'मोदी मला भेटणार आहेत' या ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही मोदी त्यांना न भेटताच अमेरिकेहून का परतले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्याहून भारतात परतले आहेत. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली, ‘क्वाड’ संमेलनात भाग घेतला, संयुक्त राष्ट्र संघटनेतही भाषण केले, अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्यांनी अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणापासून दूर राहणे पसंत केले आहे.
संयुक्त राष्ट्र संघामध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी वैश्विक शांती आणि विकासासाठी वैश्विक संघटनांमध्ये सुधारणांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
तसेच पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेटही मोदींनी घेतली.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी रिपब्लिकन पार्टीचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींची भेट घेण्याबाबत वक्तव्य केले होते. मात्र ही भेट झाली नाही.
ट्रम्प यांनी मोदींची भेट घेण्याबाबत केले होते वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचण्यापूर्वीच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी, 'मोदी त्यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी आपली भेट घेतील', असा दावा केला होता.
पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांना मोदींच्या ट्रम्प भेटीबाबत प्रश्न विचारला असता, अजून त्याबाबत काहीही निश्चित नाही, एवढेच उत्तर देण्यात आले.
या दौऱ्यादरम्यान ट्रम्प आणि मोदींची भेट होऊ शकली नाही.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प न्यूयॉर्क सिटी किंवा लाँग आयलँडमध्ये आयोजित मोदींच्या कार्यक्रमाला जरुर हजेरी लावतील, असे कयास बांधले जात होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 ला अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले असताना ह्युस्टनच्या 'हाऊडी मोदी' रॅलीत त्यांनी ट्रम्प यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भारतीय समुदायाचे नागरिक उपस्थित होते.
तर, फेब्रुवारी 2020 साली ट्रम्प यांनी भारताचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद येथे एक लाखापेक्षा अधिक लोकांची गर्दी जमली होती.


ट्रम्प आणि मोदी हे आपण एकमेकांचे मित्र असल्याचे सांगतात. परंतु, अमेरिकेच्या दौऱ्यावेळी ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांची भेट न घेण्याकडे विश्लेषक 'राजकीय मुत्सद्देगिरी' म्हणून पाहतात.
अमेरिकेच्या डेलावेअर विद्यापीठाचे प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक डॉ. मुक्तदर खान सांगतात, "अमेरिकेत सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. अशावेळी मोदींनी ट्रम्प यांची भेट घेत त्यांच्या प्रचार अभियानाचे समर्थन केले असते किंवा त्यांच्या भेटीतून 'ट्रम्प यांना समर्थन दिले' असा अर्थ काढला गेला असता तर हा अतिशय पोरकटपणा ठरला असता."
आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासक प्रा. स्वास्ती राव यांच्या मते, "जर मोदींनी ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यापैकी कोणत्याही व्यक्तीची भेट घेतली असती तर ते राजकीयदृष्ट्या शहाणपणाचे वाटले नसते."
मोदी-ट्रम्प भेट का झाली नाही?
आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक रॉबिन्दर सचदेव यांच्या मते भारत किंवा जगातील कोणताही देश, कोणत्याही देशाच्या अंतर्गत राजकारणात एका पक्षाची बाजू घेऊ शकत नाही.
ते म्हणतात, "जर मोदींना ट्रम्प यांची भेट घ्यायची असती तर ते केवळ ट्रम्प यांची एकट्याची भेट न घेता कमला हॅरिस यांनाही भेटले असते. मात्र दोन्ही नेत्यांच्या भेटीचे नियोजन शक्य न झाल्याने ट्रम्प यांच्यासोबतही भेट होऊ शकली नाही."
रॉबिन्दर सचदेव सांगतात, "भारतीय राजदुतांनी ट्रम्प आणि कमला हॅरिस या दोन्ही नेत्यांच्या भेटीसाठी प्रयत्न केले असू शकतात, त्यामुळेच ट्रम्प यांनी सार्वजनिकरीत्या मोदींना भेटण्याबाबत वक्तव्य केले. मात्र ही भेट होऊ शकली नाही."

फोटो स्रोत, Pradeep Gaur/Mint via Getty Images
मुक्तदर खान यांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ एकदाच मोदींची भेट घेण्याचे वक्तव्य केले. पण वास्तविक त्यांची भेट निश्चित झालेलीच नव्हती.
तज्ज्ञांच्या मते, मोदींनी ट्रम्प यांना टाळले किंवा त्यांच्यासोबतचे संबंध कमी केले असे म्हणणे उचित ठरणार नाही. दोघांच्या भेटीसाठी परिस्थिती अनुकूल नव्हती आणि संदर्भही योग्य नव्हता, असं म्हणणं योग्य राहील.
अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका होत आहेत. रिपब्लिकन पार्टीकडून पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प मैदानात उतरले असून डेमोक्रेटिक पार्टीच्या कमला हॅरिस या त्यांच्या प्रतिस्पर्धी आहेत.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक
अमेरिकेत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विश्लेषकांच्या मते, यावेळच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत असेल. बायडन यांच्या तुलनेत सरस असणारे ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात जोरदार टक्कर होताना दिसत आहे.
मुक्तदर खान सांगतात, "अमेरिकेतील निवडणुका फारच अटीतटीच्या होणार आहेत. अत्यंत कमी फरकाने हा निकाल लागेल. अशा परिस्थितीत जर मोदी यांनी ट्रम्प किंवा कमला हॅरिस यांची भेट झाली असती, तर मोदींसाठी तो योग्य संकेत ठरला नसता."
ते म्हणाले, "मला वाटते, कमला हॅरिस या नरेंद्र मोदींना भेट देण्यास तयार झाल्या नसाव्यात. हॅरिस यांनी भेटीस नकार दिल्याने मोदींना ट्रम्प यांच्यासोबत ठरलेली भेटही रद्द करावी लागली असावी."

फोटो स्रोत, Kevin Dietsch/Getty Images
2019 साली अमेरिकेच्या दौऱ्यावेळी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करत मोदींनी 'अबकी बार ट्रम्प सरकार' अशी घोषणा दिली होती. अर्थात त्यावेळी ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभव झाला होता.
त्यामुळे भारताला अमेरिकेत जो बायडन यांच्या नेतृत्वात सत्तेत आलेल्या डेमोक्रेटिक सरकारसोबत संबंध रुळावर आणण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती.
विश्लेषकांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्लागारांनीसुद्धा त्यांना अमेरिकेतील निवडणुकांवेळी ट्रम्प किंवा कोणत्याही एका उमेदवाराची भेट घेणे टाळण्याचा सल्ला दिला असावा.
भारताच्या परराष्ट्र धोरणात बदल
भारताचे परराष्ट्र धोरण गेल्या काही वर्षांपासून बदलताना दिसत आहे. अमेरिकेत मोदींनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे. विश्लेषक याकडे एक बदलता संकेत म्हणून पाहतात.
रॉबिन्दर सचदेव यांच्या मते, भारताने युक्रेन संकटाबाबत 'यावर एकच पर्याय आहे, हे थांबले पाहिजे' असा स्पष्ट संकेत दिला आहे.
तर प्राध्यापक स्वास्ती राव सांगतात, "भारत भलेही रशियाचा पारंपरिक मित्र म्हणून ओळखला जात असला तरी भारताला स्वहितही कळते, आणि युक्रेन संकटावर उपाययोजनेतच भारत आपले हित पाहत आहे."
यामुळेच मोदी झेलेन्स्कींना भेटताना कचरले नाही. युद्ध थांबले पाहिजे असा स्पष्ट संकेत ते यातून देऊ इच्छित आहेत.
तज्ज्ञांच्या मते भारताच्या आपल्या काही गरज आहेत, ज्या पश्चिमेकडील देशांकडून पूर्ण केल्या जातात. भारत आपले संरक्षण आणि इतर गरजांसाठी पश्चिमात्य देशांवर अवलंबून आहे.
अशात रशिया आणि युक्रेन वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आवश्यकता भासल्यास निर्णायक भूमिका घेऊ शकतो, मात्र कोणत्याही एका बाजूने उभा राहणार नाही.

फोटो स्रोत, Win McNamee/Getty Images
विश्लेषकांच्या मते, सद्यस्थितीत भारतासाठी अमेरिकेसोबत चांगले संबंध ठेवणं परराष्ट्र आणि राजकीय धोरणाच्या दृष्टीने गरजेचे आहे.
प्रा. मुक्तदर खान सांगतात, "भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यामागे राजकीय परिस्थितीसह चीनचा उदय हेही एक महत्त्वाचे कारण आहे. जोपर्यंत चीन आक्रमक भूमिका घेत राहील तोपर्यंत भारताला अमेरिकेसोबत आपले संबंध आणखी मजबूत करणे आवश्यक आहे.
मुक्तदर खान यांच्या मते चीन औद्योगीक क्षेत्रातही आक्रमक आहे. ते त्यांची क्षमता वाढवत आहेत. कंपन्यांना अनुदान देत आहे. चीन अमेरिकेला आर्थिक क्षेत्रात आव्हान देत असल्याने अमेरिकेलाही भारताची गरज आहे.
प्रा. राव यांच्या मते, "रशिया चीनच्या बाजूने झुकल्यास भारतासाठी अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांसोबतचे संबंध बळकट करणं आवश्यक असेल."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











