विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये लपून काबूल ते दिल्ली प्रवास, 13 वर्षांच्या या मुलाबाबत काय माहिती मिळाली?

अफगाणिस्तान विमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

अफगाणिस्तानच्या एका 13 वर्षांच्या मुलाच्या कारनाम्यामुळं दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि काबूल विमानतळावरील अधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ दिसून आला. तर विमानातील प्रवासीही या मुलामुळं काही काळ हवालदिल झाले होते.

अफगाणिस्तानच्या कुंदूझ प्रांतातील हा मुलगा एका आश्चर्यकारक आणि धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आला आहे.

अवघ्या 13 वर्षांचा हा मुलगा रविवारी (21 सप्टेंबर) विमानाच्या लँडिंग गिअरच्या वरच्या भागात लपून दिल्लीत पोहोचला होता.

एवढ्या उंचीवर, ऑक्सिजनची कमतरता आणि खूप थंडी असूनही तो जिवंत राहिला, त्याला तज्ज्ञही चमत्कार मानत आहेत.

पण त्याचबरोबर काबूलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेबाबत प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चौकशी केल्यानंतर त्याला परत त्याच विमानानं अफगाणिस्तानला पाठवण्यात आलं.

अफगाणिस्तान विमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'काम एअरलाइन्स'च्या विमानाच्या (फ्लाइट क्रमांक आरक्यू-4401) चालक दलाने एका मुलाला विमानाजवळ फिरताना पाहिलं.

त्यांनी लगेचच विमानतळावर तैनात असलेल्या सीआयएसएफच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या मुलाला चौकशीसाठी टर्मिनल-3 वर नेलं.

चौकशी दरम्यान हा मुलगा अफगाणिस्तानच्या कुंदूझ प्रांताचा रहिवासी असल्याचं समोर आलं, असं पीटीआयने म्हटलं आहे.

या मुलाने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलं की, तो गुपचूप काबूल विमानतळावर गेला आणि प्रयत्न करून विमानाच्या मागील भागातील लँडिंग गिअरमध्ये पोहोचला.

काबुल विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न

पीटीआयच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान काम एअरलाइन्सच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लँडिंग गिअरच्या कंपार्टमेंटमध्ये एक छोटा लाल रंगाचा स्पीकर सापडला. कदाचित तो त्या मुलानेच आणला असावा.

चौकशीनंतर विमान सुरक्षित असल्याचे जाहीर करण्यात आले आणि कोणतेही नुकसान किंवा कट नसल्याचे सांगण्यात आले. या मुलाची संपूर्ण ओळख आणि नाव अद्याप उघड करण्यात आलेलं नाही.

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारनं अद्याप या वृत्तावर अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही.

काबूल विमानतळ (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, काबूल विमानतळ (संग्रहित छायाचित्र)

परंतु, तालिबान सरकारच्या सीमा पोलिसांचे प्रवक्ते अबिदुल्लाह फारुकी यांनी या घटनेची चौकशी करत आहेत, असं बीबीसीच्या पश्तो सेवेला सांगितलं.

ते म्हणाले की, "विमानतळाच्या रनवेवर 24 तास देखरेख ठेवली जाते आणि ही जागा विशेष सुरक्षा कवचाखाली आहे.

कोणत्याही परिस्थितीत कोणीही, अगदी अधिकारीही, रनवेवर जाऊ शकत नाही. एखादा अधिकारी चुकून रनवेवर गेला, तर सर्व उड्डाणं थांबवली जातील आणि सामान्य तपासणी सुरू होईल. विमानतळ नियंत्रणाखाली आणलं जाईल."

हा मुलगा विमानापर्यंत पोहोचल्यामुळं काबूल विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पण फारुकी यांनी बीबीसीला सांगितलं की, "विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी दक्ष आहेत आणि ते कोणालाही बेकायदेशीर प्रवासाची परवानगी देणार नाहीत."

मुलगा जिवंत राहिला हा चमत्कार

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या प्रकारानंतरही मुलगा सुरक्षित राहिल्याबद्दल आश्चर्य आणि चमत्कार मानला जात आहे.

एखादी व्यक्ती विमानात लपून प्रवास करून आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण विमानाच्या या भागात लपून प्रवास करण्याची घटना कदाचित पहिलीच आहे.

ऑक्सिजनची कमतरता आणि प्रचंड थंडीमुळे एवढ्या उंचीवर जिवंत राहणं जवळजवळ अशक्य आहे, असं बीबीसीच्या पश्तो सेवेनं तज्ज्ञांच्या हवाल्यानं सागितलं.

अशा परिस्थितीत एखादा माणूस काही वेळातच बेशुद्ध होईल आणि त्याचा मृत्यू होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं.

पण, विमानाचा लँडिंग गेअर नेमका कुठे असतो? तर, विमानानं उ्डडाण केल्यानंतर ज्या ठिकाणी विमानाची चाके दुमडली जातात, त्या ठिकाणीच विमानाचे लँडिंग गिअर कंपार्टमेंट असते.

कोणत्याही विमानाचं लँडिंग गिअर कंपार्टमेंट हा प्रचंड धोकादायक भाग असतो. तिथे जाणाऱ्या वा लपणाऱ्या व्यक्तींना तीव्र थंडी आणि ऑक्सिजनच्या कमतरता जाणवून फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

विमानाच्या टेकऑफनंतर लँडिंग गिअर दुमडला जातो. अशावेळी, जी व्यक्ती लँडिंग गिअर कंपार्टमेंटमध्ये लपली असेल, ती विमानाच्या चाकांमध्ये चिरडण्याचा प्रचंड मोठा धोका असतो. अर्थातच, यामुळे तिचा मृत्यूही होऊ शकतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.