You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अहमदनगरमधील शेवगावमध्ये दोन गटात हिंसाचार, आतापर्यंत 31 जण ताब्यात
- Author, प्रवीण ठाकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमध्ये रविवारी (14 मे) रात्री दगडफेकीचा प्रकार घडल्याची माहिती समोर येते आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शेवगाव शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडला.
त्यानंतर जमावाने दुकानांचं आणि वाहनांचं नुकसान केलं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. यात चार पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
शेवगाव शहरात रविवारी (14 मे) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मिरवणूक निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण सहभागी होते.
मिरवणूक रात्री आठ ते नऊच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. यावेळी अचानक मिरवणुकीच्या दिशेने एका गटाने दगडफेक केली.
तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, धार्मिक स्थळावर अगोदर दगडफेक करण्यात आली. यामुळे अफवांना पीक येऊन दोन्ही बाजूने दगडफेक झाली. त्यामुळे पळापळ झाली.
गोंधळामुळे व्यावसायिकांनी दुकाने पटापट बंद केली. जमावाने यावेळी वाहनांवरही दगडफेक करुन त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. काही दुकानांवरही हल्ला चढवत तोडफोड केली गेली.
दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, एकूण 31 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अहमदनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान शेवगाव शहरात दोन गटात वादविवाद झाला होता. पण पोलिसांनी परिस्थिती नीट हाताळलेली आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे."
"नागरिकांना आवाहन करतो की, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. काहीही अडचण असेल तर पोलिसांशी संपर्क साधा. सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी पोलीस घेत आहेत," असंही अहमदनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे म्हणाले.
अकोल्यात इन्स्टाग्राम पोस्टवरून हिंसाचार, एका व्यक्तीचा मृत्यू
अकोल्यात शनिवारी रात्री (13 मे) इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमुळे हिंसाचार झाला होता. या हिंसाचारामुळे अकोल्यातील तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आलं होतं. या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक पोलीस कर्मचारी जखमी झाला.
हिंसाचार घडलेल्या संपूर्ण क्षेत्रात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बोलावण्यात आल्या होत्या.
विशिष्ट समाजाच्या धर्मगुरूच्या विरुद्ध इन्स्टाग्रावर अश्लील शब्दात पोस्ट लिहिल्यावर काही लोकांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांनी तक्रार दाखल केली तरी या समाजाच्या लोकांचा जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केली.
त्यानंतर दुसऱ्या समाजाचे लोक समोर आले. त्यांनी एक तास जोरदार घोषणाबाजी केली आणि दगडफेक केली.
अकोला शहरातील गंगाधर चौक, हरिहर पेठ या भागात संमिश्र वस्ती आहे. तिथे दोन्ही समुदाय एकमेकांसमोर आले आणि एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. तसंच अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
पोलिसांच्या गाडीवरही यावेळी दगडफेक करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाडीवरही जोरदार दगडफेक करण्यात आली, यात अग्निशमन दलाचा एक कर्मचारी जखमी झाला. अनेक गाड्या जाळण्यात आल्या.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. एका तासानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
या हिंसाचारानंतर अकोला ग्रामीण भागातून पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला. तसंच वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागातून पोलिसांना बोलावण्यात आलं होतं. या घटनेत आतापर्यंत 26 लोकांना अटक करण्यात आली आहे.
घटनेवनिषयी अधिक माहिती देताना अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे म्हणाले होते, “दोन समुदायात काही गैरसमज झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. आम्ही लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे."
या पुढे कोणतीही अप्रिय घटना होऊ नये पोलीस तैनात करण्यात आले आहेत, अशीही माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.