'सर्वांत वृद्ध' धावपटूचा दुर्दैवी अंत, मॅरेथॉन रनर फौजा सिंग यांचा 114 व्या वर्षी अपघाती मृत्यू

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौरभ दुग्गल
- Role, बीबीसी पंजाबी
जगातील सर्वांत वयोवृद्ध मॅरेथॉन धावपटू म्हणून ओळखले जाणारे फौजा सिंग यांचं वयाच्या 114व्या वर्षी निधन झालं. भारतात त्यांना अज्ञात वाहनानं धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. त्या व्यक्तीचे नाव अमृतपाल सिंग आहे असं पोलिसांनी सांगितले.
फौजा सिंग हे साधी जीवनशैली, जिद्द आणि प्रेरणादायी प्रवासामुळे जगभरातील लाखो लोकांचे आदर्श ठरले. त्यांच्या आयुष्याची गोष्ट केवळ एका धावपटूची नाही, तर आशा, आत्मविश्वास आणि चिकाटीची आहे.
पोलिसांनी सांगितलं की, पंजाबमधील आपल्या जन्मगावी रस्ता ओलांडत असताना फौजा सिंग यांना एका वाहनानं धडक दिली. गावकऱ्यांनी त्यांना स्थानिक रुग्णालयात नेलं, तिथेच त्यांचा मृत्यू झाला.
पंतप्रधान मोदींनीही वाहिली श्रद्धांजली
संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या फौजा सिंग यांनी वयाच्या शंभरीनंतरही मॅरेथॉन धावून विक्रम प्रस्थापित केलं. त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी धावायला सुरुवात केली आणि 2000 ते 2013 या काळात एकूण 9 पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण केल्या. 2013 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली होती.
फौजा सिंग यांनी 1992 पासून लंडनमधील इलफोर्डमध्ये राहायला सुरुवात केली होती. त्यांच्या 'शीख इन द सिटी' नावाच्या क्लबनं सांगितलं की, तिथे होणाऱ्या पुढील कार्यक्रमांमध्ये सिंग यांचं जीवन आणि त्यांच्या कामगिरीचा गौरव केला जाईल.

फोटो स्रोत, Pardeep Sharma/BBC
सोमवारी (14 जुलै) फौजा सिंग हे जालंधरजवळील त्यांच्या जन्मगावी म्हणजे बियास गावात फिरत असताना त्यांना एका गाडीने धडक दिली. अपघातानंतर ती गाडी न थांबता तिथून निघून गेली.
त्यांच्या मृत्यूची बातमी येताच सगळीकडे शोकसंदेश आणि श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना "असामान्य खेळाडू आणि विलक्षण जिद्दीचा माणूस" असं संबोधलं.
'शीख इन द सिटी' या रनिंग क्लबमध्ये फौजा सिंग यांचे प्रशिक्षक हरमंदर सिंग यांनी त्यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलं की, "खूप दुःखाने सांगतो की, मानवतेचे आदर्श आणि सकारात्मकतेचे प्रतीक असलेले फौजा सिंग यांचं भारतात निधन झालं आहे."
त्यांचा रनिंग क्लब आणि 'शीख इन द सिटी' ही संस्था, 29 मार्च 2026 रोजी होणाऱ्या 'फौजा सिंग बर्थडे चॅलेंज'पर्यंतचे सगळे कार्यक्रम त्यांच्या यशस्वी आयुष्य आणि कामगिरीचा सन्मान करण्यासाठी समर्पित करणार आहेत.
"फौजा सिंग जेथे प्रशिक्षण घेत होते, त्या इलफोर्डच्या मार्गावर त्यांच्या नावाने एक क्लबहाऊस बांधण्यासाठी आम्ही निधी गोळा करण्याचे प्रयत्न दुप्पट करू," असं त्यांनी सांगितलं.
जून महिन्यात 'बीबीसी'नं फौजा सिंग यांची बियासमध्ये भेट घेतली, तेव्हा ते चपळ आणि सक्रिय होते, दररोज कित्येक मैल चालत होते.
"पाय मजबूत राहावेत म्हणून मी अजूनही गावात चालायला जातो. स्वतःच्या शरीराची काळजी माणसानं स्वतःच घ्यायला हवी," असं त्यांनी सांगितलं.
लंडन ऑलिंपिकमध्ये मशाल वाहकाची जबाबदारी
2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये फौजा सिंग यांनी मशाल वाहकाची भूमिका पार पाडली होती. त्यांच्या धावण्याच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक मोठे टप्पे गाठले, त्यात 2011 मध्ये टोरँटोमध्ये पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करणारे पहिले वयाची शंभरी पूर्ण केलेले व्यक्ती ठरले आहेत.
परंतु, फौजा सिंग यांचा 'जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू' असा दावा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने मान्य केला नाही, कारण 1911 सालचा त्यांचा जन्म दाखला ते दाखवू शकले नव्हते.

फोटो स्रोत, Getty Images
'बीबीसी'च्या माहितीनुसार, त्यांच्या ब्रिटिश पासपोर्टवर जन्मतारीख 1 एप्रिल 1911 अशी होती आणि 100 व्या वाढदिवसानिमित्त राणी एलिझाबेथ यांनी त्यांना शुभेच्छा पत्रही पाठवलं होतं.
त्यांचे प्रशिक्षक हरमंदर सिंग म्हणाले की, फौजा सिंग यांच्या जन्माच्या वेळी भारतात जन्म प्रमाणपत्रे तयार केली जात नव्हती.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'त्यांना हा विक्रम द्यायला नक्कीच आवडलं असतं', पण त्यांनी स्पष्ट केलं की, फक्त 'जन्माच्या वर्षी तयार झालेली अधिकृत कागदपत्रंच' मान्य केली जातात.
'एकेकाळी थट्टेचा विषय...नंतर त्यांनीच इतिहास घडवला'
लहानपणी फौजा सिंग यांना गावातील लोक चिडवायचे, कारण त्यांचे पाय कमजोर होते आणि पाच वर्षांचे होईपर्यंत त्यांना नीट चालताही यायचं नाही.
"कधी काळी ज्याच्यावर कमजोरीसाठी हसले गेले, तोच मुलगा पुढे इतिहास घडवतो," असं त्यांनी जूनमध्ये 'बीबीसी पंजाबी'ला सांगितलं.
वयाची चाळीशी गाठण्यापूर्वी शेतकरी असलेले फौजा सिंग यांनी दोन्ही महायुद्धांची अस्थिरता पाहिली होती आणि फाळणीचा मानसिक धक्काही अनुभवला होता.
"लहानपणी मला मॅरेथॉन म्हणजे काय, हा शब्दही माहीत नव्हता," असं फौजा सिंग यांनी 'बीबीसी पंजाबी'ला सांगितलं होतं.
"मी कधी शाळेत गेलो नाही, आणि कोणत्याही खेळात भाग घेतला नाही. मी शेतकरी होतो आणि आयुष्याचा बहुतांश वेळ मी शेतीतच घालवला."
दुःख सहन करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा धावायला सुरुवात केली.
पत्नीचं निधन, पाठोपाठ मुलाचाही अपघाती मृत्यू
1990च्या दशकाच्या सुरुवातीला पत्नी ग्यान कौर यांच्या मृत्यूनंतर फौजा सिंग लंडनला गेले आणि आपला मोठ्या मुलगा सुखजिंदरसोबत राहू लागले. पण भारत भेटीदरम्यान त्यांचा धाकटा मुलगा कुलदीप एका अपघातात मरण पावला आणि त्यामुळे फौजा सिंग खूपच व्यथित झाले.
मुलाच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले फौजा सिंग रोज तासन् तास मुलावर अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी बसून राहायचे. हे पाहून गावकऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाला त्यांना परत ब्रिटनला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
लंडनमधील इलफोर्डमध्ये परत आल्यानंतर, गुरुद्वाराच्या एका भेटीत फौजा सिंग यांची काही ज्येष्ठ धावपटूंशी भेट झाली, जे एकत्र धावायला जायचे. तिथेच त्यांची ओळख हरमंदर सिंग यांच्याशी झाली. हेच हरमंदर सिंग पुढे त्यांचे प्रशिक्षक झाले.
"हरमंदर सिंग यांची भेट झाली नसती, तर मी मॅरेथॉन धावू शकलो नसतो," असं त्यांनी जूनमध्ये सांगितलं.

फोटो स्रोत, Saurabh Duggal/BBC
फौजा सिंग हे 2000 मध्ये लंडन मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदा धावले, तेव्हा त्यांचं वय 89 वर्ष होतं. त्यांनी 'गोल्डन बॉन्ड एन्ट्री'द्वारे भाग घेतला. या योजनेत संस्थांना पैसे भरून ठराविक जागा आधीच आरक्षित करता येतात.
त्यांनी 'बिलिस' या संस्थेसाठी धावण्याचं ठरवलं, जी वेळेआधी जन्मलेल्या बाळांसाठी (प्रीमॅच्युअर) काम करते. त्यांची टॅगलाइन होती: 'सर्वात वयस्कर व्यक्तीकडून सर्वात लहानांसाठीची धाव! त्यांनीही माझ्यासारखं दीर्घायुष्य जगावं.'
फौजा सिंग सांगतात की, मॅरेथॉनमध्ये धावण्यापूर्वी आयोजकांनी त्यांना सांगितलं होतं की, ते फक्त पटका (शीख पुरुष आणि मुलं घालतात) घालू शकतात, पगडी नाही.
"पगडीशिवाय धावण्यास मी नकार दिला. शेवटी आयोजकांनी मला पगडी घालून धावण्याची परवानगी दिली, आणि माझ्यासाठी हेच माझं सगळ्यात मोठं यश आहे," असं फौजा सिंग म्हणाले.
फौजा सिंग यांनी ही शर्यत 6 तास 54 मिनिटांत पूर्ण केली, आणि तिथून त्यांच्या एका अनोख्या प्रवासाला सुरुवात झाली.
आदिदासनं महान खेळाडूंच्या पंगतीत बसवलं
लंडन मॅरेथॉनमध्ये सलग तिसऱ्यांदा भाग घेताना, फौजा सिंग यांनी त्यांच्या आधीच्या वेळेपेक्षा 9 मिनिटं कमी वेळ घेत आपली शर्यत पूर्ण केली.
2003 मध्ये टोरँटो वॉटरफ्रंट मॅरेथॉनमध्ये फौजा सिंग यांनी आपली वेळ तब्बल एक तास पाच मिनिटांनी सुधारली आणि ही शर्यत 5 तास 40 मिनिटांतच पूर्ण केली.
"मला माझ्या वेळा लक्षात नाहीत; माझे प्रशिक्षक हरमंदर सिंगच सगळ्या वेळांची नोंद ठेवतात. पण मी जे काही मिळवलंय, ते सगळं त्यांच्या प्रशिक्षणामुळेच. मी त्यांच्या वेळापत्रकाचं मनापासून पालन केलं," असं फौजा सिंग यांनी जूनमध्ये सांगितलं होतं.
"लंडनमध्ये ते मला चढावर धावायला लावत असत, त्यामुळे माझी कामगिरी सतत चांगली होत गेली," असं त्यांनी सांगितलं. "लंडनमधल्या जवळजवळ प्रत्येक सरावानंतर मी गुरुद्वारात जात असत. तिथे माझ्या आहाराची नीट काळजी घेतली जायची आणि सगळेजण मला लांब पल्ल्याच्या धावण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे."

फोटो स्रोत, Pardeep Sharma/BBC
फौजा सिंग यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली जेव्हा आदिदास कंपनीने त्यांना 2004 मधील 'इम्पॉसिबल इज नथिंग' या जाहिरात मोहिमेसाठी निवडलं. या मोहिमेत मोहम्मद अलीसारख्या महान खेळाडूंचाही समावेश होता.
2005 मध्ये त्यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पहिल्या लाहोर मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर 2006 मध्ये राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना बकिंगहॅम पॅलेसला भेट देण्यासाठी खास आमंत्रण दिलं.
पंजाबमधील फौजा सिंग यांच्या घरात ठेवलेल्या अनेक सन्मानचिन्हं आणि प्रमाणपत्रांपैकी एक म्हणजे राणी एलिझाबेथ सोबतचा त्यांचा एक फोटो, जो त्यांनी फ्रेम करून लावला आहे.
वयाच्या शंभरीनंतरही मॅरेथॉनमध्ये भाग घेणारे 'टर्बन्ड टोर्नेडो'
फौजा सिंग यांनी वयाच्या शंभरीनंतरही मॅरेथॉनमध्ये भाग घेणं सुरूच ठेवलं, म्हणून त्यांना 'टर्बन्ड टोर्नेडो' (पगडीधारी वादळ) असं टोपणनाव मिळालं. त्यांच्या जाहिरातींमधून मिळालेलं बहुतांश उत्पन्न त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान केलं.
"धावण्याच्या जगात येण्यापूर्वीही मी तोच फौजा सिंग होतो, पण धावण्यामुळेच माझ्या आयुष्याला एक मिशन मिळालं आणि मला जगभरात ओळख मिळाली," असं त्यांनी आठवणीनं सांगितलं.
2013 मध्ये फौजा सिंग यांनी हाँगकाँगमध्ये त्यांची अखेरची लांब पल्ल्याची शर्यत पूर्ण केली. त्यांनी 10 किमी धावण्याची स्पर्धा एक तास 32 मिनिटं आणि 28 सेकंदांत पूर्ण केली.

फोटो स्रोत, Getty Images
फौजा सिंग यांनी आपलं चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य यांचं श्रेय साध्या जीवनशैलीला आणि शिस्तबद्ध आहाराला दिलं.
"कमी खाणं, जास्त धावणं आणि नेहमी आनंदी राहणं, हेच माझ्या दीर्घायुष्याचं रहस्य आहे. हेच मी सगळ्यांना सांगू इच्छितो," असं त्यांनी सांगितलं.
आपल्या शेवटच्या काळात फौजा सिंग यांनी आपला वेळ भारत आणि यूकेमध्ये विभागला होता.
जूनमध्ये 'बीबीसी'ने त्यांची भेट घेतली तेव्हा फौजा सिंग लवकरच लंडनला जाऊन आपल्या कुटुंबीयांना आणि प्रशिक्षकाला भेटण्याची अपेक्षा करत होते.
ब्रिटनच्या खासदार प्रीत कौर गिल यांनी 'एक्स'वर फौजा सिंग यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं, "खरंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या शिस्तीनं, साध्या जीवनशैलीनं आणि नम्र स्वभावानं माझ्यावर कायमची छाप सोडली."
खासदार जस अठवाल यांनी सांगितलं की, फौजा सिंग यांनी 'जगभरातल्या लाखो लोकांना प्रेरणा दिली.' त्यांनी 'एक्स'वर लिहिलं, "त्यांच्या जिद्द आणि चिकाटीचा वारसा कायमस्वरूपी चालत राहील."
(प्रदीप शर्मा यांचं अतिरिक्त वार्तांकन)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











