भिवंडीमध्ये कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे लढतीत सपा-एमआयएमकडे नजर का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठीसाठी
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा विचार करता मुंबई उपनगरांमधील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून हा समोर येतो. महायुती आणि महाविकास आघाडीच्या थेट लढतीत इथं कोण बाजी मारणार याकडं लक्ष लागलं आहे.
महायुतीकडून भाजपनं विद्यमान खासदार कपिल पाटील यांना सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू होती. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी नाव जाहीर होण्याच्या आधीच तयारीला सुरुवातही केलेली.
पण आता इथून शरद पवार गटाचा उमेदवार निवडणूक लढवेल.
सपा, एमआयएमकडे नजर
भिवंडी मतदारसंघातील मतदारांच्या संख्येचा विचार करता याठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळं समाजवादी पार्टी आणि एमआयएम यांची भूमिकाही या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघाअंतर्गतच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादी पक्षाचे रईस शेख हे विद्यमान आमदार आहे. इतरही ठिकाणी सपाची चांगली शक्ती आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्याचबरोबर इम्तियाज जलील यांनी राज्यात काही जागा लढवण्याचे संकेत दिले होते. त्यात ते भिवंडीमधूनही एमआयएमचा उमेदवार मैदानात उतरवणार अशा चर्चा होता. एवढंच नाही तर जलिल यांनी स्वतः भिवंडीमधून लढावं अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं.
त्यामुळं या दोन पक्षांच्या भूमिका पाहता त्यांचे उमेदवारही मैदानात उतरले तर भाजपविरोधी समजली जाणारी मतं या दोन पक्षांबरोबर मविआमध्ये विभागली जाऊ शकतात.
परिणामी त्याचा भाजपला फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मतदारसंघाचा इतिहास
भिवंडी लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी पहिली निवडणूक 1962 साली झाली. त्यावेळी काँग्रेसचे यशवंतराव मुकने हे या मतदारसंघाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले होते.
त्यानंतर पुन्हा 1967 आणि 1971 मध्येही इथं काँग्रेसचेच खासदार निवडून आले. त्यावेळी सोनूभाऊ बसवंत आणि वैजिनाथ धामणकर यांना या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
पण 1971 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत भिवंडी लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. 2009 मध्ये पुन्हा हा मतदारसंघ अस्तित्वात आला आणि सुरेश तावरे हे काँग्रेसचे इथले चौथे खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले.

फोटो स्रोत, FACEBOOK/KAPILPATIL
पण त्यानंतर 2014 आणि 2019 अशा सलग दोन निवडणुकांमध्ये कपिल यांच्या रुपानं भाजपला या मतदारसंघात विजय मिळवण्यात यश आलं. तर यावेळी पुन्हा विजय मिळवत हॅटट्रिकचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
2019 मध्ये तावरेंना केलं पराभूत
काँग्रेसच्या सुरेश तावरे यांनी 2009 मध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये यश मिळवून दिलं होतं. पण 2014 मध्ये पक्षानं त्यांना तिकिट दिलं नाही आणि कपिल पाटील विजयी झाले.
2019 मध्ये भाजपनं कपिल पाटील यांना पुन्हा मैदानामध्ये उतरवलं त्यावेळी काँग्रेसनंही सुरेश तावरे यांच्या माध्यमातून भाजपसमोर कडवं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही.
या निवडणुकीत कपिल पाटील यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत सुरेश तावरेंना पराभूत केलं. सुमारे दीड लाखांहून अधिकच्या मताधिक्यानं कपिल पाटील इथून विजयी ठरले.
पाटील यांना केंद्रात मंत्रिपद
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत याठिकाणच्या 6 पैकी 2 मतदारसंघात शिवसेना, 2 मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस सपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाले.

फोटो स्रोत, FACEBOOK/KAPILPATIL
खासदार कपिल पाटील यांना 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळालं. पंचायती राज मंत्रालयाच्या कारभाराची जबाबदारी त्यांना मिळाली.
शिवसेनेबरोबर भाजपचा सुरू असलेला संघर्ष पाहता, त्यावेळी भाजपची मतदारसंघातली शक्ती वाढवण्यासाठी पाटील यांना मंत्रिपद दिलं असं सांगितलं जातं. पण सध्या शिंदे गट भाजपबरोबरच असल्यानं मतदारसंघात त्यांची शक्ती पाहायला मिळते.
मतदारसंघातील निर्णायक मुद्दे
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडीबरोबर, कल्याण, ठाणे, अंबनाथमधील भागाचाही समावेश होतो. त्यामुळं संमिश्र मतदारसंघ असल्यामुळं याठिकाणचे मुद्दे आणि समस्याही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईशी जोडणारा रेल्वे मार्ग नसल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर मतदारसंघातील यंत्रमाग उद्योगांसमोरील अडचणी, वाहतुकीच्या समस्या, पायाभूत सुविधांचा अभाव आणि पाण्याचा प्रश्नही याठिकाणी गंभीर बनला असल्याचं पाहायला मिळालं आहे.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसबरोबरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनीही उमेदवारीसाठी जोर लावल्याचं दिसतंय. त्यामुळं आता ही जागा नेमकी कोण लढवणार आणि उमेदवार कोण असणार याकडं सगळ्यांचं लक्ष आहे.
महाविकास आघाडीमध्ये असलेल्या या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारानं मात्र प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळं या शर्यतीत कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.











