पावसाळ्यात गाडी चालवताय? या सोप्या टिप्स पाळा आणि अपघात टाळा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गुलशनकुमार वनकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, नवी दिल्ली
पावसाळ्यात कधी पाणी तुंबल्यामुळे तर कधी पूर आल्यामुळे रस्त्यांवर गाडी चालवणं धोक्याचं होऊन बसतं.
चालकांना रस्त्यांचा नीट अंदाज येत नाही, पाण्यावरून किंवा चिखलात गाड्या नियंत्रणात राहत नाही आणि एकूणच पावसात दृश्यमानता कमी झाल्यामुळे अपघात वाढतात आणि लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
अशात पावसाळ्यात प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी?

- हवामानाचा अंदाज घ्या – तुम्ही जिथे जात आहात, जिथून जात आहात, त्या मार्गांची माहिती घ्या. कुठे खूप पाऊस पडतोय का, कुठे रस्ते किंवा पूल वाहून गेलेत का, कुठे दरड कोसळली आहे किंवा एखादा ट्रक उलटला आहे का, याची माहिती मिळवा.
- वाहन नीट तपासून पाहा – ब्रेक, क्लच, आरसे, वायपर, हॉर्न, इंडिकेटर, लाईट्स, टायरमधली हवा (स्टेपनीसह) या सगळ्या गोष्टी नीट तपासून घ्या. गाडीतला एसी आणि डिफॉगर (काचेवरचं धुकं कमी करणारी यंत्रणा) नीट काम करतेय ना, ते पाहून घ्या.

- लांबचा आणि न टाळता येणारा प्रवास असेल तर एकट्याने प्रवास करणं टाळा. सोबत कुणीतरी प्रौढ सहप्रवासी असेल तर अडीअडचणीला मदत होईल
- गाडीत टूलकिट नेहमी तयार ठेवा. टूलकिटमध्ये फक्त पाने आणि जॅक नाही तर ग्लासब्रेकर हॅमर आणि सीट बेल्ट कटर नक्की ठेवा. गाडी पाण्यात अडकली तर याच गोष्टी जीव वाचवू शकतात.
- अशा प्रवासात खाण्याच्या सुक्या गोष्टी आणि प्यायचं पाणी सोबत ठेवा. अनेकदा पावसात निर्जन स्थळी तासन् तास अडकून राहावं लागू शकतं.

- पुढच्या-मागच्या गाड्यांचा अंदाज घ्या. पावसाळ्यात ब्रेक सामान्यरीत्या लागतात तसे लागत नाही. म्हणून दोन वाहनांमध्ये नेहमी असतं, त्यापेक्षा किमान दुप्पट सुरक्षित अंतर ठेवा
- रस्त्यावर पणी किती खोल आहे, ते पाहून वेग कमी करा. रस्त्यावरच्या पाण्याचा वरचा थर गाडीला रस्त्यावर पकड नाही मिळवू देत, ज्यामुळे गाडीचं चाक घसरण्याची शक्यता जास्त असते. याला Aquaplaning म्हणतात. याचा धोका कुठल्याही वाहनाला, कोणत्याही परिस्थितीत उद्भवू शकतो.

- पाणी तुंबलं असेल, पूरस्थिती असेल तर त्या मार्गाने जाणं टाळा. 30 सेंटीमीटरपर्यंत पाण्यात अख्खी गाडी वाहून जाऊ शकते. पुरात दुचाकी किंवा चारचाकी वाहून जात असेल तर तिला वाचवण्याच्या नादात पडू नका, स्वतःचा जीव वाचवा.
- रस्त्यावरच्या साचलेल्या पाण्यातून गाडी चालवणं टाळा. यामुळे बाजूला असलेल्या दुचाकी आणि इतर गाड्यांवर पाणी उडून त्यांचा अपघात होऊ शकतो.

फोटो स्रोत, ANI File Photo
- रस्त्यांच्या वळणावर अतिरिक्त धोके आधीच ओळखा. एकीकडे झुकलेल्या किंवा बँकिंग केलेल्या रस्त्यांवर एका कडेला पाणी साचलेलं असू शकतं, ज्यामुळे अचानक समोरच्या किंवा मागच्या गाड्या त्यांच्या मार्ग बदलू शकतात. यामुळे धडक किंवा गाड्या अनियंत्रित होण्याची शक्यता असते
- पर्वतीय भागांमध्ये दरडी कोसळतात, त्याकडे लक्ष द्या. अशा रस्त्यांवर सामान्यतः आधीच तसा इशारा देणारं फलक असतं. तिथे वेग कमी करा, आणि पुढचा अंदाज घेत हळू हळू मार्गक्रमण करा.

फोटो स्रोत, ANI File Photo
- अंधारातून किंवा खाचखळग्यांनी भरलेला रस्ता असेल तर शक्यतो तो पावसात टाळा
- अतिवृष्टी किंवा धुकं असल्यास रस्ता चांगला असेल तर EMERGENCY LIGHTS ऑन करून गाडी चालवा. ओव्हरटेक करताना मागच्या-पुढच्या गाड्यांना अतिरिक्त हॉर्न वाजवून सतर्क करा.
- Defogger चा नीट वापर करा. गाडीच्या काचेवर धुकं जमा होतं, ते कापडाने पुसू नका. त्यामुळे गाडी चालवण्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. त्याऐवजी डिफॉगरचा वापर करा.
- गाडी चालवणं कठीण होत असेल तर रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवा. तुमची गाडी इतरांना दिसेल, याची खात्री घ्या – EMERGENCY PARKING LIGHTS ON ठेवा.

- रस्त्यांवरच्या सूचना फलकांचं पालन करा, आणि वेग मर्यादा पाळा. मध्ये कुठे गावं असतील, झेब्रा क्रॉसिंग वा इतर रहदारीसाठीची चिन्हं असतील तर वाहने हळू चालवा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






