Womens T20 World Cup : ऑस्ट्रेलिया अजिंक्य; सहाव्या जेतेपदाला गवसणी

न्यूलँड्स केपटाऊन इथे झालेल्या महिला ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने यजमान दक्षिण आफ्रिकेला नमवत सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं. अतिशय चुरशीच्या अशा अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने विश्वविजेत्यांना साजेसा खेळ करत दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने 2010, 2012, 2014, 2018, 2020 आणि आता 2023 मध्ये महिला ट्वेन्टी20 वर्ल्डकपवर नाव कोरलं.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी 36 धावांची सलामी दिली. मॅरिझान कापने हिलीला बाद करत ही जोडी फोडली. तिने 18 धावा केल्या. अशले गार्डनरने 29 धावांची खेळी करत धावफलक हलता ठेवला. टायरोनने तिला बाद केलं.

ग्रेस हॅरिस (10) आणि मेग लॅनिंग (10) या भरवशाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. एलियास पेरी 7 धावाच करु शकली. एका बाजूने सहकारी बाद होत असताना बेथ मूनीने 9 चौकार आणि एका षटकारासह 53 चेंडूत नाबाद 74 धावांची मॅरेथॉन खेळी केली.

मूनीच्या या खेळीच्या बळावरच ऑस्ट्रेलियाने 156 धावांची मजल मारली. दक्षिण आफ्रिकेतर्फे शबनिम इस्माईल आणि मॅरिझान काप यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. नॉनक्लूलेको मलाबा आणि चोले टायरोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर खेळताना दक्षिण आफ्रिकेला पॉवरप्लेच्या षटकांमध्ये धुवाधार फटकेबाजी करता आली नाही. स्पर्धेत उत्तम फॉर्मात असणाऱ्या ताझिम ब्रिट्सला डार्सी ब्राऊनने बाद केलं. तिने 10 धावा केल्या. भरवशाची मॅरिझान कापही 11 धावा करुन तंबूत परतली.

कर्णधार स्यून ल्यूस 2 धावा करुन तंबूत परतली. एका बाजूने साथीदार बाद होत असताला सलामीवीर लॉरा वोल्व्हार्टने झुंजार खेळ करत विजयाच्या आशा जिवंत राखल्या. लॉरा मैदानात असेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.

चोले टायरोनने लॉराला चांगली साथ दिली. पण मेगन शूटने लॉराला पायचीत केलं आणि विजयाचं पारडं ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकलं. लॉराने 5 चौकार आणि 3 षटकारांसह 48 चेंडूत 61 धावांची दिमाखदार खेळी केली.

लॉरा बाद झाल्यानंतर चोलेने सामन्याची सूत्रं हाती घेत फटकेबाजीला सुरुवात केली. पण जेस जोनासनने चोलाला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर केला.

उर्वरित षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने सहाव्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेने 137 धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे मेगन शूट, अशले गार्डनर, जेस जोनासन, डार्सी ब्राऊन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

लॉरा वोल्व्हार्टने स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. लॉराने 6 सामन्यात 46.00च्या सरासरीने 230 धावा केल्या. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडच्या सोफी इक्लेस्टोनने स्पर्धेत सर्वाधिक 11 विकेट्स घेतल्या.

अंतिम लढतीत शानदार अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या बेथ मूनीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. स्पर्धेत 110 धावा आणि 10 विकेट्स पटकावणाऱ्या अॅशले गार्डनरला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)