'देवाची काठी लागत नाही, पण न्याय मात्र मिळतो'; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुरेश धस काय म्हणाले?

संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे फोटो समोर आल्यानंतर कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला.

विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. हा राजीनामा आपण स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी हा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्त करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यानंतर निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते, अशातच देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण पेटले.

धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. "देवाची काठी लागत नाही, पण न्याय मात्र मिळतो असे धस यांनी म्हटले. ही घटना झाल्यापासून, यावर FIR ची नोंद झाल्यापासून ते सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडण्यापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यामुळे एक खमक्या मुख्यमंत्री काय असतो हे महाराष्ट्राला दिसले."

अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या केल्याचं चित्र या फोटोंच्या माध्यमातून पुढे आलंय. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गुन्हे अन्वेषण विभाग (CID) या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात हे फोटो जोडण्यात आले आहेत.

या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसत आहेत. तर कोणी त्यांच्या शरीरावर पाय ठेवून फोटो काढला आहे. क्रूरतेची सीमा म्हणजे, या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना मारहाण करत हसताना दिसत आहेत.

फोटोमध्ये देशमुख यांचा चेहरा पूर्ण सुजलेला दिसत असून हे फोटो समोर आल्यानंतर विविध पातळीवर लोकांनी आपला तीव्र रोष व्यक्त केला.

अनेकांनी एक्स या प्लॅटफॉर्मवरून आपला संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले होते.

धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर एक्स प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. मुंडे म्हणाले, "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे.

तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे."

भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, राजीनामा देऊन थांबणार नाही. खंडणी मुळे हे सगळं घडलय याची बैठक सातपुडा त्यांच्या बंगल्यावर झाली. सगळयांचा सीडीआर (CDR) चेक करावा. आमच्या पंकजा मुंडेंना विचारा, त्या म्हणतात पुण्याचा प्रश्न विचारा, बीडचा प्रश्न त्यांना विचारू नका.

संतोष देशमुख भाजपचे बूथ प्रमुख होते. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कोण काय म्हणतंय, मला काही घेणं देणं नाही, आता राजीनामा झाल्यावरच बोलतो मी, अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील यांनी आज (4 मार्च) देखमुख कुटुंबीयांची भेट घेतली, यावेळी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाले.

धनंजय देशमुख यांनी हे फोटो सोशल मीडियावरुन डिलिट करुन टाकण्याची विनंती देखील केली आहे.

नैतिकता नाही अपरिहार्यता- सुषमा अंधारे

धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकता म्हणून नाही तर अपरिहार्यता म्हणून घेतला आहे. असा आरोप शिवसेना उबाठाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.

त्या म्हणाल्या, "मागच्या अधिवेशनात जो घटनाक्रम आमदार सुरेश धस यांनी सांगितला तो जशास तसा देशमुख हत्या प्रकरणातले फोटो बघून घडला आहे हे लक्षात येतं याचा स्पष्ट अर्थ आहे की देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं आधीच माहीत होतं मग अडीच तीन महिन्यांपासून मुंडे दोषी असतील तर राजीनामा घेतला जाईल असं वाक्य ते का उच्चारत होते अडीच तीन महिने देवेंद्र फडणवीस यांनी कोणता राजकीय अजेंडा राबवण्यासाठी देशमुख कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या डोळ्यात डोळफेक करण्याचा प्रयत्न केला."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)