चेन्नई 'अजिंक्य'; इडन गार्डन्सवर कोलकाता चीतपट

अजिंक्य रहाणेच्या 29 चेंडूत 71 धावांच्या वादळी खेळीच्या बळावर चेन्नईने 235 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल खेळताना जेसन रॉयने विजयाची आशा पल्लवित केली पण बाकी फलंदाजांची साथ न मिळाल्याने कोलकाताने 186 धावांची मजल मारली. चेन्नईने 49 धावांनी विजय साकारला. अजिंक्यलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने एन.जगदीशनच्या साथीने सुनील नरिनला सलामीला पाठवलं. हा प्रयोग फसला. आकाश सिंगने नरिनला पहिल्याच षटकात त्रिफळाचीत केलं. तो भोपळाही फोडू शकला नाही. पुढच्याच षटकात तुषार देशपांडेने जगदीशनला बाद केलं. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समाविष्ट झालेल्या वेंकटेश अय्यरने चांगली सुरुवात केली पण मोईन अलीने त्याचा अडथळा दूर केला. त्याने 20 धावा केल्या. कर्णधार नितीश राणा 27 धावा करुन तंबूत परतला.

मधल्या फळीत खेळणाऱ्या जेसन रॉयने जोरदार आक्रमण सुरू करत चेन्नईची चिंता वाढवली. त्याने 26 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 61 धावांची वेगवान खेळी केली. महेश तीक्ष्णाने त्याला माघारी धाडलं. धोकादायक ठरू शकेल अशा आंद्रे रसेलला पथिराणाने बाद केलं. तो केवळ 9 धावा करु शकला. डेव्हिज विसा आणि उमेश यादव रिंकू सिंगला साथ देऊ शकले नाहीत. कोलकाताने 186 मजल मारली. रिंकू सिंगने 33 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. चेन्नईतर्फे तुषार देशपांडे आणि महेश तीक्षणा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या.

केवळ एका वर्षात संघातून डच्चू देणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाला अजिंक्य रहाणेने धडा शिकवला. इडन गार्डन्स इथे सुरू असलेल्या मुकाबल्यात चेन्नईकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 24 चेंडूतच अर्धशतकाला गवसणी घातली. कसोटी विशेषज्ञ असा शिक्का बसलेल्या अजिंक्यने ट्वेन्टी20 प्रकारासाठीही चपखल असल्याचं सिद्ध केलं. अजिंक्यने 29 चेंडूत नाबाद 71 धावांची तडाखेबंद खेळी साकारली. चेन्नईने 235 धावांचा डोंगर उभारला.

कोलकाताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण चेन्नईने या निर्णयाचा पुरेपूर फायदा उठवला. डेव्हॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड जोडीने 73 धावांची खणखणीत सलामी दिली. 20 चेंडूत 35 धावा करुन ऋतुराज बाद झाला. अजिंक्यने कॉनवेला चांगली साथ दिली. 40 चेंडूत 56 धावांची खेळी करुन कॉनवे बाद झाला. यानंतर अजिंक्यला शिवम दुबेची साथ मिळाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 32 चेंडूत 85 धावांची वेगवान भागीदारी रचली. यादरम्यान दोघांनीही आपापली अर्धशतकं पूर्ण केली. दुबे 21 चेंडूत 50 धावा करुन बाद झाला. अजिंक्यने 6 चौकार आणि 5 षटकारांसह खेळी सजवली.

2022 हंगामात रहाणे कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता. कोलकाताने अजिंक्यला नियमितपणे संधी दिली नाही. 7 सामन्यात त्याने कोलकाताचं प्रतिनिधित्व केलं. या 7 लढतीत त्याने 133 धावा केल्या. त्याचा स्ट्राईकरेट होता 103.91. संघव्यवस्थापनाच्या स्कीम ऑफ थिंग्ज अर्थात योजनांचा भाग नसल्याचं स्पष्ट झालं. कोलकाता वर्षभरातच रहाणेला रिलीज करण्याचा निर्णय घेतला.

या हंगामापूर्वी झालेल्या लिलावातही कोलकाताने अजिंक्यला पुन्हा ताफ्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही. दुसरीकडे चेन्नईने मात्र अजिंक्यसाठी लगेचच बोली लावत त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. सुरुवातीच्या काही सामन्यात अजिंक्यला संधी मिळू शकली नाही. बेन स्टोक्स आणि मोईन अली दुखापतग्रस्त झाल्याने अजिंक्यला संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं.

आयपीएल प्रवास

सुरुवातीच्या काही हंगामांमध्ये रहाणे मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र तिथे त्याला अंतिम अकरात खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्याच नाहीत.

प्रयोगशील संघ म्हणून प्रसिद्ध राजस्थान रॉयल्स संघाने रहाणेला ताफ्यात समाविष्ट केलं. राहुल द्रविडच्या बरोबरीने रहाणे राजस्थानसाठी सलामीला येऊ लागला. भरपूर रन्स, अतिशय उत्तम फिल्डिंग यामुळे रहाणे 2012-2015 या कालावधीत राजस्थानचा अविभाज्य घटक झाला.

राजस्थान संघावर दोन वर्षांची बंदीची कारवाई झाल्यानंतर रहाणे 2016-17 अशी दोन हंगांमांसाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळू लागला. नव्या संघाकडून खेळतानाही रहाणेची धावांची भूक मंदावली नाही.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत अजिंक्य अकराव्या स्थानी आहे. टेस्ट स्पेशालिस्ट असा शिक्का बसलेला, ट्वेन्टी-20 प्रकाराला याची शैली साजेशी नाही अशी टीका होत असतानाही रहाणेने तंत्रशुद्ध बॅटिंगद्वारे सातत्याने रन्स टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

15 एप्रिल 2012 रोजी रहाणेने रॉयल्ससाठी खेळताना बेंगळुरूविरुद्ध नाबाद 103 रन्सची खेळी केली होती. गेल्या वर्षी त्याने दिल्लीविरुद्ध नाबाद 105 रन्सची खेळी साकारली होती. इतकी वर्षं आयपीएलमध्ये खेळताना अजिंक्यने 59 कॅच टिपले आहेत. अफलातून फिल्डिंगसाठी तो ओळखला जातो.

राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम रहाणेच्याच नावावर आहे. आयपीएलमध्ये 25 मॅचेसमध्ये रॉयल्सचं नेतृत्व करताना 9 मॅचेसमध्ये संघाने विजय मिळवला तर 16वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं. जिंकण्याची टक्केवारी 36 टक्के आहे.

राजस्थानसाठी खेळताना दमदार प्रदर्शन असूनही माजी कर्णधार अजिंक्य रहाणेला त्यांनी ट्रेडऑफच्या माध्यमातून दिल्ली कॅपिटल्स संघाला दिलं. त्याबदल्यात दिल्लीकडून मकरंद मार्कंडेय आणि राहुल टेवाटिया हे फिरकीपटू राजस्थानकडे आले. दिल्लीने अजिंक्यला नियमित संधी दिल्या नाहीत. 2022 हंगामापूर्वी कोलकाताने अजिंक्यला ताफ्यात समाविष्ट केलं मात्र एकच वर्षात त्याला संघातून डच्चू दिला आणि नंतर लिलावातही त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)