You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तानच्या रझिया मुरादीला गुजरातमध्ये मिळालं सुवर्णपदक
- Author, धर्मेश अमीन
- Role, बीबीसी गुजरातीसाठी
अफगाणिस्तानच्या रझिया मुरादीला दक्षिण गुजरात विद्यापीठात लोक प्रशासन या विषयात सुवर्ण पदक मिळालं आहे.
बीबीसीशी बोलताना तिने म्हटलं आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानविरोधात कारवाई केली पाहिजे.
रझिया भारतात शिकायला आली होती.
ती म्हणते की, तालिबानने हे समजून घ्यायला हवं की शिक्षण आणि विकास यांचा परस्पर संबंध आहे.
रझिया मुरादी 2021 मध्ये लोक प्रशासन या विषयात एम. ए. करण्यासाठी भारतात आली.
जेव्हा ती भारतात आली तेव्हा अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य नव्हतं आणि मुलींना शाळेत जाण्याची तसंच उच्च शिक्षण घेण्याची परवानगी होती.
पण ऑगस्ट 2021 साली अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान सत्तेत आलं. त्यानंतर तिथल्या महिलांच्या हक्कावर हळूहळू गदा आली. त्यांना शिक्षण घ्यायला किंवा नोकरी करायला बंदी घातली गेली.
भारतात आल्यानंतर रझिया अजून अफगाणिस्तानात परत गेलेली नाही.
तालिबानबद्दल रझियाला काय वाटतं?
रझिया मुरादी सेंट्रल अफगाणिस्तानाच्या बामियान प्रदेशातली आहे.
ती म्हणते, “अफगाणिस्तानात सध्या तालिबानचं राज्य आहे. ही इस्लामी कट्टरतावादी संघटना आहे. तालिबान वांशिक गट आणि अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांची पर्वा करत नाही.”
अफगाणिस्तानातल्या महिलांच्या परिस्थितीबद्दल बोलताना रझिया म्हणते, “तालिबानने महिलांचे हक्क हिसकावून घेतले आहेत. त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही, मतदानाचा नाही. त्यांना शिक्षण घेऊ दिलं जात नाही. शाळाकॉलेजात जाऊ दिलं जात नाही.”
ती पुढे म्हणते, “अफगाणिस्तानात स्थिरता नाहीये. तिथली आर्थिक परिस्थितीही चांगली नाहीये. लोकांना खायला मिळत नाहीये, देशात बेरोजगारी वाढलीये.”
तिचं म्हणणं आहे की यामुळे अफगाणिस्तानातल्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय आणि माझं कुटुंबही यापासून वाचू शकत नाहीये.
“तरीही लोक कसेबसे आयुष्य कंठत आहेत.”
आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहान
रझियाचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानातल्या परिस्थितीबद्दल काहीतरी करावं.
“अफगाणिस्तानात जे होतंय त्याबद्दल आवाज उठवणं ही फक्त अफगाणिस्तानातल्या लोकांची जबाबदारी नाही तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायची जबाबदारी आहे.”
ती पुढे म्हणते, “तिथली परिस्थितीमुळे फक्त अफगाणिस्तानावर परिणाम होतोय असं नाही तर आसपासचे देश आणि संपूर्ण जगावर परिणाम होतोय. हे सगळ्याच देशांसाठी हानिकारक आहे. आज जे अफगाणिस्तात घडतंय ते उद्या दुसरीकडे होऊ शकतं आणि म्हणूनच त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी प्लॅन बनवणं आवश्यक आहे.”
रझियाने आपल्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दलही सांगितलं.
ती म्हणते, “2021 साली मी आयसीसीआर स्कॉलरशिपच्या मदतीने भारतात आले. भारत आणि अफगाणिस्तान सांस्कृतिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत. त्यामुळे मी जेव्हा भारतात आले तेव्हा मला फार कमी अडचणी आल्या. इथले लोक खूप चांगले आहेत आणि त्यांनी माझी खूप मदत केली.”
रझिया मुरादीला आता दक्षिण गुजरात विद्यापीठातून पी.एचडी करायची आहे.
याच विद्यापीठात लोक प्रशासन विभागात सहाय्यक प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या मधु धवनी म्हणतात, “रझियाला तिच्या मेहनतीमुळे गोल्ड मेडल मिळालं आहे.”
त्या पुढे म्हणतात, “रझिया खूप धाडसी विद्यार्थिनी आहे. आपल्या अभ्यासाशी ती नेहमीच प्रामाणिक राहिली. इथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही तिने अनेकदा भाग घेतला. तिने पीएचडी करण्यासाठी अर्ज केला आहे.”
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)