You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शोले सिनेमानं 50 वर्षांपूर्वी समाजातले 'हे' पारंपरिक साचेही मोडीत काढले होते
- Author, यासिर उस्मान
- Role, बीबीसी हिंदीसाठी
'कितने आदमी थे?'
'जो डर गया, समझो मर गया'
'ये हाथ हमको दे दे ठाकुर'
'बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना'
'हम अंग्रेंजों के जमाने के जेलर है'...
तब्बल 50 वर्षांपूर्वी झळकलेल्या 'शोले' या चित्रपटातील हे मोजकेच संवाद इथं दिले आहेत. या संवादांची जादू आजही कायम आहे. या सिनेमात यासारखे असे अनेक संवाद आहेत, ज्यांनी हिंदी सिनेसृष्टीत इतिहास घडवला आहे.
बॉलिवूडच्या अनेक मोठ्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची चमक काळानुसार फिकी पडत गेली, परंतु 'शोले'नं मात्र आपली जागा दिवसेंदिवस आणखी मजबूत करून ठेवली आहे.
50 वर्षांपूर्वी भारताच्या स्वातंत्र्य दिनी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता केवळ एक सिनेमा न राहता एक अनुभव बनला आहे.
एक अशी भावना, जी प्रत्येक वेळी पाहताना नवा रंग धारण करते. बूमर असो, जेन एक्स, मिलेनियल्स असोत किंवा जेन झी, प्रत्येक पिढी हा चित्रपट आपल्या नजरेतून पाहते आणि त्यात स्वतःचं प्रतिबिंब शोधते.
हा सिनेमा प्रत्येक काळाशी, प्रत्येक वयोगटातील लोकांशी मैत्री कशी करावी हे जाणतो आणि जय-वीरूच्या मैत्रीसारखाच सर्वांमध्ये मिसळून जातो.
70 च्या दशकातील मसाला चित्रपट 'शोले'च्या संवादांवर, दिग्दर्शनावर आणि तांत्रिक बाबींवर अनेक दशकांपासून चर्चा होत आली आहे.
पण विशेष म्हणजे या सिनेमानं मनोरंजनाची वाट धरूनच समाजाच्या आणि जुन्या हिंदी सिनेमाच्या पद्धतींना आव्हान दिलं.
स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय चित्रपटांमध्ये कथा बहुतेक वेळा ठरलेल्या चौकटीतच फिरत असत, परंतु शोलेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याने बॉलिवूडच्या अनेक वर्षांपासून चालत आलेल्या जुन्या रुढी, साचे आणि ठराविक कल्पना (स्टिरियोटाइप) मोडून काढल्या.
म्हणूनच, 50 वर्षांनंतरही शोले आपल्याला जुना किंवा काळाच्या मागे पडलेला सिनेमा वाटत नाही.
याची विचारसरणी आणि भावना आजच्या काळातील वाटतात, जणू वेळेची पर्वा न करता स्वतःच्या वेगळ्याच तालासुरात चालत आहेत.
शोलेमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या स्पष्ट दाखवतात की, हा चित्रपट आपल्या काळापेक्षा अनेक पावलं पुढे होता.
जय-वीरू: चोर ते चौकीदार, सिनेमातील मजेशीर प्रवास
काही अपवाद वगळता, शोलेच्या आधीचे बॉलिवूडचे नायक बहुतेक वेळा निष्कलंक, नैतिक आणि आदर्शवादी पात्र म्हणून दाखवले जात असत.
शोलेने हा पारंपरिक आदर्श नायकाचा साचा मोडून टाकला. इथे होते जय आणि वीरू, तुरुंगातून सुटलेले चोर-बदमाश, ज्यांचा भूतकाळ काहीसा वाईट होता. ते दारू पित, खोटं बोलत आणि लोकांना फसवतही असत.
परंतु, जेव्हा ठाकूर बलदेव आणि रामगढच्या सर्व आशा या दोघांवर होत्या, तेव्हा हे नायक फक्त बदलले नाहीत, तर धोकादायक आणि बलाढ्य अशा गब्बर सिंगविरोधात ठामपणे उभे राहिले.
नायक तो नसतो, जो पूर्णपणे पवित्र आणि निष्कलंक असतो. नायक तो असतो जो आपला भूतकाळ मागे ठेवून, आपल्या आतला चांगुलपणा जागृत करतो.
चोर असतानाही त्यांनी गावाचं रक्षण केलं, मैत्री जपली आणि माणुसकीही दाखवली.
मैत्रीचा नवा चेहरा
स्वतः लेखक जावेद अख्तर यांचं असं म्हणणं आहे की, शोलेपूर्वी बॉलिवूड सिनेमांमध्ये पुरुषांची मैत्री प्रामुख्यानं प्रियकर-प्रेयसीसारखी असायची.
ते पुढं म्हणाले, "बॉलिवूड सिनेमातील पूर्वीचे मित्र एकमेकांना मिठी मारत म्हणायचे, 'मेरी जान, मेरे दोस्त, तूने जान भी मांगी तो क्या मांगी' अशाप्रकारचे संवाद बोलायचे. पण खरे मित्र कधीही एकमेकांशी असं बोलत नाहीत."
पण शोलेमध्ये जय-वीरू एकमेकांना चिडवायचे, मजा करायचे, एकमेकांची चेष्टा करायचे, भांडायचे, तरीही अडचणीत एकमेकांसोबत उभे राहायचे.
तुमच्या लक्षात आहे ना तो सीन, जेव्हा जय-वीरू बसंतीच्या 'मौसी'कडे आपलं नातं घेऊन जातात, पण नंतर गंभीर होऊन आपल्या भविष्याबद्दल मनमोकळेपणानं एकमेकांशी भावना शेअर करतात.
जेव्हा वेळ येते, तेव्हा जय आपला जीवही देतो, पण कोणताही संवाद किंवा डायलॉग न म्हणता.
अशी मैत्री आणि केमिस्ट्री पहिल्यांदाच शोलेमध्ये पाहायला मिळाली आणि नंतरच्या हिंदी चित्रपटांमधील मैत्रीवर याचा मोठा परिणाम झाला.
बसंती: गावातील त्या काळची 'वर्किंग वुमन'
कमर्शियल हिंदी सिनेमांमध्ये सहसा शहरातील किंवा गावातील नायिका फक्त 'प्रेयसी' असायची, 'वर्किंग वुमन' नव्हती.
परंतु, रामगढच्या बसंतीने (हेमा मालिनी) दाखवून दिलं की, महिलाही गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसू शकते.
टांगेवाली बसंती ही 'वर्किंग वुमन' होती आणि ती चार भिंतींच्या बाहेर जाऊन आपलं घर चालवत होती.
ती गावात सन्मानानं काम करून कमावते आणि पारंपरिक लाजाळू नायिकांपेक्षा वेगळी, कोणाचीही भीती न बाळगता आपलं मत मांडते.
आपल्या पहिल्याच सीनमध्ये बसंती सांगते, "लोग हमसे ये भी कहते हैं कि बसंती लड़की होकर तांगा चलाती हो तो हम उसका जवाब ये देते हैं कि धन्नो घोड़ी होकर तांगा खींच सकती है तो बसंती लड़की होकर तांगा क्यों नहीं चला सकती."
राधा: पारंपरिक बंधनांपेक्षा स्वतंत्र स्त्रीचं प्रेम
शोलेपूर्वी रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला त्यांचा पहिला चित्रपट 'अंदाज' मध्येही अशा स्त्रीच्या आयुष्यात प्रेम दाखवलं होतं, जिचा पती आता या जगात नाही.
त्या काळी समाजात अशा स्त्रियांसाठी प्रेम, सुंदरता किंवा जीवनातील नवीन सुरुवातीच्या कथा फारच कमी असायच्या.
'अंदाज'च्या कथेचाही हाच विषय होता. परंतु, शोलेसारख्या अॅक्शन, सूड आणि थ्रिलने भरलेल्या चित्रपटातही रमेश सिप्पींनी राधाच्या (जया बच्चन) पात्राद्वारे एक खोल आणि धाडसी संदेश दिला की, प्रेमासाठी वय, परिस्थिती किंवा समाजाची मर्यादा काहीही महत्त्वाची नसते.
ही गोष्ट न कुठल्या भाषणातून सांगितली गेली, न कुठल्याही संवादात जबरदस्ती किंवा बळजबरीने घुसवण्यात आली.
फक्त एक सीन होता, जेव्हा ठाकूर (संजीव कुमार) आपली विधवा सून राधाच्या दुसऱ्या लग्नासाठी तिच्या वडिलांकडे (इफ्तिखार) परवानगी मागायला जातात.
वडील थक्क होऊन म्हणतात, "असं कसं होईल ठाकूर साहेब? समाज आणि कुटुंबातील लोक काय म्हणतील?"
ठाकूर उत्तर देतात, "समाज आणि कुटुंब लोकांना एकटेपणापासून वाचवण्यासाठी आहेत, नर्मदाजी, कोणाला एकटं ठेवण्यासाठी नाही. मग दुसऱ्यांच्या भीतीमुळे आपण आपली राधा जिवंत असतानाच मारून टाकायची का?"
मुख्य प्रवाहातील मसाला सिनेमा असूनही शोलेमध्ये अनेक गोष्टींमध्ये प्रगत विचार दिसतात आणि काही बाबतीत त्या त्या काळानुसार बंडखोरही वाटतात.
एक सासरा आपल्या विधवा सुनेच्या दुसऱ्या लग्नासाठी प्रयत्न करतो, तोही अशा माणसासोबत जो आधी गुन्हेगार होता. कारण त्याला माहीत आहे की त्याच्या सुनेचं सुख फक्त यामध्येच आहे.
हीच होती पात्रांमधील नव्या विचारांची चाहूल, काळाबरोबर चालणारी गोष्ट जी शोलेला संस्मरणीय बनवते.
पटकथा लेखक सलीम खान यांनी एकदा शोलेच्या संवादांबद्दल बोलताना मला सांगितलं होतं, "लोक अजूनही आम्हाला म्हणतात, तुम्ही किती भन्नाट संवाद लिहिले आहेत, 'होली कब है?' किंवा 'कितने आदमी थे?'"
आता या ओळी जास्त प्रसिद्ध झाल्या आहेत, पण असे संवादही आहेत जसं, 'समाज और बिरादरी इंसान को अकेलेपन से बचाने के लिए बने हैं' किंवा 'जानते हो दुनिया का सबसे बड़ा बोझ क्या होता है? बूढ़े बाप के कंधे पर जवान बेटे का जनाज़ा.'
पण, लोकांच्या लक्षात आहे, 'कितने आदमी थे?'
डाकू गब्बर सिंग- लार्जर दॅन लाइफ व्हिलन
शोलेपूर्वीही हिंदी सिनेमात अनेक लक्षात राहणारे खलनायक झाले होते, पण गब्बर सिंगची खलनायकी शैली त्या काळासाठी पूर्णपणे नवीन आणि क्रांतिकारी होती.
प्राण, के. एन. सिंह आणि अजित यांच्यासारखे सहसा सूट-बूटात दिसणारे शहरी खलनायक असायचे, पण गब्बर सिंग त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा होता.
तो जंगलात राहणारा, धुळीने माखलेला, निर्दयी डाकू होता जो ठाकूरच्या नातवालाच नव्हे, तर आपल्या गँगमधील सदस्यांनाही क्षणार्धात जिवे मारतो.
गब्बर स्वतः चित्रपटात म्हणतो, "पचास-पचास कोस दूर जब कोई बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा."
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, असं असूनही शोले काही रक्ताने माखलेला आणि हिंसक असा चित्रपट नव्हता. यात हिंसा दाखवण्यात आली, पण तीही प्रतिकात्मक सीनद्वारे दाखवली गेली होती.
सिनेमा डोळ्यासमोर आणा, गब्बर ठाकूरच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या करतो. संपूर्ण चित्रपट या सीनभोवती फिरतो, ज्याचा बदला ठाकूर घेतो, पण या सीनमध्ये एक थेंबही रक्त दिसत नाही.
इमामच्या (ए के हंगल) मुलाची हत्याही दाखवली नाही. फक्त गब्बरने एका किड्याला चिरडून मारलं, इतकंच पुरेसं होतं.
पण रक्तपात न दाखवताही गब्बरची प्रतिमा इतकी भयानक आणि खोल आहे की, 50 वर्षांनंतरही तो भारतीय सिनेमातील सर्वात मोठा खलनायक मानला जातो.
शोलेला अजरामर बनवण्यासाठी जय-वीरूची मैत्री, बसंतीची मजा, राधाचं मौन किंवा ठाकूरच्या वेदना जितक्या महत्त्वाच्या होत्या, तितकंच महत्त्वाचा गब्बरचा भयंकरपणा किंवा त्याची भीतीही होती.
सलीम-जावेद यांनी गब्बरच्या रूपात फक्त एक खलनायक तयार केला नाही, तर हिंदी सिनेमातील सर्वात भयानक आणि लक्षात राहणारा चेहरा सादर केला, ज्याचा प्रभाव 50 वर्षांनंतरही काहीच कमी झालेला नाही.
हिंदी चित्रपट सुरुवातीपासूनच अनेक प्रकारच्या (जॉनर) कथा आणि रंग किंवा शैली एकाच सिनेमात दाखवतात. हॉलिवूड किंवा युरोपियन सिनेमांमध्ये असं नसतं.
शोलेतही अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, इमोशन, थ्रिल सर्वकाही आहे. परंतु, शोलेमध्ये या सर्व भावनांचं एक अप्रतिम संतुलन साधलं गेलं आहे.
याची सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राऊंड स्कोअर, एडिटिंग आणि कथानक इतकं छान जुळलं होतं की, प्रत्येक सीन थेट हृदयात आणि मनात घर करून राहिलं.
फक्त कथानकातील मुख्य पात्रच नाही, तर सांभा, कालिया, जेलर, हरिराम नाई आणि सूरमा भोपालीसारखे छोटे-मोठे पात्रही लोकांना आजही आठवतात आणि 50 वर्षांनंतरही ते पॉप-कल्चरचा एक भाग आहेत.
हिंदी सिनेमाचे अनेक ठराविक स्टिरियोटाइप मोडून शोले एका लोककथेप्रमाणे बनला आहे, जी पिढ्यानपिढ्या सांगितली जाते आणि पुन्हा पुन्हा पाहिली जाते, पण कधीही आपली चमक गमावत नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)