'सत्यनारायणाच्या दिवशी कळलं, ती आधीच विवाहित होती', फसवणुकीनंतरही तरुण तक्रार का करत नाही?

- Author, गणेश पोळ, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"शेतकऱ्यांच्या मुलांची लवकर लग्ने होत नाहीत. त्यामुळं शेवटी वैतागून लोक कोणताही पर्याय निवडतात. माझंही तेच झालं आणि घाईत लग्न केलं. यात माझं जवळजवळ 5 लाखांचं नुकसान झालं."
जुन्नरमधील सागर त्यांच्यासोबत झालेल्या बनावट लग्नाविषयी सांगत होते.
सध्या महाराष्ट्रातील, विशेषतः ग्रामीण भागात वयाची तिशी पार केलेल्या अनेक तरुणांना एक प्रश्न सतत सतावतोय. तो म्हणजे, माझं लग्न कधी होणार?
'शेती करणारा आणि गावात राहणारा नवरा नको गं बाई,' अशी आजकालच्या मुलींची आणि त्यांच्या पालकांची मानसिकता असल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. पण यामागं हे एकच नाही तर अनेक कारणं असल्याचं तज्ज्ञ सांगतायत.
त्यात, मुलांच्या तुलनेत घटलेला मुलींचा जन्मदर, लग्नाबाबत वाढलेल्या अपेक्षा, महिलांना शेतात करावी लागणारी श्रमाची कामं आणि ग्रामीण समाजात दडपलं जाणारं मुलींचं स्वातंत्र्य अशा कारणांनी अनेक मुली ग्रामीण भागात लग्न करण्याचं टाळताना दिसत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
अशा परिस्थितीत गावकडील लग्नाळू मुलांना नवरी शोधण्यात जास्त मेहनत घ्यावी लागत आहे. या काळात त्यांचं लग्नाचं वय निघून जाण्याची भीती असते.
याचाच फायदा मध्यस्थी करणारी काही मंडळी घेत आहेत. किंबहुना अशा अनेक टोळ्या सक्रिय असल्याचं पीडित तरुण सांगत आहेत.
त्यामुळे वयाची पस्तिशी ओलांडलेली गावातील आणि तालुक्याच्या ठिकाणची लग्नाळू मुलं एका प्रकारच्या रॅकेटला बळी पडतायत.
तर दुसरीकडे यामध्ये लाखो रुपयांची फसवणूक झाली तरी अशी हे तरुण पुढे येऊन तक्रार देत नसल्याचं पोलीस अधिकारी सांगत आहेत.
बनावट लग्नांचा हा नेमका प्रकार काय आहे? फसवणूक करणारी टोळी नेमकी कशी काम करते? मुलांचं नेमकं कुठं चुकतंय? सविस्तर जाणून घेऊयात.
'सत्यनारायण पुजेला नकार दिला आणि फुटलं बिंग'
जुन्नर तालुक्यात राहणारे सागर हे एक यशस्वी शेतकरी आहेत. पुणे आणि मुंबईच्या APMC मार्केटला ते भाजीविक्रीचा व्यवसाय करतात.
बागायती शेती असल्याने त्यांचा घरप्रपंच चांगला सुरू आहे. पण असं असतानाही त्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती.
अनेक प्रयत्न करून शेवटी मध्यस्थींच्या माध्यमातून सागर यांचं लग्न ठरलं.
या संपूर्ण प्रकाराविषयी बोलताना सागर सांगतात की, "अनेक वर्षं प्रयत्न केल्यानंतर शेवटी माझं मे 2023 मध्ये लग्न ठरलं. त्यानंतर नवरीकडील लोकांनी लग्न लवकर उरकण्याची घाई केली.
या दरम्यान, त्या मुलीसोबत मला वैयक्तिक पातळीवर बोलू दिलं नाही. माझ्या आईनेच तिच्याशी चर्चा केली. लग्नानंतर पहिल्याच आठवड्यात मला काहीतरी गडबड वाटली."

फोटो स्रोत, Sagar
हिंदू धर्मात विवाह झाल्यानंतर नवऱ्या मुलाच्या घरी सत्यनारायणाची पूजा केली जाते. तसंच अनेक मंदिरात जाऊन देवदर्शनही केलं जातं.
सागर यांच्याही घरी लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. पण त्यांच्या पत्नीने पूजेला बसण्यास नकार दिला. तेव्हा आमच्या दोघांत कडाक्याचं भांडणं झाल्याचं सागर सांगतात.
"प्रथेनुसार आईवडिलांनी घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली. पण त्यासाठी माझ्या बायकोने नकार दिला. तेव्हा आम्ही सगळेच गोंधळात पडलो.
शेवटी विश्वासात घेऊन मी बायकोला नेमकं कारण विचारल्यावर तिने तिचं आधीच एक लग्न झाल्याचं सांगितलं. तेव्हा मी कपाळाला हातच लावला," हा प्रसंग सांगताना सागर यांच्या चेहऱ्यावरचा हताशपणा स्पष्ट दिसत होता.
आपल्यासोबत फसवणूक झाल्याचं सागर यांच्या लक्षात आलं. हा प्रकार इतरांसोबत घडू नये म्हणून त्यांनी पोलिसांत सविस्तर तक्रार दिली.
तपासानंतर मध्यस्थीच्या नावानं पैसे उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अशी फसवणूक झालेले सागर हे एकमेव नाहीत. हा प्रकार देशभरात घडत असल्याचं पोलीस सांगत आहेत.
"माझ्याबाबत जी घटना घडली ती खूप जणांच्या बाबतीत घडलेली आहे. फक्त समाजाच्या लाजेपोटी ग्रामीण मुले या गोष्टी सांगत नाहीत. कारण या गोष्टींसाठी समाज कारणीभूत आहे. तर प्रशासन दुप्पट कारणीभूत आहे," अशी नाराजी सागर व्यक्त करतात.
दुसरीकडे पोलीस प्रशासन या टोळीवर केवळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकतात. त्यात काही दिवसानंतर जामीन मिळतो. त्यामुळं अशा लोकांना कायद्याचा पुरेसा धाक राहात नसल्याची खंत सागर व्यक्त करतात.
अशी फसवणूक होते
लग्न जमल्यानंतर मध्यस्थी टोळींची नवऱ्या मुलांकडून पैसे उकळण्याची एक खास पद्धत आहे.
"लग्न जमवण्याची चर्चा सुरू होती, तेव्हा मला असं सांगण्यात आलं की मुलीची आई अचानक आजारी पडली आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची आहे.
खरंतर, माझीही परिस्थिती नाजूक होती. पण आपल्याला त्यांच्यासोबत सोयरिक करायची होती. म्हणून मी बँकेतून कर्ज काढलं आणि समोरच्या लोकांना दिलं.
"त्या लोकांनी लग्नाआधी माझ्याकडून एक लाख वीस हजार रुपये घेतले. त्यानंतर लग्न करण्यासाठी मला 20-25 हजार रुपये खर्च आला," असं सागर सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
अशी प्रकरणं इथंच थांबत नाहीत. तर बहुतांश वेळा बनावट लग्नात तथाकथित नवरी मुलगी लग्न झाल्यानंतर दागिने, पैसे घेऊन फरार होतात.
यामध्ये ती एकटीच नसून एक मोठी टोळी विशिष्ट पद्धतीने काम करत असल्याचं पीडित तरुण आणि पोलीस सांगत आहेत.
सागर पुढे सांगतात, "मुलीला आम्ही 10 हजारांचे चांदीचे दागिने घातले होते. अडीच तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र घातलं. एक नेकलेससुद्धा होता त्यात. एकूण माझी 5 लाखांची फसवणूक झालीय."
बीबीसी मराठीशी बोलताना बीड जिल्ह्यातील वडवणी पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे सांगतात की, जी मुलं वयात आली आहेत पण त्यांचं लग्न जुळत नाहीत, अशा मुलांना मध्यस्थी करणाऱ्या टोळी बरोबर हेरतात. गेल्या महिन्यात (सप्टेंबर 2025) अशाच प्रकारची तक्रार आमच्याकडे आली आहे.
"तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार लग्न झाल्यानंतर आठ दिवसात मुलगी माहेरी जायचं असं सांगते. तेव्हा तिला घेऊन जाण्यासाठी आलेल्या व्यक्ती अनोळखी होत्या. त्यामुळं नवऱ्या मुलाकडच्या लोकांनी नव्या सुनेला अनोळखी लोकांसोबत जाऊ दिलं नाही. हे प्रकरण आमच्यापर्यंत पोहोचलं, तेव्हा ते बनावट लग्न असल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे."

व्हगाडे यांनी पुढे तपास केल्यानंतर या टोळीची एक विशिष्ट कार्यपद्धती असल्याचं समोर आलं आहे. तसंच त्यांच्या पोलीस हद्दीत अशाच प्रकारची आणखी दोन प्रकरणं घडल्याचं त्या सांगतात.
पहिल्या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेतलं. दुसऱ्या प्रकरणात सहाजणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यस्थी करणाऱ्या एका टोळीत किमान 7 ते 8 सदस्य असतात. मुलीची आई, मुलगी स्वतः, एखादा मध्यस्थ, मामा-मामी, काका, मावशी आणि इतर दोघेजण जे मुलीला माहेरी नेतो असं सांगून घेऊन जातात.
या साखळीत पहिला सदस्य मुलाच्या घरच्यांसोबत संपर्कात असतो. तो मुलाचे मामा, काका किंवा मित्र यांना विश्वासात घेतो.
मग लग्न करण्यास घाई केली जाते. लग्नाच्या आधी मुलीच्या आईचे किंवा वडिलांचे वैद्यकीय कारण सांगून पैसे घेतले जातात. तर दुसरा प्रकार म्हणजे मुलगी अनाथ आहे आणि तिला सांभाळणाऱ्या आत्या/मावशीला ठरावीक रक्कम द्यावी लागेल, असं सांगितलं जातं.
तर लग्नानंतर काही दिवसांत मुलगी दागिने आणि पैशांसहित पसार होते.

सागर यांनी धाडस दाखवून पोलिसांत तक्रार केली. पण बहुतांश पीडित तरुण हा प्रकार उघड करत नाहीत.
याविषयी बोलताना जुन्नरचे पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील सांगतात की, "अशावेळी लोकांनी पुढे येऊन तक्रार देणं गरजेचं आहे. पण यात त्यांना सामाजिक कुचंबना होण्याची भीती वाटते.
दुसरं म्हणजे लग्नात होणारी आर्थिक फसवणूक ही नेहमी वैयक्तिक चूक समजून स्वत:ला दोष देतात. पण बनावट लग्नांना आळा घालायचा असेल तर पीडित तरुणांनी पुढे येऊन तक्रार द्यायला पाहिजेत"
'मुलींचाही रॅकेटकडून वापर'
सागर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांची तथाकथित पत्नी ही स्वतः पीडित होती आणि तिचा एका मोठ्या टोळीकडून वापर करण्यात आला.
सागर सांगतात, "त्या मुलीची जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी आधी लग्नं झालेली होती. माझ्यासारखी अजूनही अनेक मुलं आहेत, ज्यांची अशाच प्रकारे फसवणूक झाली.
मध्यस्थ एकच नसून त्यांची एक मोठी टोळी आहे, जी हे सगळं चालवते. मी तिला विचारलं, 'तू हे सगळं का सहन करतेस?' तेव्हा ती म्हणाली, 'आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही.' तिचं पहिलं खरं लग्न झालं होतं, पण नवऱ्याने तिला घराबाहेर हाकलून दिलं."

बीबीसी मराठीने आणखी एका अशाच पीडित तरुणाशी बातचीत केली.
नाव न सांगण्याच्या अटीवर ते म्हणाले की, "माझी बायको माझ्यासोबत दीड वर्षं राहिली. माझ्याकडे असताना फार छान राहायची. तिने कधी घरातल्या पैशाला हात लावला नाही. पण अधूनमधून मावशीकडे जायचं म्हणून पुण्यात जाऊन राहायची.
या काळात तिचं आणखी एक लग्न झालं. आम्हाला याची माहिती इन्स्टाग्राममधील काही फोटोद्वारे कळली. तिची अधिक चौकशी केली तेव्हा आम्हाला समजलं की, माझ्याआधीही तिची लग्ने झाली होती आणि माझ्यानंतरही एक लग्न झालं. तेव्हा एक टोळी तिचा वापर करत असल्याचं मलातरी वाटलं."
लग्नातल्या अशा फसवणुकीला बळी पडायचं नसेल, तर लग्नाळू तरुणांनी अतिघाई करू नये, मुलगी आणि तिच्या कुटुंबियांबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. तसंच त्यांच्या गावी जाऊन अधिक चौकशी करावी, असा सल्ला पोलीस देतात.
तसंच अशा प्रकरणांत हात पोळलेल्या पीडित तरुणांकडूनही अशा प्रकारची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं सांगितलं जातं.
काय काळजी घ्यावी?
"लग्नाआधी आम्ही मुलीच्या घरी भेट दिली नाही. त्या टोळीकडून लग्नासाठी घाई केली आणि मी पण लग्नाला हो म्हटलं, ही आमची मोठी चूक ठरली," असं सागर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. पण लग्नाळू मुलांनी अशा चुका करू नयेत असं ते सांगतात.
लग्न प्रकरणांतील फसवणूक टाळण्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं असल्याचं पोलीस सांगतात.
- मुलगी आणि तिच्या कुटुंबाबाबत संपूर्ण माहिती गोळा करा. शिक्षण, नोकरी, कुटुंबाची पार्श्वभूमी तपासा.
- प्रत्यक्ष भेटी घ्या. मुलीच्या घरी किंवा गावात जाऊन चौकशी करा.
- स्थानिक लोकांशी बोला. गावकऱ्यांकडून कुटंब, त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवा.
- ऑनलाइन प्रोफाइल आणि माहितीची सत्यता तपासा. संशयास्पद बाब दिसल्यास सावधगिरी बाळगा.
- एखाद्या अडचणीचे कारण सांगून कुणी पैसे मागत असेल तर गडबड आहे, असं समजा.
- मध्यस्थांमार्फत लग्न होत असल्यास त्याबाबतही चौकशी करा.
- मध्यस्थ कोण आहे, त्यांचा अनुभव काय आहे? आधी किती यशस्वी लग्नं जुळवली आहेत? हे नक्की तपासा.
'गंभीर सामाजिक प्रश्न '
ग्रामीण भागातील लग्नाळू मुलांना मुली न मिळण्यामागं मुलींच्या आणि पालकांच्या वाढलेल्या अपेक्षा हे कारण सांगितलं जातं. नवरदेवाला चांगली नोकरी, घर आणि प्रतिष्ठित कुटुंब असावं, अशी अट अनेकदा सांगितली जाते. पण सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड यांच्या मते हे मुख्य कारण नाही.
त्या सांगतात की, "महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुलींचा घटलेला जन्मदर चिंताजनक आहे. यामुळं लग्नासाठी मुली नसल्याने अनेक तरुण अविवाहित राहतात. तर दुसरीकडं ग्रामीण भागातील जीवनशैली, शेतीतील श्रमाची कामं, घरच्या चालीरीती, परंपरा आणि घरकामाच्या जबाबदाऱ्या अशा ओझ्यांखाली गावातील सुनेला जगावं लागतं."
मुलगी नोकरी करत असेल तर चालते, पण तिच्याकडून घर सांभाळण्याचीही अपेक्षा असते. ही दुहेरी जबाबदारी अनेक वेळा तणावदायक ठरते. त्यामुळं शिकलेल्या मुली शहराची वाट धरत आहेत, असं कड सांगतात.
तरुण लेखिका श्वेता पाटील यांच्या मते, ग्रामीण भागात मुलींचं स्वातंत्र्य अनेकदा दडपलं जातं, त्यामुळे त्या गावात लग्न टाळतात.

फोटो स्रोत, Getty Images
बीबीसी मराठीसाठी लिहिलेल्या लेखात त्या सांगतात की, "गावं बदलली तर गावकंडे आणि पर्यायाने शेतकरी मुलाचा लग्नासाठी बघण्याच्या मुलींच्या दृष्टिकोनातही बदल होईल. गावाकडच्या शेतकरी कुटुंबात सगळं काटेकोर ठरलेलं असतं, निदान घरच्या सुनेसाठी तरी.
माझी मोठी बहीण अशाच एका मोठ्या घरात लग्न करून गेली आहे. रोज सकाळी पाच वाजता उठलंच पाहिजे, अंगण झाडलं पाहिजे, सडा-रांगोळी केली पाहिजे, हा नियम एवढा कडक आहे की, पीरियड्स आलेत बरं वाटत नाही म्हणून उशीरापर्यंत झोपायची तिला मुभा नाही."
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-4 (2015-2016) नुसार भारतातील फक्त 41 टक्के महिलांना पूर्ण संचार स्वातंत्र्य मिळतं. त्यातही ग्रामीण भागात हे प्रमाण आणखी कमी आहे.
श्वेता पुढे सांगतात की, "शहरात सगळंच चांगलं असं नाही, पण निदान शहरात मोकळेपणाने जगण्याच्या शक्यता असतात. गावात सुनेने जीन्स घालून नवऱ्यासोबत रात्री सिनेमाला जाणं सासू-सासऱ्यांना आवडेल का? हा मुद्दा कपड्यांचा नाही, तर खुलेपणाने जगण्याचा आहे. मुलींच्या मनात आपला नवरा आर्थिकदृष्ट्या स्थिर, समजूतदार आणि कुटुंबप्रेमी असावा, अशी अपेक्षा करणं वाईट आहे का?"
ग्रामीण कुटुंबांमध्ये अजूनही मुलीने घरच्या परंपरा पाळाव्यात, वडीलधाऱ्यांचं ऐकावं आणि घरकामात सहभाग घ्यावा अशी अपेक्षा असते. आधुनिक, शिक्षित मुलींना हे स्वीकारणं कठीण वाटतं, असंही त्या सांगतात.
एका बाजूला ही आर्थिक आणि भावनिक फसवणुकीची कहाणी आहे, तर दुसऱ्या बाजूला वय वाढलेल्या मुलांची लग्नं न होणं, हा उभा राहिलेला एक ज्वलंत सामाजिक प्रश्न बनला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











