बाल्टिमोर पूल दुर्घटनेला 7 आठवडे झाले तरी जहाजावर 20 भारतीय अडकलेलेच

बाल्टिमोर पूल दुर्घटनाः 7 आठवड्यांनंतरही जहाजावर 20 भारतीय अडकलेलेच, कधी परतणार?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, बर्न्ड डिबामन जूनियर
    • Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन

या आठवड्यात जेव्हा डाली या जहाजाला तुटलेल्या पुलाच्या अवशेषांतून बाहेर काढण्यासाठी नियंत्रित स्फोट केले गेले तेव्हा त्यावर जवळपास दोन डझन सदस्य होते.

एकाचवेळी केलेल्या स्फोटांमुळे बाल्टिमोरच्या फ्रान्सिस स्टॉट पुलाचे तुकडे नदीमध्ये वाहून गेले. 7 आठवड्यांपुर्वी हे जहाज पुलाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात 6 लोकांचे प्राण गेले होते.

आता जहाज पुलातून सोडवण्याची आणि तिथून मोकळं करण्याची प्रक्रिया संपुष्टात येईल असं प्रशासन आणि जहाजाच्या चालकदलाला वाटतंय. जगापासून असं एकटं पडलेल्या जहाजावरुन हे लोक 21 हजार मैल लांबवर भारतात आपल्या घरी कधी जाणार हे अजून निश्चित नाही.

डाली हे 298 मीटर लांब जहाज बाल्टिमोरमधून श्रीलंकेच्या दिशेने जात होतं. त्याच्या प्रवासाचा 27 वा दिवस सुरू होत असतानाच ते फ्रान्सिस स्कॉट की पुलाला अडकून पडलं. त्यामुळे जहाजावरचं हजारो टन पोलाद आणि सिमेंटसुद्धा पतॅप्सको नदीत वाहून गेलं.

एनटीएसबीच्या सुरुवातीच्या तपास अहवालात, या घटनेआधी जहाजावर दोनवेळा ब्लॅकआऊट झाला आणि त्यामुळे जहाजाची काही उपकरणं बंद करावी लागली असं दिसलं आहे. या घटनेआधी 10 तासांच्या काळात जहाजावरची वीज दोनवेळा गेली होती असंही यात नमूद केलं आहे.

बाल्टिमोर पूल दुर्घटनाः 7 आठवड्यांनंतरही जहाजावर 20 भारतीय अडकलेलेच, कधी परतणार?

जहाजावर आता उपस्थित असलेल्या चालकदलामध्ये 20 भारतीय आणि एक श्रीलंकेचा नागरिक आहे. हे सगळे लोक व्हीसासंदर्भातील अटी आणि एखाद्या किनाऱ्यावर उतरण्यासाठी आवश्यक असणारा पास नसल्यामुळे आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (एनटीएसबी) आणि एफआयबीच्या तपासामुळे जहाज सोडू शकलेले नाहीत.

अडकलेलं जहाज सोडवण्यासाठी या सोमवारी स्फोट केले गेले तेव्हाही हे चालक दल जहाजावरच होतं.

या नियंत्रित स्फोटांच्या आधी अमेरिकेच्या कोस्टगार्डचे अॅडमिरल शॅनन गिलरिथ म्हणाले, की चालक दर फायर क्रू बरोबर डेकच्या खालीच राहील. ते जहाजाचेच भाग आहेत. जहाज सुरू राहाण्यासाठी त्यांनी तिथं असणं गरजेचं आहे.

या आठवड्यात जहाज सोडवलं जाईल असं म्हटलं जात असलं तरी 3.7 किलोमीटर दूर असलेल्या किनाऱ्यावर ते कधी नेण्यात येईल याबद्दल अजूनही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

'दुःखद स्थिती'

जहाजावर असणारे चालकदलातील लोकांशी जे संपर्कात आहेत त्यात जोशुआ मेसिकसुद्धा आहे. मेसिक हे बाल्टिमोर इंटरनॅशनल सीफेअरर्स सेंटरचे कार्यकारी संचालक आहेत. ही संस्था जहाजावर काम करणाऱ्या लोकांच्या अधिकारांसाठी काम करते.

मेसिक सांगतात, तपासामध्ये एफबीआयने चालकदलातील सदस्यांचे मोबाईल फोन जप्त केले. त्यानंतर त्यांचा जगाशी संपर्क तुटला आहे.

ते सांगतात, "ते ऑनलाईन बँकिंग करू शकत नाहीत, आपल्या घरची बिलं भागवू शकत नाहीत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा डेटा शिल्लक राहिलेला नाही की त्यांच्याकडे कोणाचा फोन नंबर राहिलेला नाही. ते कोणाशी संवाद करू शकत नाहीयेत की झोपण्याआधी आपल्या मुलांचे फोटोही पाहू शकत नाहीयेत. ही खरंच एक दुःखद स्थिती आहे."

'दुःखद स्थिती'

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चालकदलाच्या या स्थितीकडे दोन संघटनांचंही लक्ष गेलं आहे. यात सिंगापूर मेरिटाइम ऑफिसर युनियन आणि सिंगापूर ऑर्गनायझेशन ऑफ सी मेन यांचा समावेश आहे.

11 मे रोजी दिलेल्या एका संयुक्त पत्रकात या युनियन म्हणाल्या होत्या, भावनिक संकट आणि गुन्हा नोंदवला जाण्याच्या भीतीमुळे या लोकांचं मनोबल खचलं आहे.

या युनियनने क्रू सदस्यांचे फोन तात्काळ परत करण्याची मागणी केली आहे.

सीफेअरर्स इंटरनॅशनल युनियनचे अध्यक्ष डेव्ह हिंडेल म्हणाले, "तपास कितीही काळ चालो, पण चालक दलाच्या सदस्यांचे अधिकार आणि हक्कांचं उल्लंघन केलं जाऊ नये."

ते म्हणतात, "जहाजावरील लोक आपली कामं म्हणजे बिलं भागवणे वगैरे फोनवरुनच करतात. तसेच घर चालवण्यासाठी पैसेही फोनद्वारेच पाठवतात. त्यांना आवश्यक असणाऱ्या मुलभूत गोष्टी काढून घेणं त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम करण्यासारखं आहे."

बाल्टिमोरमधून येणाऱ्या जहाजांची नोंद ठेवणाऱ्या एका अपोस्टर ऑफ सी या प्रोग्रॅमचे अँड्र्यू मिडल्टन बीबीसीला म्हणाले की त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी चालकदलातील लोकांशी बोलणं केलं होतं, एवढी चिंता असूनही, त्यांच्यामध्ये एकप्रकारची सकारात्मकता दिसत होती.

ते म्हणाले, "एकदा मी त्यांना नावं विचारली आणि भारतातील कोणत्या भागातील आहेत हे विचारलं. त्यांचा विवाह झालाय का, मुलं आहेत का असं विचारल्यावर जरा यश आलं. मग आम्ही हसत-खेळत बोलू लागलो. थोड्यावेळासाठी का होईना त्यांचं मन चिंताग्रस्त घटनेवरुन थोडं बाजूला वळवण्याचा आम्ही प्रयत्न केला."

पुढे काय?

मेसिक सांगतात, "सध्या जहाजावरील लोकांवर सिम कार्ड आणि तात्पुरते मोबाईल देण्यात आले आहेत, त्यात इंटरनेट नाही."

वेगवेगळ्या गटांनी आणि काही लोकांनी त्यांना खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि पांघरुणं वगैरे दिली आहेत.

या घटनेनंतर सरकारी कारवाईवर लक्ष ठेवणाऱ्या युनिफाईड कमांडशी संपर्क केला. जेणेकरुन त्यांची कधी सुटका होईल आणि त्याना घरी जाता येईल याची माहिती मिळेल,

डालीचं काम पाहाणारी सिंगापूरची सिनर्जी मरिनचे प्रवक्ते डॅरेल विल्सन बीबीसीला म्हणाले,

"जहाजावरील लोक चांगल्या प्रकारे परिस्थितीला तोंड देत आहेत. बाल्टिमोरमधून पाठवण्यात आलेले कंपनीचे प्रतिनिधी पहिल्या दिवसापासून त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. आमच्या क्षमतेनुसार त्यांच्या प्रत्येक गरजेला आम्ही पूर्ण करत आहोत. भारतात तयार झालेलं अन्नही त्यांना पाठवण्यात येत आहे. जहाजावरील लोकांचं मनोधैर्य टिकण्यासाठी अनेक धर्मगुरूही त्यांच्यासाठी सेवा बजावत आहेत."

विल्सन सांगतात, "या गोष्टी लहानलहान आहेत पण यामुळे आम्हाला धैर्य मिळतं."

बाल्टिमोर पूल दुर्घटनाः 7 आठवड्यांनंतरही जहाजावर 20 भारतीय अडकलेलेच, कधी परतणार?

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात त्यांनी क्रू सदस्य जहाज कधी सोडतील हे सांगितलं नाही.

ते सांगतात, "तपास सुरू आहे आणि जहाजाची या लोकांशिवाय जास्त माहिती कोणालाच असू शकत नाही. जहाजाच्या संचलनाचे ते अभिन्न हिस्सा आहेत."

मेसिक सांगतात, "जहाज शिपिंग चॅनलमधून बाहेर येताच त्यांना जहाजावर जायला मिळेल आणि भावनिक पाठिंबा देण्यासाठी मदत करता येईल अशी त्यांना अपेक्षा आहे."

कदाचित पाच-पाचच्या गटांना एखाद्या किनाऱ्यावर उतरण्यासाठी पास मिळेल असं त्यांना वाटतं. अर्थात त्यांच्या हालचालीवर अनेक अटी असतील. जसं की त्यांच्याबरोबर सतत सुरक्षारक्षक असू शकतील.

ते सांगतात, "जहाजावरचे लोक नक्की काय करू इच्छित आहेत याची मी माहिती घेण्याचा सतत प्रयत्न करत आहे. त्यांना आवडत नसलेल्या गोष्टीत ते अडकून पडू नयेत असं वाटतं. म्हणूनच स्थानिक क्रिकेट क्लबशी संपर्क करून एखाद्या सामन्याचं आयोजन करता येईल का याची चाचपणी केली आहे."

मेसिक सांगतात, "चालक दलाच्या काही सदस्यांपैकी जसं की कप्तांनांनी निसर्गसानिध्यात शांतचित्तानं बसण्याची इच्छा व्यक्त केली आहे."

ते सांगतात, "आम्हाला फक्त त्यांना मोकळ्या हवेत श्वास घेण्य़ासाठी मदत करायची आहे. ते पूर्णवेळ जहाजावर अडकलेत. आपण जे स्वातंत्र्य रोज उपभोगतो ते त्यांना मिळालं पाहिजे."