घर बांधणीला पैसे कमी पडले म्हणून 9 वर्षांच्या मुलाची खंडणीसाठी हत्या

हत्या

फोटो स्रोत, Getty Images

घर बांधण्यासाठी पैशांची गरज असल्याने शेजारच्या घरातील मुलाचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरजवळच्या गोरेगाव (वांगणी) इथे हा धक्कादायक प्रकार घडला.

या प्रकरणी कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नऊ वर्षांच्या इबाद बुबेरे या मुलाची खंडणीसाठी त्याच्याच घराशेजारी राहणाऱ्या सलमान मौलवी आणि त्याचा भाऊ सफूआन मौलवी यांनी हत्या केल्याची माहिती आहे.

अपहरणानंतर इबाद याचा शोध सुरू असल्यानेच घाबरून सलमान आणि सफूआन यांनी त्याची हत्या केल्याचं समोर आलं.

नेमकं काय घडलं?

बदलापूर जवळ असलेल्या गोरेगाव परिसरात सध्या रमजान सुरु असल्याने रात्री नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मशिदीत जमले होते. त्याचवेळी या गावातील नऊ वर्षीय मुलगा इबाद गायब झाला.

इबादच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला. त्या वेळी इबादचे वडील मुद्दसीर यांना फोन आला.

फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, तुमचा मुलगा तुम्हाला जिवंत हवा असल्यास त्या बदल्यास 23 लाख रुपये द्या. त्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचा फोन बंद केला.

एकीकडे पोलिसांकडून इबादचा शोध सुरु होता, तर दुसरीकडे ग्रामस्थांकडून ही इबादचा शोध घेतला जात होता. त्याचवेळी अपहरणकर्त्याने त्याच्या मोबाईलमध्ये दुसरे सीम कार्ड टाकून फोन करण्याच्या प्रयत्न केला.

हाच प्रयत्न आरोपीच्या अंगलट आला आणि पोलिसांना त्याचं लोकेशन कळलं. लोकेशनच्या आधारे पोलिसांनी त्याच गावातील सलमान मौलवी शोध सुरु केला. त्याच्या घराच्या मागच्या बाजूला एका खड्ड्यात गोणीत इबाद याचा मृतदेह आढळून आला.

या प्रकरणात कुळगाव बदलापूर पोलिसांनी सलमान, सफूआन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत असल्याची माहिती एसपी डी. एस. स्वामी यांनी दिली आहे.