कोटामध्ये विद्यार्थी आत्महत्या का करताहेत?

    • Author, मोहर सिंग मीणा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

अँम्ब्युलन्समध्ये ठेवलेल्या एका डीप फ्रीजरला पकडून एक महिला हमसून हमसून रडत होती. तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत होते.

“माझा भाऊ... माझा भाऊ” म्हणत ती सतत रडत होती.

ही रुग्णवाहिका राजस्थानमधील कोटा शहरातल्य एसबीएस रुग्णालयासमोर उभी होती. शवागारासमोर पोलीस कागदपत्रांची पूर्तता करत होते आणि आजूबाजूला काही विद्यार्थी उभे होते.

एका विद्यार्थ्याला विचारलं की काय झालं तेव्हा त्याने सांगितलं की 17 वर्षाच्या अंकुशचा मृतदेह डीप फ्रीजरमध्ये ठेवला होता. डीप फ्रीजरला बिलगून रडणारी महिला अंकुश या मुलाची मोठी बहीण होती.

पोलिसांच्या मते कोटामध्ये एकाच दिवशी तीन मुलांनी आत्महत्या केली, त्या तीन जणांपैकी एक अंकुश होता.

अंकुशला दोन मोठ्या बहिणी आहेत. बिहारच्या सुपौल गावातून अंकुशची बहीण, तिचा नवरा आणि आणखी काही लोक त्याचा मृतदेह घ्यायला कोटाला आले होते.

ते आमच्याशी बोलण्याच्या स्थितीतही नव्हते. डोळ्यातले अश्रू थोपवत ते इतकंच म्हणाले, “अभ्यासात चांगला होता. काय अडचण होती कधी सांगितलं नाही त्याने.”

कोटाच्या तलवंडी भागात एक दुमजली इमारतीत अंकुश आणि गया शहरातून आलेला उज्ज्वल रहायचे. दोघांनीही आत्महत्या केली.

या घरात राहाणाऱ्या लोकांशी आम्ही बोलण्याचा खूप प्रयत्न केला तेव्हा 50 वर्षांची एक बाई बाहेर आली आणि म्हणाली, “आम्ही सगळं पोलिसांना सांगितलं आहे, त्यांना जाऊन विचारा.”

कोटाचे जिल्हाधिकारी ओ.पी. बुनकर बीबीसी शी बोलताना म्हणाले, “एका मुलाचं अफेअर असल्याचं उघड झालं. त्यानंतर या मुलाच्या घरच्यांनी त्याला रागवलं असणार. म्हणून त्याने हे पाऊल उचललं असावं. इतर दोन मुलं अभ्यासामुळे तणावात होते.”

“एक मुलगा जवळजवळ महिनाभर कोचिंग क्लासला जात नव्हता. एक वेगळाच मुलगा त्याचं कार्ड पंच करत होता. कार्ड पंच करणाऱ्या विद्यार्थ्याने हे सांगितलं आहे.” ते पुढे म्हणाले.

कोटा शहराचे पोलीस अधीक्षक केसर सिंह शेखावत म्हणतात, “तलवंडी मध्ये बिहारच्या अंकुश आणि उज्ज्वल ने कुन्हाडी च्या मध्य प्रदेशच्या प्रणव वर्मा ने आत्महत्या केली आहे.”

मृत्यूचं कारण विचारल्यावर एस पी शेखावत म्हणाले, “सुरुवातीच्या चौकशीत अभ्यासाचा तणाव हे कारण समोर आलं आहे. आम्ही चौकशी करतोय आणि पोस्टमार्टमची वाट पाहतोय.”

पोस्टमार्टम झाल्यानंतर तिन्ही विद्यार्थ्यांचं शव त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आलं आहे.

कोटा शहरात उत्तर प्रदेश बिहारचे सर्वांत जास्त विद्यार्थी

कोटा शहरात राजीव गांधी नगर भागातील तलवंडी, जवाहर नगरस विज्ञान विहार, दादा बाडी, वसंत विहार आणि आसपासच्या भागात जवळजवळ पावणेदोन लाख विद्यार्थी राहतात.

तर लँडमार्क भागात 60 हजार विद्यार्थी राहतात. कोरल पार्क, बोरखेडा भागातही हजारो विद्यार्थी राहतात.

कोटा जिल्हाधिकारी आणि गेल्या चार दशकांपासून इथे पत्रकार म्हणून काम करत असलेल्या केबीएस हाडा यांच्या मते कोटा शहरात अडीच लाख विद्यार्थी राहतात. त्यापैकी सर्वात जास्त विद्यार्थी उत्तर प्रदेश आणि बिहारचे आहेत.

कोटामध्ये सात प्रसिद्ध कोचिंग क्लास आहेत. त्याच्याशिवाय अनेक क्लासेस इथे आहेत.

शहरात जवळजवळ साडेतीन हजार हॉस्टेल आणि पीजी आहेत. त्यातही बिहार आणि उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे.

रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी

लँडमार्क भागात आम्ही जेव्हा फिरलो तेव्हा तिथे मोठ्या संख्येने 16 ते 20 वयोगटातील विद्यार्थी खांद्यावर बॅग लटकवून क्लासेस किंवा हॉस्टेलला जाताना दिसतात.

नाव न छापण्याच्या अटीवर कोचिंग क्लासेसशी निगडीत एक व्यक्ती म्हणाली, “मुलांना शाळेत प्रवेशही कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून दिला जातो. शाळेत एक विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला जातो. कोचिंग क्लासेसमध्ये नीट , जेईई या परीक्षांचा अभ्यास करवून घेतला जातो. त्यामुळे पोरं कायम तणावात असतात.”

या शहरात आम्ही एका हॉस्टेल चालवणाऱ्या व्यक्तीलाही भेटलो. ही व्यक्ती 9 हॉस्टेल चालवते. त्यात 500 विद्यार्थी राहतात.

कुंज बिहारी म्हणतात, “विद्यार्थ्याला हॉस्टेलला सोडल्यानंतर सहा महिने ते एका वर्षांपर्यंत त्यांचे पालक मुलांना भेटायला येत नाही. आम्ही मुलांची काळजी घेतो. एखाद्या मुलाची तक्रार केली तर त्याचे पालक ती चूक स्वीकार सुद्धा करत नाहीत.”

राजीव गांधी नगर भागात कोचिंग क्लासेस समोर हजारो विद्यार्थ्यांच्या सायकल उभ्या असतात. संध्याकाळी मुलांची जत्रा रस्त्यावर दिसते.

आत्महत्येला जबाबदार कोण?

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढत आहेत. ताण हे या आत्महत्येमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मानलं जात आहे.

मात्र आत्महत्येसाठी फक्त विद्यार्थीच जबाबदार आहे का या प्रश्नाच्या उत्तरादाखल ज्येष्ठ पत्रकार केबीएस हाडा कोचिंग क्लासेस मध्ये आपसातली स्पर्धा, हॉस्टेल पीजीचं वातावरण जबाबदार आहेच. पण जाहिरातींच्या लोभापायी या उणिवा समोर न आणणारी प्रसारमाध्यमंही जबाबदार आहेत.

पोलीस- प्रशासन त्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित निभावत नाही. त्यामुळेही कोचिंग क्लासेसच्या मनमानी नियमांमुळे विद्यार्थी तणावात आहेत.

कोटा चे पोलीस अधीक्षक केसर सिंह शेखावत यांच्या मते कोटामध्ये 2011 पासून आतापर्यंत 135 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात 14 विद्यार्थ्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे.

स्थानिक प्रशासनाच्या मते 2017 मध्ये एका महिन्यात 24 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी दिल्लीहून ज्येष्ठ पत्रकार नीलम गुप्ता कोटाहून रिपोर्टिंग केलं होतं.

त्यांनी त्यांच्या बातमीत मुंबईच्या TISS या संस्थेच्या अहवालाचा संदर्भ दिला होता. त्यात विद्यार्थ्यांचं आत्महत्येचं कारण नमूद केलं होतं.

बीबीसी हिंदीशी बोलताना त्या सांगतात, “विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचं प्रेशर असतं. सगळं पणाला लावून आपल्या मुलांना कोटाला अभ्यासासाठी पाठवणाऱ्या पालकांचा दबाव असतो. नीट आणि जेईई च्या अभ्यासाचं जास्त प्रेशर असतं.”

“कोचिंग क्लासेस ना त्यांचा रिझल्ट चांगला द्यायचा असल्याने ते हुशार मुलांवर जास्त लक्ष केंद्रित करतात. इतर मुलं किंवा कमी हुशार मुलं त्या वर्गवारीत येत नाही. त्यामुळे सुद्धा या मुलांमध्ये ताण निर्माण होतो.”

कोचिंग क्लासेसचं टायमिंग आणि शेड्युल हाही एक मोठा मुद्दा आहे.

आठवड्याचे सातही दिवस क्लास आणि अगदी सणावारीही सुट्टी न मिळाल्याने मानसिक ताण निर्माण होतो.

मुलांचं काय मत आहे?

लँडमार्क भागात एका हॉस्टेलमध्ये राहणारा 19 वर्षीय चेतन सिंह तंवर 'नीट' परीक्षेची तयारी करत आहे. हा त्याचा दुसरा प्रयत्न आहे

तो म्हणतो, “कुटुंबाचा दबाव तर असतोच. विद्यार्थ्यामध्ये आपसात असलेली स्पर्धाही असते. सणावारांना घरी जायला मिळत नाही. कोचिंग क्लास मध्ये सातही दिवस क्लास आणि त्यानंतर अभ्यास असतो.”

नुकत्याच झालेल्या प्रकरणावर तो म्हणतो की “मला वाटतं नीट ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो नाही तरी बरेच पर्याय आहेत. घरचे लोक अशा वेळी फोन करून सांगतात की सगळं ठीक होईल उगाच काळजी करू नको.”

तलवंडी भागातच हरियाणा मधून आलेला 19 वर्षीय शाकिब खान म्हणतो, “माझे वडील शिक्षक आहे आणि ते अतिशय खेळीमेळीचं वातावरण असतं. मला काही अडलं तर ते मला मार्गदर्शन करतात.”

उत्तर प्रदेशातील गोरखपूर हून 2012 मध्ये कोचिंग क्लास मध्ये आलेले आलम सांगतात, “मी इथे मेडिकलची प्रवेश परीक्षा दिली. मात्र माझी निवड झाली नाही. आता मी इथे हॉस्टेल चालवतो.”

कोटा मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक लोकांनी सांगितलं की इथे राज्यानुसार मुलांनी गँग तयार केली आहे.

गँगची नावं ठेवली आहेत आणि ही मुलं प्रचंड गोंधळ घालतात.

जिल्हाधिकारी ओ.पी.बुनकर म्हणतात, “विद्यार्थ्यांनी त्यांच्या गँग तयार केल्या आहेत. मात्र अशी कोणतीच बातमी आलेली नाही.”

13 डिसेंबर ला पोलीस प्रशासनाने कोचिंग क्लासेसच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली.

या बैठकीत कोटा विभागाचे महानिरीक्षक, कोटाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी 11 नोव्हेंबरला जाहीर केलेल्या सरकारी आदेशाचं पालन करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी ओ.पी.बुनकर बीबीसीशी बोलताना म्हणाले, “आम्ही कोचिंग क्लासेसमध्ये योगा क्लास, मोटिव्हेशनल भाषणं, आठवड्यात एक सुटी आणि आवश्यक मार्गदर्शक तत्त्वाचं पालन करायला सांगितलं आहे.”

विद्यार्थ्यांमुळे कोटामध्ये रोजगारनिर्मिती

मध्य प्रदेशच्या मंदसौर भागातून येणारी चंबल नदी कोटा शहरातून जाते. त्यासाठी ग्रामीण कोटा भागात शेती मोठ्या प्रमाणात होते.

कोटा औद्योगिक नगरी म्हणून गणली जाते. 1980 नंतरच्या दशकात उद्योगधंद्यात घट झाली आणि शिक्षण संस्थांमध्ये वाढ झाली.

त्यामुळे कोटा आता शिक्षणनगरी म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांशिवाय या शहराची कल्पनाही करता येत नाही.

हॉस्टेल संचालक रोहित कुमार म्हणतात, “शहरात लोक घरात पेईंग गेस्ट म्हणून ठेवतात. जवळजवळ साडेतीन हजार हॉस्टेल आणि पीजी म्हणून राहतात. जेवणाच्या शेकडो मेस,तसंच शहराला मोठा रोजगार मिळाला आहे.”

“कोचिंग क्लासेसमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही विद्यार्थ्यांकडूनच रोजगार मिळतो.”

कोव्हिड काळात जेव्हा विद्यार्थी कोटा शहर सोडत होते तेव्हा शहरातल्या लोकांकडे कोणताच पर्याय नव्हता.

हॉस्टेल संचालक कुंज बिहारी म्हणतात, “एका मुलावर वर्षभरात चार लाख रुपये खर्च होतात. कोटा मध्ये अडीच लाख विद्यार्थी राहतात. काही मुलांचे पालकही त्यांच्याबरोबर इथे राहतात. त्यामुळे विद्यार्थी हे कोटा शहराच्या पाठीचा कणा आहेत.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)