366 दिवस रोज मॅरेथॉन धावणाऱ्या धावपटूच्या हृदयाच्या अभ्यासातून काय माहिती मिळाली?

ह्युगो फारियास

फोटो स्रोत, Clayton Damasceno

फोटो कॅप्शन, ह्युगो 28 ऑगस्ट 2023 ला एकूण 15,569 किलोमीटर धावले. यासाठी त्यांना जवळपास 1,590 तास लागले.
    • Author, गुलिया ग्रांची
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एक वर्षाहून अधिक काळ दररोज कोणतीही गोष्ट करण्यासाठी खूप शिस्तीची आवश्यकता असते. एकही दिवस न चुकता, दररोज काही तास एखाद्या छंदासाठी घालवणं तसं कठीण असतं.

ह्युगो फारियास या अवलियानं मात्र असंच काही केलं आहे. फक्त त्यांचा छंद जरा वेगळा आहे. तो मॅरेथॉनमध्ये धावण्याचा.

त्यांचं ध्येय यापेक्षाही प्रचंड महत्त्वाकांक्षी होतं. ते म्हणजे 366 दिवस सलग लागोपाठ मॅरेथॉन धावण्याचं, म्हणजे 42,195 किलोमीटर धावण्याचं.

ह्युगो आता 45 वर्षांचे आहेत. त्यांनी 22 वर्षे खासगी क्षेत्रात काम केलं आहे. ते एका मोठ्या टेक कंपनीत कार्यकारी व्यवस्थापक म्हणून काम करत होते.

मग त्यांनी एक निर्णय घेतला की, नोकरीचा राजीनामा द्यायचा आणि क्रीडा क्षेत्रात काही करायचं असा निर्धार त्यांनी केला. त्यांना वाटत असलेल्या अस्वस्थतेतूनच त्यांनी हा निर्णय घेतला होता.

"मग एक वेळ अशी आली की, मी थांबलो आणि विचार केला की माझा जन्म फक्त याच गोष्टीसाठी झाला होता का? मी हीच दिनचर्या, हेच रुटीन 35, 40 वर्षे सुरू ठेवायची का? जर असंच असेल, तर ते ठीक आहे."

"आपण लहानपणापासून एकच गोष्ट शिकत असतो. वयाच्या 18 व्या वर्षाआधीच करियरची निवड करा, त्यात कौशल्य मिळवा, प्रावीण्य मिळवा, मग बाजारात प्रवेश करा. आयुष्यात स्थैर्य शोधा, मुलं-बाळं वाढवा, आणि मग निवृत्तीची तयारी करा."

मात्र मला वाटू लागलं होतं की आपण काही वेगळं करू शकतो का, वेगळ्याप्रकारे लोकांना प्रेरणा देऊ शकतो. मात्र, नक्की काय?

अमीर क्लिंककडून प्रेरणा

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"मी अमीर क्लिंक यांचा मोठा चाहता आहे. अमीर क्लिंक हे ब्राझिलचे खलाशी आहेत. दक्षिण अटलांटिक महासागर एकट्यानं बोटीतून पार करण्याचा विक्रम अमीर क्लिंक यांनी केला होता. 1984 मध्ये त्यांनी दक्षिण अटलांटिक महासागर पार केला होता."

"मला वाटलं आपणही असंच काहीतरी केलं पाहिजे. मला वाटतं, मी देखील अमीर यांच्या प्रवासासारखंच मॉडेल तयार करू शकतो. फक्त वल्हवत बोटीनं प्रवास करण्याऐवजी मी धावणार आहे."

ह्युगो यांना स्वत:चा ठसा उमटवायचा होता. त्यामुळे ते अभूतपूर्व कामगिरी करण्याचा प्रयत्न करत होते.

मग त्यांना माहिती मिळाली की, स्टीफन एंगेल्स या बेल्जियन ॲथलीटनं एका वर्षात 365 मॅरेथॉन धावण्याची कामगिरी आधीच करून दाखवली आहे. मग याच्यापेक्षा आणखी एक दिवस धावण्याची योजना तयार करण्याचा निर्णय ह्युगो यांनी घेतला.

"लक्षात घ्या, मी काही उत्तम ॲथलीट नव्हतो. माझ्या आयुष्यभरात तोपर्यंत मी फक्त एकच मॅरेथॉन धावलो होतो. 2019 मध्ये मी धावण्यास सुरुवात केली. मी अलीकडेच धावू लागलो होतो."

"मात्र काहीतरी नवीन करून दाखवण्याची, खेळाद्वारे काहीतरी प्रभाव पाडण्याची माझी इच्छा होती. माझ्या मनात ही भावना, इच्छा वाढत गेली होती."

ह्युगो

फोटो स्रोत, Clayton Damasceno

फोटो कॅप्शन, त्यांच्या या कामगिरीनं एक नवा विश्वविक्रम झाला. त्यांच्या नावे एकसलग मॅरेथॉन धावण्यासाठीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला.

मग ह्युगो यांनी एक योजना आखण्यास सुरुवात केली. त्यामध्ये आठ महिन्यांसाठी अत्यंत बारकाईनं, काळजीपूर्वक नियोजन करण्याची आवश्कता होती.

त्यामध्ये लॉजिस्टिक्स, प्रशिक्षण, कुटुंबाचा पाठिंबा आणि विविध व्यावसायिकांकडून मिळणारा पाठिंबा यांचा समावेश होता.

"मला माहिती होतं की मी हे सर्व एकट्यानं करू शकत नाही. मग मी विविध क्षेत्रातील लोकांची एक टीम तयार केली. त्यामध्ये डॉक्टर्स, प्रशिक्षक, फिजिओथेरेपिस्ट यासारखे खेळातील व्यावसायिक आणि मानसशास्त्रज्ञ यांचा समावेश होता."

"मी माझ्या या योजनेत वेगवेगळ्या लोकांना सहभागी करून घेतलं. त्यातीलच एक होतं, हार्ट इन्स्टिट्यूट, इनकॉर."

"मी त्यांना विचारलं की माझ्या या योजनेत ते माझ्याबरोबर येऊ शकतात का, मी धावत असताना, त्याचा माझ्या हृदयावर काय परिणाम होतो, हे ते पाहू शकतात का?"

"माझ्या हृदयाचे ठोके वाढतील, कमी होतील, त्यात एरिथमिया (हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता) होईल का? हृदय त्यानुसार जुळवून घेईल का हे सर्व ते पाहतील का? मला यातून विज्ञानाच्या क्षेत्रातदेखील भर घालायची होती आणि सुदैवानं, इनकॉर यासाठी तयार झालं."

ह्युगो यांनी 28 ऑगस्ट 2023 ला हे आव्हान पूर्ण केलं. ते एकूण 15,569 किलोमीटर धावले. यासाठी त्यांना जवळपास 1,590 तास लागले.

त्यांच्या या कामगिरीनं एक नवा विश्वविक्रम झाला. त्यांच्या नावे एकसलग मॅरेथॉन धावण्यासाठीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला.

हृदयाच्या अभ्यासातून काय दिसून आलं?

मारिया जेनियर अल्वेस या हृदयरोगतज्ज्ञ आणि संशोधक आहेत. ह्युगो यांच्यावर करण्यात येत असलेल्या अभ्यासात त्या सहभागी आहेत.

मारिया म्हणतात, ह्युगो यांचं निरीक्षण करणं हा एक संशोधन प्रकल्प बनला. त्याचं एथिक्स समितीकडून मूल्यांकन झालं.

"असं काहीतरी करण्याचा हा एक योग्य आणि सुरक्षित मार्ग आहे. विशेषकरून जेव्हा एखादा प्रकल्प नाविन्यपूर्ण असतो, यापूर्वी असं कोणीही केलेलं नसतं आणि ज्याचा हृदयावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो."

या प्रक्रियेची सुरुवात खेळांसाठीच्या भाग घेण्याआधीच्या मूल्यांकनानं झाली.

मारिया अल्वेस म्हणाल्या,"आम्ही प्रामुख्यानं प्रमाणाच्या आधारे मर्यादा निश्चित केल्या, तीव्रतेच्या आधारे नाही. त्यामुळे ह्युगो यांना त्यांचं हे आव्हान, हृदयाच्या संदर्भात कोणतीही जोखीम न घेता पूर्ण करता येणार होतं."

"ह्युगो यांच्या या संपूर्ण धावण्याच्या प्रक्रियेत आम्ही मायोकार्डिअल डॅमेज (हृदयाच्या स्नायूंना होणारी दुखापत किंवा अपाय) यावर लक्ष ठेवलं, इकोकार्डिओग्राम घेतले आणि कार्डिओपल्मनरी (हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित) चाचण्या केल्या."

ह्युगो

फोटो स्रोत, Disclosure

फोटो कॅप्शन, ह्युगो यांचं निरीक्षण करणं हा एक संशोधन प्रकल्प बनला, ह्युगोंची दर महिन्याला एर्गोस्पायरोमेट्री ही एक स्ट्रेस टेस्ट करण्यात आली.

ह्युगोंची दर महिन्याला एर्गोस्पायरोमेट्री करण्यात आली.

एर्गोस्पायरोमेट्री ही एक स्ट्रेस टेस्ट असते, ज्यात शरीराकडून केला जात असणारा ऑक्सिजनचा वापर आणि हृदय, रक्तवाहिन्या यांच्या तंदुरुस्तीचं मोजमाप केलं जातं.

तसंच दर तीन महिन्यांनी ह्युगो यांचा इकोकार्डिग्राम करण्यात आला. या चाचणीत हृदयाची रचना आणि कार्य यांचं मूल्यांकन केलं जातं.

त्या म्हणाल्या, "मोठ्या स्वरुपात आणि सूक्ष्म स्वरुपात हृदय या क्रियेशी कसं जुळवून घेतं याचं निरीक्षण करणं, त्यावर देखरेख करणं आणि हृदयात काही बदल झाल्यास, हृदयाच्या क्रिया त्यानुसार जुळवून घेतल्या गेल्यावर किंवा शारीरिक प्रशिक्षणाशी जुळवून घेता आलं नाही किंवा त्यात कमतरता राहिल्यास त्याची संभाव्य लक्षणं पाहणं, हा या चाचण्यांमागचा हेतू होता."

या संदर्भात जे निष्कर्ष समोर आले ते ब्राझिलीरोस डी कार्डिओलॉजिया या विज्ञान जर्नल किंवा मासिकात प्रकाशित करण्यात आले.

एवढ्या मॅरेथॉन धावूनही हृदयावर का परिणाम झाला नाही?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या निष्कर्षांमध्ये दिसून आलं की व्यायामामध्ये मोठी वारंवारता आणि मोठं प्रमाण असून देखील ट्रोपोनिन लक्षणांमध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.

या लक्षणांमधूनच मायोकार्डिअल डॅमेज (हृदयाच्या स्नायूंना होणारी दुखापत किंवा अपाय) झाला असल्यास तो दिसून येतो.

ट्रोपोनिन लक्षणं म्हणजे हृदयाच्या स्नायूंच्या पेशींमध्ये आढळणारी प्रथिनं. हृदयाच्या स्नायू दुखापत किंवा अपाय झाल्यास ही प्रथिनं रक्तप्रवाह येतात.

"या अभ्यासातील हा मुख्य निष्कर्ष होता. हृदय, ॲथलेटिक किंवा खेळाच्या रुपात मोठा भार पडल्यास जुळवून घेऊ शकतं. फक्त त्याची तीव्रता मध्यम स्वरुपाची असली पाहिजे."

फिलिपो सॅव्हिओली स्पोर्ट्स कार्डिओलॉजिस्ट आहेत. ते या अभ्यासात सहभागी नव्हते किंवा ह्युगो यांचं निरीक्षण करणाऱ्या व्यावसायिकांच्या टीममध्ये नव्हते.

त्यांचं मूल्यांकन आहे की, या अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे सलग 366 मॅरेथॉननंतरदेखील पॅथोलॉजिकल कार्डियाक रीमॉडेलिंग नसणं. यात शारीरिक श्रम आणि त्याची वारंवारता लक्षात घेतल्यास हृदयावर अभूतपूर्व भार पडला होता.

पॅथोलॉजिकल कार्डियाक रीमॉडेलिंग म्हणजे हृदयाच्या रचनेत होणारे असामान्य बदल, जे सहसा अतिश्रम किंवा आजारामुळे होतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्यायामामध्ये मोठी वारंवारता आणि मोठं प्रमाण असून देखील ट्रोपोनिन लक्षणांमध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.ट्रोपोनिन लक्षणं म्हणजे हृदयाच्या स्नायूंच्या पेशींमध्ये आढळणारी प्रथिनं

त्यांनी या गोष्टींवर भर दिला की, या अभ्यासातील निष्कर्ष दाखवतात की हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित तणावाशी जुळवून घेतलं जाणं हे प्रामुख्यानं शारीरिक स्वरुपाचं (नैसर्गिक आणि निरोगी आणि कोणत्याही आजाराचं लक्षण नाही) होतं.

म्हणजे धावण्याच्या या प्रक्रियेत रक्ताभिसरण प्रणालीनं जुळवून घेतलं होतं.

"जर श्रमाच्या तीव्रतेच्या सुरक्षित मर्यादेत असेल आणि दोन सत्रांदरम्यान श्रमातून सावरून पूर्वरत होत असेल, तर प्रशिक्षित ॲथलीट किंवा खेळाडूचं हृदय प्रचंड तणाव सहन करू शकतं, या कल्पनेला बळकटी मिळते."

हृदयरोगतज्ज्ञ सांगतात की ह्युगो मध्यम तीव्रता किंवा गतीनं धावले. त्यांच्या हृदयाची गती सरासरी 140 बीपीएम होती. ती त्यांच्या वयासाठी असलेल्या अंदाजे कमाल गतीच्या जवळपास 70 ते 80 टक्के होती.

"यामुळे त्यांना अतिश्रम झाले नाहीत, ते सुरक्षित झोनमध्ये राहिले. त्यामुळे त्यांचं शरीर ऑक्सिजनचा वापर आणि ऊर्जा निर्मिती यामधील संतुलन चांगल्या प्रकारे ठेवू शकलं."

सॅव्हिओली यांच्या मते, "या मर्यादेत धावल्यामुळे हृदयाला अपाय होण्याचा, नुकसान होण्याचा धोका कमी होतो. यात इन्फ्लेमेशन, जखम होणंकिंवा एरिथमिया यासारखे अपाय होण्याची शक्यता कमी होते."

अगदी शारीरिक श्रमाचं प्रमाण इतकं मोठं असलं तरी. ते नमूद करतात की, जर ह्युगो खूप अधिक तीव्रतेनं धावले असते, तर त्याचे शरीरावर नकारात्मक परिणाम दिसू शकले असते.

ते पुढे म्हणतात, "दीर्घकाळ तीव्र व्यायाम केल्यामुळेहृदयाच्या फायब्रोसिसचा (यामुळे हृदयाच्या क्षमतेवर परिणाम होतो) आणि एरिथमियाचा धोका वाढतो."

रॉबर्टो कलिल फिल्हो, इनकॉरचे अध्यक्ष आणि क्लिनिकल कार्डिओलॉजी विभागाचे संचालक आहेत. त्यांच्या मते ह्युगो यांच्या हृदयाच्या अभ्यासातून महत्त्वाची माहिती मिळते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एवढे शारीरिक श्रम करून देखील ह्युगो यांच्या शरीरानं ज्याप्रकारे त्याच्याशी जुळवून घेतलं आहे, ही गोष्ट ह्युगो यांना आश्चर्यकारक वाटते.

ते म्हणतात, "योग्यप्रकारे देखरेख केल्यास, नियमितपणे शारीरिक हालचाली सुरक्षित असतात. त्याचा हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारण्यावर थेट परिणाम असतो."

"तसंच रोग प्रतिबंधकता वाढवण्यात त्या अतिशय उपयुक्त असतात. व्यायामाला प्रोत्साहन देणं, हा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील भार कमी करण्याचा एक मार्ग देखील आहे."

एवढे शारीरिक श्रम करून देखील ह्युगो यांच्या शरीरानं ज्याप्रकारे त्याच्याशी जुळवून घेतलं आहे, ही गोष्ट ह्युगो यांना आश्चर्यकारक वाटते.

त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की "हा फक्त एक वैज्ञानिक अहवाल आहे. मी जगातील अब्जावधी लोकांपैकी एक आहेत. मात्र मला वाटतं की या अभ्यासातून मानवी शरीराच्या क्षमतांबद्दल प्रचंड माहिती मिळते. विशेषकरून स्वत:बद्दल अधिक चांगलं जाणून घेता येतं."

"मी माझ्या आयुष्यात कधीही कल्पना केली नव्हती, अशी शारीरिक स्थिती मिळवली आहे. तसंच याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, हे खूपच महत्त्वाचं होतं."

मात्र हृदयरोगतज्ज्ञ फिलिपो सॅव्हिओली याबाबतीत इशारा देतात. ते म्हणतात की, शारीरिक क्षमता जुळवून घेतल्याशिवाय आणि वैद्यकीय देखरेख नसताना असं काही करणं हे धोकादायक आहे.

"यात मोठा धोका आहे आणि असं करू नये," असं ते म्हणतात.

योग्य तयारी शिवाय यात एरिथमिया, इन्फ्लेमेशन सारख्या गंभीर इजा होण्याची किंवा अगदी अचानक मृत्यू होण्याची शक्यता आहे.

366 मॅरेथॉन, शरीर आणि मनाची कसोटी

ह्युगो विवाहित आहेत आणि त्यांना दोन मुलं आहेत. ह्युगो म्हणतात की, त्यांचा दिवस सकाळी लवकर सुरू व्हायचा. त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता यायचा.

तसंच उर्वरित दिवसभरात शरीराला विश्रांती देणं किंवा स्नायू बळकट करणं यासाठी वेळ देता यायचा.

ह्यगो त्यांच्या बहुतेक मॅरेथॉन साओ पाओलोच्या आतल्या भागात असलेल्या अमेरिकाना शहरातील एकाच मार्गावरून धावले.

ह्युगो म्हणाले, "काही कारणांमुळे मी नेहमी त्याच मार्गावरून धावण्याचं ठरवलं. पहिलं कारण म्हणजे, त्या मार्गावर पुढे काय असणार आहे हे मला आधीच माहीत असायचं. त्या मार्गावरील प्रत्येक चढ, प्रत्येक वळण मला माहीत होतं."

"दुसरं कारण, थांबवण्याच्या आणि पाणी पिण्याच्या जागा. एका वर्षाच्या कालावधीत, तुम्हाला बाथरूमला जाण्यासाठी, अधिक पाणी पिण्यासाठी थांबावं लागतं."

"तिसरं कारण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं. ते म्हणजे सुलभता, सोय. मला लोकांना प्रेरणा द्यायची होती आणि ते मला कुठे आणि कधी पाहू शकतील हे त्यांना कळवायचं होतं. या संपूर्ण प्रवासात, 5,000 हून अधिक जण माझ्यासोबत धावले."

ह्युगो म्हणतात, "त्यांनी या सर्व गोष्टीशी निगडीत जोखमींचं विश्लेषण केलं होतं. मला दुखापत होऊ शकते का? तर हो. मला अपघात होऊ शकतो का? तर, हो. मी या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या होत्या आणि प्रत्येक परिस्थितीसाठी, प्रसंगासाठी एक कृती योजना तयार केली होती."

ह्युगो पुढे म्हणतात, "मी सर्व गोष्टींना तोंड दिलं. थंडी, उष्णता, पाऊस, ट्रॅफिक, खूप जवळून जाणारे ट्रक, दुखापती, तीन वेळा झालेला अतिसार, यातील सर्वात त्रासदायक पाच दिवस होता."

"या सर्व कालावधीत माझं वजन 4 किलोनं कमी झालं. मला माझा आहार आणि पाणी पिण्याच्या प्रमाणात बदल करावे लागले. मात्र आम्ही सर्व सुरू ठेवलं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ह्युगो यांना काही दुखापतींना वर्षभर तोंड द्यावं लागलं.

ह्युगो यांना काही दुखापतींना वर्षभर तोंड द्यावं लागलं. त्यांच्या 120 व्या मॅरेथॉनच्या वेळेस त्यांना प्लान्टर फॅसिटिस झाला.

यात पायाच्या तळव्यांना वेदनादायक इन्फ्लेमेशन होतं. लांब पल्ल्याच्या धावपटूंमध्ये ही समस्या अनेकदा आढळते.

त्यानंतर त्यांच्या 140 व्या मॅरेथॉनच्या वेळेस त्यांना प्युबल्जिया झाला.

यात मांडीच्या वरच्या भागात, जांघेत दुखापत होते. त्याचा पोटाचा खालचा भाग आणि मांडीच्या आतल्या बाजूला असणाऱ्या स्नायूंवर परिणाम होतो.

या दुखापतीबद्दल ह्युगो म्हणतात, "प्युबल्जिया झाला तो सर्वात वाईट टप्पा होता. ती खूपच वेदनादायी दुखापत असते. मात्र तरीदेखील मी थांबलो नाही, मी सक्रियपणे त्यातून बरा झालो. मी पाच दिवस दिवसातून 10 तास चाललो."

"त्यावेळेस मी माझ्या मांडीवर बर्फाचा पॅक ठरला होता. मग मी हळूहळू सावरलो, चालणं, जॉगिंग करणं सुरू केलं. मी पुन्हा 42 किलोमीटर धावण्यायोग्य होईपर्यंत मी हे करत राहिलो."

ह्युगो यांच्या या सर्व दिनचर्येत मानसिक आधार मिळणं हा देखील एक भाग होता.

ते सांगतात, "एका पूर्णपणे अनिश्चित गोष्टीसाठी मी माझं अतिशय व्यवस्थित चाललेलं करियर पणाला लावलं होतं. त्यामुळे अर्थातच, चिंता निर्माण होते, असुरक्षित वाटतं."

"त्यामुळे अशा परिस्थितीत मनावरील ताण कमी करण्यासाठी आणि माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रीत ठेवण्यासाठी स्वतंत्र दृष्टीकोन असलेला मानसशास्त्रज्ञ असणं महत्त्वाचं होतं."

नव्या विक्रमाची तयारी

हे आव्हान पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांनी ह्युगो यांनी त्यांच्या या अफाट अनुभवाबद्दल एक पुस्तक लिहिलं.

'इट्स नेव्हर टू लेट टी राईट न न्यू स्टोरी', असं या पुस्तकाचं शीर्षक आहे. त्यानंतर ते इतर मॅराथॉन आणि अल्ट्रामॅराथॉनमध्ये धावले.

आता ते पुढील आव्हानाची तयारी करत आहेत. ते आता संपूर्ण अमेरिका खंडाएवढं अंतर धावण्याची तयारी करत आहेत.

म्हणजे अगदी उत्तरेला असणाऱ्या अलास्काच्या प्रुडो बे पासून ते दक्षिण अमेरिका खंडाचं शेवटचं टोक असणाऱ्या अर्जेंटिनातील युशुआइया, टिएरा डेल फ्युगोशहरापर्यंत.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आता ह्युगो पुढील आव्हानाची तयारी करत आहेत. ते आता संपूर्ण अमेरिका खंडाएवढं अंतर धावण्याची तयारी करत आहेत.

"दहा महिन्यात, तीनशे दिवसांत हे अंतर पार करण्याची कल्पना आहे. म्हणजे दररोज सरासरी 85 किलोमीटर धावणं."

त्यांच्या या नव्या योजनेचा माहितीपट तयार करावा आणि त्यामुळे भविष्यातील पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळावी अशी त्यांची इच्छा आहे.

मात्र अजूनही ते याचं चित्रीकरण करण्यासाठी स्टाफ आणि पूर्णपणे सुसज्ज असं मोटरहोम (चालतं फिरतं घर) तयार करण्यासाठी स्त्रोतांची जुळवाजुळव करत आहेत.

"शारीरिक हालचालींच्या फायद्याविषयी आणि मानवात आश्चर्यकारक गोष्टी करण्याची क्षमता आहे, याबद्दल जगभरात जागरुकता निर्माण करणं, हे त्यांचं ध्येय आहे. कोणालाही दररोज मॅरेथॉन धावण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रत्येकानं स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे," असं ह्युगो म्हणतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.