फिजीमध्ये चिमुकल्यांसह हजारोंना HIV चा विळखा; काय आहे 'ब्लूटुथिंग' आणि 'ब्लड शेअरिंग'?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गॅव्हिन बटलर
- Role, बीबीसी न्यूज
10 वर्षे. सेसेनिएली नैताला यांनी ज्या एचआयव्हीग्रस्त रुग्णांची भेट घेतली, त्यातल्या सर्वात कमी वयाच्या रुग्णाचं हे वय .
सेसेनिएली यांनी 2013 मध्ये सर्वात आधी फिजीमधील सर्व्हायवर अॅडव्होकसी नेटवर्क सुरू केलं होतं. त्यावेळी हा 10 वर्षांचा मुलगा जन्मालाही आला नव्हता.
पण गेल्या वर्षांमध्ये रक्तातून होणाऱ्या संसर्गामुळं एचआयव्ही विषाणूची लागण होणाऱ्या फिजीतील हजारो रुग्णांपैकी आता तो एक आहे.
या रुग्णांमधली अनेकजण 19 किंवा त्यापेक्षा कमी वयाची आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या सर्वांना ही लागण नसांमधून अंमली पदार्थ सेवन करण्याच्या सवयीमुळं झाली आहे.
"अनेक तरुण ड्रग्ज वापरत आहेत," असं नैताला सांगतात. नैताला यांची फिजीची राजधानी सुवामध्ये सेक्सवर्कर्स आणि ड्रग्जचं व्यसन असलेल्यांसाठी काम करते.
"कोविडच्या काळामध्ये रस्त्यावर सुया (इंजेक्शनच्या नीडल) शेअर करणाऱ्यां तरुणांमध्ये 'त्या' मुलाचाही समावेश होता," असं त्यांनी सांगितलं.
दक्षिण पॅसिफिकमधील फिजी या लहानशा देशाची लोकसंख्या ही दहा लाखांपेक्षाही कमी आहे. पण गेल्या पाच वर्षांमध्ये जगात एचआयव्हीच्या साथीची सर्वात वेगानं वाढ होणाऱ्या देशांमध्ये याचा समावेश झाला आहे.
याठिकाणी 2014 मध्ये एचआयव्ही बाधितांची संख्या 500 हून कमी होती. पण 2024 पर्यंत हा आकडा अकरा पटीने म्हणजे 5900 पर्यंत वाढला.
त्याच वर्षी (2024) फिजीमध्ये 1583 नवीन रुग्ण आढळले. ही वाढ तर पाच वर्षांच्या सरासरीचा विचार करता तेरा पटीनं अधिक होती.
या रुग्णांपैकी 41 जण 15 वर्ष किंवा त्याहून कमी वयाची होती. एका वर्षापूर्वी म्हणझे 2023 हे प्रमाण फक्त 11 एवढं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
अशी प्रकारची धक्कादायक आकडेवारी समोर आल्यानंतर फिजीच्या आरोग्य आणि वैद्यकीय सेवा मंत्रालयानं जानेवारी महिन्यात एचआयव्हीचा प्रादुर्भाव झाल्याचं जाहीर केलं.
त्यानंतर गेल्याच आठवड्यात सहाय्यक आरोग्यमंत्री पेनिओनी रवुनावा यांनी आणखी एक धक्कादायक इशारा दिला. फिजीमध्ये 2025 च्या अखेरीपर्यंत 3000 हून अधिक नवीन एचआयव्ही रुग्णांची नोंद होऊ शकते, असं त्यांनी सांगितलं.
"हे एक राष्ट्रीय संकट असून ते कमी होत नाहीये," असं ते म्हणाले.
एचआयव्हीच्या रुग्णांमध्ये अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात वाढ होण्यामागे काय कारणं आहेत हे जाणून घेण्यासाठी बीबीसीनं अनेत तज्ज्ञ, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
त्यापैकी काहींनी एक कारण सांगताना म्हटलं की, एचआयव्हीबाबत पसरलेली जागरूकता आणि या आझाराकडे कलंक म्हणून पाहण्याच्या दृष्टीकोनात झालेला बदल यामुळं अधिकाधिक लोक पुढं येऊन तपासणी करत आहेत.
पण त्याचवेळी अधिकृत आकड्याचा विचार करायचा असेल तर, अनेक लोक अजूनही समोर आलेले नाहीत. त्यामुळं या संदर्भातले खरे आकडे आणि रेकॉर्डब्रेक आणि खूप मोठे असू शकतात असंही त्यांनी सांगितलं.

फिजीमध्ये वाढणाऱ्या एचआयव्ही प्रसाराच्या कारणांचा विचार करता ड्रग्जचे सेवन, असुरक्षित लैंगिक संबंध, सुई शेअर करणं आणि 'ब्लूटूथिंग' अशी कारणं समोर येत आहे.
'ब्लूटूथिंग' ला 'हॉटस्पॉटिंग'ही म्हटलं जातं. ही ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची ते शेअर करण्यासाठीची एक पद्धत आहे.
यात इंजेक्शनद्वारे नसांमधून रक्तात घेतले जाणारे ड्रग्ज घेतल्यानंतर ड्रग्ज सेवन करणारी व्यक्ती स्वतःचं रक्त काढते आणि दुसरा व्यक्ती ते ड्रग्स असलेलं रक्त स्वतःच्या शरीरात इंजेक्ट करतो. त्यानंतर तो दुसरा व्यक्ती हीच प्रक्रिया तिसऱ्या व्यक्तीसोबतही करू शकतो.
या प्रक्रियेमध्ये एकाच सुईचा वापर तर होतोच पण थेट एकमेकांचे रक्त एकमेकांच्या शरिरात इंजेक्ट केलं जातं आणि त्यातून विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो.
ही बातमीही वाचा : एड्स आणि HIV संदर्भातील 19 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
कालेसी वोलाटाबू या ड्रग फ्री फिजी या सामाजिक संस्थेच्या कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी हे सर्व प्रत्यक्षात पाहिलं आहे. मे महिन्यात त्या फिजीची राजधानी सुवा याठिकाणी नियमितपणे जात होत्या.
रस्त्यावर ड्रग्जचा वापर करणाऱ्यांना आधार आणि शैक्षणिक मदत देण्याचं काम त्या करायच्या. अशाच एका दिवशी फिरताना त्यांना सात-आठ लोकांचा एक समूह दिसला.
"मी रक्तानं माखलेली सुई पाहिली. इंजेक्शननं ड्रग्ज घेतलेली ती तरुणी माझ्या डोळ्यासमोर तिचं रक्त काढत होती आणि ते स्वतःच्या शरीरात इंजेक्ट करून घेण्यासाठी इतर मुली आणि प्रौढ लोकांची अक्षरशः रांग लागलेली होती."
"ते फक्त इंजेक्शनची सुई नव्हे तर रक्तही शेअर करत होते," असं त्या सांगत होत्या.

फोटो स्रोत, Supplied: Kalesi Volatabu
जगात एचआयव्हीचं प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीतील दक्षिण आफ्रिका आणि लेसोथो या दोन देशांमध्येही ब्लूटूथिंगचा वापर झाल्याचं समोर आलं आहे. वोलाटाबू आणि नैताला या दोघींच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये फिजीमध्येही हा प्रकार लोकप्रिय बनला आहे.
नशा करण्याचा स्वस्त पर्याय हे याचं प्रमाण वाढण्याचं एक कारण असू शकतं असं त्यांचं मत आहे. एका डोसचा वापर करून इंजेक्शनद्वारे अशाप्रकारे अनेक लोक एकत्रितपणे ते शेअर करू शकतात, हे एक कारण. तर फक्त एका इंजेक्शन सिरिंज वापरावी लागण्याची सुविधा हे दुसरं कारण.
त्याचं कारण म्हणजे याठिकाणी अगदी सहजपणे इंजेक्शनचं सिरिंज मिळणं शक्य नाही. पोलिसांच्या दबावामुळं याठिकाणी अनेकदा औषधविक्रेते सिरिंजसाठी प्रिस्क्रिप्शनची मागणी करतात. तसंच, इंजेक्शनच्या वापराबाबतच्या जागरूकतेचाही इथं अभाव आहे.
एचआयव्हीसारख्या रक्तातून संसर्ग होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही उपक्रमांतर्गत ड्रग्जचं सेवन करणाऱ्यांना स्वच्छ सिरिंज उपलब्ध करुन देण्याला मान्यता आहे. पण असं असलं तरी धार्मिक परंपरा आणि प्रथांचा पगडा यामुळं या देशात त्याची अंमलबजावणी कठीण ठरत आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वोलाटाबू यांच्या मते, सुयांची म्हणजे सिरिंजचा एवढा तुटवडा आहे की, सिरिंज शेअर करणं किंवा ब्लूटूथिंगसारख्या धोकादायक प्रकारांना चालना मिळते.
तसंच, याठिकाणी सिरिंज आणि कंडोम वाटपाची जबाबदारी ही सामाजिक संस्थांवर टाकली जात आहे. हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
फिजीच्या आरोग्य आणि सेवा मंत्रालयानं ऑगस्ट 2024 मध्ये देशात वाढत्या एचआयव्ही प्रसारासाठी 'ब्लूटूथिंग' हेही एक कारण असल्याचं मान्य केलं.
तर दुसरं कारण म्हणजे, केमसेक्स. यामध्ये लोक लैंगिक संबंधांपूर्वी आणि त्यादरम्यान ड्रग्जचा आणि बहुतांशवेळा 'मेथाम्फेटामाइन'चा वापर करतात.
जगभरातील बहुतांश देशांच्या उलट फिजीमध्ये क्रिस्टल मेथ हे प्रामुख्यानं नसांतून घेतल्या जाणाऱ्या इंजेक्शनद्वारे घेतले जाते.
2024 च्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये समोर आलेल्या 1093 नव्या प्रकरणांपैकी 223 म्हणजे अंदाजे 20 टक्के प्रकरणं ही नसांतून घेण्यात आलेल्या ड्रग्जच्या माध्यमातून संसर्ग झालेली असल्याचं मंत्रालयाला आढळून आलं.

फिजी हे गेल्या 15 वर्षांमध्ये क्रिस्टल मेथच्या तस्करीचं पॅसिफिकमधील केंद्र बनलं आहे. त्यामागचं मोठं कारण म्हणजे या देशाचं भौगोलिक स्थान.
एकाबाजूला या ड्रग्जच्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादकांमध्ये समावेश असलेलं पूर्व अमेरिका आणि आशिया, तर दुसऱ्या बाजुला यासाठी सर्वाधिक किंमत मोजणारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधली बाजारपेठ. या दोन्हींच्या मध्ये असलेलं स्थान हे यामागं एक कारण आहे.
त्यामुळं याच काळाता एचआयव्ही प्रमाणेच मेथचा स्थानिक लोकांमध्ये प्रसार झाला आणि तेही फिजीसाठी 'राष्ट्रीय संकट' असल्याचं सरकारला जाहीर करावं लागलं.
पण या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या मते, याचा वापर करणाऱ्यांचं वय दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे.
"आम्हाला तरुणांची संख्या जास्त दिसत आहे आणि दिवसेंदिवस त्यांचं वय घटत चाललं आहे," असं वोलाटाबू म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
फिजीच्या ताज्या एचआयव्ही आकडेवारीनुसार इंजेक्शनद्वारे ड्रग्जचं सेवन हे प्रसाराचं सर्वात मोठं कारण आहे. त्यामुळं होणाऱ्या प्रसाराचं प्रमाण सुमारे 48% आङे. तर लैंगिक संबंधांमुळं होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण 47% टक्के आहे.
तर बालरुग्णांच्या संसर्गाचं कारण आईकडून बाळाला होणारा संसर्ग हे असल्याचं समोर आलं.
बीबीसीनं चर्चा केली त्या सर्वांच्या मते, शिक्षणाचा अभाव हादेखिल या संकटामागचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यात सुधारणा व्हाव्या म्हणून वोलाटाबू आणि नैताल यांच्यासारखे लोक झटत आहे.
एचआयव्हीच्या धोक्यांबाबत करण्यात आलेल्या जनजागृतीनंतर लोकांमध्ये जागरुकता वाढत असून त्यामुळं ब्लूटुथिंगची लोकप्रियता कमी होत असल्याचं, नैताला सांगतात.
तसंच जास्तीत जास्त लोक एचआयव्हीच्या चाचणी करत असून उपचार घेत आहे. त्यामुळं या संकटाच्या संदर्भात आणखी ठोस माहिती समोर येत आहे.
पण अजूनही सर्वात मोठी चिंतेची बाब आहे की, समोर आलेली संख्या ही केवळ हिमनगाचं टोक असू शकतं आणि त्याखाली काय दडलंय ही मोठी भीती कायम आहे.

हा प्रकार म्हणजे, एक मोठं वादळ तयार होत असण्यासारखं आहे असं न्यूझीलंडच्या कॅन्टरबरी विद्यापीठात पॅसिफिक रीजनल सेक्युरिटी हबचे प्रमुख जोस सौसा-सँटोस याचं मत आहे.
"फिजीतील एचआयव्ही संकटाबाबत सगळ्यांच स्तरांत चिंतेचं वातावरण आहे. फक्त सध्याची स्थितीच नव्हे तर, पुढच्या तीन वर्षांत काय परिस्थिती असेल आणि फिजीमध्ये असलेला सुविधांचा अभाव याबाबतही चिंता वाढत आहे. कारण व्यवस्थापनाची यंत्रणा, वैद्यकीय सेवा, एचआयव्हीच्या उपचारांसाठी औषधं वितरित करण्याची किंवा निर्मीतीची क्षमता, याचा अभाव आहे," असं ते म्हणाले.
"त्यामुळंच या क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना भीती वाटत आहे. कारण फिजी याचा सामना करूच शकणार नाही."
जानेवारी महिन्यात या राष्ट्रीय संकटाच्या घोषणेनंतर फिजी सरकारनं एचआयव्ही संदर्भात निगराणी आणि समोर न येणाऱ्या प्रकरणांच्या नोंदीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
यासाठी ग्लोबल अलर्ट अँड रिस्पॉन्स नेटवर्क तयार करण्यात आलं होतं. त्यांच्या अहवालानुसार,"फिजीमध्ये एचआयव्हीचं प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त समन्वय असलेल्या राष्ट्रीय प्रयत्नांची गरज आहे."

फोटो स्रोत, Supplied: José Sousa-Santos
कर्मचाऱ्यांची कमतरता, दळणवळणाच्या समस्या, प्रयोगशाळेतील उपकरणं, एचआयव्हीच्या जलद चाचण्यांसह औषधांचा साठा या संदर्भातील आव्हानांमुळं यामुळे तपासणी, निदान आणि उपचारांवर परिणाम होत असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं होतं.
ही माहिती मिळवण्याचा वेग कमी असून त्यात अनेक त्रुटीही असू शकतात असंही यात म्हटलं आहे. त्याचा परिणाम म्हणजे, फिजीतील एचआयव्हीच्या साथीची व्याप्ती आणि उद्रेकाचा सामना करण्यासाठी असलेली तयारी याचा आढावा घेण्यात अडचणी येत आहेत.
त्यामुळं अनेक तज्ज्ञ, अधिकारी आणि सामान्य फिजीवासी अजूनही याबाबतीत अंधारात आहे. त्यामुळं यासंदर्भातलं एक मोठं वादळ घोंगावत असल्याची शक्यता सौसा-सँटोस व्यक्त करतात.
"सध्या आपण जे पाहत आहोत ती फक्त सुरुवात आहे. पण ते एढ्यावरच थांबवणं शक्य नाही. कारण संसर्ग सध्या सुरू आहे किंवा आधीच झालेला आहे. आपल्याला ते पाहता येणार नाही आणि लोकही किमान पुढची दोन तीन वर्ष स्वतः चाचण्यांसाठी पुढं येणार नाहीत," असं त्यांनी म्हटलं.
"गेल्या वर्षभरात झालेला आणि आता सध्या होत असलेला संसर्ग रोखण्यासाठी आपण सध्या काहीही करू शकत नाही. हे खरंच भयावह आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











