हॅरी पॉटरमधल्या 'हर्मायनी' आणि 'मॅडम हूच' यांना गाडी चालवण्यास बंदी का घालण्यात आली?

    • Author, स्टीव्हन मॅकिंटॉश
    • Role, एंटरटेनमेंट रिपोर्टर

हॅरी पॉटर या सिनेमानं एकेकाळी लहान मुलांसह मोठ्यांवरही भुरळ पाडली होती. चित्रपटातील प्रत्येक पात्रानं रसिकांच्या मनात घर केलं होतं.

दरम्यान, या सिनेमातील हर्मायनीची भूमिका साकारणारी एमा वॉटसन चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे एमा एकटीच नव्हे, तर या सिनेमातील आणखी एक कलाकार झोई वॉनामेकर याही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

एमा वॉटसन आणि झोई वॉनामेकर यांना एका प्रकरणात कोर्टानं दंड ठोठावत त्यांच्यावर 6 महिन्यांसाठी गाडी चालवण्यावर बंदी घातली आहे.

एमा वॉटसनने हॅरी पॉटर चित्रपटांच्या मालिकेत हर्मायनी ग्रेंजरची भूमिका केली होती. तिने गेल्या वर्षी 31 जुलैच्या सायंकाळी ऑक्सफर्डमध्ये 30 एमपीएच वेग मर्यादेच्या झोनमध्ये 38 एमपीएच वेगाने तिची निळी ऑडी चालवली होती.

वेग मर्यादा उल्लंघनाची ही घटना घडण्यापूर्वीच वॉटसनच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर 9 गुण जमा झाले होते, असं न्यायालयात सांगण्यात आलं. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

एमा क्रिएटिव्ह रायटिंग शिकतेय

35 वर्षीय एमा वॉटसन सध्या विद्यार्थीनी आहे. मागील आठवड्यात बुधवारी (16 जुलै) हाय विकॉम्ब न्यायालयाने तिला एकूण 1,044 पौंड दंड भरण्यास सांगितलं. पाच मिनिटांच्या सुनावणीलाही वॉटसन हजर नव्हती.

ती सध्या विद्यार्थिनी आहे आणि दंड भरायला ती सक्षम असून तिच्याकडे पैसे आहेत, असं वॉटसनचे वकील मार्क हॅसलम यांनी न्यायालयात सांगितलं.

एमा वॉटसन 2023 पासून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सर्जनशील लेखन (क्रिएटिव्ह रायटिंग) या विषयात मास्टर्सचं शिक्षण घेत आहे.

2001 मध्ये 'हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटातून डॅनियल रॅडक्लिफ आणि रुपर्ट ग्रिंटसोबत काम करत एमा वॉटसन प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली होती.

एमा वॉटसनने एकूण 8 हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये काम केलं. त्यापैकी शेवटचा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिनं ब्युटी अँड द बीस्ट, द ब्लिंग रिंग आणि द पर्क्स ऑफ बीइंग अ वॉलफ्लॉवर यांसारख्या चित्रपटांत काम केलं आहे.

एमा वॉटसनचा शेवटचा सिनेमा 2019 मध्ये लिटल विमेन प्रदर्शित झाला होता. याचं दिग्दर्शन ग्रेटा गेरविग यांनी केलं होतं. 2023 मध्ये तिनं आपल्या भावासोबत स्वतःचा एक टिकाऊ (सस्टेनेबल) जिन ब्रँड सुरू केला.

जे.के. रोलिंग यांच्या हॅरी पॉटर पुस्तकांवर आधारित एक नवीन टीव्ही मालिका सध्या तयार होत आहे. यात डॉमिनिक मॅक्लॉघलिन हॅरीच्या भूमिकेत आहे, अरबेला स्टॅन्टन हर्मायनीच्या आणि ॲलिस्टर स्टाऊट रॉनच्या भूमिकेत आहेत.

या नव्या टीव्ही मालिकेत जॉन लिथगो डंबलडोरची भूमिका साकारणार आहेत, निक फ्रॉस्ट हे हॅग्रीड, जॅनेट मॅक्टीयर मिनर्व्हा मॅकगोनॅगल म्हणून दिसतील आणि पापा एसीएडू हे सेव्हेरस स्नेपची भूमिका साकारणार आहेत.

ही मालिका एचबीओ कंपनी तयार करत आहे आणि ती पूर्ण व्हायला सुमारे 10 वर्षे लागण्याची शक्यता आहे.

झोई वॉनामेकर यांनाही त्याचदिवशी तसाच दंड

महत्त्वाचं म्हणजे, हॅरी पॉटरमधील दुसऱ्या अभिनेत्री झोई वॉनामेकर यांनाही मागच्या वर्षी वेगात गाडी चालवण्याच्या गुन्ह्यासाठी त्याच दिवशी आणि त्याच न्यायालयात वॉटसनप्रमाणेच गाडी चालवण्यावर बंदी घालण्यात आली होती.

झोई वॉनामेकर यांनी हॅरी पॉटर मालिकेत मॅडम हूचची भूमिका साकारली होती. त्या 7 ऑगस्ट 2024 रोजी बर्कशायरमधील न्यूबरी येथील एम4 रस्त्यावर वेगात गाडी चालवत असताना पकडल्या गेल्या.

76 वर्षांच्या वॉनामेकर या 40एमपीएच मर्यादेच्या भागात 46एमपीएच वेगाने गाडी चालवत होत्या, असं न्यायालयात सांगण्यात आलं.

त्यांनाही 1,044 पौंड दंड आणि सहा महिन्यांसाठी गाडी चालवण्यावर बंदी घालण्यात आली.

त्या कोणतीही 'विशेष सवलत' मागत नाहीत आणि त्यांनी दंड मान्य केला आहे, असं वॉनामेकर यांचे वकील डंकन जोन्स यांनी न्यायालयात सांगितलं.

वॉटसनप्रमाणेच वॉनामेकर यांच्या लायसन्सवरही स्पीडिंगच्या घटनेपूर्वीच 9 गुण जमा झाले होते.

न्यायाधीश अरविंद शर्मा यांनी शिक्षा सुनावताना दोघांच्याही लायसन्सवर आणखी 3 गुण वाढवले, त्यामुळे दोघीही 6 महिन्यांसाठी गाडी चालवण्यास अपात्र ठरल्या आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.