कारगिल युद्धाच्या 26 वर्षांनंतरही शहीद कॅप्टन सौरभ कालिया यांच्या वडिलांचा संघर्ष का सुरू राहिला?

पासिंग आउट परेडदरम्यान कॅप्टन सौरभ कालिया आपल्या आई-वडिलांसोबत.

फोटो स्रोत, NK Kalia/ Penguin India

फोटो कॅप्शन, पासिंग आउट परेडदरम्यान कॅप्टन सौरभ कालिया आपल्या आई-वडिलांसोबत.
    • Author, प्रदीप कुमार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कारगिल युद्धाला 26 वर्षं झाली आहेत. तरीही कॅप्टन सौरभ कालिया यांच्या 78 वर्षांच्या वडिलांची लढाई सुरूच आहे. आपल्या मुलाशी संबंधित एका मुद्द्याला न्याय मिळावा यासाठी एन. के. कालिया यांचा हा लढा आहे.

गेल्या 26 वर्षांच्या या लढाईत त्यांच्या हाती फारसं काहीही लागलेलं नाही. पण जोपर्यंत श्वास सुरू आहे तोपर्यंत ते आशेनं लढत राहतील असं ते सांगतात.

पण हे कॅप्टन सौरभ कालिया आहेत तरी कोण? कारगिल युद्धाशी त्यांचा नेमका संबंध काय? आणि त्यांच्या कुटुंबीयांना एवढी वर्षं कसली लढाई लढावी लागत आहे?

कॅप्टन सौरभ कालिया हे कारगिल युद्धातले पहिले 'वॉर हिरो' आहेत असं आपण म्हणू शकतो. ते या युद्धात शहीद झालेले पहिले भारतीय लष्करी अधिकारी होते.

कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्यासह त्यांच्या गस्त दलातील पाच सैनिकांना 15 मे 1999 रोजी पाकिस्तानी सैन्याने पकडलं होतं.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार कॅप्टन सौरभ अनेक दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांचे आणि त्यांच्या साथीदारांचे फार हाल केले गेले.

22 दिवसांनंतर त्यांचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह भारतीय लष्कराकडे सोपवला गेला.

हे युद्धकैद्यांबाबतच्या जिनिव्हा कराराचं उल्लंघन होतं, आणि हाच तो मुद्दा आहे ज्यासाठी एन. के. कालिया आजही आपल्या मुल्यासाठी लढा देत आहेत.

2012 मध्ये पाकिस्तानचे तत्कालिन गृहमंत्री रहमान मलिक भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा कॅप्टन सौरभ कालिया यांचा मृत्यू पाकिस्तानने गोळ्या घातल्याने झाला की हवामान खराब असल्यानं झाला, हे सांगणं अवघड आहे असं मलिक माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

कारगिल युद्धातले पहिले 'वॉर हिरो'

या परिस्थितींमुळेच कारगिल युद्धात शहीद झालेल्या इतर लष्करी अधिकाऱ्यांना मिळाली तितकी प्रसिद्धी कॅप्टन सौरभ कालिया यांना मिळाली नाही.

पण त्यांच्या मृत्यूच्या 26 वर्षानंतर त्यांचा जीवनपट सांगणारं पुस्तक प्रकाशित होत आहे.

पेंग्विन इंडियाकडून येणारं 'द लीगसी ऑफ कॅप्टन सौरभ कालिया' हे पुस्तक श्रीमती सेन आणि एन.के. कालिया यांनी मिळून लिहिलं आहे.

या चरित्रात त्यांची कारगिल युद्धातली भूमिका आणि त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारांचा विस्तृत उल्लेख केला गेलाय.

कॅप्टन सौरभ कालिया (उजवीकडे) त्यांच्या साथीदारासोबत

फोटो स्रोत, NK Kalia/ Penguin India

फोटो कॅप्शन, कॅप्टन सौरभ कालिया (उजवीकडे) त्यांच्या साथीदारासोबत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

26 वर्षानंतर हे पुस्तक लिहिण्याची गरज का पडली? असं विचारल्यावर श्रीमती सेन म्हणाल्या, "मे-जून 1999 मध्ये हे प्रकरण समोर आलं तेव्हा मी ग्रॅज्यूएशन करत होते. वर्तमानपत्रात कालियासोबत झालेल्या अत्याचारांबाबात वाटलं होतं. या सगळ्यात मला खूप रस निर्माण झाला होता.

कॅप्टन सौरभ कालिया यांच्यासोबत जे झालं त्यानंतर त्यांच्या कुटुंबीय कशा परिस्थितीतून जात असेल याचा विचार मी नेहमी करायचे. पण त्यावेळी या दिशेनं मी गांभीर्यानं काहीही काम सुरू करू शकले नाही."

सेन यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या काम करू लागल्या. सध्या त्या नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये राहतात, "लग्नानंतर मला मुलगा झाला. योगायोग असा की सौरभ कालिया यांच्या वाढदिवसादिवशीच माझ्या मुलाचा जन्म झाला."

या विषयावर काम करायला हवं असं मला वाटू लागलं. पण कॅप्टन कालिया यांच्याबद्दल फार माहितीही उपलब्ध नव्हती."

जवळपास एक वर्ष हिमाचल प्रदेशच्या पालमपूर जिल्ह्यातले कॅप्टन कालिया यांचे कुटुंबीय आणि मित्रांशी भेटीगाठी केल्यानंतर हे पुस्तक तयार झालं. त्यात कॅप्टन सौरभ कालिया यांच्या लहानपणापासून ते कारगिल युद्धात झालेल्या मृत्यूपर्यंतचा तपशील क्रमशः मांडलेला आहे.

लष्करात जायचं स्वप्न

सौरभ कालियाचा मृत्यू झाला आणि पाकिस्तानच्या सेनेनं त्यांचा छिन्नविछिन्न झालेला मृतदेह भारताकडे सोपवला तेव्हा त्यांचं वय फक्त 22 वर्ष होतं.

भारतीय सैन्यात तरूण लेफ्टनंट म्हणून सामील होऊन त्यांना फार काळही झाला नव्हता.

सौरभ कालिया यांचा मृत्यू झाला तेव्हा ते फक्त 22 वर्षांचे होते

फोटो स्रोत, NK Kalia/ Penguin India

फोटो कॅप्शन, सौरभ कालिया यांचा मृत्यू झाला तेव्हा ते फक्त 22 वर्षांचे होते

पण सैन्यात जायची इच्छा त्यांना होती. त्याबद्दल बोलताना एन. के. कालिया म्हणतात, "माझ्या कुटुंबातलं तर कुणीही सैन्यात नव्हतं. नातलगांपैकीही कुणी नाही. पण नियतीनं देशाच्या सेवेसाठी माझ्या मुलाची निवड केली."

सौरभ कालिया यांची आई विजया कालियायांच्या हवाल्यानं श्रीमती सेन असं लिहितात की, "अकरावीत असताना त्याने डीएवी पालमपूरमध्ये प्रवेश घेतला. तेव्हाच त्याची मैत्री अस्तित्व नावाच्या एका मुलाशी झाली. सैन्यात जाण्यामागे ही दोनच कारणं होती."

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याकडून मिळाली प्रेरणा

एन के कालिया त्यावेळी हिमालयन बायोरिसोर्स टेक्नोलॉजी या पालमपूरमधल्या संस्थेत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून काम करत होते. तर सौरभ यांची आई कालिया पालमपूर कृषी विद्यापीठात प्रशासकीय विभागात काम करत होती.

एकदा सौरभ आणि अस्तित्व यांना एकत्र बसवून वडिलांनी लष्करात जायचा विचार कुठून आला हे विचारलं.

सौरभ कालिया आईसोबत

फोटो स्रोत, NK Kalia/ Penguin India

फोटो कॅप्शन, सौरभ कालिया आईसोबत

एन. के. कालिया ते आठवताना म्हणतात, "अस्तित्व सांगत होता की लष्करातले अनेक अधिकारी डीएवी पालमपूरमध्ये शिकले होते. त्यांना दोन वर्ष वरिष्ठ असलेला विक्रम बत्रा याचीही लष्करात अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यावरून दोघांना प्रेरणा मिळाली होती."

"सौरभला विचारलं तेव्हा तो म्हणाला त्याला पहिले लोकांची सेवा करण्यासाठी डॉक्टर व्हायचं होतं. पण प्रामाणिकपणानं काम करण्यासाठी त्याला लष्करात जायचं होतं.''

'जगभरात माझं नाव घेतलं जाईल'

पण सौरभ आणि अस्तित्व यांच्या वाटा पुढे वेगळ्या झाल्या.

सौरभ यांची अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. पण अस्तित्व यांची निवड होऊ शकली नाही. नंतर ते बँकेत नोकरी करू लागले.

कॅप्टन सौरभ कालिया यांचा लहानपणीचा फोटो

फोटो स्रोत, NK Kalia/ Penguin India

फोटो कॅप्शन, कॅप्टन सौरभ कालिया यांचा लहानपणीचा फोटो

सौरभ कालियाच्या लष्करी अधिकारी बनण्याच्या प्रवासात त्यांच्या आईवडील आणि मित्रांसोबतच त्यांचे लहान भाऊ वैभव कालिया यांचंही महत्त्वाचं योगदान होतं.

त्यांच्या संपूर्ण परिवारालाच सौरभ यांच्या सैन्यात असण्याबद्दल अभिमान होता.

सौरभ यांच्या आई आता वयामुळे फार आजारी असतात. पण तरीही सौरभबाबत दोन गोष्टी त्या सगळ्यांना आवर्जून सांगतात.

सौरभ कालिया आईच्या कुशीत

फोटो स्रोत, NK Kalia/ Penguin India

फोटो कॅप्शन, सौरभ कालिया आईच्या कुशीत

पहिली गोष्ट, कारगिल युद्धाच्या आधी 1998 च्या डिसेंबर महिन्यात सौरभ पालमपूरमधल्या त्यांच्या घरी आले होते. परत जाताना स्टेशनवरून ट्रेन पकडत असताना आईला म्हणाले, "आई मी एक दिवस असं काम करेन की जगभरात माझं नाव घेतलं जाईल."

आणि दुसरी गोष्ट ही की या प्रवासाआधी सौरभ यांनी आईजवळ एक सह्या केलेलं चेकबूक दिलं आणि गरज असेल तेव्हा यातून पैसे काढा, असं सांगितलं.

कारगिलमध्ये नेमकं काय झालं?

29 जूनला सौरभ कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी परत येणार होते. त्याआधीच मे महिन्यात कारगिलमधून पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी सुरू केली. तेव्हाच लेफ्टनंट कालिया आणि पाच सैनिकांना बजरंग पोस्टवर गस्त घालण्याची जबाबदारी दिली गेली होती.

मूला राम बिदियासर, भिखा राम मूंढ, अर्जुन राम बसावनबिहा, भंवर लाल बगारिया, नरेश सिंह सिनसिनवार या आपल्या पाच साथीदारांसह 15 मे 1999 ला सौरभ कालिया रवाना झाले.

सकाळी चार वाजता प्रवास सुरू करून पुढे आठ तासाचं चढण पूर्ण करून बजरंग पोस्टला पोहोचायचं होतं.

पण चढण पार करायला थोडा जास्त वेळ लागला. बजरंग पोस्टला पोहोचल्यानंतर उंचीचा फायदा घेत पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना ताब्यात घेतलं, असं म्हटलं जातं.

कॅप्टन कालिया यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी पालमपूरमध्ये एक संग्रहालय उभारलं आहे

फोटो स्रोत, SREEMATI SEN

फोटो कॅप्शन, कॅप्टन कालिया यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी पालमपूरमध्ये एक संग्रहालय उभारलं आहे

त्यानंतर पुढचे 22 दिवस त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. 15 दिवसांनी त्यांच्या कुटुंबीयांना वर्तमानपत्राच्या माध्यमातून सौरभ कालिया बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

31 मेला वर्तमानपत्रात छापलेल्या बातमीवरून हैराण झालेल्या कुटुंबीयांनी पालमपूरच्या होल्टा कँटोनमेंटमध्ये जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण कोणालाही कसलीही माहिती नव्हती.

कुटुंबीयांनी तेव्हाचे स्थानिक संसद सदस्य शांता कुमार यांना संपर्क केला. त्यांनी तत्कालिन केंद्रीय संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी चर्चा केली.

केंद्र सरकारच्या पातळीवर हस्तक्षेप झाल्यानंतरही फक्त इतकंच समजलं की, लेफ्टनंट कालिया बेपत्ता आहेत.

अनिश्चिततेच्या सावटाखाली कुटुंबीय कालिया यांच्या परत येण्याची आशेनं वाट पहात होते. पण 8 जूनला सरकारी दूरदर्शन वृत्तसंस्थेत बातमी झळकली की लेफ्टनंट कालिया आणि पाच सैनिक शहीद झाले आहेत.

सौरभ कालिया यांच्या आठवणी जपण्यासाठी उभारलेल्या संग्रहालयातील त्यांचा कोट

फोटो स्रोत, SREEMATI SEN

फोटो कॅप्शन, सौरभ कालिया यांच्या आठवणी जपण्यासाठी उभारलेल्या संग्रहालयातील त्यांचा कोट

9 जूनला त्यांचे मृतदेह भारतीय सैन्याकडे सोपवले जातील असंही पाकिस्तानी लष्करानं जाहीर केलं. कॅप्टन कालिया यांचा मृतदेह पहिले श्रीनगर, मग दिल्ली आणि तिथून पालमपूरला आला.

मृतदेह इतका छिन्नविच्छिन्न झाला होता की आई-वडिलांना पाहायला देऊ नये, असं वैभव कालिया यांनी ठरवलं. सौरभ यांच्या अंत्यसंस्कारासाठी सगळं पालमपूर लोटलं होतं.

पण सौरभ कालिया यांचा मृत्यू नेमका कशामुळे आणि कोणत्या परिस्थितीत झाला याचं उत्तर मिळू शकलेलं नाही.

पालमपूरच्या संग्रहालयात ठेवलेलं कॅप्टन सौरभ कालिया यांचं पाकीट

फोटो स्रोत, SREEMATI SEN

फोटो कॅप्शन, पालमपूरच्या संग्रहालयात ठेवलेलं कॅप्टन सौरभ कालिया यांचं पाकीट

एन. के. कालिया यांनी भारतीय लष्कराकडून मुलाच्या शवविच्छेदन अहवालाची मागणी केली. त्या अहवालावरून आपल्या मुलावर करण्यात आलेले अत्याचार आणि त्याला झालेल्या वेदना याबद्दलची माहिती त्यांना मिळाली.

ही घटना युद्धकैद्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेल्या जिनेव्हा कराराचे उल्लंघन असल्याचं सांगत पाकिस्तानविरुद्ध इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये जाण्याची मागणी एन के कालिया यांनी केली होती.

पण भारत सरकारच्या धोरणाप्रमाणे भारत आणि पाकिस्तानमधल्या प्रकरणात कोणाचीही मध्यस्ती स्वीकारली जात नाही. त्यामुळेच भारताकडून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात नेलं गेलं नाही.

पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याची मागणी

कॅप्टन कालिया यांचे वडील आपल्या मुलाच्या मृत्यूला युद्धगुन्हा मानत पाकिस्तानविरुद्ध कारवाईची मागणी करत अनेक वर्षांपासून सर्वोच्च्य न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा करत आहेत.

या प्रकरणावर सर्वोच्च्य न्यायालयात अजूनही सुनावणी सुरू आहे.

एन के कालिया म्हणतात, "मी फक्त माझ्याच मुलासाठी हा खटला लढत नाही. पण युद्धबंदी झाल्यानंतर माझ्या मुलासोबत काय होईल याचा विचार करून घाबरून जाऊन कोणत्याही आई-वडिलांनी स्वतःच्या मुलाला सैन्यात जाण्यापासून अडवू नये, म्हणून हा लढा आहे."

दोन महिने कारगिल युद्ध सुरू होतं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दोन महिने कारगिल युद्ध सुरू होतं

कॅप्टन कालिया यांच्या आठवणी जपण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी पालमपूरमध्ये एक संग्रहालय उभारलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज लोक त्याला भेट देतात. या संग्रहालयात कॅप्टन कालिया यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत त्यांच्याकडे असलेली डायरी, पर्स आणि इतर अनेक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्यात.

जेव्हा सौरभ कालिया कारगिलमधील आपल्या शेवटच्या मोहिमेसाठी निघाले होते, तेव्हा त्यांची लेफ्टनंट पदावरून कॅप्टनपदाची बढती देणारं पत्र जाहीर झालं असल्याचं त्यांना माहीतच नव्हतं.

ते पत्र त्यांना कधीच मिळालं नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतर जगाने त्यांना 'कॅप्टन कालिया' म्हणून ओळखायला सुरुवात केली.

भारत सरकारने कॅप्टन कालिया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला एलपीजी गॅस वितरणाचे हक्क दिले. शिवाय, हिमाचल प्रदेश सरकारने 35 एकर जागेत सौरभ वनविहार विकसित केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)