You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'लहान गावातील मुलंही अंतराळात जातील', शुभांशु शुक्लांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
ग्रूप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (आयएसएस) जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत.
25 जून 2025 रोजी शुभांशु शुक्ला यांनी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून 'अॅक्सियम मिशन 4' अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली होती. या मोहिमेत ते मिशन पायलट आहेत.
आयएसएसवर मुक्कामाला असलेल्या कॅप्टन शुक्ला यांनी मंगळवारी (8 जुलै) भारतीय विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शुभांशु शुक्ला यांच्यात संवाद झाला होता.
मेघालयमधील नॉर्थ इस्टर्न स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमधील (एनइएसएसी) विद्यार्थ्यांना कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती. या वेळी त्यांनी अंतराळातील अनुभव, प्रशिक्षणाची कठीण तयारी, शरीरावर होणारे परिणाम आणि पृथ्वीचं अविस्मरणीय दृश्य याबद्दल मनमोकळेपणाने सांगितलं.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पडलेल्या अनेक प्रश्नांची सोप्या शब्दांत उत्तरं दिली, त्यांच्या शंकांचं समाधान केलं.
'लहान गावातील मुलंही अंतराळात जातील'
"मला पूर्ण विश्वास आहे की ही मुलं एक दिवस अंतराळवीर नक्कीच बनतील. फक्त मेहनत करत रहा. मी लवकरच परत येईन आणि तुम्हाला मार्गदर्शन करीन," असं शुभांशु शुक्ला यांनी अंतराळ स्थानकावरून हॅम रेडिओवरून बोलताना सांगितलं.
"लहान गावांमधील, मोठ्या शहरांमधील, सगळीकडची मुलं एक दिवस अंतराळात जातील," असं ते म्हणाले. कॅप्टन शुभांशु यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न बघायला आणि त्यासाठी मेहनत करत राहायला प्रोत्साहन दिलं.
शुभांशु शुक्ला हे अॅक्सियम मिशन 4 अंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर गेले आहेत. तिथे जाताना त्यांना आलेले अनुभव, प्रशिक्षणादरम्यान आलेल्या अडचणी आणि अंतराळात प्रवासातील आव्हानं याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं.
यावेळी शुभांशु शुक्ला यांनी भारतीय हवाई दलातील लढाऊ वैमानिक होण्यासाठीचं प्रशिक्षण आणि अंतराळवीर होण्यासाठी घेतलेल्या प्रशिक्षणातील साम्य विद्यार्थ्यांना सांगितलं.
'भारतीय हवाई दलातील शिस्तीचा फायदा झाला'
"भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून घेतलेलं प्रशिक्षण आणि अंतराळवीर होण्यासाठी लागणारं प्रशिक्षण यात खूप समानता आहे. मला त्याचा खूप फायदा झाला, कारण मला आधीच यंत्रणेची माहिती होती आणि अशा मोहिमेसाठी लागणाऱ्या शिस्तीची सवय होती. अंतराळवीर बनण्यासाठी खूप साऱ्या माहितीवर आधारित प्रशिक्षण घ्यावं लागतं," असं त्यांनी स्पष्ट केलं.
शुभांशु शुक्ला म्हणाले की, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील परिस्थिती पृथ्वीपेक्षा खूप वेगळी असते. तिथे गुरुत्वाकर्षण खूप कमी (मायक्रोग्रॅव्हिटी) असतं आणि किरणोत्सर्गही (रेडिएशन) जास्त असतात, त्यामुळे सगळं वेगळं वाटतं.
"पृथ्वीवर आपल्याला वातावरण आणि चुंबकीय क्षेत्र या किरणांपासून वाचवतात. पण अंतराळात असं संरक्षण नसतं, त्यामुळे किरणं जास्त प्रमाणात असतात. हे फक्त दोन मुद्दे आहेत, अशा अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिथल्या जीवनावर परिणाम करतात," असं त्यांनी स्पष्ट केलं.
या वेगळ्या वातावरणामुळे विशेषतः मायक्रोग्रॅव्हिटीमुळे हाडं आणि स्नायू कमजोर होऊ लागतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. आयएसएसवर फिट राहण्यासाठी ते ट्रेडमिल, सायकल आणि एआरइडी नावाचं खास व्यायामाचं उपकरण वापरतात.
सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीबाबत सांगताना ते म्हणाले की, "जर अंतराळ स्थानकात काही अनपेक्षित किंवा अडचणीच्या गोष्टी घडल्या, तर त्यासाठी आम्ही खास प्रशिक्षण घेतलेलं आहे. अशा परिस्थितींना ऑफ नॉर्मल सिनॅरिओ म्हणतात, आणि त्यासाठी आधीच तयारी करून ठेवलेली असते.
ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी अंतराळातून दिसणाऱ्या पृथ्वीच्या अद्भुत दृश्याबद्दलही सांगितलं. "हा एक जबरदस्त अनुभव होता... पहिल्यांदाच मी पृथ्वीला वरून पाहिलं... खूपच सुंदर आणि विस्मयकारक क्षण होता," असं ते म्हणाले.
शुभांशुचा समावेश असलेली अंतराळ मोहीम काय आहे?
अॅक्सियम-4 ही एक कमर्शियल म्हणजे व्यावसायिक मोहिम आहे.
अॅक्सियम स्पेस नावाच्या अमेरिकन कंपनीनं ती आखली आहे. त्यांचं मुख्यालय अमेरिकेतील टेक्सास राज्यातल्या ह्यूस्टन शहरात आहे.
अॅक्सियम स्पेसनं नासा आणि इलॉन मस्क यांची स्पेसएक्स यांच्या सहकार्यानं ही मोहिम आखली आहे. त्यासाठी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचा वापर करण्यात आला.
अॅक्सियम कंपनीचं हे चौथं मिशन असून पहिल्यांदाच एखादा भारतीय अंतराळवीर या मिशनमध्ये सहभागी असणार आहे.
तर नासाशिवाय भारताची इस्रो ही अंतराळ संस्था आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांचाही या मोहिमेत सहभाग आहे.
या मोहिमेत यानातली एक जागा इस्रोनं 550 कोटी रुपये देऊन विकत घेतली आहे.
नासाच्या अंतराळवीर पेगी व्हिटसन या मिशनच्या कमांडर आहेत.
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अॅक्सियम-4 मिशनचे पायलट आहेत. पायलटची भूमिका ही सेकंड कमांडर सारखीही असते.
तर मोहिमेत सहभागी झालेले युरोपीयन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर स्टावोझ युझनान्स्की विझन्युस्की (Sławosz Uznański-Wiśniewski) हे पोलंडचे आहेत आणि टिबोर कापू हे हंगेरीचे आहेत.
भारतासाठी का आहे हे मिशन महत्त्वाचं?
1984 साली भारताचे अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा हे सोवियत संघ मिशनसोबत अंतराळात गेले होते. अॅक्सियम-4 च्या माध्यमातून आता दुसरा भारतीय व्यक्ती अंतराळात झेपावणार आहे.
भारतीय अंतराळवीर म्हणून आणखी काही अंतराळवीरांचं नाव नक्कीच घेतलं जातं.
त्यामध्ये, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांची नावे आघाडीवर असतात. मात्र, या दोघीही भारतीय वंशाच्या असल्या तरी त्या भारतीय नागरीक नाहीत.
विज्ञानविषयक घडामोडींचे अभ्यासक पल्लव बागला यांनी बीबीसीला सांगितलं, "अॅक्सियम-4 मोहिमेतून भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोला त्यांच्या मानवी मोहिमेसाठी मदत होईल."
गगनयान ही भारताची स्वत:ची पहिली मानवी मोहिम असणार आहे. त्यात एका भारतीय अंतराळवीराला भारतीय रॉकेटच्या मदतीने श्रीहरीकोटा इथल्या स्पेस सेंटरमधून अंतराळात पाठवलं जाईल. 2027 मध्ये ही मोहिम राबवण्यात येईल, अशी आशा आहे.
पल्लव बागला पुढे सांगतात, "अॅक्सियम-4 हे भारतासाठी गगनयान मोहिमेच्या दिशेने आणखी एक पावलं टाकण्यासारखंच आहे. यातून भारताला बरंच काही शिकण्यासारखं आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जो अंतराळ सहकार्याचा करार केला होता, तो आता प्रत्यक्षात उतरत आहे."
बागला यांच्यामते "इस्रोच्या योजनेनुसार 2035 पर्यंत भारताला एक स्वत:चं अंतराळ स्थानक तयार करायचं आहे. तसंच एका भारतीय व्यक्तीला भारतीय रॉकेटमधून पूर्णतः भारतीय ताकदीच्या जोरावर चंद्रावर पाठवण्याची महत्त्वाकांक्षा पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवली होती.
"पुढच्या15 वर्षांचा रोडमॅप इस्रोच्या डोळ्यांपुढे स्पष्ट आहे. आपल्या एका अंतराळवीराला अॅक्सियम-4 मिशन अंतर्गत अंतराळात पाठवणं, हे त्यातलं पहिलं पाऊल आहे."
अॅक्सियम-4 मोहिमेत भारतीय अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्ण प्रशिक्षण मिळत आहे.
इस्रोला अद्याप मानवी अंतराळ उड्डाणाचा अनुभव नाही. भारतानं आजवर उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत, पण मानवी मोहीम हे एक कठीण काम आहे. त्यासाठीचं अॅक्सियमसोबतची मोहीम एक शिकण्याची संधी म्हणून महत्त्वाची आहे.
शुभांशु शुक्ला कोण आहेत आणि ते काय करणार आहेत?
शुभांशु शुक्ला भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहेत. 1985 साली जन्मलेले शुक्ला हे उत्तर प्रदेशातल्या लखनौचे रहिवासी आहेत.
2006 मध्ये ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले आणि त्यांना 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे.
भारतीय वायुसेनेत असणाऱ्या सुखोई-30 MKI, मिग-21S, मिग-29 S, जॅग्वार, हॉक्स डॉर्नियर्स आणि N-32 सारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव शुक्लांच्या गाठीशी आहे.
त्यांचा वैयक्तिक प्रवास नेमका कसा होता, यासंदर्भात सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांपैकी शुक्ला एक आहेत.
अॅक्सियम-4 चे मिशन पायलट म्हणून, शुभांशु शुक्ला यांची भूमिका मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यात महत्त्वाची आहे.
यामध्ये रॉकेटचे प्रक्षेपण, त्याचं कक्षेत पोहोचणं, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर त्याचं डॉकिंग होणं, त्याचं परत येणं आणि सुरक्षित लँडिंग होणं, या सगळ्याचा यात समावेश आहे.
या मोहिमेदरम्यान पृथ्वीवर मिशन कंट्रोल टीमसोबत संवाद करण्याची जबाबदारीही त्यांचीच असेल.
अॅक्सियम-4 एक कमर्शियल स्पेसफ्लाईट असली तरी त्याद्वारा अनेक नवे प्रयोगही केले जाणार आहेत.
शुभांशु शुक्ला यांच्यासहित अॅक्सियम-4 ची टीम अंतराळात बियाणे उगवणे आणि अवकाशात वनस्पती कशा वाढवायच्या याचाही अभ्यास करतील.
जवळजवळ शून्य गुरुत्वाकर्षणावर अवकाशात वनस्पती कशा वाढतात, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, या वनस्पतींमध्ये कोणते गुणधर्म असतील, हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
पल्लव बागला माहिती देतात, "अॅक्सियम-4 मिशनमध्ये जवळपास 60 वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत, जे एक्सियमच्या मागील तीन मिशनमध्ये झालेले नव्हते. या मोहिमेत सुमारे 30 देशांचे प्रयोग होत आहेत.
"शुभांशु शुक्ला हे त्यापैकी अनेक प्रयोगांचा भाग असतील. भारताच्या स्वतःच्या शास्त्रज्ञांनी यापैकी सात प्रयोग सुचवले आहेत."
ते म्हणाले की, भारताने कधीही अंतराळात खगोल-जीवशास्त्राचे असे प्रयोग केलेले नाहीत, या क्षेत्रातील हे भारताचं पहिलं पाऊल असेल.
याआधी भारतातील एमिटी युनिव्हर्सिटीने, एका स्टार्टअपने आणि एका इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नोलॉजीने पीएसएलव्हीच्या माध्यमातून बायोलॉजीचे काही खास प्रयोग केले होते.
मात्र, त्यातले नमुने अंतराळातच राहिले होते, ते परत आणले गेले नव्हते. भारत पहिल्यांदाच असे प्रयोग करणार आहे, ज्यात नमुने पुन्हा परत आणले जाणार आहेत.
या सात प्रयोगांशिवाय आणखी पाच प्रयोग इस्रो आणि नासा मिळून करणार आहेत. मात्र त्याविषयी अद्याप सविस्तरपणे सांगण्यात आलेलं नाहीये.
पुढे बागला यांनी सांगितलं की, "शुभांशु शुक्ला अंतराळातून काही आऊटरिच ऍक्टीव्हीटीदेखील करतील. याअंतर्गत ते लखनऊमधील ज्या शाळेत शिकले आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांशी बातचित करतील.
"त्यासोबतच ते अंतराळ संशोधक, स्टार्टअप्ससोबत बातचित करतील. ते एका व्हीआयपी व्यक्तीशीही संवाद साधतील. मात्र, ही व्हीआयपी व्यक्ती कोण आहे, ते नाव अद्याप उघड झालेले नाही."
1984 साली जेव्हा राकेश शर्मा अंतराळात गेले होते, तेव्हा त्यांनी तिथून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संवाद साधला होता.
इंदिरा गांधींनी त्यांना प्रश्न विचारला होता की, अंतराळातून भारत कसा दिसतो? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये राकेश शर्मा यांनी म्हटलं होतं की, "सारे जहाँ से अच्छा..."
गगनयान मिशनसाठी होतील दरवाजे उघडे?
भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम 'गगनयान' ही आहे. ही मोहीम अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं जातं. जर या मोहिमेबाबत सर्व काही व्यवस्थित झालं तर ते 2027 मध्ये ती अवकाशात जाईल. या मोहिमेअंतर्गत भारताने चार अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आखली आहे.
या मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठवलं जाईल, त्यानंतर त्यांना तीन दिवसांनी परत यावं लागेल.
भारताने यासाठी चार अंतराळवीरांची निवडदेखील केली आहे आणि यामध्ये शुभांशु शुक्ला यांचंदेखील नाव आहे.
पल्लव बागला सांगतात की, "अंतराळातील मानवी मोहिम कधीही सोपी नसते. आतापर्यंत फक्त रशिया, अमेरिका आणि चीन या तीनच देशांना हे स्वबळावर करता आलं आहे. अॅक्सियम-4 हे भारताच्या गगनयान मोहिमेसाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे.
"जेव्हा एखादा माणूस अंतराळात जातो, तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी फारच सतर्कता बाळगावी लागते. एखाद्या व्यक्तीला अंतराळात पाठवणं फार सोपं आहे, पण सुरक्षितपणे परत आणणं अधिक अवघड आहे आणि तेच अधिक महत्त्वाचंही असतं."
ते पुढे सांगतात की, "भामूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते तातडीनं धावायला लागत नाही. आधी ते रांगायला लागतं. गगनयन मोहिम हे एखादं धावणारं बाळ असेल तर, अॅक्सियम-4 मोहिम हा रांगण्याचा टप्पा आहे, असा त्याचा अर्थ आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)