You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंडोनेशियातून थेट मक्केपर्यंत 'भुयारी मार्गा'चा दावा, काय आहे सफरावादी गुहेची कहाणी?
कडाक्याचं ऊन पडलं आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. तरीही हजारोंच्या संख्येनं लोक जमा झाले आहेत.
हे दृश्य आहे इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील पामिजहान गावातलं. येथील सफरा व्हॅली गुहा पाहण्यासाठी आलेल्या लोकांचा उत्साह या भयंकर उन्हात तसूभरही कमी झाला नव्हता.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 'बीबीसी इंडोनेशिया'नं या स्थळाला भेट दिली होती. त्यावेळी या 'पवित्र गुहेला' भेट देण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते.
त्यातील बहुतांश यात्रेकरूंचा असा विश्वास होता की, 'ही गुहा मक्का येथे जाण्याचा गुप्त मार्ग आहे.'
इथं मक्केपर्यंत जाण्यासाठी गुप्त भुयारी मार्ग असल्याचं बोललं जातं
यात्रेकरूंमध्ये स्क्रोन बसरन नावाची व्यक्तीही आहे. ते पामिजहान गावात शेख अब्दुल मुही यांच्या मकबराच्या परिसरात असलेल्या गुहेबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हीडिओ पाहिल्यानंतर बसरान आणि त्यांचे मित्र गुहा पाहण्यासाठी येथे आले आहेत.
व्हायरल व्हीडिओ पाहिल्यानंतर गुहेला भेट देण्याची आमची उत्सुकता वाढली, त्यामुळं आम्ही इथं आलो, असं सफरावादी व्हॅली गुहेत प्रवेश करण्यासाठी थांबलेल्या बसरान यांनी आम्हाला सांगितलं.
"मक्केला जाणारा हा रस्ता आम्हाला बघायचा आहे, त्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे," असं ते म्हणाले.
35 वर्षीय बसरान पूर्वीच्या लोकांच्या अशा कथांवर विश्वास ठेवतात, जे या गुहेतून मक्केला पोहोचायचे.
मात्र, या गुहेतून आजही कोणी मक्केला जाऊ शकेल की नाही, याची त्यांना खात्री नाही. कारण या कथेची सत्यता कोणीही सिद्ध करू शकलेलं नाही.
तरीही बसरान आणि त्यांचे सहकारी अजूनही या 'पवित्र गुहेत' प्रार्थना करू इच्छितात. त्यांना आशा आहे की, ते देखील लवकरच अल्लाहच्या घरातील हज करण्यास सक्षम होतील.
ते म्हणतात की, कदाचित ते या गुहेतून नव्हे तर इथं येऊन प्रार्थना करून मक्केला जाऊ शकतील.
माझीही अल्लाहकडे अशाच प्रार्थना आणि आशा आहे. ज्या आम्हाला वर्षातून एकदा सफरावादी (सफावादी) गुहेत घेऊन येतात.
वर्ष 2009 पासून दरवर्षी 'आमच्या संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी' आम्ही इथं येत आहोत, असं ते म्हणाले.
"परंतु, या ठिकाणी इतक्या वेळा भेट देऊन आणि येथे नमाज अदा करूनही, मी अजूनही हजला जाण्याची माझी विनंती मान्य होण्याची वाट पाहत आहे," असं ते म्हणाले.
त्यांचा असा विश्वास आहे की, जर त्यांनी एकट्यानं प्रार्थना केली असती तर कदाचित त्याचं उत्तर मिळालं नसतं.
बसरान म्हणतात, "पण जर मी इथं येऊन प्रार्थना केली तर कदाचित शेख मुही यांच्या मध्यस्थीनं मला संतांचे आशीर्वाद मिळतील आणि आमच्या अल्लाहच्या प्रार्थनांना उत्तर मिळू शकेल."
हे सांगत असताना त्यांचा चेहरा आनंदाने उजळला होता.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला सफरावादी गुहेचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात हा मक्केकडे जाणारा एक गुप्त मार्ग असल्याचा दावा करण्यात आला होता.
गुहेपासून मक्का हा प्रवास अवघ्या दीड तासात पूर्ण होऊ शकतो, असा दावाही एका व्हीडिओमध्ये करण्यात आला होता. व्हीडिओ बनवणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, त्याला एका स्थानिक गाईडने ही माहिती दिली होती.
दुसऱ्या एका व्हीडिओमध्ये, हज दरम्यान यात्रेकरू जसं करतात तसं गुहेत प्रवेश करताना लोकांचा एक गट "लब्बैक अल्लाहू अल्लाहू लब्बैक" म्हणताना ऐकू येतं.
काही सोशल मीडिया युजर्स अशा दाव्यांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आणि इथं येणाऱ्या लोकांची खिल्ली उडवतानाही दिसले आहेत.
एका युजरने येथे येणाऱ्या लोकांना "तुम्ही पासपोर्ट वापरता का?", असं विचारलं.
दुसऱ्यानं "गुहेत इमिग्रेशन ऑफिस आहे का?", असा प्रश्न एकाला केला.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चेनं इंडोनेशियातील दोन प्रमुख इस्लामिक संघटनांना या विषयावर आपलं मत मांडण्यास भाग पाडलं.
इंडोनेशियातील बरेच लोक अजूनही चमत्कारांवर विश्वास ठेवतात आणि कदाचित यामुळंच काही लोक अजूनही अशा अतार्किक गोष्टींवर विश्वास ठेवतात, असं मुहम्मदिया संघटनेचे अध्यक्ष दादांग कहमद यांचं म्हणणं आहे,
दादांग यांच्या मते, अशा गोष्टींपासून लांब राहण्यासाठी ज्ञान मिळवण्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. जेणेकरून समाज अशा निराधार समजुतींमध्ये अडकणार नाही.
इंडोनेशियन उलेमा कौन्सिलचे अध्यक्ष चोल नफीस म्हणतात की, गुहांचा वापर केवळ मनोरंजन आणि निसर्गाचं निरीक्षण करण्यासाठी केला पाहिजे.
चोल नफीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, "तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याची गरज नाही." इंडोनेशिया ते सौदी अरेबियाला जाण्यासाठी जो सामान्य मार्ग आहे, तो वापरला पाहिजे.
23 फेब्रुवारीला सकाळी बीबीसीची टीम तिथे पोहोचली. तेव्हा गुहेत जाण्यासाठी यात्रेकरूंची रांग लागली होती. एकामागोमाग एक यात्रेकरूंचा जत्था गुहेत जात होता.
कधी गुहेतून अजानचा आवाज ऐकू येत. तर कधी-कधी मोठ्या आवाजात नमाज अदा केल्याचा आवाज येत असे.
हे सर्व पाहिल्यानंतर गुहेत प्रवेश करण्यासाठी काही अलिखित आणि पारंपारिक नियम आहेत की काय असं वाटतं. लोक अल्लाहच्या प्रार्थनेसाठी उपस्थितांना आवाहन करतात किंवा प्रवेश करण्यापूर्वी प्रार्थना करतात.
परंतु, व्हायरल व्हीडिओच्या विरूद्ध, गुहेत प्रवेश केलेल्या सुमारे डझनभर समूहांपैकी कोणीही तल्बिया किंवा 'लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक' म्हणताना ऐकलं नाही.
सफरावादी गुहेच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकानं आश्चर्य व्यक्त करत म्हटलं की,"माझा जन्म याच भागात झाला आहे. गेल्या सात वर्षांपासून गुहेच्या प्रवेशद्वारावर मी काम करत आहे. येथे कोणीही तल्बिया वाचलेलं नाही, व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतरच हे सर्व सुरू झालं."
सफरावादी गुहेचा मार्ग मक्केपर्यंत जाण्याची गोष्ट पामिजहान गावातील लोक पिढ्यानपिढ्या ऐकत आले आहेत.
गुहेच्या सुरक्षा रक्षकानं आश्चर्य व्यक्त करत म्हटलं की, 'हे का व्हायरल होत आहे, मला समजत नाही?' विशेष म्हणजे अशी माहिती जी 'थोडीशी चुकीची' आहे.
इतिहासकारांच्या मते, 17 व्या शतकात दक्षिण-पश्चिम जावामध्ये इस्लामचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींपैकी एक शेख अब्दुल मुही आहेत.
स्थानिक परंपरेनुसार शेख अब्दुल मुही येथे आपल्या विद्यार्थ्यांना इस्लामची शिकवण देत असत आणि या गुहेत ध्यान करत असत.
जेव्हा 1730 मध्ये शेख अब्दुल मुही यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्यावर सफरावादी गुहेपासून सुमारे 800 मीटर अंतरावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
एका पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, सफरावादी गुहा ही अशी जागा आहे जिथे इंडोनेशियामध्ये इस्लामचा प्रसार करणाऱ्या नऊ प्रतिष्ठित धार्मिक व्यक्ती, वली सांघा एकत्र भेटत असत.
यात्रेकरू आणि स्थानिकांचा असा विश्वास आहे, की वली सांघा (धार्मिक व्यक्ती) आपापल्या शहरातून भूमिगत मार्गाने खूप वेगाने प्रवास करून प्रार्थना करण्यासाठी येथे जमत. म्हणूनच असं मानलं जातं की, 'मक्का कॉरिडॉर' व्यतिरिक्त, इतर कॉरिडॉर आहेत जे इंडोनेशियाच्या इतर प्रदेशांना जाऊन मिळतात, जसं की सिरेबोन, सुराबाया आणि बिंटन.
सफरावादी इतर काळोख असलेल्या आणि दमट गुहांपेक्षा वेगळी नाही. इथं काही ठिकाणी वटवाघुळं फिरताना दिसतात.
रुंडी हे एक स्थानिक गाईड आहेत. ते यात्रेकरूंना शेख अब्दुल मुही यांनी ज्या ठिकाणी त्यांचे उपक्रम चालवले, ती स्थळं दाखवतात.
रॉकेलच्या दिव्याच्या प्रकाशात ते गुहेचा रस्ता दाखवतात आणि त्याबद्दलच्या कथा सांगतात.
गुहेच्या मुखातून टपकणाऱ्या पाण्याच्या थेंबांना प्रशासन आणि पर्यटक 'आब ए झम झम' म्हणतात.
रुंडी म्हणाले की, यात्रेकरू सहसा या पाण्यानं आपलं तोंड धुतात. "त्यांना या 'झम झम'चा फायदा होईल" या आशेनं ते असं करतात.
गुहेच्या आत उजव्या बाजूला एक खोली आहे. जी शेख अब्दुल मुही यांची राहण्याची खोली असल्याचं मानलं जातं.
बीबीसीची टीम जेव्हा गुहेत पोहोचली तेव्हा यात्रेकरूंचा एक गट अल्लाहची प्रार्थना करताना आणि कुराण अदा करताना दिसला.
काही मीटर अंतरावर पुढं एक लहान तलाव आहे. ज्यावर इंडोनेशियन भाषेत 'जीवनदायी जल' असं लिहिलं आहे. पाणी इतकं स्वच्छ दिसतं की जणू ते नळातून वाहत आहे.
शेख अब्दुल मुही हे या पाण्याचा वजूसाठी वापर करत असत असं सांगण्यात येतं. यात्रेकरू या पाण्याचा वापर आंघोळीसाठी आणि गुहेला भेट देत असताना थकल्यानंतर तहान भागवण्यासाठी करतात.
या ठिकाणाहून थोडं पुढे पायऱ्या आहेत. ज्या एका मोठ्या खोलीपर्यंत जातात. या जागेला विशाल मशीद म्हणतात.
येथे पोहोचल्यावर काही यात्रेकरूंनी पुन्हा अल्लाहची प्रार्थना करण्याचं उपस्थितांना आवाहन केलं.
भव्य मशिदीच्या 'हॉल'च्या अगदी वर एक छोटा कॉरिडॉर आहे.
शेख अब्दुल मुही याच मार्गानं मक्केला गेल्याचं या छोट्या मार्गाबद्दल सांगितलं जातं.
पामिजहान तीर्थस्थळ परिसरातील एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणतात की, शेख अब्दुल हे मुस्लिम संत होते. त्यांच्याकडे चमत्कार करण्याची शक्ती होती.
व्हायरल व्हीडिओमध्ये दिलेल्या माहितीचा अनेकांनी चुकीचा अर्थ लावला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.
अनेक वर्षांपूर्वी गुहा पाहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीनं या मार्गानं जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो मक्केला पोहोचू शकला नाही. या छोट्या गुहेत तो अडकला आणि त्याला बाहेर काढताना मात्र अधिकाऱ्यांना खूप अडचणी आल्या.
या घटनेनंतर हा मार्ग आता लोखंडी सळ्या लावून बंद करण्यात आला आहे.
या कॉरिडॉरच्या डाव्या बाजूला एक खोली असून शेख अब्दुल मुही येथे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचं समजतं.
या ठिकाणचं छत आजूबाजूच्या छताच्या तुलनेत खूपच खाली असल्यानं लोकांना इथून जाण्यासाठी वाकून जावं लागतं.
खालच्या छतावर नऊ जागा आहेत, ज्यांना लोक 'हज कॅप' म्हणतात.
काही लोकांच म्हणणं आहे की, ज्या लोकांचं डोकं या स्लॉटमध्ये बसतं ते हजसाठी मक्केला जाऊ शकतात.
तिथल्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं की ही 'केवळ यात्रेकरूंची श्रद्धा' आहे. पिढ्यानपिढ्यापासून सुरु असलेल्या कथा हुशारीनं आणि सावधपणं मांडल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.
ते म्हणतात, "आम्ही इथं येणाऱ्या लोकांना असं काही करायला सांगत नाही किंवा त्यांना मनाईही करत नाही." जर तुमच्याकडे निसर्गाचे चिंतन करण्यासाठी वेळ असेल तर पुढं जा. देवाची निर्मिती म्हणून याकडे पहा आणि त्यातून प्रेरित व्हा.
इंडोनेशिया विद्यापीठातील धार्मिक आणि सांस्कृतिक मानववंशशास्त्रातील तज्ज्ञ अमाना नॉरिश म्हणतात की, सफरावादी गुहेत घडलेली घटना विचित्र नाही.
कारण त्यांच्या मते, इंडोनेशियन लोकांचे पूर्वज देखील प्राचीन काळापासून रहस्यमय गोष्टींच्या जवळ राहिले आहेत.
इंडोनेशियन भाषेचा शब्दकोष असलेल्या कामुस बेसर बहासा इंडोनेशियाच्या मते, सूफीवादाची संकल्पना जवळजवळ सर्व धर्मांमध्ये आहे, ज्याचा उद्देश लोकांनी देवाला किंवा अल्लाहला जवळून जाणणं हा आहे.
नॉरिश म्हणतात की, इंडोनेशियामध्ये विविध धर्मांच्या आगमनापूर्वी, द्वीपसमूह पौराणिक कथांनी समृद्ध होते.
'लोक पौराणिक कथा आणि लोककथांवर विश्वास ठेवतात आणि नंतर त्यांना सत्य मानायला लागतात.'
नॉरिश यांच्या मते, पामिजहान सारखी ठिकाणं "कमी आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांसाठी, विशेषत: ज्यांना हज करण्यासाठी सौदी अरेबियाला जाणं परवडत नाही त्यांच्यासाठी आकर्षक धार्मिक पर्यटन स्थळ आहे."
इंडोनेशियातून हजला जाण्याची किंमत साडेपाच कोटी इंडोनेशियन रुपये किंवा 3,300 डॉलर आहे.
हे योग्य किंवा अयोग्य म्हणून पाहिलं जाऊ शकत नाही. 'सफरावादी गुहेत लोकांनी जे केलं. ते त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा एक प्रकार होता,' असं नॉरिश यांनी म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)