मंगल पांडे : 1857 च्या बंडाला सुरुवात कशी झाली

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्व काळातकलकत्त्यापासून 16 मैलांवर असलेली एक शांत लष्करी छावणी अशी बराकपूरची ओळख होती.

पूर्व भारतातील बहुतेक भारतीय सैनिक येथेच तैनात होते आणि ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे निवासस्थानही येथे होते.

याच छावणीतून बंडाचे निशाण उभारून इंग्रजांची झोप उडवली जाईल कदाचित याची कल्पना देखील कुणी केली नसेल.

29 मार्च 1857 हा रविवार होता आणि दुपारची शांतता भंग झाली ती मंगल पांडे यांच्यामुळे. फक्त दुपारचीच नव्हे तर अनेक दिवसांसाठी महिन्यांसाठी भारत या घटनेनी पेटून उठला होता.

त्या दिवशीचा घटनाक्रम आणि त्या घटनेनी भारताचे भवितव्य कसे बदलले याचा रेहान फजल यांनी घेतलेला धांडोळा.

प्रसिद्ध इतिहासकार रुद्रांशु मुखर्जी यांनी त्यांच्या डेटलाइन 1857 रिव्हॉल्ट अगेन्स्ट द राज' या पुस्तकात लिहिले आहे की,

त्या दिवशी मंगल पांडेंनी रेजिमेंटचा कोट अंगावर घातला होता पण त्यांनी ट्राऊजरऐवजी धोतर परिधान केले होते. ते अनवाणी होते आणि त्यांच्याकडे लोडेड बंदूक होती. ते ओरडत होते. तिथे असलेल्या सैनिकांना त्यांनी शिवीगाळ केली आणि म्हटले की इंग्रज आले आहेत.

तुम्ही त्यांच्याविरोधात लढायला का तयार नाहीत? ही काडतुसं आपण वापरली तर आपला धर्म भ्रष्ट होईल.धर्मासाठी उभे राहा. मी हे करावं म्हणून तुम्ही मला भडकवलंत पण आता मात्र तुम्ही माझी साथ द्यायला कुणी तयार दिसत नाहीये.

नवीन रायफलची काडतुसं बनली बंडाचं कारण

मंगल पांडेच्या बंडखोरी केली त्याचं कारण असं मानलं जातं की ब्रिटीश सैन्यात नव्याने सामील झालेली इनफिल्ड पी-53 रायफल. याआधी भारतीय सैनिक ब्राउन बीज नावाची बंदूक वापरत असत.

1856 मध्ये भारतीय सैनिकांच्या वापरासाठी नवीन बंदूक आणण्यात आली होती, परंतु ही बंदूक लोड करण्यासाठी काडतुसं दातांनी फोडून वापरावी लागत होती.

या रायफलमध्ये वापरण्यात येणाऱ्या काडतुसांमध्ये गाय आणि डुकराची चरबी वापरण्यात आल्याची अफवा भारतीय सैनिकांमध्ये पसरली. यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या.

इंग्रजांनी भारतीय सैनिकांचा अपमान करण्यासाठी हे जाणूनबुजून केले होते, असे भारतीय सैनिकांमध्येही एक सामान्य मत बनले होते. यामागे आणखी एक कथा होती.

मंगल पांडेच्या खटल्यात साक्ष देताना लेफ्टनंट जे.ए. राइट यांनी याचा उल्लेख केला होता, 'एकदा एका खालच्या जातीतील सैनिकाने ब्राह्मण सैनिकाला पाणी मागितले. त्या शिपायाने पाणी देण्यास नकार दिला यामुळे माझा तांब्या बाटेल असं त्याने उत्तर दिले.

यावर त्या सैनिकाने प्रत्युत्तर दिले की लवकरच तुमची जात भ्रष्ट होईल. कारण तुम्हाला डुक्कर आणि गायीच्या चरबीची काडतुसं वापरावी लागतील. पाहता-पाहता ही बातमी आगीसारखी पसरली. ब्रिटिश सरकारला भारतीयांची जात आणि धर्म भ्रष्ट करायचा आहे असा समज वणव्यासारखा पसरला.

सैनिकांनी नवीन काडतुसं वापरण्यास नकार दिला

2 फेब्रुवारी, 1857 रोजी, बराकपूर येथे संध्याकाळच्या परेड दरम्यान सैनिकांनी इनफिल्ड रायफलसाठी वापरल्या जाणार्‍या काडतुसेबद्दल नापसंती व्यक्त केली होती.

हे इंग्रज अधिकाऱ्यांना कळवताना निष्ठावंत सैनिकांनी त्यांना माहिती दिली की, भारतीय सैनिक रात्री ब्रिटिश अधिकाऱ्यांना भेटून ठार मारण्याचा बेत आखत आहेत.

सर्वात तीव्र प्रतिक्रिया ही बुऱ्हाणपूरच्या 19 नेटिव्ह इन्फंट्रीच्या सैनिकांकडून आली होती.

त्यांच्या या प्रतिक्रियाला उत्तर देण्यासाठी इंग्रजांनी आपल्या तोफखान्यातील अधिकाऱ्यांनाच सर्व शस्त्रानिशी पाचारण केले. सैनिकांनी याचा निषेध म्हणून टेलिग्राफ ऑफिस जाळले, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या घरावर अग्निबाण सोडले.

जॉन विल्यम काय यांनी त्यांच्या द हिस्ट्री ऑफ द सिपाय वॉर' या पुस्तकात लिहिले आहे की याचा संबंध कदाचित एका जुन्या अफवेशी देखील असेल. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांची राजवट संपेल असा एक समज सर्वांमध्ये होता. पण तसं काही झालं नाही. यातून पुढे शिपायांचे बंड घडले असावे.

मंगल पांडेंनी झाडली लेफ्टनंट बो वर गोळी

मंगल पांडे हे 1849 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल सैन्यात सामील झाले होते. 29 मार्चच्या आधी म्हणजेच 15 ते 27 मार्च महिन्यात हुनमान आणि शंकराची उपासना केली होती.

29 मार्च रोजी संध्याकाळी 5.10 वाजता मंगल पांडेंने गोंधळ सुरू करताच लेफ्टनंट बीएच बो परेड ग्राऊंडवर पोहोचले.

ते पाहताच मंगल पांडे यांनी बो या अधिकाऱ्यावर गोळीबार केला. ती गोळी बो याला लागली नाही पण त्याच्या घोड्याच्या पायाला लागली. घोडा पडला आणि खाली पडलेल्या बो यांनी मंगल पांडे यांच्यावर गोळीबार केला. त्या गोळ्या मंगल पांडेंना लागल्या नाहीत. या घटनेनंतर मागून सार्जंट मेजर ह्युसनही आला.

पीजीओ टेलरने आपल्या 'व्हॉट रियली हॅपन्ड ड्युअरींग द म्युटिनी' या पुस्तकात लिहिले आहे की, 'परिस्थिती पाहता ह्युसन आणि बो या दोघांनी आपल्या तलवारी काढल्या. तलवारींव्यतिरिक्त त्यांच्याकडे पिस्तुलंही होती. मंगल पांडें यांच्याकडे देखील तलवार होती. बो आणि ह्युसन या दोघांवर त्यांनी तलवारीने हल्ला चढवला.

तिथे उपस्थित असलेले सर्व भारतीय सैनिक हा तमाशा बघतच राहिले, त्यांच्यापैकी शेख पल्टूशिवाय कोणीही इंग्रज अधिकाऱ्यांच्या मदतीला आलं नाही. त्याने मागून मंगल पांडेची कंबर पकडली. याचा परिणाम असा झाला की दोन्ही ब्रिटीश अधिकारी बचावले.

भारतीय सैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यालाही धक्काबुक्की केली

नंतर ह्युसनने साक्ष दिली, 'मंगल पांडेचा हल्ला माझ्यावर पूर्ण ताकदीनिशी झाला नाही. परिणाम असा झाला की मला ओरखडा आला. पण लेफ्टनंट बो मंगलच्या थेट हल्ल्याचा निशाणा बनले होते. त्यांचे जॅकेट रक्ताने माखले होते. पण तितक्यात एक सैनिक पुढे आला आणि त्याने माझ्या पाठीवर बंदुकीच्या दस्ता मारला. त्यामुळे मी खाली पडलो.

'मी त्या सैनिकाला ओळखू शकलो नाही पण त्याने रेजिमेंटचा गणवेश घातला होता हे मला दिसलं.'

'पडल्यावर उठताच मी डाव्या हाताने मंगलच्या कोटची कॉलर पकडली. मी माझ्या तलवारीने त्याच्यावर अनेक वार केले. त्याने माझ्यावर तलवारही चालवली आणि मी जखमी होऊन खाली पडलो. मंगलने त्याच्या डावा हाताने आम्हाला ढकललं आणि उजव्या हाताने आमच्यावर हल्ला केला.

मंगल पांडेंनी स्वतःवर गोळी झाडली

दरम्यान, 34 नेटिव्ह इन्फंट्रीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एसजी वेलरही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या सैनिकांना मंगल पांडेला अटक करण्यास सांगितले परंतु त्यांनी तसे करण्यास नकार दिला.

रुद्रांशु मुखर्जी लिहितात, 'नंतर वेलरने साक्ष दिली की मला त्या वेळी असहाय वाटत होतं. त्याचवेळी डिव्हिजनचे कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल हियरसे हेही आपल्या दोन मुलांसह तेथे पोहोचले. हियरसे मंगल पांडेंच्या दिशेने जात असताना त्याच्याकडे लोडेड बंदूक असल्याचे कोणीतरी ओरडले. जेव्हा त्याच्या मोठ्या मुलाने ओरडून त्यांना सावध केले. आणि तो म्हणाला की तो तुमच्यावर हल्ला करू शकतो. हर्से म्हणाले, 'जॉन, जर मी मेलो तर तू पुढे जा आणि त्या माणसाला संपव.'

दरम्यान, हियरसे आपलं पिस्तूल हाती घेऊन क्वार्टर गार्डजवळ आला आणि एक आदेश दिला. जर आता कुणी एखादा सैनिक माझ्या आदेशाच्या विरोधात वागला तर त्याला मीच गोळ्या झाडेन. असं सांगत त्याने मंगल पांडेंवर हल्ला करण्याचा आदेश सैनिकांना दिला. सैनिकांनी तो आदेश मानून मंगल पांडेंवर चाल केली.

त्यानंतर मंगल पांडेंनी आपल्या बंदुकाच्या घोड्यात पायाचे बोट रुतवले आणि बंदुकीची नळी छातीवर ठेवली आणि गोळी चालवली. त्यांच्या छाती आणि खांद्याला इजा होत ती गोळी निघून गेली. त्यांच्या कोटाला आग लागली. मंगल पांडे हे पोटावर पडले होते. त्यांच्या पोटाखाली तलवार पडली होती. ती तलवार एका शीख सैनिकाने काढली. मंगल पांडेंना अटक करण्यात आली आणि त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले.

मंगल पांडेंना फाशीची शिक्षा

त्या काळी गोऱ्या अधिकाऱ्यावर हल्ला करणं म्हणजे स्वतःचा मृत्यू ओढावून घेणं होतं.

शिपाई नंबर 1446 मंगल पांडे यांना या कृत्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

8 एप्रिल 1857 रोजी सकाळी साडेपाच वाजता त्यांना इतर साथीदारांसोबत फाशी देण्यात आली.

कोणत्याही इंग्रज अधिकाऱ्यांने त्यांना त्यांच्या वागणुकीबाबत प्रश्न विचारले नाहीत.

आधी मंगल पांडे यांच्या फाशीच्या शिक्षेचं नियोजन 18 एप्रिल रोजी करण्यात आलं होतं. पण त्यांनी सुरू केलेलं बंड इतर भागांत पसरू नये, यासाठी पांडे यांचा दहा दिवस आधीच 8 एप्रिल रोजी फासावर चढवण्यात आलं.

1857 च्या उठावात प्राण त्याग करणारे मंगल पांडे हे पहिले भारतीय होते.

जमादार ईश्वरी प्रसाद यांनाही फाशी

रुद्रांशू मुखर्जी लिहितात, “यामागे कोणतं षडयंत्र नाही, असं म्हटलं तरी हे नाकारता येणार नाही की शेख पलटू यांच्याव्यतिरिक्त कोणताही भारतीय सैनिक हा इंग्रज अधिकाऱ्यांची मदत करण्यासाठी किंवा मंगल पांडे यांना रोखण्यासाठी पुढे सरसावला नव्हता. विशेष म्हणजे, त्यावेळी हा संपूर्ण प्रकार 400 सैनिक प्रत्यक्ष पाहत होते.

जेव्हा सार्जंट मेजर यांनी तिथे उपस्थित असलेल्या ईश्वरी प्रसाद यांना विचारलं की मंगल पांडेंना आतापर्यंत अटक का केली नाही.

तेव्हा त्यांचं उत्तर होतं, “मी काय करू शकतो, माझा नाईलाज होता.” त्यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ लावले जाऊ शकतात.

पहिला अर्थ म्हणजे, तेसुद्धा या कृत्यात सामील होते. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांना वाटत होतं की सगळे गोरे अधिकारी घटनास्थळी दाखल व्हावेत. तिसरं म्हणजे त्यांना माहीत होतं की मंगल पांडेंना इतर सैनिकांचाही पाठिंबा मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं नाही. इंग्रजांनी त्यांचं हे स्पष्टीकरण मान्य केलं नाही. पुढे 21 एप्रिल 1957 रोजी ईश्वरी प्रसाद यांनाही फासावर लटकवण्यात आलं.

मंगल पांडेंना सहकाऱ्यांचा पाठिंबा

मंगल पांडे यांना तिथे उपस्थित असलेल्या भारतीय सैनिकांचा पाठिंबा होता, हे नाकारता येणारं नाही. तिथे मोठ्या संख्येने भारतीय सैनिक उपस्थित होते.

पण शिस्तपालनाच्या नावाने कुणीच इंग्रजांची मदत करण्यासाठी पुढे आला नाही.

अमरेश मिश्रा यांनी आपल्या ‘मंगल पांडे द ट्रू स्टोरी ऑफ अन इंडियन रिव्होल्युशनरी’ पुस्तकात लिहिलं आहे, “भारतीय सैनिकांनी सर्वांदेखत विद्रोह केलेला नसला तरी त्यांची निष्क्रियता पाहिल्यास त्यांची इंग्रजांचा विरोध करण्याची इच्छा होती.

त्यांच्या या भूमिकेचा अर्थ म्हणजे, मंगल पांडे जे काही करत आहेत, त्याला त्यांचा पाठिंबा होता. जेव्हा हिअरने त्यांना विचारलं की तुमची बंदूक भरलेली असूनही का घाबरत आहात. या प्रश्नावरही ते शांतच होते. दरम्यान याच वेळी एका अज्ञात सैनिकाने हिउसनवर आपल्या बंदुकीच्या बटीने प्रहार केला होता.

शिक्षा स्वरुपात 34 व्या रेजिमेंटचा भंग

एका महिन्यानंतर असहकार आणि द्वेष या भावना उत्तर भारतातील अनेक सैनिकी छावण्यांमध्ये धुमसत होत्या.

इंग्रज अधिकाऱ्यांनी विद्रोही सैनिकांना मंगल पांडेंच्या जातीच्या नावावरून पँडीज म्हणून संबोधणं सुरू केलं.

मंगल पांडे यांच्या मृत्यूवरून कलकत्ता ते पटणा आणि संपूर्ण गंगा किनारी क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात आला.

10 मे रोजी मेरठमध्ये उठावानंतर मंगल पांडेंचा मित्र नकी अली यांनी त्यांच्या अस्थी गावी जाऊन आईकडे सोपवल्या.

नंतर एप्रिल 1957 मध्ये मंगल पांडे यांच्या 34 व्या रेजिमेंटला शिक्षा म्हणून भंग करण्यात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)