मासिक पाळीच्या काळात वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते, पण खाताना काय घ्यावी काळजी?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
"मासिक पाळी जवळ आली की मला तुपात बनवलेला गरमागरम गोड शिरा, चीज पास्ता, चीज सँडविच, हॉट चॉकलेट ब्रॉऊनी, चीप्स असे जास्त साखर आणि कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ खायची तीव्र इच्छा होते. हे पदार्थ मला खावेच लागतात. या काळात हे पदार्थ खाण्यावर माझं अजिबात नियंत्रण नसतं."
मासिक पाळी येण्यासाठी आठ दिवस वेळ असेल तेव्हापासूनच प्रगतीला (बदलेलं नाव) ही लक्षणं दिसायला लागतात.
त्यामुळे आपल्याला कुठला आजार तर झाला नसेल?, प्रत्येक महिन्यात असे जास्त कार्बोहायड्रेट्स असलेले, जास्त रिफाईंड शुगर असलेले पदार्थ जे नेहमी खाणं टाळतो तेच पदार्थ या काळात खायची इच्छा का होते? असे सगळे प्रश्न प्रगती उपस्थित करत होती.
पण, मासिक पाळीच्या आधी असे पदार्थ खायची इच्छा होणारी प्रगती एकमेव मुलगी नाही. आपल्यापैकी अनेक महिलांना असे लक्षणं दिसतात त्याला पिरियड्स क्रेविंग्स सुद्धा म्हणतात.
प्रगती सांगतेय, मला मासिक पाळीची तारीख आठवायची किंवा बघायची गरजच पडत नाही. एकदा हे क्रेविंग्स सुरू झाले की कळतं आता आपली पाळी कधीही येऊ शकते.
पण, हे पिरियड्स किंवा मेनस्ट्रुअल क्रेविंग्स नेमकं काय असतं? असे पदार्थ खाण्याची इच्छा का होते? आपण कार्बोहायड्रेड आणि जास्त रिफाईंड शुगर असलेले असे पदार्थ खाणं योग्य आहे का?
याचा शरीरावर काही वाईट परिणाम होतो का? पाहुयात.
मेनस्ट्रुअल क्रेविंग्स म्हणजे नेमकं काय?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्री मेंस्ट्रुअल सिंड्रोम म्हणजेच (PMS) मध्ये महिलांना मासिक पाळीआधी चीडचीड होणे, मूड स्विंग्स होणे, असे अनेक लक्षणं दिसतात. त्यापैकीच एक म्हणजे फूड क्रेविंग्स. त्याला पिरियड्स क्रेविंग्स सुद्धा म्हटलं जातं.
यामध्ये मासिक पाळी येण्याच्या आठ दिवसांपूर्वीच जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट्स, गोड, खारट पदार्थ खायची तीव्र इच्छा होते. याच काळात पीएमएसचे लक्षणं सुद्धा दिसायला लागतात. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, डोकेदुखी, काही जणांना बद्धकोष्ठता, शरीर जड वाटणे अशी लक्षणं जाणवतात.
असे पदार्थ खाण्याची इच्छा का होते?
कार्बोहायड्रेट जास्त असलेले गोड पदार्थ खायची इच्छा होण्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत.
मासिक पाळीच्या आधी जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट, गोड पदार्थ, मीठाचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खायची इच्छा ही हार्मोन्सच्या बदलामुळे होते असं अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याबद्दल नागपुरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुषमा देशमुख सांगतात, "आपली मासिक पाळी ही हार्मोन्सवर अवलंबून असते. मासिक पाळी संपली की सुरुवातीचे काही दिवस इस्ट्रोजेन हार्मोन वाढतो. त्यानंतर ओव्ह्युलेशन झालं की दुसरी पाळी येण्याच्या काही दिवसांआधी प्रोजेस्ट्रॉन हार्मोन वाढतो. यामुळे पीएमएसचे लक्षणं दिसतात. या काळात महिलांना अस्वस्थ वाटणं, चीडचीड होणं असे प्रकार होतात. अशावेळी काही पदार्थ खाल्ल्यानं त्यांना शांत वाटतं. त्यामुळे महिला असे पदार्थ खातात. एकूणच हार्मोन्सच्या बदलांमुळे असे सगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते.
"या काळात काही महिलांना आपलं वजन एखाद्या किलोनं वाढल्यासारखं वाटतं. पण, एकदाची मासिक पाळी संपली की सगळं पहिल्यासारखं एकदम व्यवस्थित वाटायला लागतं."

फोटो स्रोत, Getty Images
तर स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अनिल हुमणे हार्मोन्सबद्दल सविस्तर समजावून सांगतात.
ते म्हणतात, "पाळी येण्याच्या आधी प्रोजेस्ट्रॉन हार्मोन वाढतं. त्यामुळे आपल्याला आनंद देणारा सिरोटोनीन हार्मोनची पातळी कमी होते. परिणामी आपल्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे कार्बोहायड्रेट जास्त असलेले पदार्थ खाण्याची इच्छा अधिक तीव्र होते."
पाळीच्या आधी असे पदार्थ खायला हवेत का?
आपण आपलं वजन नियंत्रित राहायला हवं यासाठी आपण जास्त कार्बोहायड्रेट असलेले, गोड पदार्थ खाणं टाळतो. पण, हेच पदार्थ पाळी येण्याआधी खायची तीव्र इच्छा होते. त्यावेळी हे पदार्थ खाताना वाईटही वाटतं. आपलं वजन तर वाढणार नाही ना? याचा आपल्या शरीरावर काही परिणाम तर होणार नाही ना? अशी भीती काही महिलांच्या मनात असते.
पण, खरंच पाळीच्या आधी हे पदार्थ खायला हवेत का?
या काळात असे पदार्थ खायची इच्छा होणं हे अगदी सामान्य आहे. हा कुठला आजार नसतो. या काळात रेस्टींग मेटाबोलिजम रेट वाढल्यामुळे आपल्याला जास्त आहाराची गरज भासते. काही रिसर्च असेही सांगतात की या काळात दिवसाला 100 ते 300 कॅलरीज घेतल्या तरी चालतं.

भुकेच्या बाबतीत आपल्याला शरीराचं ऐकायला पाहिजे. कारण, या काळात आपल्या शरीराला जास्त कॅलरीजची गरज असू शकते.
डॉ. हुमणे सांगतात, "पाळीच्या आधी असे पदार्थ खायची तीव्र इच्छा होणं हे नैसर्गिक आहे. यामध्ये स्वतःला फार अपराधी आहोत, आपल्या शरीरावर याचे वाईट परिणाम होतील असं समजू नये. हे शरीराला गरजेचं असणारं इंस्टंट ग्लुकोज असतं. ते द्यायला हवं. पण, कुठलीही गोष्ट मर्यादित खायला हवी. त्याचं प्रमाण जास्त झालं तर शरीरावर त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल. तसेच ज्यांना अनियंत्रित शुगर आहे त्या महिलांनी हे पदार्थ खाणं टाळायला हवे."

फोटो स्रोत, Getty Images
पण, शरीराला गरज आहे म्हणून घरात कुठलाही गोड पदार्थ दिसला की खावा असं करू नये असा सल्ला डॉ. सुषमा देशमुख देतात.
त्या सांगतात, "यामधून फक्त तात्पुरतं समाधान मिळतं. हे तात्पुरते उपाय झाले. पण, क्रेविंग्सवर आपल्याला नेहमी कायमस्वरुपी उपाय शोधायला पाहिजे.
"मासिक पाळी येण्याच्या आधी आपल्याला खूप अशक्त वाटणं, अस्वस्थ वाटणं असे लक्षणं दिसू नये यासाठी आपली जीवनशैली व्यवस्थित असणं गरजेचं असतं. ज्या महिलांची जीवनशैली व्यवस्थित असते त्यांना असे लक्षणं दिसत नाही. आपण दररोज मेडीटेशन, व्यायाम करायला पाहिजे. आपला आहार संतुलित असला पाहिजे. ज्या महिला हे सगळं करतात त्यांना मासिक पाळीमध्ये शारीरिक आणि मानसिक कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही," असं देशमुख सांगतात.
क्रेविंग्सवर नियंत्रण ठेवायचं असेल तर पर्याय काय?
संतुलित आहार असलेल्या महिलांना क्रेविंग्सची लक्षणं फार कमी दिसतात. पण, ज्या महिलांना पाळीच्या आधी असे पदार्थ खायची इच्छा होते. पण, त्यांना आपल्या या क्रेविंग्सवर नियंत्रण ठेवून शरीराची इंस्टंट ग्लुकोजची गरज पूर्ण करायची असेल तर त्यांच्यासाठी कुठले पर्याय असू शकतात?
आपल्या शरीराला इंस्टंट ग्लुकोजची गरज असेल तर काही हेल्थी पदार्थ आपण खाऊ शकतो. कुठले पदार्थ खायला पाहिजे याचा सल्ला डॉ. देशमुख देतात.
गोड पदार्थ खायचे असतील ड्रायफूट्स, खजूर, गूळ शेंगदाण्याचा लाडू खाऊ शकता. राजगिऱ्याचा लाडू खाऊ शकता. घरगुती गोड पदार्थ खा. पण, ते शरीरासाठी अपायकारक नसेल हे बघा.
जास्तीत जास्त कार्ब्स असलेले पदार्थ खावे वाटत असतील तर घरी बनवलेला पालक पराठा, मेथी पराठा खाऊ शकता. खूप साऱ्या भाज्या टाकून बनवलेला भात किंवा पालक टाकून बनवलेली पौष्टीक खिचडी खाता येईल. यामुळे शरीराला असलेल्या ऊर्जेची गरजही पूर्ण होईल आणि आपल्या शरीरावर वाईट परिणामही होणार नाही. पण, बाहेरचे पदार्थ खाणं टाळायला हवं, असं त्या सांगतात.

"मासिक पाळीनंतर महिला अगदी सामान्य वागतात. आपल्या पूर्वीच्या आहारावर परतही येतात. पण, मासिक पाळीच्या आधी नेहमी असे जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खाल्ल्यानं त्याचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. आपलं वजन देखील वाढू शकतं.
"त्यामुळे महिलांनी या काळात क्रेविंग्सवर हळूहळू नियंत्रण ठेवून संतुलित आहाराकडे वळायला हवं. त्यामुळे ऊर्जाही टिकून राहण्यास मदत होते. पण, क्रेविंग्स खूपच वाढत असेल, नियंत्रणाबाहेर असेल तर त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा", असंही डॉ. देशमुख सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











