ज्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अजित पवारही संतापले ते राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप कोण आहेत?

    • Author, प्रविण सिंधू
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी "दिवाळीत धर्म बघून दुकानातून खरेदी करण्याचं" आवाहन केलं. यानंतर त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप झाला आणि वादाला तोंड फुटलं आहे.

हा वाद केवळ विरोधकांपुरता मर्यादित राहिला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रीस नायकवाडी यांच्यासह स्वतः अजित पवार यांनीही जगताप यांच्या या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. मात्र, यानंतरही संग्राम जगताप यांच्या भूमिकेत बदल झालेला दिसला नाही.

या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांच्या अशा वक्तव्यांमागे नेमकी कारणं काय आहेत? 'धर्मनिरपेक्ष' म्हणवणाऱ्या पक्षाचे ते अनेक वर्षे आमदार राहिले असताना, ते आता 'कट्टर हिंदुत्ववादी' अशी ओळख का मिळवू पाहत आहेत? त्यांच्या मुस्लीमविरोधी भूमिकेचा नेमका अर्थ काय? हे राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेऊया.

संग्राम जगताप नेमकं काय म्हणाले?

हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना संग्राम जगताप म्हणाले, "मी सर्वांना विनंती करेन की, दिवाळीनिमित्त खरेदी करताना आपला पैसा आणि आपला नफा फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे, अशी दिवाळी आपण साजरी करायची आहे."

संग्राम जगताप यांच्या याच वक्तव्यानंतर वाद सुरू झाला. तसेच, ते समाजात तेढ निर्माण करत आहेत असा आरोप झाला.

संग्राम जगतापांच्या भूमिकेला पक्षातूनच विरोध

संग्राम जगताप यांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इंद्रीस नायकवाडी म्हणाले, "आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की, जर त्यांना आमची विचारधारा पटत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांच्यावर योग्य कारवाई करायला आणि त्यांना कसं मोकळं करायचं यासाठी माझा पक्ष आणि माझे नेते समर्थ आहेत."

"त्यांनी पक्षापासून दूर झालं पाहिजे. कारण ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. ते दूर होत नसतील, तर त्यासाठी काय कार्यवाही करायची असते हे आमचे वरिष्ठ जाणून आहेत," असं मत नायकवाडी यांनी व्यक्त केलं.

अजित पवार काय म्हणाले?

या वादाबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "संग्राम जगताप यांनी अतिशय चुकीचं विधान केलं आहे. आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत. एकदा पक्षाची ध्येयधोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून पक्षाचा कुठलाही खासदार, आमदार किंवा जबाबदार व्यक्ती अशाप्रकारची वक्तव्ये करत असतील, तर ती वक्तव्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाहीत."

"ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललो आहे," असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार पुढे म्हणाले, "अरूणकाका जगताप जोपर्यंत हयात होते, तोपर्यंत तिथं सगळं सुरळीत होतं. परंतु, काही लोकांना आपल्यावर जबाबदारी वाढली आहे, हे लक्षात येत नाही. वडिलांचं छत्र राहिलेलं नाही, त्यावेळी जबाबदारीनं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे."

"मी तिथं एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हाही त्यांना सांगितलं होतं. तेव्हा ते म्हणाले की, यात सुधारणा करेल. मात्र, ते सुधारणा करताना दिसत नाही. त्यांचे विचार-भूमिका पक्षाला अजिबात मान्य नाही. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत," असंही पवारांनी नमूद केलं.

यानंतर पक्षाकडून संग्राम जगताप यांना नोटीस पाठवल्याचंही सांगण्यात आलं. याबाबत विचारलं असता संग्राम पाटील यांनी माध्यमांना थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. तसेच याबाबत मी अजित पवार यांच्याशी बोलेन, इतकंच म्हटलं.

'फक्त नोटीस देऊन होणार नाही, पक्षातून काढा'

संग्राम जगताप यांचं वक्तव्य आणि त्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं त्यांना दिलेली नोटीस यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.

त्या म्हणाल्या, "फक्त नोटीस देऊन होणार नाही, त्यांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल, तर अशा व्यक्तिवर कडक कारवाई झाली पाहिजे."

संग्राम जगताप कोण आहेत?

संग्राम जगताप दोनदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभेवर निवडून आले आणि एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून निवडून आले. संग्राम जगताप यांचे सासरे शिवाजी कर्डिले हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत.

संग्राम जगताप यांना घरातूनच राजकीय वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील अरूण जगताप हेही राजकारणात सक्रीय होते आणि त्यांनी 1990 मध्ये जनता दलाकडून निवडणूक लढवली होती.

याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना राजकीय विश्लेषक आणि अहिल्यानगर लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके म्हणाले, "संग्राम जगताप यांच्या सर्व निवडणुका या धर्मनिरपेक्ष पक्षाकडूनच झाल्या आहेत. 2024 मध्ये निवडणुका झाल्यावर संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी अजेंडा घेतला आहे."

"ते काही वर्षापूर्वी एकदा थेट ठाकरेंच्या शिवसेनेत गेले होते. मात्र, ते तिथे थोडा काळच राहिले आणि पुन्हा शरद पवारांसोबत आले. आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत."

"मात्र, सध्या संग्राम जगताप यांचं राजकारण भाजपकडे झुकलेलं दिसत आहे. कारण अजित पवार ही पक्षाची भूमिका नाही असं सांगत आहेत, तरीही ते हिंदुत्ववादी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे ते अजित पवार यांचंही कितपत ऐकतील याबाबत शंका वाटते. अजित पवार हतबल दिसत आहेत," असं मत सुधीर लंके यांनी व्यक्त केलं.

अहिल्यानगरचे स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भैरवनाथ वाकळे संग्राम जगताप यांच्या घरातील राजकीय घडामोडी अधोरेखित करताना सांगतात, "नगरच्या राजकारणात सुरुवातीला अरूण जगताप यांचा पुतण्या नितीन जगताप महापालिका निवडणुकीत निवडून आला. त्यावेळी संग्राम जगताप यांचं शिक्षण सुरू होतं. मात्र, कुटुंबात कलह झाल्यानंतर अरूण जगताप यांनी संग्राम जगताप यांना राजकीय मैदानात उतरवलं. तिथून संग्राम जगताप यांचा राजकीय उदय झाला."

"तेव्हा सुरुवातीला संग्राम जगताप यांनी प्रेरणा प्रतिष्ठान ही संस्था सुरू केली. यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तेथे अनिल राठोड यांनी त्यांना बळ दिलं. पुढे संग्राम जगताप यांनी शिवसेना सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नगरचे महापौर झाले," अशी माहिती भैरवनाथ वाकळे देतात.

जगताप कुटुंबाच्या राजकीय वाटचालीत मुस्लीम समुदायाचं योगदान

जगताप कुटुंबाच्या राजकीय वाटचालीतील मुस्लीम समुदायाच्या योगदानावर बोलताना सुधीर लंके म्हणाले, "सुरुवातीपासून मुस्लीम समाज संग्राम जगताप यांच्यासोबत होता. अनेक मुस्लीम कुटुंबांशी त्यांचं जवळचे संबंध आहेत. 1990 मध्ये संग्राम जगताप यांचे वडील अरूण जगताप यांनी जनता दलाकडून निवडणूक लढवली तेव्हापासून मुस्लीम समाज त्यांच्यासोबत दिसला."

"अरूण जगताप आजारी पडले तेव्हाही त्यांचे अनेक मुस्लीम मित्र त्यांच्या तब्येतीची काळजी करत होते. अरूण जगताप आणि संग्राम जगताप यांचंही मुस्लीम समाजाशी नातं चांगलं होतं. मात्र, 2024 च्या निवडणुकीनंतर त्यांनी हिंदुत्ववादी अजेंडा घेतला आहे," असं लंके नमूद करतात.

जगताप कुटुंबाच्या राजकीय वाटचालीवर बोलताना भैरवनाथ वाकळे सांगतात, "संग्राम जगताप यांचे वडील अरूण जगताप यांच्या राजकीय काळात अनिल राठोड हिंदुत्ववादी नेते होते, तर दुसरीकडे स्वतः अरूण जगताप धर्मनिरपेक्ष राजकारण करायचे. त्यामुळे त्यांना सुरुवातीपासून मुस्लीम समुदायाकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. त्या बळावर ते मोठे झाले."

संग्राम जगताप यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेमागे काय कारणं?

संग्राम जगताप यांनी घेतलेल्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेमागे तीन कारणं असल्याचं पत्रकार सुधीर लंके सांगतात.

ते म्हणाले, "पहिलं कारण म्हणजे 2024 च्या निवडणुकीत मुस्लीम मतदारांनी आपल्याला मते दिली नाहीत, असं संग्राम जगताप यांना वाटतं. जगताप कुटुंबाचे मुस्लीम समाजाशी चांगले नाते असतानाही कमी मते मिळाली म्हणून ते नाराज असावेत. मात्र, त्या निवडणुकीत मुस्लिमांचा भाजपच्या सत्तेला विरोध होता आणि जगताप भाजप आघाडीसोबत होते म्हणून मुस्लीम मतदार दुरावले हे त्यांनी लक्षात घेतले नाही."

सुधीर लंके पुढे म्हणाले, "संग्राम जगताप टोकाचे हिंदुत्ववादी झाले याचे दुसरे कारण म्हणजे त्यांना आता अजित पवार यांच्यासोबत राहण्यात रस नसावा. आपली आमदारकीची तिसरी टर्म असताना पवारांनी आपणाला मंत्रिपद दिले नाही हे शल्य त्यांच्या मनात आहे. त्यामुळे पवारांनी दूर लोटले तरी भाजपात जाण्याचा आपला मार्ग मोकळाच होईल असे त्यांचे आडाखे असू शकतात."

"तिसरे कारण म्हणजे त्यांचा चेहरा राज्यभर नेण्यासाठी त्यांना हिंदुत्व हा मुद्दा सापडला आहे. त्यांना यातून 'टीआरपी' मिळाला आहे. सध्या ही प्रसिद्धी सर्वात सोपी आहे. त्यांना तरुणांचा आयता प्रतिसादही मिळतो आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

'लोकप्रतिनिधींनी संविधानाच्या कक्षेतच वागलं पाहिजे'

सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींकडूनच होणारी धार्मिक धृवीकरणाची वक्तव्ये यावर सामाजिक कार्यकर्ते आणि संविधान अभ्यासक सुरेश सावंत म्हणाले, "निवडून येणाऱ्या कुठल्याही पक्षाचे असोत, मात्र ते संविधानाची शपथ घेऊन येतात. धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता, वैज्ञानिक दृष्टिकोन ही सर्व मूल्यं संविधानातील आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी संविधानाच्या कक्षेतच वागलं पाहिजे. मात्र, हे पाळलं जाताना दिसत नाही."

"या सर्व गोष्टींसाठी कायद्याच्या तरतुदी आहेत, असं नाहीये. हा नैतिकतेचा भाग आहे. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवैधानिक नैतिकता म्हणतात. सत्ताधारीच द्वेषपूर्ण वक्तव्ये करत असतील, तर समाजातही द्वेष पसरतो," असं मत सुरेश सावंत यांनी व्यक्त केलं.

ते पुढे म्हणाले, "संविधान जागेवर राहतं आणि व्यवहार त्याच्या उलट होतो. यातून संविधान मातीमोल करण्याचा प्रकार होतो. संविधानाचं मर्म नैतिकता असल्याचं आंबेडकर सांगतात. मात्र, ते पाळलं नाही, तर लोकांमध्ये चुकीचं मूल्य जातं. निवडून जाईल तो आपलंच बघेल, असा स्थायीभाव लोकांमध्येही आला, तर ही लोकशाही टीकणारच नाही. त्यातून अराजक तयार होईल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)