स्पेनमधील पुरामुळे मोठं नुकसान, मृतांचा आकडा 211 वर, बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू

    • Author, लॉरा गोज्जी
    • Role, बीबीसी न्यूज

स्पेनमध्ये अचानक आलेल्या महापुराने मोठं नुकसान केलं असून पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे लोकांना धक्का बसलाय.

शनिवारी (2 नोव्हेंबर) मृतांचा आकडा 211 वर पोहोचला आहे. बहुतांश जीवितहानी वॅलेन्शिया भागात झाली आहे असं स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी सांगितलं आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

स्पेनच्या पंतप्रधानांनी 5000 अतिरिक्त तुकड्या आणि 5000 पोलीस अधिकारी तसंच नागरी सुरक्षा रक्षकांना पाचारण केलं आहे. वॅलेन्शिया या भागात आलेला पूर स्थानिक प्रशासनाने योग्य पद्धतीने हाताळला नाही अशी टीका नागरिकांनी केली आहे. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

सोमवारी (28 ऑक्टोबर) सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे पूल वाहून गेले आहेत. अनेक शहरांत चिखल झाला आहे. संवादाची साधनं बंद पडली आहे. त्यामुळे लोकांना अन्न, पाणी आणि विजेचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.

युरोपात सध्या अतिशय भीषण पूर आला आहे. या पुराशी दोन हात करण्यासाठी आपात्कालीन सेवा आणि लष्कराला सर्वांत मोठ्या संख्येने तैनात करण्याची स्पेनची ही पहिलीच वेळ आहे.

आतापर्यंत तो प्रतिसाद दिला आहे तो पुरेसा नाही याची जाणीव असल्याचं पंतप्रधान सांचेझ यांनी मान्य केलं आहे. लोकांना अनंत अडचणी येत असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. अनेक लोक अजूनही आपल्या नातलगांचा शोध घेत आहेत. तसंच अनेक लोकांना आपल्या घरात जात येत नाहीये.

चिखलामुळे लोकांची घरं माखली आहेत किंवा उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळे आम्हाला आणखी चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळायची आहे असं ते पुढे म्हणाले.

वातावरणाबद्दलचा अलर्ट रविवारपर्यंत कायम राहणार आहे. बॅलरिक बेटांसाठी शनिवारीसुद्धा एक इशारा देण्यात आला आहे.

वॅलेन्शिया भागात 1700 सैनिक बचावकार्यात गुंतले आहेत. या पुरात बचावलेल्या लोकांची सापडण्याची शक्यता आता धूसर होत आहे.

कार पार्किंग आणि भूमिगत बोगद्यांमधून पाणी काढायला प्राधान्य दिलं जात आहे.पाण्याची पातळी वाढल्यामुळे अनेक लोक इथे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

“पाणी वाढताना लाटामागून लाटा येत होत्या. त्सुनामी आल्यासारखं वाटत होतं.” असं गुईलोरमो सेरानो पेरेज हा स्पेनचा नागरिक पुराची भयानक परिस्थिती सांगताना म्हणाला.

मंगळवारी (29 ऑक्टोबर) रात्री अचानक आलेल्या महापुरात अडकलेल्या हजारो लोकांमध्ये पेरेज 21 वर्षांचा तरुणही होता. वॅलेन्सिया या मोठ्या शहराजवळच्या पाईपोर्ता नावाच्या छोट्या शहरात तो राहतो.

पूर आला तेव्हा तो आपल्या आई वडिलांसोबत महामार्गावर गाडी चालवत होता. अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात कार सोडून दिली आणि त्याच्यासकट त्याचं कुटुंब एका पुलावर चढून बसल्यामुळे वाचला.

परिसरात खूप वेळापासून मुसळधार पाऊस सुरू होताच. तरीही, पूर ज्या पद्धतीनं आला ते पेजर आणि कुटुंबीयांसाठी अनपेक्षित होतं.

पहिल्यांदाच पाहिलं असं भयंकर दृश्य

असा मोठा पूर येईल असे संकेतही दिले गेले होते. मंगळवारी सकाळी सात वाजता स्पेनच्या हवामान विभागानं वॅलेन्सियामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं होतं.

“सावध रहा. धोका जास्त आहे. खूप गरज असेल तरच प्रवास करा,” असं हवामान खात्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं होतं.

त्यानंतर पूर्ण दिवस धोक्याची सूचना दिली जात होती. नद्यांच्या किनारी जाऊ नका अशी सुचनाही लोकांना दिली होती.

वॅलेन्सियाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या फुएंत आणि अतायल या शहरांच्या गल्ल्यांमधे पूर आला असल्याचे फोटो दुपारी साडेतीनच्या आसपास रीजनल इमर्जन्सी कोऑर्डिनेशन सेंटरने प्रसिद्ध करणं सुरू केलं. यानंतर काही तासतच नदीतलं पाणी वाढत असल्याने लोकांनी किनाऱ्याजवळच्या भागांमध्ये जाऊ नये असं या केंद्राकडून सांगण्यात आलं होतं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

तिथून 20 किलोमीटर लांब असलेली ‘चिवा’ ही या महापुराचा सामना करणारी पहिली जागा ठरली.

शहरातून जाणारी ही खोल दरी पूर्णपणे पाण्यानं भरून गेली होती.

संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शहरातल्या गल्ल्यांनाही खळखळणाऱ्या नद्यांचं रूप आलं होतं. पाण्याचा वेग इतका होता की यात चारचाकी गाड्या, रस्त्यावरचे दिवे आणि लहान मुलंही वाहून गेली.

मदतीसाठी आप्तकालिन सेवा पुरवणाऱ्यांची संपूर्ण भागात धावाधाव सुरू होती. पण पाण्याच्या अशा वेगाचा कुणालाच अंदाज नव्हता.

असं आधी कधीही झालेलं नव्हतं. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच असं भयंकर दृश्य पाहिलं असल्याचं अनेक लोक म्हणत होते.

इशारा द्यायला झाला उशीर

अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि काही मिनिटांमध्येच पाणी एक ते दीड मीटरपर्यंत वर चढलं, असं रिबा-रोजा-डे तुरिया या शहराच्या महापौरांनी सांगितलं.

इतर भागातून माणसं पाण्यात वाहून जाऊन बेपत्ता झाल्याच्या बातम्या यायल्या लागल्या.

तरीही नागरी सुरक्षा विभागाकडून वॅलेन्सियावासियांना रात्री 8 नंतर घराबाहेर न पडण्याचा, प्रवास न करण्याचा इशारा देण्यात आला नाही.

स्पेनच्या हवामान खात्याने पहिला रेड अलर्ट दिल्यानंतर जवळपास 12 तासांनी त्यांनी इशारा दिल्याचं म्हणत अनेकांनी त्यावर आक्षेप घेतले आहेत.

इशारा इतक्या उशीरा आला की लोकांना उंच भागात आश्रय घ्यायला जाणंही शक्य नव्हतं आणि कामावरून घरी परत येणाऱ्या अनेक लोकांना रस्ता सोडून कुठे जाताही येत नव्हतं.

वॅलेन्सियातून जवळच्या पिकासेंट या शहराच्या दिशेने पॅको त्यांच्या गाडीतून जात होते. रस्ता अचानकच पुराच्या पाण्याने भरून गेला आणि ते अडकून बसले.

“पाण्याचा वेग वेडावून टाकणारा होता. त्यात कार वाहून गेली. पाण्याचा दाबही खूप होता. मी कसातरी कारमधून बाहेर पडलो आणि पाण्याच्या वेगामुळे एका कुंपणावर जाऊन आदळलो. मी ते कुंपण धरून ठेवलं. पण मला हलताच येत नव्हतं,” अल मुंडो या वृत्तपत्राला सांगताना पॅको म्हणाले. “पूर मला हलूच देत नव्हता. माझे कपडेही फाटले होते,” त्यांनी पुढे सांगितलं.

सेदावीच्या पॅट्रिशिया रोड्रिग्ज कामावरून घरी परतत असताना पुरात अडकल्या.

पाईपोर्तमध्ये ट्रॅफिकमधे त्या थांबल्या होत्या तेव्हा समोरून पाणी येताना दिसलं आणि त्यात त्यांच्यासमोरच्या एक एक गाड्या वाहून येत होत्या, असं स्थानिक मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलं.

“ते दृश्य पाहून आम्ही सगळेच घाबरलो. नदीचं पाणी किनारे तोडून खूप वेगाने वाढत होतं,” त्या म्हणाल्या. दुसऱ्या गाडीतल्या एका माणसाच्या मदतीनं त्या कशातरी उभ्या राहिल्या. अतिशय घाबरलेल्या. तेव्हाच त्यांनी एका तरुण मुलाला त्याच्या नवजात बाळाला सुरक्षितपणे कुठेतरी नेत असल्याचं पाहिलं.

“घसरून पडू नये याची काळजी मी घेत होते. तसं झालं असतं तर पुराचं पाणी आम्हाला वाहून घेऊन गेलं असतं,” त्या सांगत होत्या.

जीव वाचवण्यासाठी झाडावर घालवले सात तास

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या पोस्ट्समधून पुरामुळे झालेल्या गोंधळाची व्यवस्थित कल्पना येते. त्यातून लोकांना मदतही मिळत होती.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या अशाच एका व्हिडियोत एका केअर होममध्ये व्हिल चेअरवर बसलेले लोक जेवणाच्या खोलीत अडकून पडले होते. पुराचं मळकट पाणी त्यांच्या गुडघ्यांपर्यंत पोहोचलं होतं.

वेलेन्सियाजवळच्या बेनेतुसेरमध्ये राहणाऱ्या रूत मेयोने यांनी त्यांच्या शहरातली भयंकर परिस्थिती दाखवणाऱ्या पोस्ट एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या. त्यात त्या लोकांना मदत मागताना दिसतायत. शेजाऱ्यांसोबत बिल्डिंगच्या वरच्या मजल्यावर त्यांनी आश्रय घेतला असल्याचं त्यांनी लिहिलंय. त्यातल्या एका माणसाचा तिथेच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

“ सिविल गार्ड चालत इथं पोहोचले होते. पण बिल्डिंगच्या दरवाजापाशी एक कार अडकली असल्याने ते आतमध्ये ते येऊ शकले नाहीत. आम्हाला बाकी कुणी मदत करू शकतं का?” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलंय.

सकाळ जास्त आव्हानात्मक होती. चारही बाजूला विध्वंस दिसत होता. डझनभर गाड्या एकावर एक चढलेल्या होत्या. दुकानं उद्ध्वस्त झालेली दिसत होती आणि सगळं शहर चिखल आणि मलाने भरून गेलं होतं.

वॅलेन्सियामध्ये अडकून पडलेल्या जुलियाना सांचेज नावाच्या एका माणसाला सोडवलं तेव्हा त्याला हायपोथर्मियाची लक्षण दिसत होती. हायपोथर्मिया म्हणजे शरीराचं तापमान खूप कमी होणं. पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी तो ताडाच्या झाडावर चढला आणि सात तास तिथेच अडकून पडला.

“मी पूर्ण ताकदीनं झाडाला पकडून बसलो होतो. पुराचं पाणी मला वाहून घेऊन जाईल आणि मी मरेन असं वाटत होतं,” असं 'अल परियोदिको' या वृत्तसंस्थेला सांगताना तो म्हणाला.

त्याला वाचवण्यात यश आलं. पण इतर अनेक लोक त्याच्यासारखे नशीबवान नव्हते.

अजून अनेक लोक बेपत्ता आहेत. जे वाचलेत ते पुरातल्या हतबलतेची गोष्ट सांगतायत.

“मी पुराच्या पाण्यात दोन गाड्या वाहताना पाहिल्या. त्यात माणसं होती की नाही माहीत नाही. आत्तापर्यंतच्या आयुष्यात असं भयंकर दृश्य मी कधीही पाहिलं नव्हतं,” एकजण ‘ला प्रोविंसिया’ या वृत्तसंस्थेला सांगत होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.