राजस्थानमधील 'हा' अपक्ष उमेदवार कोण आहे, ज्याच्या सभेला गुजरात-महाराष्ट्रातही प्रचंड गर्दी

    • Author, त्रिभूवन
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

लोकसभा निवडणुकीमुळे देशभरातील वातावरण तापलं आहे. प्रत्येक मतदारासंघाचं स्वत:चं असं वैशिष्ट्यं असतं. काही ठिकाणी एखाद्या उमेदवारामुळे तो मतदारसंघ चर्चेत येत असतो.

राजस्थानातील बाडमेरमधील अपक्ष उमेदवार रवींद्र सिंह भाटी यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून सध्या त्यांच्याविषयी जोरदार चर्चा होते आहे.

अलीकडच्या काळात ज्या प्रकारे पैशांचं महत्त्व वाढलं आहे ते पाहता, सरकारी शाळेतील एका शिक्षकाचा मुलगा अल्पावधीत मिळालेल्या लोकप्रियतेमुळे राजस्थानातील मातब्बर नेत्यांना थक्क करेल अशी कल्पना कोणी करू शकेल का? त्यातही विशेष बाब म्हणजे हा उमेदवार अपक्ष आहे.

पश्चिम राजस्थानच्या सीमावर्ती भागात वाळवंटाचं साम्राज्य आहे. तिथं फारशा अपेक्षा, आकांक्षा बाळगल्या जात नाहीत. अशा भागात एका नावाची जोरदार चर्चा होते आहे. ते नाव म्हणजे रवींद्र सिंह भाटी.

राजस्थानातील बाडमेर भागातील रवींद्र सिंह भाटी यांनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फक्त बाडमेरच नाही तर गुजरातमधील सुरत, महाराष्ट्रातील पुण्यापर्यत या तरुण उमेदवाराची चर्चा होते आहे. काही दिवसांपूर्वी गुजरात आणि महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या राजस्थानी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी या दोन्ही राज्यातील अनेक शहरात भाटी गेले होते.

जेम्स बॉंड संस्कृती

राजस्थानाबाहेर पोहोचणाऱ्या भाटी यांच्या लोकप्रियतेबाबत बाडमेर भागातील स्थानिक रहिवासी आणि राजस्थानातील प्रसिद्ध समाजवादी नेते अर्जुन देथा म्हणतात, "हा तरुणांचा समूह आहे आणि जेम्स बॉंड्स संस्कृती आहे. त्यांच्यासमोर भाजपा-कॉंग्रेसचे जाट उमेदवार आहेत. त्याचबरोबर राजपूत, ब्राह्मण, वैश्य, राजपुरोहित, कुंभार, कळबी, बिश्नोई, सोनार, सुतार यांच्यासह ओबीसी समाजातील बेरोजगार तरुणसुद्धा जातीव्यवस्थेच्या ध्रुवीकरणामागील कारण आहेत."

विधानसभा निवडणुकीत बाडमेर जिल्ह्यातील शिव मतदारसंघातून कॉंग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांचा पराभव करून राजस्थानच्या राजकारणात उदयाला आलेले रवींद्र सिंह भाटी म्हणजे एक कोडं बनत चालले आहेत.

समाजशास्त्रज्ञ असलेले राजीव गुप्ता यासंदर्भात सांगतात, "या भागातील तरुणांकडे प्रदीर्घ काळापासून लक्ष देण्यात आलेलं नाही. त्यांच्या प्रश्नांकडे कोणीही लक्ष देत नव्हतं. बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. भाटी यांनी या सर्वांना आक्रमक भूमिकेनिशी एका राजकीय भांडवलात रुपांतरीत करून टाकलं आहे."

भाटी शेकडोंची गर्दी कसे खेचतायेत?

तसं तर बाडमेर लोकसभा मतदारसंघात तीन प्रमुख उमेदवार आहेत. ते म्हणजे भाजपाचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, कॉंग्रेसचे उम्मेदाराम आणि तिसरे रवींद्र भाटी.

यात उम्मेदाराम विधानसभा निवडणुकीत राजस्थान लोकतांत्रिक पार्टीच्या तिकिटावर कॉंग्रेसच्या हरीश चौधरी यांच्याकडून 910 मतांनी पराभूत झाले होते. तर रवींद्र भाटी अपक्ष उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीआधीच उम्मेदाराम आरएलपी मधून कॉंग्रेसमध्ये आले आहेत.

मात्र, भाटी यांनी मतदारसंघात जी वातावरण निर्मिती केली आहे तशी इतर कोणत्याही उमेदवाराला निर्माण करता आलेली नाही.

भाटी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे वातावरण निर्माण केलं हे त्यामुळे प्रत्येकालाच ते आवडू लागले आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार असलेले उम्मेदाराम यांच्या समर्थकांनी ते एक्सवर (ट्विटर) ट्रेंडमध्ये यावेत यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत, मात्र त्यांना यश मिळालेलं नाही.

राजकारणातील कटुतेमुळे लोकप्रियता पचवणं जड जातंय?

या लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा जागांपैकी पाच जागा भाजपाकडे आहेत, तर एक कॉंग्रेस आणि दोन अपक्ष आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यत भाटींसह दोन्ही अपक्ष भाजपाच्या गोटात होते.

विधानसभा निवडणुकीच्या आधी भाटी या अटीवर भाजपामध्ये आले होते की त्यांना शिव मतदारसंघातून पक्षाचं तिकीट दिलं जाईल. मात्र स्वरूप सिंह खारा यांना तिकिट देण्यात आलं. त्यामुळं भाटी यांनीदेखील अर्ज भरला. ते भाजपासोबत नव्हते आणि जोरदार निवडणूक लढवून निवडून आले.

जिंकल्यानंतर राजकीयदृष्टया भाटी शांत राहिले. मात्र त्यांच्या मवाळ भूमिकेचं आकलन भाजपाच्या नेत्यांना झालं नाही. किंबहुना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी त्यांची एक प्रदीर्घ भेट घेतली. यानंतर भाटी यांना आशा होती की भाजपा एकतर त्यांना बाडमेर म्हणून तिकिट देईल किंवा या भागात त्यांना अशी जबाबदारी देईल ज्यामुळं त्याचं राजकीय वजन आणि सन्मान वाढेल.

मात्र असं काहीच झालं नाही. त्यामुळे नामांकनाआधी भाटी लोकांमध्ये गेले आणि समर्थकांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडली, त्यामुळे ते राजकीय स्टार बनले.

जुन्या नेत्यांना कंटाळले

उदयपूरच्या सुखाडिया विद्यापीठात राजकीय विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केलेले आणि आता राजस्थानातील निवडणुकीच्या राजकारणाचा अभ्यास करणारे प्रो. अरुण चतुर्वेदी म्हणतात, "भाटी यांच्या राजकीय उदयामागे काही कारणं आहेत. त्यात जातीचं राजकारण, नव्या चेहऱ्याचं लोकांना असलेलं आकर्षण आणि जुन्या नेतृत्वाबद्दल लोकांमधील नाराजी ही प्रमुख कारणं आहेत."

चतुर्वेदी सांगतात, सचिन पायलट, राजकुमार रोत, हनुमान बेनीवाल इत्यादी नेत्यांबद्दल लोकांमध्ये असलेल्या भावनेमागे हेच कारण आहे. लोक आता जुन्या नेत्यांना कंटाळले आहेत आणि राजकारणात काहीतरी नवीन पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या बंडखोर अपक्ष उमेदवाराच्या रुपात भाटी यांनी विजय मिळवला होता. त्यांनी कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार 3,950 मतांनी हरवलं होतं. भाजपाचे स्वरुप सिंह खारा 22,820 मतांनी तर कॉंग्रेसचे उमेदवार अमीन खान 24,231 मतांनी मागे पडले होते.

भाजपा आणि कॉंग्रेसच्या तीन जुन्या दिग्गज नेत्यांचा पराभव केल्यामुळं भाटी यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली.

विद्यार्थी राजकारणातून मुख्य प्रवाहातील राजकारणात

जोधपूरच्या जयनारायण व्यास विद्यापीठात 2019 मध्ये भाटी बंडखोर उमेदवार म्हणून उभे राहिले आणि प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले होते. तेव्हा पहिल्यांदा त्यांना लोकप्रियता मिळाली होती.

त्यावेळेस भाटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय होते. ते तिकिटाच्या शर्यतीत होते. मात्र एबीव्हीपीने त्यांना तिकीट दिलं नव्हतं. त्यामुळे भाटी यांनी बंडखोरी केली होती आणि अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

जयनारायण व्यास विद्यापीठात याआधी कोणताही अपक्ष उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र अपक्ष असूनदेखील भाटी जिंकले होते, तेदेखील 1,300 मतांनी.

प्रचंड साधनसंपत्ती, मनुष्यबळ आणि विशिष्ट जातीचा पाठिंबा असलेल्या विद्यार्थी नेत्यांना, बाडमेरमधील गडरा रोडसारख्या अत्यंत मागासलेल्या भागातील दूधोरा या दुर्गम गावातून आलेला, राजस्थानी भाषेत एमए करणारा, सरकारी शाळेतील एका पीटीआयचा 21 वर्षांचा मुलगा या प्रकारे आव्हान देईल याचा कोणीही विचार केला नव्हता.

गहलोत सरकारशी घेतली होती टक्कर

राजस्थानात गहलोत सरकारच्या एका निर्णयाने या विद्यार्थी नेत्याची राज्यपातळीवर प्रतिमा निर्माण झाली होती.

गहलोत सरकारच्या काळात ऑडिटोरियम बनवण्यासाठी विद्यापीठाच्या 37 एकर जागेचे अधिग्रहण केले जात होते. भाटी यांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की 1,200 कोटी रुपये किंमतीची ही जागा विद्यापीठाची आहे. याचं अधिग्रहण कसं काय केलं जाऊ शकतं.

सरकार अधिग्रहणावर ठाम होती. त्यामुळे भाटी यांनी विधानसभेवर विराट मोर्चा नेत प्रदर्शनं केली आणि मुख्यमंत्र्यांच्याच गृहक्षेत्रात सरकारसाठी एक डोकेदुखी निर्माण केली. या आंदोलनामुळे भाटी यांना राज्यस्तरावर ओळख मिळवून दिली.

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढू इच्छित होते भाटी

विधानसभा निवडणूक आल्यावर भाटी दोनपैकी एका जागेवर भाजपाच्या तिकिटावर लढू इच्छित होते. यातील एक जागा होती सरदारपुरा. इथून आधीच्या सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत निवडणूक लढवत होते. तर दुसरी जागा होती शिव. इथून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण उत्सुक होते.

भाटी यांना सरदारपुरा किंवा शिव कोणत्याच मतदारसंघाचं तिकिट देण्यात आलं नाही. भाजपाचे एक नेते सांगतात, ''सरदारपुरा जागेसाठी त्यांना तिकिट दिलं जाणार होतं. मात्र याला विरोध झाला. कारण यामुळं या तरुणाची संपूर्ण देशभरात ओळख, प्रतिमा निर्माण होईल. त्याचबरोबर जोधपूरमधील काही नेत्यांसाठी ही बाब डोकेदुखीची ठरेल. एक भीती हीदेखील होती नवीन पर्याय मिळताच मोदी कोणाचंही तिकीट कापतात. त्यामुळे रवींद्र भाटी उदयाला आल्यानंतर तर परिस्थितीच बदलून जाईल.''

भाटी सांगतात, सरदारपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र भारतीय जनता पार्टीने त्यांना तिकीट दिलं नाही. भाजपाचे काही नेते भाटी यांचा प्रभाव वाढू देऊ इच्छित नव्हते. मात्र त्यांच्या या भूमिकेमुळे भाटी अधिक आक्रमकपणे उसळून वर आले.

आमदार झाल्यावर भाटी यांनी भाजपाला विनाअट पाठिंबा दिला होता.

हँडपंपचा मुद्दा बनला होता महत्त्वाचा

लोकसभा निवडणुका आल्या त्याआधीच बाडमेर जिल्ह्यातील राजकारणात हॅंडपंपचा मुद्दा चर्चेत आला होता. भाजपाचे एक राज्यस्तरीय नेते सांगतात, "सत्ता आणि संघटनेच्या पातळीवर या अत्यंत नाजूक मुद्द्याला खूप गांभीर्याने हाताळण्यात आलं नाही."

ते पुढे सांगतात, ''हॅंडपंपचा मुद्दा भाजपाची डोकेदुखी बनला आणि अजूनही ती कायम आहे.''

याचवर्षी 14 मार्चला राजस्थानच्या सिंचन विभागाने बाडमेर जिल्ह्यात हॅंडपंप मंजूर केले होते. यात भाटी यांच्या शिव विधानसभा मतदारसंघासाठी 22 हॅंडपंप मंजूर करण्यात आले होते. मात्र यातील फक्त दोन भाटी यांच्याकडून सुचवण्यात आल्याचे म्हटले होते तर उर्वरित सर्वांवर स्वरुप सिंह खारा यांचं नाव होतं.

यातून दिला जाणारा संदेश स्पष्ट होता. तो म्हणजे शिव मतदारसंघातून आमदार भाटी यांनी फक्त दोन हॅंडपंप लावले आहेत आणि त्यांच्याकडून पराभूत झालेल्या उमेदवाराने 20 हॅंडपंप लावून दिले आहेत. यातून आणखी एक संदेश गेला तो म्हणजे भाटी एक कमकुवत नेते आहेत तर खारा हे ताकदवान नेते आहेत.

राजकीय प्रवासाच्या सुरूवातीलाच झालेल्या या निर्णयामुळं नव्यानेच निवडून आलेल्या आमदार भाटी यांच्यासमोर डोकेदुखी निर्माण केली. त्यातून आपलं राजकीय स्वप्नं अपूर्ण राहतील अशी चिंता त्यांना वाटली. मात्र ते यामुळे दडपून गेले नाहीत तर त्यांनी याकडे एक आव्हान म्हणून पाहिले.

रन फॉर रेगिस्तान आणि जनसंवादसारखे उपक्रम

याआधी 'गोवंश बचाओ अभियाना' द्वारे 20 हजार आजारी गाईंवर उपचार करण्याचं काम भाटी यांनी केलं होतं. त्यामुळं सर्वसामान्य ग्रामीण लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली होती.

'रन फॉर रेगिस्तान' आणि 'जनसंवाद' सारख्या यात्रांचा उपयोग त्यांना सर्वसामान्य लोकांपर्यत पोचण्यासाठी झाला. त्यांचे सहकारी असणारे तरुण सांगतात भाटी जेव्हा कोणतेही अभियान सुरू करतात तेव्हा ते अथकपणे काम करतात. त्यांची स्वप्ने त्यांच्या तरुण सहकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये उमटू लागतात.

सद्यपरिस्थितीत यामुळं फक्त भाजपा नाही तर कॉंग्रेसचे राजकारणदेखील फिकं पडलं आहे. अनेक नेते मागे पडले आहेत.

एक्स (ट्विटर), फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून भाटी यांची लोकप्रियता शहर आणि गावांबरोबरच जात आणि धर्माच्या चौकटी ओलांडून पलीकडे पोचली आहे. बाडमेर जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावांमधील तरुण-तरुणी मध्यरात्रीपर्यंत भाटी यांच्यासाठी रील बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

जाट विरुद्ध इतर राजकारणाचं मिथक

याचं एक कारण हेदेखील आहे की या भागात मागील तीस-पस्तीस वर्षांपासून जाट खासदारांचं वर्चस्व होतं. राजपूत मागे पडत चालले होते. वास्तविक बाडमेरमध्ये आधी राजपुतांचं वर्चस्व होतं. मात्र 2009 मध्ये पुनर्सीमांकनानंतर इथून पोखरण आणि शेरगड सारखा राजपूत बहुल भाग जोधपूरशी जोडण्यात आला आहे.

साहजिकच आता 26 एप्रिलला बाडमेर-जैसलमेर लोकसभा क्षेत्रात होणाऱ्या निवडणुकीत सर्वांचीच प्रतिष्ठा प्रणाली लागली आहे. इथं रिफायनरीचं काम झालं होतं. याचा बहुतांश लाभ जाट पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांचा झाला होता. याचा सखोल अभ्यास झालेला नाही. मात्र होत असलेल्या चर्चेनुसार या भागात जाट विरुद्ध इतर अशा प्रकारचं ध्रुवीकरण जोर पकडत आहे. भाटींच्या रुपाने त्याला एक चेहरा मिळाला आहे.

भाटीकडे तरुण इतक्या मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत की कॉंग्रेसपेक्षा भाजपात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण राजपूत हे परंपरागतदृष्ट्या भाजपाचे मतदार आहेत.

राजकीय विज्ञानाचे प्राध्यापक असलेले संजय लोढा म्हणतात, ''तरुणांना चांगला पर्याय हवा आहे आणि जिथं हे शक्य दिसेल तिकडे लोक आकर्षित होत आहेत. राज्यात तिसऱ्या पर्यायासाठी जागा आहे आणि भाटीबद्दल असलेले आकर्षणाचं हे देखील एक कारण आहे.''

भाटी यांच्या टीकाकारांचं मत आहे की ते खूपच महत्त्वाकांक्षी आहेत आणि त्यांना कोणतीही विचारधारा नाही.

ते आधी विधानसभा निवडणुकीत अचानक भाजपात सामिल झाले. मात्र तिकिट मिळालं नाही तर ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. त्याचप्रकारे त्यांना विद्यार्थी राजकारणात एबीव्हीपीकडून तिकीट मिळालं नाही तर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

भाटी स्वत: राजपूत आहेत. तर त्यांच्याविरुद्ध उभे असलेले दोन प्रमुख उमेदवार जाट आहेत. मागील काळात विधानसभा निवडणुकीत ते भाजपासोबत गेल्यानं मुसलमान मतदारांना धक्का बसला होता.

याचप्रकारे टीकाकारांना असंदेखील वाटतं की विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत बराच फरक असतो. शिव हा छोटा मतदारसंघ होता. त्या तुलनेत बाडमेर मतदारसंघ खूपच मोठा आहे.

भाटी यांचे विरोधक प्रचार करत आहेत की ते जिंकले तरी अपक्ष म्हणून ते काम करू शकतील?

मोदी यांच्या सभेचा प्रभाव

भाजपाच्या नेत्यांच्या आग्रहामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात इथं मोठी सभा घेतली होती. या भागातील राजपूत आणि मुसलमान मतदारांमध्ये चांगला प्रभाव असणाऱ्या माजी खासदार मानवेंद्र सिंह यांना कॉंग्रेसमधून आपल्याकडे ओढण्यात भाजपा यशस्वी झाली आहे.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासह इतर अनेक नेते बाडमेर-जैसलमेर भागात तंबू ठोकून आहेत. त्याचबरोबर आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, अभिनेता सनी देओल, बाबा बागेश्वर धाम चे धीरेंद्र शास्त्री, पहलवान दिलीप सिंह राणा उर्फ खली यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बर नेते आणि सेलिब्रिटी यांना प्रचारात उतरवलं जाणार आहे.

राष्ट्रीय राजकारणात बाडमेरचं स्थान

बाडमेर जिल्हा कितीही वाळवंटी आणि वाळूमय असला तरी हा भाग राजस्थान आणि देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकत आला आहे.

1967 आणि 1971 च्या निवडणुकीत इथून कॉंग्रेसच्या तिकिटावर जिंकलेले अमृत नाहटा यांनी 1975 मध्ये 'किस्सा कुर्सी का' हा चित्रपट बनल्यानंतर वाद निर्माण झाला होता. आणीबाणीच्या काळात या चित्रपटाची प्रिंट सेंसर बोर्डातून आणून जाळण्यात देखील आली होती.

1971 च्या निवडणुकीत नाहटा यांनी राजस्थानातील बडे राजकारणी भैरोसिंह शेखावत यांचा बाडमेर मतदारसंघात 55,573 मतांनी पराभव केला होता. स्थानिक पातळीवर जातीपातीचा प्रभाव असतानादेखील शेखावत यांचा पराभव झाल्यामुळं त्याची खूप चर्चा झाली होती.

अशा परिस्थितीत रवींद्र भाटी नवीन बदल घडवून आणणार का की त्यांना संसदेपर्यंत पोचण्यासाठी अजून बरीच वाट पाहावी लागणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे.