हिंगोली लोकसभा : शिंदेंच्या शिवसेनेला हेमंत पाटलांची उमेदवारी मागे का घ्यावी लागली?

फोटो स्रोत, Facebook
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठीसाठी
हिंगोली मतदारसंघामध्ये यावेळी शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत पाहायला मिळणार आहे.
हिंगोलीत हेमंत पाटील विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर असा हा सामना रंगणार असं वाटलं होतं. पण शिंदेंच्या शिवसेनेला ऐनवेळी हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घ्यावी लागली आहे.
शिवसेना शिंदे गटाने काही दिवसांपूर्वीच 8 लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.
तेव्हा हिंगोलीमधून हेमंत पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. पाटील यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला होता. पण शिंदेंच्या शिवसेनेने आता हेमंत पाटील यांचे नाव मागे घेतले.
त्यांच्याऐवजी आता बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुतीच्या जागावाटपाच्या तिढ्यामध्ये हा मतदारसंघ अडकला होता. मात्र हा तिढा सुटला असून शिंदे गटाकडेच ही जागा राहणार आहे.
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं असून त्यांनी आधीच नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर केली.
विद्यमान शिवसेना खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटामध्ये आहेत. त्यांनी जागा आपल्यालाच मिळणार असा दावा वारंवार केला होता.
हिंगोलीत दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिलला मतदान होत आहे. त्यामुळं 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत आहे.
शिवसेना विरुद्ध शिवसेना
ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे हदगावचे माजी आमदार राहिलेले आहेत.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते हदगावमधून विजयी झाले होते. ग्रामपंचायत पातळीपासून काम केलेलं असल्यानं त्यांचा जनसंपर्क चांगला आहे.
हिंगोलीतील इतर दावेदार असलेल्या उमेदवारांनीही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा यासाठी कोणतीही नाराजी न बाळगता काम करण्याची तयारी दाखवली आहे.
त्यामुळं उमेदवारीबाबत इतर काही चर्चा नाहीत. वसमतचे राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांच्या नाराजीच्या चर्चा मत्र दबक्या आवाजात सुरू आहेत.

याआधी शिंदे गटाचे मतदारसंघात उमेदवार बदलण्याचे प्रयत्न सुरू होते, अशी माहिती स्थानिक पत्रकारांबरोबरच्या चर्चेत समोर आली होती.
आता हेमंत पाटलांची उमेदवारी मागे घेतल्याने ही चर्चा खरी ठरली आहे.
पण तरीही या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगणार आहे.
मतदारसंघाचा इतिहास कसा राहिलाय ?
हिंगोली मतदारसंघाची निर्मिती 1977 मध्ये झाली.
त्यानंतर सुरुवातीला काही वर्ष काँग्रेसचं याठिकाणी वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसचे उत्तम राठोड हे सलग तीन टर्म हिंगोली मतदारसंघाचे खासदार होते.
पण नव्वदच्या दशकात शिवसेनेनंही या मतदारसंघामध्ये जम बसवल्याचं दिसून आलं. 1991 आणि 96 मध्ये विलास गुंडेवार आणि शिवाजी माने असे शिवसेनेचे दोन खासदार इथून निवडून आले.
पण त्यानंतर मात्र या मतदारसंघातून प्रत्येकवेळी खासदार बदलत असल्याचा ट्रेंड पाहायला मिळाला. एका निवडणुकीत काँग्रेस आणि एका निवडणुकीत शिवसेना अशा प्रकारे मतदारांनी याठिकाणी खासदारांची निवड केल्याचं पाहायला मिळालं.

फोटो स्रोत, TWITTER
2014 मध्ये भाजप आणि मोदींची प्रचंड लाट असूनही काँग्रेसला तारणारे जे महाराष्ट्रातले मोजके मतदारसंघ होते त्यापैकी एक होता, हिंगोली मतदारसंघ. राहुल गांधींचे नीकटवर्तीय दिवंगत राजीव सातव यांनी मोदी लाटेतही इथं काँग्रेसला विजय मिळवून दिला होता.
त्यामुळं विद्यमान खासदाराला पराभूत करण्याचा ट्रेंड या मतदारसंघामध्ये जवळपास गेल्या आठ निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला आहे. सूर्यकांता पाटील, शिवाजी माने हे दोन दोन वेळा खासदार बनले. पण सलग दोन वेळा ते खासदार राहू शकले नाहीत.
2019 मध्ये काय झालं?
हिंगोलीतून 2014 मध्ये शिवसेनेचे तेव्हाचे खासदार सुभाष वानखेडे यांना राजीव सातव यांनी अवघ्या काही हजारांच्या फरकानं पराभूत केलं होतं. त्यामुळं 2019 मध्ये वानखेडे यांनी पुन्हा उमेदवारीसाठी दावा केला होता.
पण शिवसेनेनं सुभाष वानखेडे यांना उमेदवारी न देता हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं वानखेडेंनी बंडखोरी करत काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी सुभाष वानखेडे यांचा जवळपास अडीच लाखांपेक्षाही जास्त मताधिक्यानं पराभव करत विजय मिळवला होता. वंचितच्या उमेदवारानं या निवडणुकीत सुमारे दीड लाखांहून अधिक मतं मिळवली होती.
सुभाष वानखेडे यांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला या मतदारसंघात धक्का देण्यात यश मिळेल असं काँघ्रेसला त्यावेळी वाटलं होतं. पण त्यावेळी मतदारांकडून हेमंत पाटील यांना पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं.
गेल्या चार वर्षांत काय घडलं?
राज्याच्या राजकारणातील भूकंप आणि प्रामुख्यानं शिवसेनेत पडलेली उभी फूट याचा मराठवड्यातील शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या भागांत मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. त्यात हिंगोलीचा समावेशही होता.
शिंदे गटातील फुटीनंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही शिंदेंबरोबर सत्ताधारी गटात जाण्याचा निर्णय घेतला. तर कळमनुरीतून आमदार असलेले संतोष बांगर यांनी आधी ठाकरेंबरोबर आणि नंतर शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळं मराठवाड्यातील शिवसेनेचं आणि प्रामुख्यानं ठाकरे गटाचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत हिंगोली मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केलं होतं.
फुटीनंतर काही महिन्यांत उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत घेतलेल्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच गेल्या दोन महिन्यांतही उद्धव ठाकरेंनी हिंगोली मतदारसंघाची बांधणी केल्याचं दिसून आलं.
त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये ठामपणे मतदारसंघासाठी आग्रह करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असूनही जागावाटपात ठाकरेंनी हा मतदारसंघ मिळवला आहे.
मतदारसंघातील निर्णायक फॅक्टर कोणते आहेत ?
हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगोली, वसमत आणि कळमनुरी हे हिंगोलीतील तीन, किनवट आणि हदगाव हे नांदेडमधील दोन तर उमरखेड या यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.
ग्रामीण भागाचा समावेश असल्यानं कृषी क्षेत्राशी संबंधित अनेक मुद्दे या मतदारसंघात महत्त्वाचे आहेत. सिंचन व्यवस्था, कृषी प्रक्रिया उद्योग आणण्याकडं दुर्लक्ष, रोजगार, आरोग्य सुविधा अशा अनेक मुद्द्यावर या निवडणुकीत लक्ष असेल.
ठाकरे गटाकडून या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी चांगलीच मोर्चेबांधणी करण्यात आलेली आहे. पण वंचितनं घेतलेली भूमिका पाहता शिवसेनेला त्यादृष्टीनं विचार करणं गरजेचं ठरणार आहे.
अशोक चव्हाणांचाही या मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्यानं महायुतीच्या उमेदवाराला त्यांचा फायदो होऊ शकतो, याचा विचारही ठाकरे गटाच्या शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला करावा लागेल.
महायुतीमध्ये ही जागा घेण्यात शिंदेंनाही यश आलं आहे. त्यामुळं शिवसेनेचेच दोन उमेदवार आमनेसामने असणार आहेत. अशा स्थितीत आता मराठवाड्यातील शिवसेनेचा मतदार कोणाच्या पाठिशी उभा राहणार हे या निवडणुकीच्या निकालावरूनच स्पष्ट होणार आहे.











