करसनदास मूलजी : जयदीप अहलावत-जुनैद खान यांच्या 'महाराज' चित्रपटामागची प्रेरणा तुम्हाला माहीत आहे का?

    • Author, नियाझ फारुकी
    • Role, बीबीसी, दिल्ली

19 वं शतक हे सामाजिक घुसळणीचं शतक होतं. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर या शतकात सामाजिक सुधारणेचं वारं वाहत होतं. यात अनेकांनी त्यांचं योगदान दिलं आहे. पत्रकार करसनदास मूलजी हे त्यातीलच एक नाव.

समाजातील चुकीच्या चालीरितींना विरोध करत लढा देताना त्यांनी अनेक अडचणींना तोंड दिलं. या धाडसी पत्रकाराची कहाणी 'महाराज' या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात मांडण्यात आली आहे, त्यानिमित्तानं करसनदास मूलजी यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

अलीकडेच नेटफ्लिक्सवर 'महाराज' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट दोन कारणांमुळे खूपच चर्चेत आहे.

यामागचं एक कारण तर हे आहे की, शतकापूर्वी भारतीय समाजातील चुकीच्या चाली-रितींविरोधात एका पत्रकारानं दिलेल्या लढ्याची ही कहाणी आहे. तर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे बॉलीवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळख जाणाऱ्या आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर आगमन केलं आहे.

गुजराती पत्रकार सौरभ शाह यांच्या 2014 मध्ये आलेल्या 'महाराज' या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे.

करसनदास नावाच्या पत्रकाराची समाज सुधारणेची चळवळ आणि समाजातील चुकीच्या चाली-रितींविरोधात लढा देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आलं आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ मल्होत्रा यांनी केलं आहे, तर आमिर खान यांचा मुलगा जुनैद खान, शालिनी पांडे, शर्वरी वाघ आणि जयदीप अहलावत यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

हा चित्रपट सत्य घटनांवर आधारलेला आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे की, 1862 मध्ये एका पत्रकारानं एका धर्मगुरूकडून केल्या जात असलेल्या लैंगिक शोषणाविरोधात लिहिण्यात सुरूवात केली. यामुळे तत्कालीन बॉम्बे हायकोर्टात त्यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्यात आला. हा खटला पुढे एक ऐतिहासिक खटला ठरला.

जवळपास दीड शतकापूर्वी भारतीय समाजातील महिलांचं शोषण आणि चुकीच्या धार्मिक चाली-रितीविरोधात आवाज उठवणारे हा पत्रकार कोण होता.

करसनदास मूलजी कोण होते?

बी एन मोतीवाला या लेखकानं 1935 मध्ये करझनदास मूलजी याचं चरित्र लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात की करझनदास यांचा जन्म 25 जुलै 1832 ला मुंबईतील एका गुजराती कुटुंबात झाला होता. त्याचं सुरूवातीचं शिक्षण एका गुजराती शाळेत झालं. त्यानंतर ते इंग्रजी शाळेत गेले.

चित्रपटात जी कथा मांडण्यात आली आहे त्यानुसार ते लहाणपणापासून अत्यंत बुद्धिमान होते आणि समाजातील अनिष्ठ प्रथा, रिती याबद्दल प्रश्न विचारायचे. ते अनेकदा आपल्या घरातील लोकांना असे प्रश्न विचारायचे ज्या गोष्टींना सामाजिक चालीरिती आणि मूल्यांविरोधात मानलं जायचं.

उदाहरणार्थ, "आपण दररोज मंदिरात का जातो? देवाला गुजराती भाषा येते का? देव आपल्याच गावचे आहेत का? महिला नेहमी डोक्यावरून पदर का घेतात?"

करसन मूलजी गुजराती भाषिक पत्रकार होते. त्यांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात लिहिण्यास सुरूवात केली होती.

समाजाभिमुख पत्रकारिता आणि समाजातील चुकीच्या चाली-रिती, प्रथा यांच्याविरोधात आवाज उठवण्यामुळं त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं.

'महाराज' कोण होते?

जदुनाथ जी महाराज हे वैष्णव पुष्टिमार्ग संप्रदायाचे एक सन्माननीय धर्मगुरु होते. ते श्री कृष्णाचं पूजन करायचे. या संप्रदायातील धार्मिक गुरु स्वत:ला 'महाराज' म्हणायचे.

गुजरात, काठियावाड, कच्छ आणि मध्य भारतात या संप्रदायाचे अनेक अनुयायी होते. त्यामध्ये शेतकऱ्यांपासून ते श्रीमंत व्यापाऱ्यांचा समावेश होता. यात भाटिया आणि बनियासारख्या जातीतील लोकांचाही समावेश होता.

या संप्रदायाचे धर्मगुरु 'चरण सेवा' नावाच्या प्रथेच्या माध्यमातून महिला भक्तांच्या भक्तीचा गैरवापर करून त्यांचं लैंगिक शोषण करायचे. ही प्रथा म्हणजे एक धार्मिक परंपरा असल्याचे ते लोकांना सांगायचे.

'इकॉनॉमिक अॅंड पॉलिटिकल वीकली' या प्रसिद्ध नियतकालिकात अनु कुमार यांनी लिहिलं आहे की, "महाराजांनी आपल्या महिला भक्तांशी तर लैंगिक संबंध ठेवलेच होते. त्याचबरोबर पुरुष भक्तांनी सुद्धा आपल्या लैंगिक सुखासाठी त्यांच्या पत्नींना सादर करावं अशी त्यांची अपेक्षा असायची."

करसनदास यांच्यासारख्या समाज सुधारकांना धर्म आणि श्रद्धेच्या या गैरवापराची चांगलीच कल्पना होती. मात्र हे समाज सुधारणेचं काम करत असताना त्यांना या प्रकारच्या महाराजांच्या भक्तांकडून आणि आपल्या कुटुंबांकडून प्रचंड विरोधाला तोंड द्यावं लागलं.

'चरण सेवा' नावाच्या या वाईट प्रथेविरोधात करसनदास यांनी आवाज उठवला. याचा परिणाम म्हणून करसनदास यांना घरातून बाहेर काढण्यात आलं. मात्र आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी 'महाराजां'च्या या कृत्याविरोधात लढा सुरूच ठेवला.

सुरूवातीच्या काळात त्यांनी 'रस्त गुफ्तार' या दादाभाई नौरोजी यांच्या वृत्तपत्रातून लिखाण केलं. त्यानंतर त्यांनी 'सत्य प्रकाश' नावाचं स्वत:चं वृत्तपत्र सुरू केलं होतं. या वृत्तपत्रातून करसनदास जे लेख लिहित होते त्यामुळे जदुनाथ महाराज त्यांच्यावर रागावले. त्यांनी करसनदास यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला.

करसनदास मूलजी यांच्यावरील अब्रुनुकसानीचा खटला

पत्रकार करसनदास मूलजी यांनी धर्मगुरु जदुनाथ महाराज यांच्यावर धर्माच्या नावाखाली महिलांच्या लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केला होता. आपल्या वृत्तपत्रातून त्यांनी या विरोधात लिखाण देखील केलं होतं.

त्यामुळे चिडलेल्या 'महाराजां'नी 1862 मध्ये बॉम्बे हायकोर्टात करसनदास यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

या खटल्यात आपली बाजू मांडताना करसनदास यांनी असा युक्तिवाद केला की, त्यांच्याऐवजी जदुनाथ महाराजांवरच खटला चालवण्यात आला पाहिजे. कारण करसनदास यांच्या मते, जदुनाथ यांचा पुष्टिमार्ग हा खरा हिंदू संप्रदाय नव्हता तर एक पथभ्रष्ट, वाईट संपद्राय होता. या संप्रदायाकडून 'महाराजां'च्या लैंगिक सुखासाठी महिला भक्त, पुरुष भक्तांच्या पत्नी, मुलींचा वापर करण्याची अत्यंत वाईट प्रथा चालवण्यात येत होती.

महत्त्वाची बाब म्हणजे करसनदास मूलजी यांच्या कुटुंबाची देखील या संप्रदायाच्या 'महाराजां'वर श्रद्धा होती.

महाराज जदुनाथ यांनी दाखल केलेल्या या अब्रुनुकसानीच्या खटल्याची न्यायालयात 24 दिवस सुनावणी झाली. महाराजांनी आपल्या चारित्र्याच्या समर्थनार्थ अनेक साक्षीदारांना सादर केलं.

या खटल्यात महाराजांच्या खासगी वैद्यांनी देखील न्यायालयात साक्ष दिली होती. त्यात त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी जदुनाथ आणि इतर महाराजांच्या गुप्त रोगांवर उपचार केले होते. वैद्यांनी हे मान्य केलं होतं की हा रोग त्यांना अनेक महिला भक्तांशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळंच झाला होता.

अब्रुनुकसानीचा हा ऐतिहासिक खटला करसनदास जिंकले. या खटल्यामुळे त्या काळात समाजात होणाऱ्या सुधारणांना बळ मिळाले.

याशिवाय करसनदास यांनी त्या काळातील हिंदू समाजातील इतर चुकीच्या चाली-रिती, अनिष्ठ प्रथांविरोधात देखील आवाज उठवला होता. त्यांनी जातीव्यवस्थेविरोधात लढा दिला. त्याचबरोबर विधवा विवाहाला पुढे आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले होते.

करसनदास यांच्या प्रयत्नांचे आणि न्यायालयीन निकालाचे वृत्तपत्रांमधील एका भागानं खूप कौतुक केलं. स्थानिक इंग्रजी वृत्तपत्रांनी त्यांना 'इंडियन लूथर'चा किताब दिला.

करसनदास यांच्या मित्रांना त्यांच्याबद्दल काय वाटत होतं?

करसनदास यांचे समकालीन असलेले आणि वृत्तपत्रातील त्यांचे सहाय्यक, माधव दास रघुनाथ दास यांनी 1890 मध्ये एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकात त्यांनी आपल्या अनुभवांबद्दल लिहिलं आहे. करसनदास यांच्या मदतीनं एका विधवेशी माधव दास यांनी लग्न केलं होतं, त्याबद्दल त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे.

या विवाहाचा उल्लेख करताना ते लिहितात की विधवेचं पुन्हा लग्न होणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्यामुळेच "हा विवाह व्यवस्थित पार पडण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारचे सुरक्षा उपाय करावे लागले."

करसनदास यांनी स्वत: वधूच्या वडिलांच्या जागी तिचं कन्यादान केलं. मात्र, त्यांनी समाज सुधारणेसाठी उचललेल्या या पावलाविरोधात प्रतिगामी आणि प्रथांचे समर्थक असलेल्या लोकांकडून तीव्र स्वरुपाची प्रतिक्रिया उमटेल अशी त्यांना भीती होती. ही भीती इतकी होती की एका इंग्रज इन्स्पेक्टरनं रात्री त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून लाठ्या दिल्या होत्या.

ते पुढे लिहितात की, "आम्ही सुरक्षेबाबत अतिशय सावध होतो. त्यामुळेच त्या जागेच्या सुरक्षेसाठी आम्ही स्वत: चार मजबूत पठाणांना ठेवलं होतं."

करसनदास यांनी समाजाला इतर मार्गांनी देखील आव्हान दिलं होतं. माधव दास रघुनाथ दास लिहितात की, त्यांनी अपवित्र म्लेच्छ (त्याकाळी परधर्मियांना म्लेच्छ म्हटले जायचे) आणि असुरांच्या देशात प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता.

(इथे अपिवित्र म्लेच्छ आणि असुरांचा देश म्हणजे युरोप असा आहे.)

हिंदू समाजातील एका वर्गाचा उल्लेख करताना ते लिहितात, "युरोपचा प्रवास करणं हा त्यांच्यादृष्टीनं सर्वात गंभीर गुन्हा होता. अगदी विधवा विवाहापेक्षाही अधिक मोठा गुन्हा होता."

रघुनाथ दास लिहितात की, "करसनदास यांनी म्लेच्छ आणि असुरांच्या देशात (युरोपात) जाण्याचा गुन्हा केल्याबद्दल समाजाकडून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यांची पत्नी आणि लहान मुलांनासुद्धा त्यांचा कोणताही दोष नसताना या रोषाला तोंड द्यावं लागलं."

करसनदास यांच्या मृत्यूनंतर चुकीच्या चालीरितींचे समर्थक असलेल्या संप्रदायाच्या लोकांनी मागणी केली होती की त्यांच्या पत्नी आणि मुलांनी माफी मागावी. त्यासाठी त्यांची अट होती की "गाईचं शेण त्यांनी आपल्या अंगावर लावावं आणि मग आपलं पाप नाशिकच्या पवित्र नदीत (गोदावरी) धुवून काढावं."