धनगर समाजाच्या मागणीला आदिवासींचा विरोध का आहे? मानववंशशास्त्र काय सांगतं?

    • Author, प्रविण सिंधू
    • Role, बीबीसी मराठी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या भटक्या जमातीत समावेश असलेल्या धनगर समाजाकडून अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षणाची जोरदार मागणी होत आहे.

दुसरीकडे आदिवासी नेत्यांकडून, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याला कडाडून विरोध आहे.

या पार्श्वभूमीवर धनगर आरक्षणाचा नेमका मुद्दा काय, धनगर समाजाची मागणी काय, या मागणीचा आधार काय, आदिवासी समाजाचा याला विरोध का, कोणत्याही समुदायाला आदिवासी समुहात समाविष्ट करण्याचे निकष कोणते, यात कोणत्या गोष्टींचा विचार करतात, कोणत्या गोष्टी निर्णायक ठरतात, भटक्या जमाती आणि आदिवासी यांच्यात फरक काय या प्रश्नांचा हा आढावा...

धनगर आरक्षणाचा मुद्दा काय आहे?

धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गातून (ST) आरक्षण द्यावं, अशी धनगर समाजाची जुनी मागणी आहे. सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त संवर्गातून (NT) आरक्षण आहे.

"अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे एकच असून इंग्रजीमध्ये R ऐवजी D असा शब्द वापरण्यात आला आहे. 'ड' ऐवजी 'र' असा उल्लेख आल्याने आतापर्यंत समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नाही," असा दावा धनगर समाजातर्फे करण्यात येतो. धनगर किंवा धनगड यापैकी कोणताही उच्चार असला तरी त्याचा अर्थ समान असल्याचा दावाही धनगर समाजाकडून केला जातो.

आदिवासींचा विरोध का?

आदिवासी समाजाकडून धनगर समाजाला अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षणाला तीव्र विरोध केला आहे.

‘आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचा’चे राज्य समिती सदस्य डॉ. संजय दाभाडे यांनी धनगर नेत्यांचा दावा फेटाळत, ओरांव जमातीशी धनगरांचा संबंध काय? असा प्रश्न विचारला आहे.

संजय दाभाडे म्हणाले, "अनुसूचिमध्ये आधी ओरांव या मुख्य जमातीचा उल्लेख आहे आणि मग धनगड या उपजमातीचा उल्लेख आहे. त्यामुळे धनगर समुदायाने त्यांचा ओरांव जमातीशी काय संबंध आहे हे सांगावं, त्यांचा ओरांवशी आप्तभाव सिद्ध करावा. तसेच ओरांवसोबत धनगड अशी नोंद का झालीय़ हेही धनगर समुदायाने सांगावं."

ओरांव ही भारतातील खूप मोठी जमात आहे. प्रामुख्याने झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांमध्ये ही जमात आढळते. महाराष्ट्रातही काही प्रमाणात ओरांव जमातीचे लोक आढळतात.

महाराष्ट्राच्या अनुसूचित आधी एकूण 47 जमातींची नोंद होती. त्यातील दोन जमातींना यातून वगळण्यात आले आणि आता अनुसूचित 45 जमाती शिल्लक आहेत.

दरम्यान, धनगड आणि धनगर हे एकच आहेत, असा दावा करणारी याचिका फेटाळताना उच्च न्यायालयाने असा बदल करायचा असेल, तर तो अधिकार फक्त संसदेला आहे, राज्य सरकारला किंवा न्यायालयाला नाही, असं स्पष्ट केलं आहे. या निर्णयाला धनगर संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.

आदिवासी असण्याचे निकष काय?

भारतीय संविधानातील कलम 342 मध्ये आदिवासी, आदिवासी समुदाय आणि आदिवासी समुहातील इतर जमाती यांचा उल्लेख आढळतो.

याचा अर्थ लावताना कसा विचार करावा याबाबत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने म्हटलं आहे, "मागासलेपणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. आदिमता, भौगोलिक आलिप्तता, लाजरेबुजरेपणा आणि सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण या निकषांवर भारतातील आदिवासी समुदाय इतर समुदायापेक्षा वेगळा ठरतो."

मानववंशशास्त्रानुसार आदिवासी असण्याचे निकष काय?

एखाद्या समुदायाकडून त्यांचा आदिवासी समुदायात समावेश करावा म्हणून मागण्या होत असल्या, तरी मानववंशशास्त्रात आदिवासी असण्याचे निकष फार स्पष्ट आहेत.

पुणे विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागाच्या प्रमुख अंजली कुरणे म्हणाल्या, "मानववंशशास्त्रात आदिवासी असण्यासाठी सांस्कृतिक आप्तभाव (कल्चरल अॅफिनिटी) हा एक महत्त्वाचा निकष असतो. याशिवाय महसुली कागदपत्रांचाही विचार होतो. सांस्कृतिक आप्तभावात भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती हे दोन महत्त्वाचे घटक आहेत."

भौतिक संस्कृतीत संबंधित समुदायाचे कपडे, घराची रचना, त्यांचे दागिणे, अंगावरील गोंदण (टॅटूज) या गोष्टींवर भर दिला जातो. अभौतिक संस्कृतीत बोली आप्तभाव, सामाजिक संरचना, आप्तसंबंध, जीवनचक्र कसं आहे, धर्मसंस्था कशी आहे या सर्व गोष्टींवर भर दिला जातो.

"कोणत्याही समुदायाच्या भौतिक संस्कृतीत वेगाने बदल होतो, पण अभौतिक संस्कृती समुदायाच्या बदलाला विरोध करते. त्यामुळे अभौतिक संस्कृतीवर अधिक भर देणं आवश्यक असतं. अभौतिक संस्कृतीतील बोली आप्तभावमध्ये समुदायातील शब्द, वाक्य, म्हणी, वाक्यप्रचार, लोकसाहित्य, लोकगीतं आणि लोककथा यावर भर दिला जातो," असं मानववंशशास्त्रज्ञ कुरणे यांनी नमूद केलं.

सामाजिक संरचनेत आप्तसंबंध (किंगशिप ऑर्गनायझेशन) तपासला जातो. आप्तसंबंधामध्ये विवाहसंबंध आणि रक्तसंबंध या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विवाहसंबंधात लग्नाचे प्रकार, कुणाशी विवाह करायचा (विवाह युती) आणि कुणाशी विवाह करायचा नाही (विवाह निषिद्धता) याचा समावेश आहे. विवाह संबंधाची परिसीमा आणि स्थलांतर हेही महत्त्वाचे घटक आहेत.

आधी घरापासून 2-3 किलोमीटरच्या अंतरावरच लग्नं व्हायची. नंतर 10 किलोमीटरपर्यंत लग्नं होऊ लागली. शिक्षणामुळे लग्नाचं अंतर वाढत चाललं आहे. आदिवासींमध्ये अजूनही लग्नाचं अंतर फार नाही. त्यामुळे लग्न किती अंतरावर केलं आणि स्थलांतर झालं आहे का? हेही महत्त्वाचे मुद्दे ठरतात. विवाह करताना किती अंतरावर केला जातो, स्थलांतर होतं का? हे विवाह संबंधात बघितलं जातं.

रक्तसंबंधात कुळ बघितलं जातं. प्रत्येक आदिवासी समुहात त्यांचं कुळ असतं. त्यानंतर प्रत्येक आदिवासी जमातीला कुळ दैवत, कुळ प्रतिकं, चिन्ह असतं. काही जमातींची मोर, वाघ अशी प्राणी प्रतीकं असतात, तर काही जमातींची साग, आंबा अशी झाडाची प्रतीकंही असतात.

आदिवासींच्या जीवनचक्राचा निकष काय?

आदिवासी समुदाय कोण हे ओळखताना आदिवासींच्या जीवनचक्राचा (लाईफ सायकल इव्हेंट) निकष महत्त्वाचा ठरतो.

जीवनचक्रात जन्म, तारुण्यावस्था, लग्न आणि मृत्यू याचा समावेश होतो. या जीवनचक्रातील अवस्थांमध्ये भौतिक आणि अभौतिक संस्कृती एकत्र होते. या प्रत्येक अवस्थेत त्यांची कुळ दैवता, कुळ प्रतीकं, कुळ संरचना यांचं किती महत्त्व आहे हे तपासलं जातं.

याशिवाय भौतिक संस्कृतीत धार्मिक विधीसाठी, पूजेसाठी कोणत्या वस्तू वापरल्या, त्यांचं प्रतीकात्मक महत्त्व काय, धार्मिक विधी काय, त्यातील पारंपारिक प्रथा, त्याचा धर्मसंस्थेशी संबंध काय हेही पाहिलं जातं. जीवनचक्राच्या प्रत्येक टप्प्यावर हे निर्णायक ठरतं.

आदिवासींच्या जीवनचक्रातील जन्म या टप्प्याचा विचारत करताना या जमातीत प्रसूतीपूर्वी काय प्रथा आहेत, धार्मिक विधी, देवदेवतांची पूजा आणि निषिद्ध बाबी काय आहेत, प्रसूतीनंतर कोणत्या प्रथा, धार्मिक विधी आणि निषिद्ध गोष्टी कोणत्या या गोष्टींना महत्त्व दिलं जातं.

धार्मिक विधीत नैवेद्य काय देतात, धार्मिक विधीत कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी नाही करायच्या, जन्मापासून मृत्यूपर्यंत काय करायचं, काय नाही. मृत्यूनंतर काय संस्कार होतात याचाही विचार केला जातो.

जमातीच्या धार्मिक संस्थेचं महत्त्व

भौतिक संस्कृतीचा आणखी एक महत्त्वाचा निकष म्हणजे संबंधित जमातीची धार्मिक संस्था. धार्मिक संस्थेत त्या जमातीचे कुळदैवत आणि धार्मिक उत्सव या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. दैवतातही कुळदैवतं आणि ग्रामदैवतं असे दोन प्रकार असतात.

दैवतांमध्ये मानवी चेहरा असलेले आणि मानवी चेहरा नसलेले दैवतं असाही फरक असतो. आदिवासी जमातींमध्ये मानवी चेहरा नसलेले दैवतं असतात. यात दगड, झाड, पाला, काडी याचा समावेश होतो. त्या देवांना वेगवेगळी नावंही असतात. अनेक जमातींमध्ये वाघ देव असल्याचं सापडतं. प्राणी, झाड अशा निसर्गातील प्रतिकांचा यात समावेश असतो. त्यांचे सण, उत्सव कोणते आहेत आणि त्यांच्या यात्रा कोणत्या आहेत हे बघितलं जातं.

धार्मिक उत्सव कोणते आहेत, हे उत्सव का करतात, त्यांची ठिकाणं काय आहेत, कोणत्या महिन्यात हे उत्सव असतात, कोणत्या रुपात उत्सव होतो, नैवेद्य काय, बळी देतात का, अशा गोष्टी अभौतिक संस्कृतीत येतात. अशाप्रकारे भौतिक आणि अभौतिक संस्कृतीच्या निकषांवर आदिवासी आहेत की नाही हे ओळखलं जातं.

आरक्षणासंदर्भात इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

आदिवासी जमातीच्या भौगोलिक ठिकाणाचं महत्त्व

आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या समुदायाचे भौगोलिक ठिकाण काय आहे. यावर बोलताना अंजली कुरणे म्हणाल्या, "मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात राहत असले, तरी महाराष्ट्र आणि भारतभरात प्रत्येक आदिवासी समुदायाचे मुळ गाव/ठिकाण (नेटिव्ह प्लेस) असतेच."

महादेव कोळी जुन्नर, आंबेगाव, अकोले या पट्ट्यात आढळतात. ठाणे, रायगड या भागात कातकरी आदिवासी जमात सापडते. अशाप्रकारे प्रत्येक आदिवासी जमातीचे विशिष्ट भौगोलिक ठिकाण आहे. त्या भागात तीच जमात आढळते. आपल्याकडे अशा 183 आदिवासी जमाती आहेत.

"विशिष्ट भौगोलिक ठिकाण नसेल, तर ती जमात आदिवासी नसते. ठराविक भौगोलिक ठिकाण हा महत्त्वाचा निकष आहे. सध्या काही खोट्या आदिवासी जमातीही तयार होत आहेत. या खोट्या जमातींना विशिष्ट भौगोलिक ठिकाण नसते", असं कुरणे यांनी सांगितले.

भटक्या जमाती आणि आदिवासी जमाती यांच्यात काय फरक असतो?

भटक्या जमाती आणि आदिवासी यांच्यातील फरक सांगताना मानववंशशास्त्रज्ञ कुरणे म्हणाल्या, "भटक्या जमातींचे एका जागेवर वास्तव्य नसते. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. यात धनगर, गोसावी, वैदू अशा जमातींचा समावेश होतो. आदिवासी जमाती एकाच ठिकाणाशी संबंधित असतो. त्यांची स्वतःची एक स्वतंत्र संस्कृती असते."

"आदिवासींचा हिंदूंच्या चार वर्णातही समावेश होत नाही. ते हिंदू नसतात. ते त्यांच्या प्रमाणपत्रावरही हिंदू लावत नाहीत. ते प्रमाणपत्रावर वारली, महादेव कोळी असं लिहितात. आदिवासी जमातींना त्यांची विशिष्ट धार्मिक संस्था असते. त्यांची जात पडताळणी होते तेव्हा तो खरा आदिवासी आहे की नाही हे ठरवताना अभौतिक संस्कृतीवर अधिक भर दिला जातो", असंही कुरणे यांनी नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)