‘कारगिल युद्ध पेटलं होतं तेव्हा चीनने अरुणाचल प्रदेशात जमवाजमव केली आणि...’

चीन

फोटो स्रोत, ANI

    • Author, राघवेंद्र राव
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

नऊ डिसेंबरला भारत आणि चीन यांच्यादरम्यान झालेल्या झटापटीमुळे अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील यांगत्से भाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

ऑक्टोबर 2021 मध्ये याच यांगत्से भागात दोन्ही देशातील डझनभर सैनिक समोरासमोर आले होते आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. हा तणाव काही काळ सुरू होता. दोन्ही बाजू एकमेकांना मागे हटण्यासाठी सांगत होत्या.

शेवटी हे प्रकरण कमांडरस्तरावर सोडवलं गेलं.

सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या यांगत्से भागात भारत चीन आजपासून नाही तर 1999 पासून झगडत आहेत.

जनरल व्ही.पी. मलिक भारतीय लष्कराचे 1997 ते 2000 पर्यंत प्रमुख होते. त्यांच्या मते 1999 पासून कारगिल युद्ध सुरू होतं. त्यावेळी यांगत्सेमध्ये मोठ्या संख्येने सैनिक जमा झाले होते.

चीन

फोटो स्रोत, Tauseef Mustafa

जनरल मलिक सांगतात, “कारगिल युद्धादरम्यान जुलै महिन्यात चीनच्या यांगत्से भागात अतिरिक्त सैनिकांना आणण्यात आलं होतं आणि दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर होते. त्यावेळी कोणतीही झटापट झाली नव्हती. मात्र चीनचे सैनिक तिथे सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत होते.

जवळजवळ तीन महिने ते एकमेकांसमोर होते आणि शेवटी ते आपापल्या जागी परत गेले होते.

जनरल मलिक यांच्या मते, यांगत्से एक वादग्रस्त क्षेत्र होण्याचा एक मोठा इतिहास आणि पार्श्वभूमी आहे. त्यामुळे चीन अशा भागावर दावा करतो जो भारताच्या नियंत्रणात आहे.

दोन देशांच्या मध्ये 2020 च्या आधी पूर्व लडाखच्या गलवन भागात झालेल्या हिंसक झटापटीनंतर सुरू झालेला वाद अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही. नुकत्याच झालेल्या झटापटीने या दोन्ही देशांमधला वाद संपलेला नाही हे पुरेसं स्पष्ट झालं आहे.

जनरल मलिक यांच्या मते 1990 च्या दशकात या दोन देशांचा सीमा वाद निपटवण्यासाठी एक जाँईंट वर्किंग ग्रुप तयार केला होता. त्यावेळी भारत आणि चीन यांनी वादग्रस्त क्षेत्र कोणते याची चाचपणी केली होती. ते सांगतात, “हे वादग्रस्त क्षेत्र अरुणाचल प्रदेशात होतं आणि यांगत्से त्यापैकी एक होता.”

या दोन देशात जशीजशी चर्चा झाली होती, त्यात काही वादग्रस्त भाग निश्चित करण्यात आले होते. “2002 नंतर चीनने नकाशाची देवाणघेवाण बंद केली होती आणि वास्तविक नियंत्रण रेषेचं मानांकन करण्यात काहीही अर्थ नाही.”

चीन

फोटो स्रोत, Getty Images

अरुणाचल प्रदेशाच्या विकास कामात अडथळे

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गेल्या काही वर्षांत अरुणाचल प्रदेशात चीनच्या घुसखोरीच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत.

निनॉग्ग एरिंग सध्या अरुणाचल प्रदेशाच्या विधानसभेत आमदार आहेत. 2019 मध्ये आमदार होण्याआधी ते खासदार होते. संसदेत त्यांनी हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला होता.

मंगळवारी बीबीसीने जेव्हा त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा ते अरुणाचल प्रदेशाच्या सीमावर्ती भागात दौरा करत होते.

ते म्हणाले, “अरुणाचल प्रदेशालगत चीनची कोणतीही सीमा नव्हती. अरुणाचल प्रदेशाची सीमा तिबेटला लागून आहे. आम्हाला अजूनही हेच मान्य आहे. मॅकमोहन रेषेचा सन्मान करायला हवा. चीन असं करत नाहीये. ज्या पद्धतीने चीन या भागावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ती अरुणाचलसाठी दु:खाची बाब आहे.”

एरिंग यांच्या मते चीनच्या वाढत्या घुसखोरीचं कारण अरुणाचल प्रदेशातील विकास योजना आहेत.

ते म्हणतात, “अरुणाचल प्रदेश सीमेवर चीन विकास योजना राबवत आहे. आमच्याकडे पायाभूत सुविधा कमी आहेत, त्यासाठी सरकार काम करत आहेत. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन रस्ते तयार करत आहे आणि आणखी काही परियोजना आखत आहेत. मला असं वाटत आहे की यामुळेच चीनला अडचण आहे. भारताने अरुणाचल प्रदेशातील विकास योजना कायम ठेवायला हव्यात.”

अरुणाचल प्रदेश मागे पडतोय असं लक्षात आल्याबरोबर तिथल्या पायाभूत सुविधांवर काम करायला सरकारने सुरुवात केली होती.

“चीनने पूर्व लडाख भागात अचानक अतिरिक्त सैनिकांना आणून एक नवीन वाद निर्माण झाला होता. आम्हाला पूर्ण सीमा बघावी लागेल.”

पूर्व भाग शांत आहे आणि पश्चिम आक्रमक आहे असा विचार आम्ही करू शकत नाही. जेव्हा त्यांनी पायाभूत सुविधांवर काम करायला सुरुवात केली आणि अतिरिक्त सनिक आणले तेव्हा आम्हालाही अतिरिक्त सैनिक आणावे लागले आणि पायाभूत सुविधा वाढण्यासाठी भारताला प्रयत्न करावे लागले.

तिबेट

फोटो स्रोत, EPA

यांगत्से मध्ये झालेली चकमक किती महत्त्वाची?

2020 मध्ये पूर्व लडाखच्या गलवान भागात झालेल्या चकमकीनंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताने आपली ताकद वाढवली आहे आणि त्याचा परिणाम अरुणाचल प्रदेशमध्ये झाला आहे. त्यामुळेच चीनच्या सैनिकांना पिटाळण्यात भारत यशस्वी ठरला.

जनरल मलिक म्हणतात, “2016 नंतर भारत आणि चीन यांच्यादरम्यान अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या घटनेनंतर अशी कोणतीच घटना समोर आलेली नाही. आता अरुणाचल प्रदेशमध्ये झालेली घटना चिंताजनक आहे. त्यासाठी आमचे सैनिक तयार आहेत. मी तर म्हणेन आधीच्या तुलनेत ही परिस्थिती आणखी सुधारली आहे.”

त्यांच्या मते ही कारवाई अत्यंत विचारपूर्वक केली आहे. कारण नऊ डिसेंबरच्या काही दिवस आधी चीनने या भागात अतिरिक्त सैनिक गोळा करायला सुरुवात केली होती.

जनरल मलिक म्हणतात, “रणनितीच्या पातळीवरसुद्धा स्थिती फारशी सुखद नाही. आपल्याला तयार रहावं लागेल. कारण अशा प्रकारच्या घटना कधीही होऊ शकतात.”

2019 मध्ये नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर चीनने आक्षेप नोंदवला होता. त्याच्या उत्तरादाखल परराष्ट्र मंत्रालयाचं मत होतं की अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारतीय नेते वेळोवेळी इतर राज्यांसारखाच अरुणाचल प्रदेशाचा दौरा करतात.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

चीन गेल्या अनेक वर्षांपासून अरुणाचल प्रदेशावर दावा करत आहे. तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांनाही त्यांनी अरुणाचल प्रदेशात जाण्यास विरोध केला होता. 2021 मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही तिथे जाण्यास विरोध केला होता.

इतकंच नाही, 2021 मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशातल्या 15 जागांची नावं बदलली होती. तज्ज्ञांच्या मते भारत आणि अमेरिका यांच्यात वाढणारी जवळीक चीनसाठी मोठी अडचण आहे.

 भारताला सतर्क राहण्याची गरज

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची पूर्णत: आखणी करण्यात आलेली नाही. दोन्ही देशांमध्ये वाद असलेल्या जागा सीमेवर मोठ्या प्रमाणात आहेत.

जनरल मलिक यांच्या मते प्रत्यक्ष नियंत्रण रेषा जोपर्यंत नकाशावर अंकित केली जात नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना होत राहतील.

“भारताकडून हा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करण्यात आला आहे. मात्र चीन त्याबरोबर सहमत नाही. उलट तो जास्त आक्रमक झाला आहे.”

त्यांच्या मते, सामरिक दृष्टीने बघायला गेलं तर चीनच्या नेत्यांनी जे धोरण स्वीकारलं त्यात अजिबात बदल झालेला नाही.

“ते म्हणतात की त्यांना शांतता हवी आहे. पूर्व लडाखच्या स्थितीवर दोन्ही देशांच्या सैन्यांनी एकमेकांशी 16 वेळा चर्चा केली आहे. तरीही या प्रश्नाचा अद्याप उलगडा झालेला नाही. शांततता प्रस्थापित करण्यासंदर्भात त्यांच्या देशाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत असं दिसतंय. असं झालं असतं तर अशा घटना झाल्या नसत्या.”

जनरल मलिक यांच्या मते स्थिती तणावपूर्ण आहे. त्यामुळे काही ना काही होण्याचा धोका सतत असतोच.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)