सिक्कीमः फक्त 30 मिनिटांत सिक्कीम भारतात सामिल झालं तेव्हा...

चोग्याल आणि त्यांची पत्नी

फोटो स्रोत, LOC.IN

फोटो कॅप्शन, सिक्किमचे शेवटचे राजे चोग्याल आणि त्यांची पत्नी होप कूक
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

6 एप्रिल 1975 ला भारतीय सैनिकांचे ट्रक सिक्कीमच्या राजवाड्याच्या दिशेने रवाना झाले. सकाळी सकाळी कसला आवाज येतोय म्हणून पाहण्यासाठी सिक्कीमचे राजे चोग्याल यांनी राजवाड्याबाहेर डोकावून बघितलं.

तर भारतीय सैन्याने राजवाड्याला चारही बाजूंनी घेरलं होतं. तेवढ्यात मशिनगन चालवल्याचा आवाज येऊ लागला.

मशिनगनची एक गोळी राजवाड्याच्या गेटवर तैनात असलेल्या बसंत कुमार छेत्रींना लागली आणि ते खाली कोसळले.

राजवाड्याच्या संरक्षणासाठी 243 सुरक्षारक्षक होते. तर दुसरीकडे 5,000 भारतीय सैनिक होते.

अवघ्या 30 मिनिटांत हे युद्ध संपलं आणि भारतीय सैन्याने राजवाड्यावर ताबा मिळवला.

त्याच दिवशी 12 वाजून 45 मिनिटांनी सिक्कीम या देशाचा स्वतंत्र दर्जा समाप्त झाला आणि सिक्कीम हे नवं राज्य भारताचं अविभाज्य अंग झालं.

यासंदर्भातील माहिती जगाला कळावी या उद्देशाने राजे चोग्याल यांनी हॅम रेडिओवर एका संदेशाचं प्रसारण केलं.

तिकडे इंग्लंडच्या खेड्यात राहणाऱ्या एका निवृत्त डॉक्टरने चोग्याल यांचा आपत्कालीन संदेश ऐकला. तर स्वीडन आणि जपानमधील इतर दोघांनीही हा संदेश ऐकला होता.

चोग्याल
फोटो कॅप्शन, इंदिरा गांधीचे सचिव आणि चोग्याल

राजे चोग्याल यांच्या या कृतीमुळे त्यांना राजवाड्यातच नजरकैदेत ठेवण्यात आलं.

पण त्याआधी दोन वर्षं म्हणजेच 7 एप्रिल 1973 ला देशाची राजधानी दिल्लीत एक घटना घडली होती.

दिल्लीचे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त बी. एस. दास आपल्या कार्यालयात दुपारचं जेवण करत होते. तितक्यात फोन खणखणला. लाईनवर परराष्ट्र सचिव केवल सिंग होते. 'लवकरात लवकर भेटा', असा मॅसेज केवल सिंग यांनी दास यांना दिला.

दास तातडीने परराष्ट्र मंत्रालयाच्या दिशेने रवाना झाले. परराष्ट्र सचिवांच्या ऑफिसची पायरी चढताच त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

सचिव केवल सिंग म्हणाले, "तुम्हाला सिक्कीम सरकारची जबाबदारी घेण्यासाठी तत्काळ गंगटोकला पाठवण्यात येत आहे. तयारीसाठी तुमच्याकडे केवळ 24 तास आहेत."

दास यांनी सामान आवरून गंगटोक गाठलं. त्यांच्या स्वागतासाठी चोग्याल यांचे विरोधक काझी लेंडुप दोरजी, सिक्कीमचे मुख्य सचिव, पोलीस आयुक्त आणि भारतीय लष्कराचे प्रतिनिधी हजर होते.

सिक्किमची राणी होप कुक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिक्किमच्या राणी होप कुक

दास यांचं स्वागत करण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक त्यांच्या निवासस्थानापर्यंत पायी काढण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी दास आणि राजे चोग्याल यांची भेट होणार होती. त्यासाठी दास यांनी चोग्याल यांच्याकडे वेळ मागितला. यावर आम्ही आमच्या ज्योतिषांशी सल्लामसलत करू आणि मगच भेटीची वेळ ठरवू असं उत्तर चोग्याल यांच्याकडून आलं.

दास सांगतात की, "खरं तर भेट नाकारण्याचं हे एक निमित्त होतं. त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की तुमच्या या पदाला आमची मान्यता नाहीये."

सिक्कीम म्हणजे गोवा नाहीये..

दुसऱ्या दिवशी चोग्याल यांनी दासांना भेटीचा निरोप पाठवला. पण तिथं वातावरण तणावपूर्ण होतं.

चोग्याल आणि त्यांची पत्नी
फोटो कॅप्शन, राजे चोग्याल आणि त्यांची पत्नी होप कूक

चोग्याल यांनी बैठक सुरू करताच सांगितलं की, "मिस्टर दास सिक्कीम म्हणजे गोवा आहे, असा समज करून घेऊ नका."

भूतानला जसा दर्जा दिलाय तसा दर्जा सिक्कीमलाही मिळावा, असा त्यांचा प्रयत्न होता.

ते म्हणाले की, "आम्ही एक स्वतंत्र, सार्वभौम देश आहोत. तुम्हाला आमच्या संविधानानुसार काम करावं लागेल. भारताने माझ्या सरकारला सेवा दिल्या आहेत. याबद्दल कोणताही गैरसमज नसावा. आम्हाला दाबण्याचा कधीही प्रयत्न करू नका."

पण सिक्कीमच्या विलिनीकरणात बी. एस. दास यांची भूमिका महत्त्वाची होती.

बी. एस. दास
फोटो कॅप्शन, बी. एस. दास

दुसर्‍या दिवशी बी. एस. दास सिक्कीममध्ये पोस्टिंग असलेल्या त्यांच्या मित्राला म्हणजेच शंकर बाजपेयी यांना भेटण्यासाठी इंडिया हाऊसवर पोहोचले. दास तिथं पोहोचल्यावर बाजपेयी यांचा पहिला प्रश्न होता की, "केवल सिंग यांनी माझ्यासाठी काय आदेश दिलेत?"

यावर दास सांगतात, "मला विशिष्ट असे कोणते निर्देश दिले नव्हते. पण मला इतकंच सांगितलं होतं की, सिक्कीमच्या लोकांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण मदत करायची आहे. इंदिरा गांधींनीही नेहमीप्रमाणे कोणतीही औपचारिक राजकीय आश्वासने दिली नव्हती. विलीनीकरण हा शब्द तर कोणाच्या तोंडातही नव्हता."

चोग्याल आणि त्यांची पत्नी
फोटो कॅप्शन, सिक्किमचे शेवटचे राजे चोग्याल आणि त्यांची पत्नी होप कूक

ते सांगतात, "आम्हाला सूचना देणारे केवल सिंग यांनी खासगीत देखील हा शब्द कधी वापरला नव्हता. पण बोलले नसले तरी नेमकं करायचं काय आहे याचा अंदाज मला आणि शंकर बाजपेयींना आला होता."

1962 चे चीन युद्ध..

दिवंगत राजकीय विश्लेषक इंदर मल्होत्रा ​​यांच्या मते, "सिक्कीम भारतात विलीन केलं पाहिजे असा पहिला विचार 1962 च्या भारत-चीन युद्धानंतर सुरू झाला."

युद्धानंतर तज्ज्ञांना जाणवलं की, चीनच्या चुंबी खोऱ्याजवळ भारताचा 21 मैल एवढा भाग आहे. याला 'सिलिगुडी नेक' म्हटलं जातं.

चीनने जर ठरवलं तर तो एका झटक्यात ही 'नेक' वेगळी करून भारतात एन्ट्री करू शकतो आणि याच चुंबी खोऱ्याला लागून सिक्कीम आहे.

सिक्किमचं स्थान
फोटो कॅप्शन, सिक्किमचं भौगोलिक स्थान

राजे चोग्याल यांनी अमेरिकन असलेल्या होप कुक यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांनी चोग्याल यांचे कान भरायला सुरुवात केली.

चोग्याल यांना वाटायचं की, सिक्कीमने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली तर अमेरिका त्यांना पाठिंबा देईल. पण भारताला मात्र ही मागणी मान्य नव्हती.

अमेरिकन पत्नीने चोग्याल यांची साथ सोडली..

चोग्याल यांची अमेरिकन पत्नी होप कुक यांचं व्यक्तिमत्त्व गूढ होतं.

चोग्याल यांना भारताविरुद्ध भडकवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

त्यांनी शाळेची पाठ्यपुस्तके बदलली. दर आठवड्याला तरुण अधिकाऱ्यांच्या बैठका बोलावण्याचा त्यांनी सपाटा लावला होता.

सिक्किमच्या राजांचा राज्याभिषेक 4 एप्रिल 1965

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिक्किमच्या राजांचा राज्याभिषेकाचा दिवस. 4 एप्रिल 1965

त्या जेव्हा चोग्याल यांच्या राणीच्या भूमिकेत असायची तेव्हा सिक्कीमच्या लोकांसारखे कपडे घालायची.

अतिशय विनम्रतेने वागायची, बोलताना राणीसारखं शांत आवाजात बोलायची. पण तेच दुसरीकडे राग आल्यावर मात्र तिचा स्वतःवरचा ताबा सुटायचा.

चोग्याल यांना दारूचं व्यसन लागलं होतं.

ते दारूच्या इतके आहारी गेले होते की, त्यांच्या सवयीचा त्रास त्यांच्या राणीला व्हायचा आणि दोघांमध्ये खडाजंगी व्हायची.

एकदा चोग्याल तिच्यावर इतके चिडले की त्यांनी तिचा रेकॉर्ड प्लेयर राजवाड्याच्या खिडकीतून बाहेर फेकून दिला.

राणी होप

शेवटी होप कुक यांनी सिक्कीम सोडून अमेरिकेत परतण्याचा निर्णय घेतला. या कठीण काळात सोबत राहा म्हणून चोग्याल यांनी तिला विनंती केली. पण तिने त्यांचं काही एक ऐकून घेतलं नाही.

तिला सोडायला दास गेले होते. तेव्हा ती दास यांना म्हणाली, "मिस्टर दास, इथं माझी भूमिका संपली आहे. माझ्या पतीची काळजी घ्या."

दास सांगतात की, "होप यांनी जाता जाता राजवाड्यातील अनेक मौल्यवान कलाकृती आणि चित्रं चोरून अमेरिकेला पाठवली होती....आणि हे सांगायला मलाच लाज वाटते."

फक्त एकच जागा निवडून आली..

दास सांगतात की, "चोग्याल यांनी 8 मे च्या करारावर स्वाक्षरी तर केली मात्र त्यांना हा करार कधीच मान्य नव्हता. त्यांनी बाहेरून मदत मिळते का यासाठी चाचपणी सुरूच ठेवली होती."

चोग्याल आणि त्यांची पत्नी
फोटो कॅप्शन, सिक्किमचे शेवटचे राजे चोग्याल आणि त्यांची पत्नी होप कूक

हा करार कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी एक महिला वकील नेमली होती. सिक्कीमची निवडणूक जाहीर झाल्यावर चोग्याल यांनी दक्षिण सिक्कीमला भेट देण्याचा मानस व्यक्त केला. मात्र हे योग्य ठरणार नाही असा सल्ला दास यांनी दिला.

पूर्वी जेव्हा ते या भागात यायचे तेव्हा त्यांना भेटण्यासाठी लोक लांबच लांब रांगा लावायचे, त्यांचं स्वागत करायचे. पण यावेळी मात्र त्यांच्या फोटोंवर चपलांचा हार घातला होता.

चोग्याल यांचा पाठिंबा असलेल्या नॅशनलिस्ट पक्षाला निवडणुकीत 32 पैकी फक्त एकच जागा मिळाली. तर निवडून आलेल्या सदस्यांनी चोग्याल यांच्या नावे शपथ घेणार नाही, तसेच त्यांनी विधानसभेत पाऊल ठेवलं तर कामकाजात सहभाग घेणार नाही असा पवित्रा घेतला.

पीएन धर आणि रॉचे तत्कालीन प्रमुख

फोटो स्रोत, PN DHAR

फोटो कॅप्शन, पीएन धर आणि रॉचे तत्कालीन प्रमुख

दास यांच्यापुढं धर्मसंकट उभं राहिलं. कारण ते नव्याने स्थापन झालेल्या विधानसभेचे अध्यक्षही होते. ते या घटनेविषयी सांगतात, "शेवटी असं ठरलं की, चोग्याल यांनी आपला निषेध लेखी पाठवावा. तो निषेध मी विधानसभेत सर्वांसमोर वाचून दाखवीन. तसेच निवडून आलेले प्रतिनिधी सिक्कीमच्या नावे शपथ घेतील."

चोग्याल यांचा नेपाळ दौरा

दरम्यानच्या काळात चोग्याल यांनी नेपाळचा दौरा केला. नेपाळच्या राजाचा राज्याभिषेक होता आणि चोग्याल राजकीय पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते.

त्या कार्यक्रमाला पाकिस्तानी राजदूत आणि चीनचे उपपंतप्रधान चिन सी लिऊ सुद्धा आले होते. चोग्याल यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे मदत मागितली.

चोग्याल
फोटो कॅप्शन, चोग्याल

बी. एस. दास यांनी चोग्याल यांना एक लेखी पत्र पाठवलं होतं. त्यात चोग्याल यांनी बाहेरून मदत मिळवण्याच्या फंदात पडू नये असं स्पष्ट लिहिलं होतं. तसेच तुमचा राजवंश अबाधित राहील. तुमच्या नंतर वारस म्हणून तुमचा मुलगाच गादीवर बसेल. पण यासाठी तुम्हाला 8 मे रोजी झालेला करार मान्य करावा लागेल, तसेच तुम्ही संरक्षित आहात यावर विश्वास ठेवावा लागेल."

मात्र चोग्याल त्यांच्या मतावर ठाम होते. त्यांचं म्हणणं होतं की, "माझ्याकडे स्वतंत्र देश आहे आणि मी तो सोडणार नाही."

इंदिरा गांधींसोबतची शेवटची भेट

30 जून 1974 रोजी चोग्याल यांनी इंदिरा गांधींना आपल्याकडे वाळवून घेण्याचा शेवटचा प्रयत्न केला. चोग्याल, इंदिरा गांधी आणि गांधींचे सचिव पी. एन. धर यांची ती शेवटची बैठक ठरली.

इंदिरा गांधींचे सचिव असलेले पीएन धर त्यांच्या 'इंदिरा गांधी, द एमर्जन्सी अँड इंडियन डेमोक्रेसी' या पुस्तकात लिहितात, "चोग्याल यांनी ज्या प्रकारे इंदिरा गांधींसमोर संपूर्ण प्रकरण मांडलं ते पाहून मी प्रभावित झालो. ते म्हणत होते की भारत सिक्कीमच्या ज्या राजकारण्यांवर विश्वास ठेवतोय ते त्या लायक नाहीयेत."

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी

यावर इंदिरा गांधी म्हणाल्या की, ते ज्या राजकारण्यांबद्दल बोलत आहेत ते जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत.

चोग्याल यांना अजून बरंच काही बोलायचं होतं पण इंदिरा गप्प बसल्या.

नकारात्मक प्रतिसाद द्यायचा असेल तर मौन बाळगण्यावर प्रभुत्व मिळवलं होतं.

त्या एकदमच उठून उभ्या राहिल्या... रहस्यमयी पद्धतीने स्मितहास्य केलं आणि दोन्ही हात जोडले. चोग्याल आता निघू शकतात असा त्याचा अर्थ होता.

विशेष म्हणजे हेच ते राजे चोग्याल होते, ज्यांना 1958 मध्ये दिल्लीत प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी नेहरू पंतप्रधान होते.

चोग्याल पंतप्रधानांच्या तीनमूर्ती भवनातील निवासस्थानी राहिले होते.

चोग्याल म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी सिक्कीमच्या स्वतंत्र अस्मितेबाबत कधीही तडजोड केली नाही.

चोग्याल आणि त्यांची पत्नी होप कूक

फोटो स्रोत, Sikkimarchives.gov.in

फोटो कॅप्शन, सिक्किमचे शेवटचे राजे चोग्याल आणि त्यांची पत्नी होप कूक

दास सांगतात की, "त्यांनी फक्त एकदाच चोग्याल यांना पराभूत झालेलं पहिलं होतं. सिक्कीमच्या गादीचा वारस असलेला त्यांचा मुलगा अपघातात मरण पावल्यावर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता."

त्याच दरम्यान, त्याची पत्नी होप कुकसुद्धा दोन मुलांसह अमेरिकेला निघून गेली. यामुळे ते खचले होते. 1982 मध्ये कर्करोगाने त्यांचं निधन झालं.

विलिनीकरणाला विरोध..

नंतर सिक्कीम भारतात विलीन करण्याची घोषणा करण्यात आली. तेव्हा चीनने या विलिनीकरणाची तुलना 1968 मध्ये रशियाने चेकोस्लोव्हाकियावर केलेल्या आक्रमणाशी केली.

त्यावर इंदिरा गांधींनीही चीनला प्रत्युत्तरादाखल तिबेटवरील आक्रमणाची आठवण करून दिली. या सगळ्या घडामोडीत भूतान आनंदी होता कारण आता त्यांची तुलना सिक्कीमसोबत केली जाणार नव्हती.

मात्र सर्वाधिक विरोध नेपाळमध्ये झाली. बघायला गेलं तर त्यांना सर्वाधिक आनंद व्हायला हवा होता. कारण नेपाळी वंशाची 75 टक्के लोकसंख्या सिक्कीममध्ये राहत होती.

भारतातील काही ठिकाणी या विलिनीकरणाला विरोध झाला.

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी

हिंदुस्तान टाईम्समध्ये 'अ मर्जर इज अरेंज्ड' नावाच्या हेडलाईनखाली जॉर्ज वर्गीस यांचा संपादकीय लेख छापण्यात आला होता.

त्यात म्हटलं होतं की, "सार्वमत इतक्या घाईघाईने घेण्यात आलं की संपूर्ण मोहीमच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सार्वमत घेताना चोग्याल यांचं पद रद्द केलं जातंय आणि सिक्कीम आतापासून भारताचा भाग असेल असे दोनच प्रश्न विचारण्यात आले. हे दोन्ही मुद्दे वेगवेगळे होते. आणि या दोन्हींचा एकमेकांशी काडीमात्र संबंध नव्हता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे गांधी आणि नेहरूंच्या देशात हे घडलंय."

'रॉ ची भूमिका'

सिक्कीमचं भारतात विलिनीकरण करताना भारताची गुप्तचर संस्था रॉ नेही खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती.

गंगटोकच्या बाजारातील दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गंगटोकच्या बाजारातील दृश्य

दास सांगतात की, "त्यावेळी मी रॉ च्या पार्ट्यांमध्ये जायचो. तिथं उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना मी सिक्कीम बाबत विचारायचो. मात्र मला ते काहीच सांगायचे नाहीत. एक दिवस ते अधिकारी माझ्या घरी आले आणि मला सॉरी म्हणाले. सर आम्ही तुम्हाला काही गोष्टींबाबत सांगू शकत नाही. सिक्कीममध्ये ज्या काही घटना घडणार आहेत त्याबाबत तुम्हाला सांगू नये अशा आम्हाला ऑर्डर्स आहेत. तुम्ही चोग्याल यांचे नोकर आहात आणि अनवधानाने तुम्ही ही माहिती चोग्याल यांना सांगाल असं अधिकाऱ्यांना वाटतं."

"त्यामुळे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतोय की सिक्कीममध्ये शेवटच्या दिवसापर्यंत काय होणार आहे याची मला अजिबात कल्पना नव्हती."

सिक्किमचा 1967 पर्यंतचा झेंडा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सिक्किमचा 1967 पर्यंतचा झेंडा

सिक्कीमच्या विलीनीकरणात रॉ'ने महत्वपूर्ण भूमिका बजावल्याचं इंदर मल्होत्रा ​​यांचं मत होतं. मात्र यासंदर्भात जे काही मार्गदर्शक तत्त्व होते ते भारताच्या राजकीय नेतृत्वानेच जारी केले होते.

इंदिरा गांधींनी रॉचे प्रमुख रामनाथ काव, पी. एन. हक्सर आणि पीएन धर यांची बैठक बोलावली होती.

काव यांना या प्रकरणी सल्ला विचारला असता ते म्हणाले की, "माझं काम सरकारला सल्ला देण्याचं नसून सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं आहे."

इंदिरा गांधींची भूमिका

दास सांगतात, "आम्हाला कल्पना होती की इंदिरा गांधींना सर्व माहिती पोहोचते आहे. मी इंदिरा गांधींसोबत 11 वर्षं काम केलंय. त्यामुळे त्यांच्या स्वभावाबाबत एक सांगू शकतो की, जर कोणी त्यांच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या त्याला सोडायच्या नाहीत. चोग्याल शांत बसणार नाहीत याचा अंदाज त्यांना आला होता. त्यामुळे सिक्कीम प्रकरणाच्या त्या मुख्य नायिका होत्या आणि आम्ही त्यांचे प्यादे होतो."

सिक्कीम भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

फोटो स्रोत, Getty Images

सिक्कीमला भारताचे 22 वे राज्य बनवण्यासाठी 23 एप्रिल 1975 ला संसदेत घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं. त्याच दिवशी 299-11 मतांनी ते मंजूरही झालं.

26 एप्रिलला राज्यसभेत या विधयेकाला मंजुरी मिळाली आणि 15 मे 1975 रोजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी या विधेयकावर सही करून नामग्याल घराण्याची राजवट संपुष्टात आणली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)