IPS अधिकारी वाय. पूरन कुमार यांचं अखेर शवविच्छेदन, आतापर्यंत काय घडलं?

फोटो स्रोत, Haryanapolice.gov.in
आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांचं चंदीगड पीजीआयमध्ये शवविच्छेदन (पोस्टमार्टेम) होऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 7 ऑक्टोबर 2025 रोजी वाय. पूरन कुमार यांनी आत्महत्या केली.
बीबीसीचे पत्रकार सरबजीत सिंह धालीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाय. पूरन कुमार यांच्या पत्नी आयएएस अमनीत पी कुमार यांनी न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर शवविच्छेदनाला संमती दिली आहे.
मंगळवारी (14 ऑक्टोबर) संध्याकाळी वाय. पूरन कुमार यांच्या शवविच्छेदनाबाबत चंदीगड पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे (चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट) याचिका केली होती. या याचिकेत त्यांची अमनीत पी कुमार यांना मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची संमती देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
यासाठी डॉक्टरांचं एक विशेष पॅनेल तयार करण्यात आलं होतं. ते एसडीएम आणि एसआयटीच्या देखरेखीखाली झालं. त्याचबरोबर संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफीदेखील करण्यात आलं.
7 ऑक्टोबरला आयपीएस वाय. पूरन कुमार यांचा मृतदेह चंदीगडच्या सेक्टर 11 मधील त्यांच्या निवासस्थानी सापडला होता.
कथित सुसाईड नोटनुसार, पूरन कुमार यांनी व्यावसायिक प्रवास, करियर, बदली आणि जातीबद्दल वारंवार तक्रारी केल्या होत्या.
(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल, तर 1800 233 3330 या भारत सरकारच्या स्पाउस हेल्पलाईनवर मदत मागू शकता. तसंच तुम्ही मित्रांबरोबर आणि नातेवाईकांबरोबर यासंदर्भात बोललं पाहिजे.)
ASI संदीप कुमार यांचा मृतदेह सापडला
माजी एडीजीपी वाय. पूरन कुमार यांच्यावर भ्रष्टाचार आणि जातीयवादाचे आरोप करून एएसआय संदीप लाठर यांनी मंगळवारी, 14 ऑक्टोबरला कथितरित्या आत्महत्या केली.
मृत्यूपूर्वी त्यांनी तयार केलेला एक व्हीडिओ आणि तीन पानांचं एक कथित सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
लाठर यांचा मृतदेह लाढोत या त्यांच्या मामाच्या गावात ठेवण्यात आला आहे. बुधवारी (15 ऑक्टोबर) सकाळी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी देखील एएसआय संदीप लाठर यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आले होते.

फोटो स्रोत, ANI
रोहतकचे पोलीस अधीक्षक (एसपी) सुरेंद्र सिंह यांचं म्हणणं आहे की, संदीप पोलीस दलात असिस्टंट सब इन्स्पेक्टर (एएसआय) पदावर कार्यरत होते.
पोलीस अधीक्षक भोरिया म्हणाले, "संदीप हे आमच्या पोलीस दलातील खूप मेहनती आणि प्रामाणिक एएसआय होते. त्यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर फॉरेन्सिक टीम त्यासंदर्भात तपास करते आहे."
कथित सुसाईड नोट आणि व्हायरल व्हीडिओबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सध्या तपास सुरू आहे. त्यामुळे आता यासंदर्भात काहीही सांगता येणार नाही.
त्यांना विचारण्यात आलं की आयपीएस वाय पूरन कुमार प्रकरणात, एएसआय कोणत्याही प्रकारे जोडलेले होते का, यावरदेखील पोलीस अधीक्षक भोरिया यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही.
डीजीपी आणि एसपींची झाली बदली
वाय पूरन कुमार यांच्या कथित आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी हरियाणातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता.
यात हरियाणातील तत्कालीन डीजीपी म्हणजे पोलीस महासंचालक शत्रुजीत सिंह कपूर आणि रोहतकचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजारनिया यांचा समावेश आहे.
या प्रकरणामुळे हरियाणाचे पोलीस महासंचालक शत्रुजीत कपूर यांना रजेवर पाठवण्यात आलं आहे.
त्यांच्या जागी हरियाणा सरकारनं आयपीएस अधिकारी ओम प्रकाश सिंह यांना हरियाणा पोलिसांचे कार्यवाहक पोलीस संचालक म्हणून नियुक्त केलं आहे.

फोटो स्रोत, ANI
याआधी हरियाणा सरकारनं 11 ऑक्टोबरला नरेंद्र बिजारनिया यांच्या जागी सुरिंदर सिंह भौरिया यांना रोहतकचे पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्त केलं होतं.
वाय. पूरन कुमार यांच्या पत्नी आयएएस अधिकारी अमनीत पी कुमार यांनी तक्रार केल्यानंतर एफआयआरमध्ये काही आणखी कलमं जोडण्यात आली होती.
वाय. पूरन कुमार यांनी कथित सुसाईड नोटमध्ये ज्या लोकांचा उल्लेख केला होता त्यांच्या नावांचा या एफआयआरमध्ये समावेश आहे.
या लोकांच्या विरोधात आत्महत्या करण्यासाठी चिथवल्याचा आणि एससी/एसटी (अत्याचार निवारण) अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
त्याचबरोबर या प्रकरणाच्या तपासासाठी सहा सदस्यांची एक एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्ष चंदीगडचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) पुष्पेंद्र कुमार असतील.
वाय. पूरन कुमार कोण होते?
वाय. पूरन कुमार मूळचे आंध्र प्रदेशातील होते आणि इंजिनिअर होते.
ते हरियाणा कॅडरच्या 2001 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये अंबाला आणि कुरुक्षेत्रमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी अंबाला आणि रोहतक रेंजचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केलं.

फोटो स्रोत, Nayabsaini/FB
वाय पूरन कुमार यांच्या पत्नी हरियाणात आयएएस अधिकारी आहेत. त्या परराष्ट्र सहकार्य विभागात आयुक्त आणि सचिवपदावर आहेत.
घटनेच्या वेळेस त्या हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याबरोबर जपानला गेलेल्या शिष्टमंडळात होत्या.
राहुल गांधींनी घेतली भेट
मंगळवारी (14 ऑक्टोबर) लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हरियाणा पोलीस दलातील दिवंगत पोलीस महानिरीक्षक वाय पूरन कुमार यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी चंदीगडला गेले होते.

फोटो स्रोत, ANI
राहुल गांधी पीडित कुटुंबाबरोबर जवळपास 50 मिनिटं बोलले आणि त्यांनी हरियाणा सरकारकडे 'दोषी अधिकाऱ्यां'ना तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
राहुल गांधी म्हणाले की हे फक्त एका कुटुंबापुरतं मर्यादित प्रकरण नाही आणि दलितांना त्रास देणं चुकीचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











