल्याचा त्याच्या आई-वडिलांचा दावा आहे.
कारण, त्यांनी तिथं 18-24 वर्ष वयोगटात विचारपूस केली तर इतर मुलं 20-21 वर्षांची होती. नुकताच 18 वर्ष पूर्ण झालेला दक्ष एकमेव होता. त्यामुळे आता आम्ही सर्वांत तरुण आयर्नमॅन अशा टायटलसाठी त्यांच्याकडे अर्ज केला असल्याचं दक्षची आई एकता म्हणाल्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)