You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निधी तिवारी कोण आहेत, ज्या पंतप्रधान मोदींच्या खासगी सचिव बनल्यात?
- Author, अंशुल सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
निधी तिवारी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव (प्रायव्हेट सेक्रेटरी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) अधिकारी आहेत.
भारत सरकारच्या मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागानं (डीओपीटी) 29 मार्चला यासंदर्भातील आदेश दिला आहे. त्यात म्हटलं आहे की कॅबिनेटच्या नियुक्ती समितीनं निधी तिवारी यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. हा आदेश तत्काळ प्रभावानं लागू होणार असल्याची माहिती मनुष्यबळ आणि प्रशिक्षण विभागानं (डीओपीटी) दिली आहे.
आतापर्यंत निधी तिवारी पंतप्रधान कार्यालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या. त्यांची नियुक्ती को-टर्मिनस स्वरूपाची आहे. म्हणजेच पंतप्रधानांचा कार्यकाळ संपेपर्यंत किंवा त्या पदाबाबत पुढील आदेश येईपर्यंत ही नियुक्ती असणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचं नियोजन, त्यांच्या शेड्यूलचं व्यवस्थापन करणं, धोरण आणि प्रशासकीय समन्वय आणि कम्युनिकेशन इत्यादी कामाची जबाबदारी निधी तिवारी यांच्यावर असणार आहे.
निधी तिवारी 2014 बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत. त्यांना 2013 च्या सिव्हिल सेवा परीक्षेत 96 वा रँक किंवा क्रमांक मिळाला होता.
नव्या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी जवळपास अडीच वर्षांपासून निधी तिवारी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) कार्यरत होत्या.
खासगी सचिव म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्या पंतप्रधान कार्यालयात उप सचिव पदावर काम करत होत्या. या पदावर असताना त्या परराष्ट्र आणि संरक्षणाशी संबंधित प्रमुख विभागांचं काम सांभाळत होत्या.
त्याआधी नोव्हेंबर, 2022 मध्ये त्यांची पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) अंडर सेक्रेटरी या पदावर नियुक्ती झाली होती.
2013 मध्ये सिव्हिल सेवा परीक्षा पास होण्यापूर्वी त्यांनी वाराणसीत सहाय्यक आयुक्त (वाणिज्य कर) म्हणून काम केलं होतं.
निधी तिवारी यांचे पती सुशील जायसवाल पेशानं डॉक्टर आहेत. वाराणसीत त्यांचं हॉस्पिटल आहे.
निधी तिवारी यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करताना डॉ. सुशील जायसवाल म्हणाले, "सिव्हिल सेवेत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत असतात. मात्र ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. निधी खूप मेहनती आहेत आणि त्यांच्या कामात त्यांना खूप रसदेखील आहे."
पंतप्रधान कार्यालयात काम करण्याआधी निधी यांची नियुक्ती परराष्ट्र मंत्रालयात होती. तिथे त्या नि:शस्त्रीकरण (डिसआर्मामेंट) आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या टीममध्ये होत्या.
पंतप्रधान कार्यालयात गेल्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील त्यांची जाण महत्त्वाची ठरली. तिथे त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्या अंतर्गत काम करताना 'परराष्ट्र आणि संरक्षण' या विभागांमध्ये योगदान दिलं होतं.
निधी तिवारी मूळच्या लखनौच्या आहेत. पदवीपर्यंत शिक्षण त्यांनी लखनौमध्येच घेतलं.
त्यांनी बीएससी (जीवशास्त्र)ची पदवी घेतली आहे. तर पदव्युत्तर पदवी बनारस हिंदू विद्यापीठातून (बीएचयू) पूर्ण केली आहे. 2006 मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीचं शिक्षण पूर्ण केलं. तिथे त्यांना सुवर्णपदक मिळालं होतं.
त्यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्रात निधी यांची निवड वैज्ञानिक म्हणून झाली. 2008 मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी सुरू केली.
डॉ. सुशील जायसवाल म्हणतात, "वैज्ञानिकाच्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर दोन वेळा त्यांची निवड (2008 आणि 2009) उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात (पीसीएस) झाली होती. 2008 मध्ये त्या बेसिक शिक्षण अधिकारी झाल्या होत्या."
"तर 2009 मध्ये उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगात त्यांची निवड सहाय्यक आयुक्त (सेल टॅक्स) पदी झाली होती."
2013 च्या सिव्हिल सेवा परीक्षेच्याआधी, निधी तिवारी 2012 च्या सिव्हिल सेवा परीक्षेत देखील पास झाल्या होत्या. मात्र त्यावेळेस त्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये होतं.
दरम्यान त्या वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त (सेल टॅक्स) पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर 2014 मध्ये त्या सिव्हिल सेवा परीक्षेत (2013) 96 रँक किंवा क्रमांकानिशी पास झाल्या.
पंतप्रधान कार्यालयात डॉ. प्रमोद कुमार (पीके) मिश्रा पंतप्रधानांचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. पीके मिश्रा गुजरात कॅडरचे 1972 च्या बॅचचे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, 2001 ते 2004 दरम्यान डॉ. प्रमोद कुमार मोदींचे मुख्य सचिव होते.
या यादीत दुसरं नाव अजित डोभाल यांचं आहे. ते पंतप्रधान मोदींचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) आहेत. अजित डोभाल सर्वाधिक काळ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी राहणारे व्यक्ती आहेत. 2014 पासून आतापर्यंत ते या पदावर आहेत.
1968 मध्ये अजित डोभाल आयपीएस अधिकारी म्हणून केरळ कॅडरमध्ये रुजू झाले होते. 2004-05 मध्ये ते इंटेलिजन्स ब्युरो (गुप्तहेर संस्था)चे संचालक होते.
या टीममधील आणखी एक नाव म्हणजे शक्तिकांता दास. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांच्याकडे मुख्य सचिव-2 पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा जन्म ओडिशात झाला होता. ते 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.
शक्तिकांता दास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पसंतीचे अधिकारी असल्याचं मानलं जातं. ते सहा वर्षे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.
याशिवाय विवेक कुमार (आयएफएस 2004) आणि हार्दिक सतीशचंद्र शाह, पंतप्रधान कार्यालयात खासगी सचिव म्हणून कार्यरत आहेत. शाह 2010 च्या बॅचचे गुजरात कॅडरचे अधिकारी आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.