महात्मा गांधींकडे खरंच कोणत्याही विद्यापीठाची पदवी नव्हती का?

    • Author, दीपक मंडल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

महात्मा गांधींकडे कायद्याची पदवी तर सोडाच पण त्यांच्याकडे कोणत्या विद्यापीठाची देखील पदवी नव्हती, असं वक्तव्य केलंय जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी.

ते पुढे म्हणाले की, शिकल्यासवरल्या लोकांना वाटतं की, गांधीजींकडे कायद्याची पदवी होती, मात्र गांधीजींकडे कोणतीही पदवी नव्हती.

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठातील डॉ. राम मनोहर लोहिया व्याख्यानमालेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लावली होती. यावेळी लोहिया यांच्यावरील पुस्तकाचं प्रकाशन करून सिन्हा यांनी गांधीजींची प्रशंसा करत भाषणाला सुरुवात केली.

ते म्हणाले, "गांधीजींनी खूप मोठमोठी कामं केल्याचं सांगितलं जातं. मला ते पुन्हा पुन्हा सांगायचं नाहीये. देशाला स्वातंत्र्य मिळालं, यासाठी खूप काही केलं. पण जे काही मिळवलं त्याच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट होती, ती म्हणजे सत्य."

"आयुष्यभर ते सत्याशी बांधिल राहिले, त्यांनी सत्याच्या अधीन राहून काम केलं, ते आचरणात आणलं. तुम्ही त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू पाहिला तर तुम्हाला समजेल की, त्यांच्या आयुष्यात कित्येक आव्हाने आली, कितीही संकटे आली, पण त्यांनी कधीच सत्याचा त्याग केला नाही. त्यांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ओळखला. त्यामुळेच ते राष्ट्रपिता झाले."

नायब राज्यपालांनी गांधींजींविषयी केलेलं वक्तव्य

मनोज सिन्हा यांनी महात्मा गांधींच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

ते म्हणाले, "मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. देशातील शिकल्यासवरल्या लोकांना वाटतं की, गांधीजींकडे कायद्याची पदवी होती, मात्र गांधीजींकडे कोणतीही पदवी नव्हती. आज मी हे सांगेन त्यावर लोक स्टेजवर येऊन याचा विरोध करतील. पण मी तथ्याला धरुनच बोलेन."

ते म्हणाले, "कोण म्हणेल की, गांधीजी एज्यूकेटेड नव्हते. पण मला नाही वाटत की हे सांगण्याचं कोणामध्ये धाडस असेल. तुम्हाला माहीत आहे का, त्यांच्याकडे विद्यापीठाची पदवी किंवा क्वालिफिकेशन नव्हतं."

सिन्हा पुढे म्हणाले, "आपल्यापैकी अनेकांना वाटतं की त्यांच्याकडे कायद्याची पदवी होती. पण त्यांच्याकडे केवळ हायस्कूल डिप्लोमा होता."

जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल पुढे म्हणाले की, "ते कायद्याच्या प्रॅक्टिससाठी क्वालिफाय झाले होते, मात्र त्यांच्याकडे कायद्याची पदवी नव्हती. पण ते इतके शिक्षित होते की, ते राष्ट्रपिता बनले. त्यामुळे फक्त पदवी मिळवण्याची औपचारिकता करू नका."

मनोज सिन्हा आपल्या भाषणात म्हणाले होते की, मी तथ्यांचा आधार घेऊनच बोलतोय. पण त्यांनी असे कोणतेही पुरावे दिले नाहीत ज्यामुळे त्यांनी केलेले दावे खरे मानता येतील.

पण महात्मा गांधींच्या शिक्षणाशी संबंधित कागदपत्रांमधून पुढे येणारी तथ्य सिन्हा यांच्या दाव्याच्या विरुद्ध असल्याचं दिसतं.

बीबीसी हिंदीने राष्ट्रीय गांधी संग्रहालयातून काही कागदपत्रे मिळवली. त्यानुसार गांधींनी लंडन विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 'इनर टेंपल' या लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली होती.

1891 मध्ये गांधींना बार-एट-लॉ चं सर्टिफिकेट देण्यात आलं.

या सर्टिफिकेट व्यतिरिक्त बारसमोर सादर करण्यात आलेली गांधींनी स्वाक्षरी केलेले कागदपत्रही आहेत.

इनर टेंपल या लॉ कॉलेजमध्ये त्यांनी घेतलेल्या प्रवेशाचे दस्तावेजही उपलब्ध आहेत. दस्तऐवज क्रमांक 7910 मध्ये त्यांनी इनर टेंपल मध्ये ॲडमिशन घेतल्याची नोंद आहे. यामध्ये ॲडमिशन खर्च, स्टॅम्प ड्युटी, लेक्चर मध्ये बसण्यासाठीची फी अशा गोष्टी नमूद केल्या आहेत.

लंडनमध्ये कायद्याचं शिक्षण घेतल्यानंतर गांधी भारतात परतले आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. पण इथे काही त्यांचा जम बसला नाही.

कागदपत्रांमध्ये काय नोंदी आहेत?

बीबीसीने राष्ट्रीय गांधी संग्रहालयातून काही कागदपत्रं मिळवली आहेत. त्यात 2020 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातील 'गांधी एक वकील' या प्रदर्शनात गांधींच्या अर्जाची प्रत समाविष्ट होती.

गांधींनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी जी प्रत दिली होती, ती हीच प्रत होती.

हा अर्ज 1891 मध्ये करण्यात आला होता. या कागदपत्रावर गांधीजींची सही आहे.

पण गांधीजी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करू शकले नाहीत. त्यामुळे ते राजकोटला काठियावाड पॉलिटिकल एजन्सीमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी गेले.

महात्मा गांधींनी एजन्सी न्यायालयात प्रॅक्टिस करण्यासाठी जो अर्ज केला होता त्याची माहिती राजकोट पॉलिटिकल एजन्सीच्या गॅझेटमध्ये देण्यात आली आहे.

1892 च्या एजन्सीच्या अधिसूचना क्रमांक 16 मध्ये असं म्हटलंय की, बॅरिस्टर ऑफ लॉ मिस्टर एम.के. गांधींनी काठियावाड पॉलिटिकल एजन्सीच्या न्यायालयात प्रॅक्टिस करण्याची परवानगी मागितली होती आणि ती मंजूर झाली आहे.

वकिलीची प्रॅक्टिस करताना त्यांना काठियावाडमध्येही चांगला जम बसवता आला नाही.

1893 मध्ये काठियावाडमधील एक मुस्लिम व्यापारी दादा अब्दुल्ला यांनी मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी संपर्क साधला. दादा अब्दुल्ला यांचा दक्षिण आफ्रिकेत शिपिंगचा बिजनेस होता. गांधींनी तिथे जावं आणि व्यावसायिक खटले लढावेत असं अब्दुल्ला यांना वाटत होतं.

दादा अब्दुल्ला यांच्या दूरवरच्या एका नातेवाईक भावालाही चांगल्या वकिलाची गरज होती. आणि हा वकील काठियावाडी हवा असा त्याचा आग्रह होता.

दादा अब्दुल्ला यांनी बोलल्यावर गांधीजी आफ्रिकेला गेले. दादा अब्दुल्लाची केस लढविण्यासाठी त्यांना एक वर्ष दक्षिण आफ्रिकेतील नतालमध्ये राहावं लागणार होतं. त्यावेळी दक्षिण आफ्रिका ही ब्रिटिशांची वसाहत होती.

एप्रिल 1893 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी गांधींजी अब्दुल्ला यांच्या चुलत भावाचा खटला लढविण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आले.

महात्मा गांधींचे पणतू काय म्हणाले?

मनोज सिन्हा यांनी महात्मा गांधींच्या पदवीवर जे वक्तव्य केलं होतं त्यावर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी एकामागून एक ट्वीट करत मनोज सिन्हा यांनी केलेले दावे फेटाळून लावले.

एका ट्विटमध्ये ते लिहितात की, "एम. के गांधी दोनदा मॅट्रिक पास झाले. यातली पहिली मॅट्रिक ते आल्फ्रेड हायस्कूल राजकोटमधून तर दुसरी लंडनमधील ब्रिटिश मॅट्रिक्यूलेशन मधून पास झाले. त्यांनी लंडन विद्यापीठाशी संलग्न असलेल्या इनर टेंपल या लॉ कॉलेजमधून पदवी मिळवली."

"गांधीजींनी लॅटिन आणि फ्रेंच भाषेत डिप्लोमा केला होता."

दुसर्‍या ट्विटमध्ये ते लिहितात की, "मी बापूंचं आत्मचरित्र जम्मूतील राजभवनावर पाठवून दिलंय. हे वाचून नायब राज्यपालांना ज्ञान मिळेल ही अपेक्षा आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)