'महिलांसारखे स्तन आहेत म्हणून मला मंदिरात प्रवेश नाकारला', गायनॅकोमॅस्टिआ बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मुरुगेश माडकानू
- Role, बीबीसी प्रतिनिधी
" पूर्वी मी सगळ्यांशी मिळूनमिसळून वागायचो. पण मला याबद्दल कळताच सगळं बदललं. मी बाहेर जाणंयेणं बंद केलं. माझा स्वभावच बदलून गेला", मॅथ्यू सांगत होते.
नववीत शिकत असताना, त्यांना छातीचा आकार सर्वसाधारण आकारापेक्षा मोठा होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. दहावी झाल्यावर व्यायामशाळेत जाऊ आणि हा आकार कमी करु असं त्याला वाटलं होतं.
मात्र चांगला व्यायाम केल्यानंतरही छातीचा आकार कमी होत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं.
सर्वाननला (नाव बदललं आहे) 14 वर्षांचा असताना शबरीमला अय्यपन मंदिरात प्रवेशावेळी अडवण्यात आलं.
तुझ्या छातीचा आकार महिलांसारखा आहे असं कारण त्याला देण्यात आलं. चाचणीनंतर त्याला मंदिरात प्रवेश देण्यात आला.
लहान वयामुळे याबद्दल सर्वाननला फारशी माहिती नव्हती. त्यामुळे अशा पद्धतीने प्रवेश नाकारण्याचा त्याच्या मनावर परिणाम झाला नाही. पण पुढच्या काही वर्षात छातीचा आकार महिलांसारखा होत असल्याने त्याची काळजी वाढली.
गायनॅकोमॅस्टिआ
गायनॅकोमॅस्टिआ हा आजार नाही तर शरीरात होणारा बदल आहे असं डॉ.कार्तिक राम यांनी सांगितलं. डॉ. राम हे चेन्नई प्लॅस्टिक सर्जरी इथे प्रिन्सिपल कॉस्मेटिक सर्जन आहेत. गायनॅकोमॅस्टिआ या स्थितीत पुरुषांच्या छातीचा आकार महिलांच्या छातीप्रमाणे होतो. हार्मोनल संतुलन बिघडल्यामुळे असं होतं.

फोटो स्रोत, KARTHICK RAM
या स्थितीचे चार टप्पे असतात. स्तनाग्रांची वाढ होते. दुसऱ्या टप्प्यात स्तनाग्राच्या खालचा भागही वाढू लागतो. तिसऱ्या टप्प्यात स्तनांचा आकार वाढू लागतो. महिलांच्या स्तनाप्रमाणे हा आकार होतो. चौथ्या टप्प्यात संपूर्ण छातीचा आकार प्रचंड असा वाढतो.
तीन विविध वयोगटात ही स्थिती उद्भवते. बाळाच्या जन्मावेळी, 10 ते 13 वयोगटादरम्यान आणि वृद्धापकाळात. वृद्ध माणसं या स्थितीबद्दल फारसे चिंतीत नसतात. ते याकडे समस्या म्हणून पाहत नाहीत.
पौंगडावस्थेत, तरुण वयात अशी स्थिती होते तेव्हा त्या तरुणांना काळजी वाटू लागते. ही स्थिती आहारामुळे होतं असं नाही. आमच्याकडे अशा स्थितीतील तरुण येतात तेव्हा आम्ही त्यांना फार फास्टफूड खाऊ नका असं सांगतो.
या स्थितीमुळे लोकांशी बोलण्याची माझी पद्धतच बदलली असं मॅथ्यू सांगतो.
"मला बोलायला आवडतं. पण ही स्थिती निर्माण झाल्यानंतर मी लोकांशी अंतर ठेऊनच बोलू लागलो. माझ्या छातीच्या आकारामुळे कोणी थट्टा उडवू नये असं मला वाटू लागलं. जलतरण तलावात पोहायला गेलो तर बाकीचे मित्र येण्याआधीच मी पाण्यात उतरत असे. मी कोणालाही माझ्या शरीराला स्पर्श करू देत नसे आणि बोलतही नसे. कोणी माझ्या जवळ आलं तर मी प्रत्युत्तर देत असे. हा माझा स्वभाव नव्हता. पण याला कसं उत्तर द्यावं हे मला ठाऊक नव्हतं", असं त्यांनी सांगितलं.
व्यायाम केला तर ही स्थिती बरी होते का?
सर्वाननने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "या स्थितीमुळे मी कॉलेजला जाणं टाळू लागलो. मी बाहेर जाणंही टाळू लागलो. माझं वजन थोडं जास्त आहे. मी व्यायामशाळेत जाऊ लागलो. यामुळे छातीचा आकार कमी होऊन वजनही नियंत्रणात राहील असा माझा विचार होता. व्यायाम करु लागल्यानंतर पोटाचा घेर कमी होऊ लागला. पण छातीचा आकार तसाच राहिला", असं सर्वाननने सांगितलं. मॅथ्यूनेही सर्वाननच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
डॉ. कार्तिक यांना आम्ही यासंदर्भात विचारलं. छातीचा मोठा आकार व्यायामाने कमी होऊ शकतो का? यावर ते म्हणाले, "व्यायामामुळे चरबी कमी होऊ शकते. सस्तन ग्रंथी कमी होऊ शकत नाहीत. व्यायामशाळेत जाणं हा उपाय नव्हे तर शस्त्रक्रिया हा यावरचा उपाय आहे".

फोटो स्रोत, Getty Images
मॅथ्यू स्वत: एक डॉक्टर आहे. आईवडिलांपैकी एकजण वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यामुळे या स्थितीबद्दल घरच्यांना सांगायला त्याला संकोच वाटला नाही.
मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ लागल्यानंतर मला या स्थितीविषयी कळलं. पण सर्वाननने ही गोष्ट घरच्यांना किंवा जवळच्या मित्रांना सांगितली नाही. ते मला समजून घेतील का, ते काय म्हणतील या भीतीने त्याने कोणालाही काहीही सांगितलं नाही.
जन्मावेळी लिंग म्हणून पुरुष अशी नोंद होते आणि नंतरच्या काळात महिला म्हणून ओळख सांगणाऱ्या लोकांना ट्रान्सजेंडर म्हणून ओळखलं जातं. यासंदर्भात आम्ही डॉ.कार्तिक यांना विचारलं असता ते म्हणाले, काही पुरुषांना दाढीही आली आणि मिशीही आली.
"छातीचा आकार वाढणे म्हणजे महिलेसारखं शरीर होणं असं नाही. हार्मोन चाचणी ही स्थिती झालेल्या लोकांसाठी आवश्यक नाही. ग्यानमोस्टिओ ही छातीतली पेशी आहे. महिलेसारखं होण्याशी त्याचा काहीही संबंध नाही".
'आम्हाला वेगळं काही वाटत नाही'
हा मुळात आजार नाही तर ती एक स्थिती आहे. त्यामुळेच याला विमा कवच मिळत नाही. एखाद्या व्यक्तीने छातीच्या अशा स्थितीसह जगायचं ठरवलं तर त्याचा त्याला त्रास होत नाही.
काहींना ग्रेड-1 म्हणजे पहिल्या टप्प्याचा त्रास होऊ शकतो. काही पुरुषांचे स्तन महिलेप्रमाणे भासू शकतात. काहींना याचा फरक पडत नाही. हे मानसिक आहे. काहींना शस्त्रक्रिया करुन घेतली की बरं वाटतं असं डॉ. कार्ती राम यांनी सांगितलं.
डॉक्टर असल्यामुळे मॅथ्यू यांना या स्थितीबद्दल पुरेशी माहिती आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना पूर्वीसारखं वाटू लागलं आहे असं मॅथ्यू यांनी सांगितलं.
"नववीत असताना माझ्या छातीचा आकार सर्वसाधारण मुलांसारखा होता. आता मी पुन्हा तसाच झालो आहे. माझ्या स्थितीबद्दल कळू नये म्हणून मी ढगळ आकाराचे कपडे घालत असे. आता मी माझ्या शरीराला साजेसे कपडे घालतो".
यावर काय उपाय आहे हे समजून घेण्यासाठी मी इंटरनेटवर सर्च केलं. घरच्यांना माहिती न देता शस्त्रक्रिया केल्याचं सर्वाननने सांगितलं.
हा आजार नाही तर एक स्थिती आहे हे लक्षात आल्यावरही शस्त्रक्रियेची आवश्यकता होती असं आम्ही सर्वाननला विचारलं.
ते म्हणाले, "या स्थितीमुळे माझी चेष्टा उडवली गेली आहे. देवळात देवदर्शनासाठी गेल्यानंतर मला टीशर्ट किंवा शर्ट काढायला लावत. त्यावेळी मला अतिशय अस्वस्थ आणि विचित्र वाटत असे.
मी टाईट टीशर्ट घालू शकत नव्हतो. लोकांमध्ये सहजतेने वावरू शकत नसे. त्यामुळे मी शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निर्णय घेतला. आता देवळात जाताना मला धास्ती नसते. आता मी माझ्या मापाचे कपडे घालतो. मी आनंदी आहे", असं सर्वाननने सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








