You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चेटूक केल्याच्या आरोपावरून एकाच कुटुंबातील 5 जणांना जिवंत जाळले
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात एक धक्कादायक आणि अमानवी घटना घडली आहे. टेटगामा गावात जादूटोण्याच्या आरोपाखाली एका कुटुंबातील पाच जणांना मारहाण करून जिवंत जाळण्यात आलं.
या घटनेनंतर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
पूर्णिया जिल्ह्यातल्या टेटगामा गावात एकाच कुटुंबातील पाच जणांना जादूटोणा करणारे असल्याचं सांगत त्यांची हत्या करण्यात आली आहे.
पूर्णिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये बाबूलाल ओराव, त्यांची पत्नी आणि कुटुंबातील एकूण पाच सदस्यांचा समावेश आहे. ही घटना रविवारी (6 जुलै) घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पूर्णियाचे जिल्हाधिकारी अंशुल कुमार यांनी दिली.
या घटनेनंतर बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
"एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळून मारण्यात आलं आहे", असं तेजस्वी यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत लिहिलं.
या प्रकरणी 23 संशयित आरोपींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अंशुल कुमार यांनी सांगितलं.
ते म्हणाले, "ही घटना 6 जुलैच्या रात्रीची आहे. रात्री सुमारे दोनच्या सुमारास पाच जणांना मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्यांना जाळून टाकण्यात आलं. सोमवारी पोलीस आणि प्रशासनानं मृतदेह ताब्यात घेतले आणि त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे."
"एफआयआरमध्ये 23 आरोपींची नावं स्पष्ट आहेत, तर 150 ते 200 अज्ञात लोकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली आहे. तसंच अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत तिघांना अटक झाली असून, त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे."
अंशुल कुमार यांनी गावातील सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "टेटगामा गावातून अनेक लोक पळून गेले आहेत. पोलीस त्यांना अटक करण्यासाठी छापे टाकत आहेत."
पोलिसांनी काय सांगितलं?
पूर्णियाचे डीआयजी प्रमोद कुमार मंडल यांनी सांगितलं की, या प्रकरणात आतापर्यंत दोन मुख्य आरोपींसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रमोद मंडल म्हणाले की, "एकविसाव्या शतकात असं काही घडू शकतं यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. रामदेव महतो यांच्या कुटुंबातील एक मुलगा आजारी होता. त्याला बरं करण्यासाठी मृत व्यक्तींवर दबाव टाकण्यात आला होता."
"जेव्हा तो मुलगा बरा झाला नाही, तेव्हा कुटुंबातील पाच जणांना तिथेच ठार मारण्यात आलं. दोन मुख्य आरोपींसोबतच एका ट्रॅक्टरच्या मालकाला देखील अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी 40 ते 50 लोक उपस्थित होते," असं ते म्हणाले.
उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
पूर्णियाचे एसडीपीओ पंकज कुमार शर्मा म्हणाले की, "असं म्हटलं जात आहे की, या हत्येचा संबंध जादूटोणा आणि तंत्र-मंत्राशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुटुंबावर जादूटोणा केल्याचा आरोप करण्यात आला होता."
"कुटुंबातील एका अल्पवयीन सदस्यानं सांगितलं की, त्याच्या पाच नातेवाइकांना जादूटोणा केल्याच्या आरोपाखाली मारहाण करून जिवंत जाळून टाकण्यात आलं," असं ते म्हणाले.
एसडीपीओ म्हणाले, "ही अत्यंत गंभीर घटना आहे. कोणत्याही दोषींना सोडलं जाणार नाही. कठोर कारवाई केली जाईल."
विरोधकांनी उपस्थित केले प्रश्न
बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या घटनेचा निषेध केला आहे. पूर्णियामधील या घटनेचा उल्लेख करत त्यांनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या आणखी एका घटनेचंही उदाहरण दिलं आणि तिथल्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
तेजस्वी यादव यांनी 'एक्स'वर पोस्ट करून लिहिलं की, "पूर्णियामध्ये एका कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळून मारण्यात आलं. काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुसऱ्या एका घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता."
"गुन्हेगार सतर्क आणि मुख्यमंत्री बेशुद्ध आहेत," अशी आणखी एक पोस्ट करत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका केली आहे.
पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी ही घटना लाजीरवाणी असल्याचं म्हटलं.
"पूर्णियातील आदिवासी कुटुंबातील पाच जणांचा नरसंहार, खूपच लाजीरवाणी गोष्ट आहे!" असं त्यांनी 'एक्स'वर म्हटलं आहे.
ते म्हणाले, "जग मंगळावर पोहोचलं आहे, आणि आपले लोक अजूनही डायनच्या नावावर नरसंहार करत आहेत!"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)