पोलीस बनून वर्षभर वावरली, प्रेरणादायी भाषणंही दिली, अखेर होणाऱ्या नवऱ्यामुळे पितळ उघडं

पोलीस

फोटो स्रोत, MALAVIKA JADALA/INSTAGRAM

    • Author, अमरेंद्र यरलागड्डा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"महिला काहीतरी मिळवण्यासाठी बाहेर पडत असतात..." असं तिनं एकदा भाषणात म्हटलं होतं. तिलाही काहीतरी मिळवायचं होतं. पण ते मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा वापर केला आणि तो मार्ग तिला तुरुंगापर्यंत घेऊन गेला.

हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वे पोलिसांनी मालविका नावाच्या एका महिलेला अटक केली आहे.

रेल्वे पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून एका वर्षापेक्षा अधिक काळापासून मालविका लोकांना फसवत होती.

मालविका नालगोंडा जिल्ह्याची रहिवासी आहे. वर्षभर ती सगळीकडं पोलिसाच्या गणवेशातच जायची आणि पोलिस असल्यासारखंच वागायची.

ही महिला रेल्वेमध्ये चेकिंग करायची, सोहळ्यांमध्ये तसंच नातेवाईकांच्या घरी आणि मंदिरांतही पोलिसाच्या गणवेशात जाऊन सगळ्यांसमोर मिरवत असायची.

पण तिनं जेव्हा स्वतःच्या साखरपुड्यातही पोलिसाचाच गणवेश परिधान केला, तेव्हा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला संशय आला. त्यामुळे तिचं पितळ सगळ्यांसमोर उघडं पडलं.

पण जवळपास एक वर्ष पोलिसांची खाकी वर्दी परिधान करून ती अधिकारी असल्याचा बनाव करत फिरत राहिली, तरी तिला कोणी पकडलं कसं नाही?

नेमकं काय घडलं?

जदाला मालविका ही महिला नालगोंडा जिल्ह्याच्या नरकटपल्लीमधील जदाला यादैया यांची मुलगी आहे.

मालविका हिचं लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न होतं. तिच्या आई-वडिलांचीही तिनं पोलीस अधिकारी व्हावं अशी इच्छा होती.

मालविकानं निजाम कॉलेजमधून एमएससी पूर्ण केलं. 2018 मध्ये तिनं रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) मध्ये एसआय पदाच्या नोकरीसाठी अर्ज केला.

पण, दृष्टीतील काही समस्येमुळं शारीरिक क्षमता चाचणीत ती उत्तीर्ण झाली नाही. त्यामुळं तिनं लेखी परीक्षाही दिली नाही.

पण नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना मात्र ती लेखी परीक्षेत पास झाली असून लवकरच तिला नोकरीही मिळणार आहे, असंच वाटत होतं.

"शारीरिक क्षमता चाचणीत ती अपयशी ठरली. त्यामुळं लेखी परीक्षेसाठी पात्र नव्हती. पण तिनं आई-वडील आणि नातेवाईकांना गेल्या वर्षीच नोकरी मिळाली, असं सांगितलं. तांत्रिक अडचणींमुळं पगार मिळत नसून, लवकरच तोही मिळेल, असं तिनं सांगितलं होतं," अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाच्या एसपी शेख सलिमा यांनी बीबीसीबरोबर बोलताना दिली.

ड्रेस कोडची माहिती मिळवली

मालविका वर्षभरापासून तोतया पोलीस अधिकारी बनून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांच्या मते, तिनं रेल्वे सुरक्षा दलात एसआयच्या ड्रेस कोडबाबत आणि पोलिसाच्या गणवेशात नेमके काय असले, याबाबत सर्व माहिती मिळवली.

मालविका

फोटो स्रोत, MALAVIKA JADALA/INSTAGRAM

हैदराबादच्या एलबी नगरमध्ये तिनं आरपीएफचा गणवेश शिवून घेतला. सिकंदराबादमध्ये आरपीएफचा लोगो, स्टार, शोल्डर बॅज, बेल्ट आणि बुटांची खरेदी केली. त्यानंतर तिनं एक बनावट ओळखपत्रही तयार केलं. विशाखा डिव्हिजनमध्ये खरी नोकरी लागल्यासारखी तयारी तिनं केली होती, असं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मालविका एका वर्षापासून नालगोंडा-सिकंदराबाद मार्गावर तोतया एसआय (सब इन्सपेक्टर) बनून प्रवास करत होती. तिनं 3 जानेवारी 2019 ला बनावट ओळखपत्र तयार करून घेतलं होतं. त्यावर जे मालविका, सब-इन्स्पेक्टर लिहिलं होतं. MR5732019 असा युनिक नंबर असलेलं हे आयडीकार्ड होतं. त्याच्या मागच्या बाजुला ब्लड ग्रुप आणि पत्ता लिहिलेला आहे.

महिलादिनी सन्मानही झाला

मालविकानं 8 मार्चला नालगोंडामधील एमईएफ संस्थेद्वारे आयोजित महिला दिनाच्या सोहळ्यातही सहभाग घेतला होता. त्या सोहळ्यातही ती पोलिसांच्या गणवेशातच सहभागी झाली होती. संस्थेच्या सदस्यांकडून तिचा सन्मान करण्यात आला होता.

"एक महिला काही तरी मिळवण्यासाठी घरातून निघते. माझी पत्नी हे करेल... माझी मुलगी हे करेल... असा विश्वासानं पाठवा...त्यांना स्वातंत्र्य द्या... त्यांना समाजात पुढं जाऊ द्या," असा उपदेश तिनं व्याख्यान करताना दिला होता. अटकेनंतर तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पोलीस समोर आले तर..

मालविका रेल्वेचं चेकिंग करते हे पोलिसांना समजलं होतं. विशेषकरून ती पालनाडू एक्सप्रेसमध्ये चेकिंग करायची. एक वर्षापासून एसआय रेल्वेमध्ये चेकिंग करायची पण कोणालाही याबाबत समजू शकलं नाही. एसपी सलिमा यांनी त्यामागची कारणं सांगितलं.

मालविका

फोटो स्रोत, MALAVIKA JADALA/INSTAGRAM

"एखादा पोलीस कर्मचारी येत असल्याचं दिसताच ती जर्किन (जॅकेट) परिधान करायची. त्यामुळं पोलीस गणवेशात असूनही तिला कोणी ओळखू शकत नव्हतं. तसंच ती कोणत्या रेल्वे स्टेशनवर ड्युटी करते हेही कोणालाही माहिती नव्हतं. ती कदाचित मोठ्या रेल्वे स्टेशनऐवजी लहान रेल्वे स्टेशनवर थांबत असेल. कारण मोठ्या रेल्वे स्टेशनवर खरे अधिकारी असण्याची शक्यता होती. त्यामुळं तिनं लहान स्टेशन निवडले असावे," असं त्या म्हणाल्या.

मालविकानं कोणाची फसवणूक केली आहे की नाही, याबाबत चौकशी करावी लागेल, असंही त्या म्हणाल्या.

कुठेही वर्दीतच जात असे

मालविका कुठंही जायचं असलं तरी ड्रेसकोडमध्येच जायची. ती पोलिसाच्या गणवेशातच मंदिरात जायची, त्यामुळं तिच्यासाठी विशेष पुजेचं आयोजन केलं जायचं. नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यातही ती ड्रेसकोडमध्येच जायची. ती खूप व्यस्त असते आणि ड्युटीवरून थेट कार्यक्रमात आल्याचं ती भासवायची, असंही पोलिसांनी सांगितलं.

मालविका

फोटो स्रोत, MALAVIKA JADALA/INSTAGRAM

रेल्वेमध्ये तपासणीच्या नावाखाली ती मोफत प्रवासही करायची. ती गणवेशात रील्स तयार करायची आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करायची. सेलिब्रिटींबरोबरचे फोटोही तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.

नवरदेवाला आला संशय

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालविकाचा साखरपुडा नारकेटपल्लीमधील रहिवासी असलेल्या एका तरुणाशी झाला. तो आयटी क्षेत्रात जॉब करत होता. पण मालविका साखरपुड्यातही पोलिसाचा गणवेश परिधान करूनच पोहोचली. त्यामुळं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला संशय आला.

त्यानंतर हे सर्वप्रकरण समोर आलं. बीबीसीबरोबर बोलताना एसपी शेख सलिमा म्हणाल्या की, "सोहळ्यानंतर सामान्य पोलिसांनी रेल्वे पोलिसांकडं चौकशी केली. मालविका नावाचं कोणी आहे का? अशी विचारणा करण्यात आली. त्यानंतर आरपीएफ, नालगोडा आरपीएफ असा ठिकाणी चौकशी करण्यात आली. त्यानंतर या नावाची कोणीही व्यक्ती नसल्याचं विशेष शाखेनं पोलिसांना कळवलं."

त्याचबरोबर, "विशेष शाखेच्या पोलिसांनी 10 दिवस तिच्यावर पाळत ठेवली. मालविका कुठे जाते.. काय करते.. यावर पाळत ठेवत अतिशय गोपनीय पद्धतीन आरपीएफच्या महानिरीक्षकांना त्याबाबत अहवाल दिला. त्यानंतर त्यांच्या आदेशावर सिकंदराबाद जीआरपी पोलिसांनी तिला अटक केली."

मालविका 19 मार्चच्या सकाळी नालगोंडा रेल्वे स्टेशनवर तपासणीची तयारी करत असताना तिला अटक केल्याचं पोलिसांनी जाहीर केलं.

मालविका

फोटो स्रोत, MALAVIKA JADALA/INSTAGRAM

मालविकाच्या विरोधात आयपीसीच्या कलम 170, 419 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिनं शिवलेला गणवेश, आरपीएफचा लोगो, स्टार, आरपीएफ शोल्डर बॅज, नेम प्लेट, बूट हेही जप्त करण्यात आले आहेत. तसंच आयडी कार्डही जप्त करण्यात आलं आहे.

"तिच्यात खूपच आत्मविश्वास होता. पण तिची कामाची पद्धत किंवा बॉडी लँग्वेज मात्र प्रत्यक्ष अधिकारी काम करतात तशी नव्हती. रेल्वेमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. "सर्वांना वाटलं हे तेलंगणामध्ये कुठं तरी सुरू आहे. पण कर्मचारी किंवा अधिकारी कुणालाही याची शंका आली नाही," असं सलिमा शेख म्हणाल्या.

तोतया पोलिसांना कसं ओळखावं?

यापूर्वीही अनेक तोतया पोलीस अधिकारी पकडले गेले आहेत.

गेल्यावर्षी खम्मममध्ये वन वन विभागाचा अधिकारी असल्याचं सांगून बनावट ओळखपत्राद्वारे फसवणूक करणाऱ्या किरण नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती.

विशाखापट्टनमच्या कोवविरेड्डी श्रीनिवास राव नावाच्या व्यक्तीला 2022 मध्ये दिल्लीत अटक करण्यात आली होती.

हैदराबादच्या वनस्थलीपुरममधून अत्तिली प्रवीण नावाच्या व्यक्तीला 2023 मध्ये मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी असल्याचा दावा करताना अटक केली होती.

मालविका

फोटो स्रोत, MALAVIKA JADALA/INSTAGRAM

एमएससी केलेल्या एका तरुणीनं तोतया पोलीस बनण्यामागचं कारण काय? या विचारानं रेल्वे पुलिस आश्चर्यचकित झालेत.

तुम्हाला जर असा कोणावर संशय आला तर लगेचच ओळखपत्र तपासल्यास माहिती मिळू शकते.

एसपी शेख सलिमा म्हणाल्या की, "मोनोग्राम असलेलं कार्ड वेगळं आहे."

वर्तन आणि भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करा...

आयपीएस अधिकारी व्हीसी सज्जनार म्हणाले की, वर्तन आणि कपडे याआधारे तुम्हाला तोतया अधिकारी ओळखण्याची संधी मिळू शकते.

'तोतया अधिकाऱ्यांचं वर्तन आणि कपडे पाहा'

तोतया अधिकाऱ्यांच्या वर्तनात नक्कीच बदल पाहायला मिळतो. विनाकारण जास्त बोलणं किंवा अनपेक्षित विषयांवर चर्चा या दृष्टीनं त्याचा अंदाज लावता येऊ शकतो.

बहुतांश प्रकरणांत पोशाखावरूनच अशी व्यक्ती ओळखायला येऊ शकते, असंही सज्जनार म्हणाले.

तोतया अधिकाऱ्यांच्या विरोधात तीन कलमांतर्गत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात असं त्यांनी सांगितलं.

मालविका

फोटो स्रोत, MALAVIKA JADALA/INSTAGRAM

आयपीसीच्या कलम 419, 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 419 अंतर्गत दोषी आढळल्यास तीन वर्षांची शिक्षा, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

420 अंतर्गत गुन्ह्यासाठी सात वर्षांची शिक्षा, दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

कलम 170 अंतर्गत हा अजामीनपात्र गुन्हाही ठरतो. त्याअंतर्गत दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा सरकारी नोकरी मिळण्याची कोणत्याही प्रकारे पात्रता शिल्लक राहत नाही, हे तरुणांनी लक्षात घ्यावं असं सज्जनार म्हणाले.