मीठ खाल्ल्यानं काय होतं, आहारात मीठ कमी करा, असं WHO का सांगतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Reporting from, मुंबई
खाल्ल्या मीठाला जागा... मैने आपका नमक खाया है... अशा म्हणी आणि वाक्प्रचार मीठाचं महत्त्व सांगतात.
जेवणाला चव आणणारं, पदार्थ टिकवणारं मीठ जगातल्या सगळ्याच खाद्यसंस्कृतींचा अविभाज्य भाग आहे.
पण जगभरात बहुतांश लोक गरजेपेक्षा जास्त मीठ खात आहेत, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत, असं जागतिक आरोग्य संघटनेने एका ताज्या अहवालात म्हटलं आहे.
या अहवालात नेमकं काय म्हटलंय? किती मीठ खाणं योग्य आहे? आणि जास्त मीठ खाल्ल्यानं काय होतं? हे जाणून घेण्याआधी मीठ महत्त्वाचं का आहे, हे समजून घ्यायला हवं.

फोटो स्रोत, Getty Images
मीठ का महत्त्वाचं?
माणसाच्या इतिहासातच मिठाला महत्त्वाचं स्थान आहे. मिठाला कुणी पांढरं सोनं म्हणजे व्हाईट गोल्ड असंही म्हणतात आणि मिठावरच्या कराचा विरोध करण्यासाठीच महात्मा गांधींनी काढलेली दांडी यात्राही तुम्हाला आठवत असेल.
हे पांढरे स्फटिक जेवणात किती महत्त्वाचे आहेत, हे वेगळं सांगायला नको. एखाद्या बेचव, अळणी पदार्थात चिमूटभर मीठ घातलं तरी चव लगेच बदलते. त्यामुळे मिठाचा वापर एखाद्या मसाल्यासारखा म्हणजे पदार्थाची चव वाढवण्यासाठी केला जातो.
अन्न शिजवण्याच्या आणि साठवण्याच्या पद्धतींमध्येही मीठाचा वापर होतो. रेफ्रिजरेटर येण्याआधी लोणची, फळं, मासे, असे पदार्थ मीठ घालून खारवले जात, ज्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात.

फोटो स्रोत, Getty Images
मीठ आपल्या शरीरातल्या स्नायूंचं आकुंचन-प्रसरण योग्य पद्धतीनं होण्यासाठी, मज्जातंतूंद्वारा मेंदूपासून शरीरात संदेश पोहोचण्यासाठी आणि शरीरातलं पाण्याचं संतुलन राखण्यासाठी मदत करतं.
आपण रोज जे मीठ वापरतो, त्याचं रासायनिक नाव आहे सोडियम क्लोराईड (Sodium Chloride) आणि त्यात 40 टक्के सोडियम असतं. त्याशिवाय मिठातून पोटॅशियम, आयोडिन ही द्रव्यही शरीराला मिळतात.
थोडक्यात, मीठ हे मानवी शरीराला आवश्यक असलेलं खनिज आहे. पण ते कमी किंवा जास्त प्रमाणात घेतलं तर त्याचे मोठे दुष्परीणाम होतात.
WHO च्या म्हणण्यानुसार मीठाचं सेवन अगदी कमी होण्याची वेळ फारशी येत नाही, कारण आपण जे बहुतांश अन्न खातो, त्यात मिठाचा समावेश असतो. पण बराच काळ जास्त प्रमाणात मिठाचं सेवन घातक ठरू शकतं.
जास्त मीठ खाण्यानं काय होतं?
अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनं प्रकाशित केलेल्या माहितीनुसार आहारात मीठाच्या अतिसेवनाचा संबंध हृदयरोगासारख्या आरोग्याच्या गंभीर समस्यांशी आहे.
तज्ज्ञांच्या मते मीठाचं अतिरिक्त सेवन केल्यानं स्ट्रोक, धमन्यांचे आजार, उच्च रक्तदाब, हृदयक्रिया बंद पडणं आणि वेळेआधीच मृत्यू, असे धोके संभवतात.
तसंच लठ्ठपणा, कॅन्सर, किडनीचे आजार, हाडांची घनता कमी होण्याचीही शक्यता असते.

फोटो स्रोत, BBC/WHO
त्यामुळेच WHO ने 2013 साली एक मोहीम सुरू केली, आणि 2025 सालापर्यंत जगभरातलं मीठाच्या सेवनाचं प्रमाण 30 टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं.
पण आता एका ताज्या अहवालानुसार जगातले जवळपास सगळे देश ते लक्ष्य गाठण्यापासून बरेच मागे आहेत.
रोज किती मीठ खाणं योग्य आहे?
जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOच्या सल्ल्यानुसार एका निरोगी व्यक्तीनं दिवसाला जास्तीत जास्त 5 ग्रॅम, म्हणजे साधारण चहाचा छोटा चमचाभर एवढंच मीठ खाणं योग्य आहे. या पाच ग्रॅम मीठात जवळपास २ ग्रॅम सोडियम असतं, जे शरिरासाठी पुरेसं ठरतं.
पण WHO चा अहवाल सांगतो की जगभरातले लोक दिवसाला प्रत्येकी सरासरी 10.8 ग्रॅम एवढं मीठ खातात. तर भारतीय लोक दिवसाला प्रत्येकी 9.8 ग्रॅम मीठाचं सेवन करतात, म्हणजे बहुतांश लोक गरजेपेक्षा दुप्पट मीठाचं सेवन करत आहेत.
WHO नं केलेल्या शिफारसींनंतरही जगभरातल्या 194 देशांपैकी केवळ 9 देशांनीच मीठाच्या सेवनाचं प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत.

यात ब्राझील, चिली, चेक प्रजासत्ताक, लिथुएनिया, मलेशिया, मेक्सिको, सौदी अरेबिया, स्पेन आणि उरुग्वेचा समावेश आहे.
मीठ आणि पर्यायानं सोडियमचं सेवन कमी केलं, तर 2030 सालापर्यंत 70 लाख लोकांचा जीव वाचू शकतो, असं WHOनं म्हटलं आहे. मग आपण मीठाचं सेवन कमी कसं करू शकतो?
मीठाचं सेवन कमी कसं होईल?
पॅकेज्ड फूड्स आणि प्रिझर्व्हेटिव्जमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ आणि सोडियम असतं. त्यामुळे अशा तयार खाद्यपदार्थांसाठीचे नियम आणणं तसंच त्यांची योग्य अंमलबजावणी करणं याला सरकारनं प्राधान्य द्यायला हवं, असं WHO चं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
WHO च्या मते,
- एखाद्या पदार्थात किती सोडियम आहे, याची माहिती पाकिटावर स्पष्टपणे लिहिणं बंधनकारक करणं, हे नियम पाळले जातायत याची तपासणी करणं.
- मीठाच्या जास्त सेवनानं होणाऱ्या दुष्परिणामांविषयी जागरुकता निर्माण करणं.
- हॉस्पिटल्स, शाळा, अशा सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या आहारात मीठाचं प्रमाण कमी ठेवणं.
अशी पावलं सरकारनं उचलायला हवीत.
आहारात मीठाचं प्रमाण कमी करणं, ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. त्याविषयी आहारतज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत.
रोजच्या आहारात ताज्या पदार्थांचं प्रमाण वाढवावं. प्रोसेस्ड म्हणजे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ कमी करावे आणि तयार खाद्यपदार्थ विकत घेताना, त्यात मीठाचं प्रमाण किती आहे, हे लेबलवर नीट तपासून पाहावं. तयार सॉसेस, लोणची यांचं सेवन कमी करा, असा सल्लाही ते देतात.

फोटो स्रोत, Getty Images
WHOनं 5 ग्रॅमची मर्यादा घातली असली, तरी काहींच्या शरीराची मीठाची गरज थोडी जास्त असू शकते, तर काहींनी आरोग्याच्या समस्येमुळे 5 ग्रॅमपेक्षाही कमी मीठ खावं असं तज्ज्ञांचं मत आहे.
एंडोक्रायनॉलॉजी आणि चयापचाशी संबंधित आजारांतले तज्ज्ञ डॉ. दिलीप इनामदार सांगतात, “उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनीचे आजार अशा समस्या असलेल्या व्यक्तीनं दिवसाला तीन ग्रॅम मीठाचं सेवन करणं पुरेसं असतं.
"माझ्याकडे जे रुग्ण येतात, त्यांना मी एक उपाय सुचवतो. फक्त 90 ग्रॅम मीठ घ्या आणि ते महिनाभर पुरवून खा. आपल्याकडे अनेकांना पदार्थ शिजवताना मीठ घालायची पद्धत असते. पण शिजवताना मीठ घालण्याऐवजी पदार्थ ताटात वाढल्यावर या 90 ग्रॅम मिठापैकी थोडं त्यावर घाला. “
कुठलीही गोष्ट प्रमाणातच खावी आणि आहारात कुठलाही बदल करताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आधी घ्या, अशी सूचनाही ते करतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








