बारसू : इस्लामिक रिफायनरीसाठी मराठी भूमिपुत्रांना मारहाण – संजय राऊत

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..

1. इस्लामिक रिफायनरीसाठी मराठी भूमिपुत्रांना मारहाण – संजय राऊत

स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या सरकारकडून एका इस्लामिक रिफायनरीसाठी मराठी भूमिपुत्रांना मारहाण केली जात आहे, अशी टीका शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राज्य सरकारमध्ये कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही. मुख्यमंत्री लाठीचार्ज झाला नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगतात. देवेंद्र फडणवीस परदेशातून वेगळे आदेश देतात.

अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देतात. याचा अर्थ मुख्यमंत्री या प्रकरणाकडे डोळे झाक करत आहेत किंवा त्यांची प्रशासनावर अजिबात पकड नाही, असं राऊत यांनी म्हटलं.

बारसूमध्ये जमीन सोडणार नाही, अशी स्थानिकांची भूमिका आहे. पण बाहेरून लोक आल्याचं सांगितलं जातं, पण बाहेरून म्हणजे कुठून आले, मॉरिशसमधून की पाकिस्तानातून, असा सवाल राऊत यांनी केला. ही बातमी ई-टीव्ही मराठीने दिली.

2. मुंबई मेट्रो प्रवासात विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना 25 टक्के सवलत

मुंबई मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना 25 टक्के सवलत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मात्र, ही सवलत मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. 45 ते 60 फेऱ्यांसाठी ही सवलत लागू असेल, असं मुंबई मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केलं.

या सवलतीची माहिती देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे. त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे.”

“आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे. तर महिलांना सुद्धा एसटी बसेसमधून 50 टक्के तिकीट दरात प्रवासाची सवलत दिली. या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ही बातमी पुढारीने दिली.

3. 'काँग्रेसने मला 91 वेळा शिव्या दिल्या, पण...'

“काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या. पण, जनतेने त्यांना प्रत्येकवेळी नाकारलं आहे. जो सामान्य जनतेचा विचार करतो, त्याचा काँग्रेस द्वेष करते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिदर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, “काँग्रेसने मोठ्या महापुरूषांनाही शिव्या दिल्या आहेत. काँग्रेस शिव्या देते, पण, मी जनतेचं काम करत राहणार आहे. जनतेचं समर्थन मला असल्याने शिव्या मातीत मिसळून जातील. कर्नाटकची आणखी सेवा करायची आहे. त्यासाठी पूर्ण बहुमताचं सरकार पाहिजे.”

“कर्नाटकात मागील पाच वर्षात सुरू असलेला विकास थांबू नये, असं जनतेचं मत आहे. कर्नाटकाला देशातील नंबर 1 चं राज्य बनण्यासाठी डबल इंजीन सरकारची आवश्यकता आहे, असंही मोदी यांनी यावेळी म्हटलं. ही बातमी ई-सकाळने दिली.

4. फिल्मफेअर पुरस्कारांवरून अनुपम खेर यांची नाराजी

68 व्या फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा नुकतेच करण्यात आली. या पुरस्कारांबाबत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात गंगूबाई काठियावाडी आणि बधाई दो या चित्रपटांची कामगिरी चांगली झाली. मात्र, विवेक अग्निहोत्रींच्या अनुपम खेर अभिनित काश्मीर फाईल्स चित्रपटाला या पुरस्कारांमध्ये एकही पुरस्कार मिळाला नाही.

फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली.

“इज्जत ही महागडी गोष्ट आहे. छोट्या लोकांकडून ती मिळण्याची अपेक्षा ठेवू नका, असा या पोस्टचा आशय आहे. या पोस्टचा संबंध फिल्मफेअर सोहळ्याशी जोडून पाहिला जात आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली.

5. आज मन की बात कार्यक्रमाचा 100 वा भाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा 100 वा बाग आज (30 एप्रिल 2023) प्रसारित केला जाणार आहे.

3 ऑक्टोबर 2014 साली पहिल्यांदा मन की बात कार्यक्रम प्रसारित झाला होता. त्यानंतर गेल्या 9 वर्षांपासून दर रविवारी हा कार्यक्रम प्रसारीत केला जातो.

आजवर मन की बातचे 99 भाग प्रसारीत झाले. आज 100 वा भाग प्रसारित केला जाईल. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने देशभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये हा कार्यक्रम ऐकण्याची सोय केली आहे.

मुंबईतही जवळपास 5 हजारपेक्षा जास्त ठिकाणी मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)