डोनाल्ड ट्रंप यांचं आत्मसमर्पण, तुरुंगातला फोटो झाला प्रसिद्ध

फोटो स्रोत, Reuters
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जॉर्जियाच्या फुल्टन काऊंटी तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे.
2020च्या निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर निवडणुकीत हस्तक्षेप करणं, हे निकाल फिरवण्याचा प्रयत्न करणं, अशा स्वरुपाचे आरोप असलेल्या प्रकरणात डोनाल्ड ट्रंप यांच्यावर ही कारवाई सुरू आहे.
या प्रकरणी डोनाल्ड ट्रंप हे जॉर्जियाच्या फुल्टन काऊंटी तुरुंगात काल (24 ऑगस्ट) स्वतः हजर झाले. यानंतर ट्रंप यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर ट्रंप यांचा एक मगशॉट (आरोपीच्या चेहऱ्याचा फोटो घेण्याची प्रक्रिया) घेण्यात आला.
या निमित्ताने पहिल्यांदाच एखाद्या प्रकरणात डोनाल्ड ट्रंप यांचा मगशॉट घेण्यात आला आहे. येथील नियमांनुसार ट्रंप यांचा हा मगशॉट सार्वजनिकही करण्यात आला आहे.
अटकेनंतर डोनाल्ड ट्रंप यांना तत्काळ जामीन देण्यात येणार असून जात मुचलक्यासाठीची रक्कम तब्बल दोन लाख डॉलर इतकी निश्चित करण्यात आली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला एका तक्रारदाराने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यामध्ये जो बायडन यांच्याविरुद्ध पराभूत झाल्यानंतर हा निकाल फिरवण्याचा प्रयत्न करणे, या आरोपासह इतर अनेक आरोपांचा समावेश होता.
या प्रकरणी डोनाल्ड ट्रंप यांना जॉर्जियामध्ये हजर होऊन आत्मसमर्पण करावं लागलं. गेल्या एका वर्षांत कोर्ट किंवा प्रशासनाकडे ट्रंप यांनी आत्मसमर्पण करण्याची ही चौथी वेळ आहे.
फुल्टन काऊंटीमध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर तुरुंगाच्या नोंदवहीत त्यांच्या नावाची एन्ट्री करण्यात आली. तसंच त्यामध्ये त्यांच्याविरोधातील 13 विविध आरोप आणि इतर तपशीलही नोंदवण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Reuters
दुसरीकडे, डोनाल्ड ट्रंप यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ट्रंप म्हणाले, “निवडणुकीला आव्हान देण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. मला वाटतं की त्या निवडणुकीत गोंधळ झाला होता. मी काहीही चुकीचं केलेलं नाही. सर्वांनाच हे माहीत आहे. निवडणुकीत खोटेपणा झाल्याचं वाटत असल्यास त्याला आव्हान देण्याचे अधिकारही माझ्याकडे आहेत.”
अडीच वर्षांनंतर डोनाल्ड ट्रंप यांचं ट्विट
सुमारे अडीच वर्षांनंतर डोनाल्ड ट्रंप यांनी ट्विट केलं आहे.
त्यांनी तुरुंगाकढून जारी करण्यात आलेला मगशॉटचा फोटो शेअर करताना म्हटलं, "निवडणूक हस्तक्षेप, शरणागती नाहीॅ"

फोटो स्रोत, TWITTER/@realDonaldTrump
आपल्या या ट्विटमध्ये ट्रंप यांनी आपल्या वेबसाईटची लिंकही दिली आहे. याच वेबसाईटच्या माध्यमातून ट्रंप यांच्यासाठी निवडणूक निधी जमा केला जातो.
डोनाल्ड ट्रंप यांनी यापूर्वी ट्विट 8 जानेवारी 2021 रोजी केलं होतं. पुढे त्यांच्यावर ट्विटरवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर ट्रंप यांनी स्वतःचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ हे सुरू केलं होतं.
गेल्या वर्षी ट्विटर कंपनी इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यानंतर त्यांनी ट्रंप यांच्यावरील बंदी हटवली होती. पण गेला एक वर्षभर ट्रंप त्याचा वापर करत नव्हते. मात्र आता अडीच वर्षांनी त्यांनी ट्विटरचा वापर केला.
ट्रंप यांच्यावर नक्की काय कारवाई झाली आहे?
या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यातील फिर्यादीने ट्रंप यांच्यावर अनेक आरोप लावले. 2020च्या निवडणुकीत जो बायडन यांची मतं चोरण्याच्या कटात सहभागी असल्याचा आणि या राज्यात होत असलेल्या निसटत्या पराभवातून स्वतःला वाचवण्याचा हेतू त्यांचा होता असा आरोप ट्रंप यांच्यावर आहे.
ट्रंप यांच्यावर 13 आरोप असल्याचा उल्लेख या लेखी आरोपपत्रात आहे. हे त्यांच्याविरोधातले या वर्षातले चौथे लेखी आरोपपत्र आहे. गुरुवारी त्यांनी जॉर्जियातल्या अधिकाऱ्यांसमोर समर्पण केले आणि त्यांच्यावर हे आरोप ठेवण्यात आले.
इनडायक्टमेंट म्हणजे काय?
इनडायक्टमेंट म्हणजे जेव्हा आरोपीवर एखाद्या गुन्ह्यासाठी अधिकृतरित्या आरोप करण्यात येतात तेव्हा त्या व्यक्तीला स्वतः कोर्टात उपस्थित व्हावं लागतं.
या आधी ट्रंप तीनवेळा वेगवेगळ्या आरोपांसाठी कोर्टात हजर झाले असून त्यांनी ते आरोप तेव्हा नाकारलेही होते.
ट्रंप अजूनही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात का?
हो, अनेक प्रकारचे आरोप असले तरी त्यांना निवडणूक प्रचारापासून रोखता येईल अशी मेरिकेच्या राज्यघटनेत कोणतीही तरतूद नाही.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात त्यात काही गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. त्यांच्यावरील खटला अनेक आठवडे चालू शकतो. तसेच त्यांना स्वतःही हजर राहावे लागू शकते. त्यामुळे त्यांचा वेळ, ऊर्जा आणि पैसा यामध्ये जाऊन मतदारांना भेटण्याचा, प्रचारमोहिमेचा वेळ यात जाऊ शकतो.
रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवार होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच असून पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणुकीत जो बायडेन यांच्याविरोधात उभे ठाकण्याचा त्यांचा मानस आहेच.
ट्रंप यांना तुरुंगवास होऊ शकतो का?
जर दोषसिद्धता झाली तरी यातले बहुतांश आरोप हे दंडास पात्र आहेत. पण काही आरोपांमुळे त्यांना गजाआड जावं लागू शकतं. आणि जरी ते गजाआड गेले तरी त्यांना निवडणूक लढवता येईल आणि मतं मिळाली तर जिंकताही येईल. 1920 साली सोशालिस्ट पक्षाचे उमेदवार युजिन डेब्स यांना तुरुंगात असूनही लक्षावधी मतं मिळाली होती.
बचावपक्षानं काय म्हटलं आहे?
हे सर्व आरोप राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं ट्रंप यांनी वारंवार म्हटलं आहे. आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीत हे मुद्दाम आणलेले अडथळे आहेत असं त्यांचं मत आहे.
जॉर्जियात करण्यात आलेले आरोप हे धक्कादायक आणि मूर्खपणाचे आहेत तसेच राजकीय हेतूने करण्यात आलेले आहेत असं ट्रंप यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
अमेरिकेची राज्यघटना काय सांगते?
अमेरिकेत दर चार वर्षांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होते आणि कुठल्याही राष्ट्राध्यक्षाला चार वर्षांच्या दोन कार्यकाळांपेक्षा अधिक काळ सत्तेत राहता येत नाही. अमेरिकन राज्यघटनेत 1951 साली झालेल्या घटनादुरुस्तीनं हा नियम लागू केला.
पण कुणी किती वेळा निवडणूक लढवावी, यावर मात्र काहीही निर्बंध नाहीत. तसंच हे दोन कार्यकाळ सलगच असावेत असंही बंधन नाही. त्यामुळे पराभव झाला, तरी चार वर्षांनी पुन्हा निवडणूक लढवणं आणि जिंकणं हा पर्याय ट्रंप यांच्यासमोर आहे.
याआधी असं कधी झालं होतं?
ट्रंप पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि जिंकले, तर असं करणारे ते पहिलेच राष्ट्राध्यक्ष ठरणार नाहीत.
ग्रोव्हर क्लीव्हलँड 1884 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले होते पण 1988 साली त्यांना बेंजामिन हॅरिसन यांनी पराभूत केलं. मात्र क्लीव्हलँड 1892 सालच्या निवडणुकीत हॅरिसनना हरवत राष्ट्राध्यक्षपद परत मिळवलं.
अर्थात, एकच कार्यकाळ सत्तेत राहिलेल्या राष्ट्राध्यक्षांची यादीही मोठी आहे आणि त्यात जॉर्ज बुश सीनियर, जिमी कार्टर, जेराल्ड फोर्ड, हर्बर्ट हूवर यांच्यासारख्यांचाही समावेश आहे. या चौघांनाही राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडणूक जिंकता आली नाही.
हे वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








