'आंदोलक दिसले की गोळ्या घाला', शेख हसीनांचा आदेश, लीक झालेल्या ऑडिओतून समोर आलं सत्य

फोटो स्रोत, Getty Images
- Author, क्रिस्तोफर गिल्स, रिद्धी झा, रफीद हुसैन आणि तारेकुझामन शिमुल
- Role, बीबीसी आय इन्व्हेस्टिगेशन्स आणि बीबीसी बांगला
बांगलादेशात गेल्या वर्षी विद्यार्थ्यांची तीव्र आंदोलनं झाली होती. त्याला हिंसक वळणदेखील लागलं होतं. पोलिसांनी बळाचा हिंसक वापर करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता.
या आंदोलकांवर तीव्र स्वरुपाची, हिंसक कारवाई करण्याचे आदेश स्वत: तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनीच दिले होते, असं त्यांच्या फोन कॉलमधून समोर आलं आहे.
बीबीसीनं या फोन कॉल्सपैकी एका कॉलची पडताळणी केली आहे.
शेख हसीना यांच्या फोन कॉलचा हा ऑडिओ मार्च महिन्यात ऑनलाईन लीक झाला होता.
या फोन कॉलमध्ये शेख हसीना पोलीस, सुरक्षा दलांना निदर्शकांच्या विरोधात 'घातक शस्त्रांचा' वापर करण्याची परवानगी देत असल्याचं आणि "ते (आंदोलक) जिथे दिसतील तिथे त्यांना गोळ्या घालण्याचे" आदेश देत असल्याचं ऐकू येतं आहे.
बांगलादेशात एका विशेष ट्रिब्युनलसमोर मानवतेच्या विरोधातील गुन्ह्यांसाठी शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत त्यांच्याविरोधात खटला सुरू आहे.
त्या खटल्यात बांगलादेशातील सरकारी वकील या ऑडिओचा वापर शेख हसीना यांच्याविरोधातील एक महत्त्वाचा पुरावा म्हणून करणार आहेत.
बांगलादेशातील तीव्र जनआंदोलन आणि हिंसाचार
गेल्या वर्षी उन्हाळ्यात बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली होती. शेख हसीना सरकारविरोधात विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते.
या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाच्या तपासानुसार त्यामध्ये 1,400 जण मारले गेले होते.
परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर, शेख हसीना यांनी भारतात पलायन केलं होतं. शेख हसीनांवर विविध आरोप होत असले तरी त्यांच्या पक्षानं म्हणजे अवामी लीगनं त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
शेख हसीना यांच्या लीक झालेल्या ऑडिओमध्ये, निदर्शकांच्या विरोधात "बळाचा हिंसक वापर करण्याचा" कोणताही "बेकायदेशीर हेतू" असल्याचं अवामी लीगच्या प्रवक्त्यानं नाकारलं आहे.
शेख हसीना यांचा हा लीक झालेला ऑडिओ, त्यांच्या आणि एका अज्ञात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यामधील संभाषणाचा आहे.
शेख हसीना यांनी सरकारविरोधात निदर्शनं करणाऱ्यांना गोळ्या घालण्याची थेट परवानगी दिली होती, याचा हा आतापर्यंतचा सर्वांत महत्त्वाचा पुरावा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षी उन्हाळ्यात बांगलादेशात हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले होते.
1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात लढलेल्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याच्या विरोधात ही निदर्शनं सुरू झाली होती.
नंतर या निदर्शनांनी व्यापक स्वरुप घेतलं आणि संपूर्ण बांगलादेश पेटला. त्याचं रुपांतर एका जनआंदोलनात झालं होतं.
सरकारविरोधात लोकांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की गेल्या 15 वर्षांपासून बांगलादेशच्या सत्तेत असलेल्या शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं.
1971 च्या मुक्ती संग्रामानंतर बांगलादेशात झालेला हा सर्वात भीषण हिंसाचार आहे. या आंदोलनातील सर्वात हिंसक, रक्तरंजित घटना गेल्या वर्षी 5 ऑगस्टला घडल्या होत्या.
त्याच दिवशी जमावानं शेख हसीना यांच्या ढाक्यातील निवासस्थानावर हल्ला केला होता. मात्र त्याआधी शेख हसीना यांनी सत्ता सोडत हेलिकॉप्टरनं बांगलादेशातून पलायन केलं होतं.
बीबीसीचा स्वतंत्र तपास आणि शेख हसीनांच्या आदेशाचा ऑडिओ
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस इन्व्हेस्टिगेशननं या आंदोलनाच्या काळात पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या हिंसक कारवाईचा तपास केला.
या पोलीस हत्याकांडाबद्दलचे पूर्वी नोंदवण्यात न आलेले तपशील त्यातून समोर आले. त्यात दिसलं की पोलीस कारवाईत मारले गेलेल्यांची संख्या खूप जास्त आहे.
शेख हसीना यांच्या फोन कॉलचा जो ऑडिओ लीक झाला आहे तो 18 जुलैचा आहे. त्या फोन कॉलच्या वेळेस शेख हसीना, गणभवन या ढाक्यातील त्यांच्या निवासस्थानी होत्या.
या लीक झालेल्या ऑडिओची माहिती असणाऱ्या एका सूत्रानं बीबीसीला ही माहिती दिली.
या निदर्शनांचा तो एक महत्त्वाचा क्षण होता. पोलीस कारवाईत निदर्शक मारले गेले होते. या हत्याकांडाचा व्हिडिओ होता आणि तो सोशल मीडियावर पसरला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यातून लोकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला होता. सुरक्षा अधिकारी लोकांच्या या संतापाला तोंड देत होते.
बीबीसीनं पोलिसांची कागदपत्रं पाहिली आहेत. त्यानुसार, शेख हसीना यांच्या या कॉलनंतर संपूर्ण ढाक्यात पोलिसांना लष्करी-दर्जाच्या रायफल देण्यात आल्या आणि त्यांचा वापर करण्यात आला.
बीबीसीनं जो शेख हसीना यांच्या फोन कॉलचा ऑडिओ तपासला, तसे शेख हसीना यांच्याशी संबंधित असंख्य कॉल रेकॉर्डिंग आहेत. ते नॅशनल टेलीकम्युनिकेशन्स मॉनिटरिंग सेंटरनं (एनटीएमसी) केले होते.
एनटीएमसी ही बांगलादेशमधील सरकारी संस्था आहे. ती कम्युनिकेशन्सवर देखरेख करते.
शेख हसीना यांच्या फोन कॉलचं हे रेकॉर्डिंग यावर्षी मार्च महिन्यात लीक झालं होतं. मात्र ते नेमकं कोणी लीक केलं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
लीक झालेल्या ऑडिओची पडताळणी, आवाज शेख हसीनांचाच
बांगलादेशातील या निदर्शनांनंतर, शेख हसीना यांच्या फोन कॉलचे अनेक ऑडिओ समोर आले आहेत. मात्र त्यातील अनेक ऑडिओची पडताळणी झालेली नाही.
18 जुलैच्या या लीक झालेल्या ऑडिओतील आवाज शेख हसीना यांच्या आवाजाच्या ज्ञात ऑडिओशी जुळला आहे. बांगलादेश पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं ही पडताळणी केली होती.
बीबीसीनंदेखील यासंदर्भात स्वत:ची स्वतंत्र पडताळणी केली. बीबीसीनं हा ऑडिओ इअरशॉट या फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे तपासणीसाठी दिला होता.
त्यांनी याची तपासणी केल्यानंतर या ऑडिओमधील आवाज संपादित करण्यात आल्याचा किंवा त्यात छेडछाड झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना आढळला नाही.
तसंच इअरशॉटनं सांगितलं की शेख हसीना यांचा आवाज कृत्रिम रीतीनं तयार केला गेला असण्याची शक्यता खूपच कमी आहे. म्हणजेच तो आवाज शेख हसीना यांचा आहे.
इअरशॉट ही मानवाधिकार आणि पर्यावरणाला पाठिंबा देण्यासाठीचा ऑडिओ तपास करणारी स्वयंसेवी संस्था आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इअरशॉटनं म्हटलं आहे की हा लीक झालेला फोन कॉल एका खोलीतून करण्यात आला होता. त्यावेळेस फोन स्पीकरवर होता. कारण या फोन कॉलच्या ऑडिओमध्ये विशिष्ट टेलिफोनिक फ्रिक्वेन्सी तसंच पार्श्वभूमीला इतर आवाज ऐकू येतात.
इअरशॉटला या संपूर्ण रेकॉर्डिंगमध्ये इलेक्ट्रिक नेटवर्क फ्रिक्वेन्सी (ईएनएफ) आढळली आहे. ही विशिष्ट फ्रिक्वेन्सी ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये अनेकदा आढळते.
ऑडिओ रेकॉर्डिंग करणारं उपकरण आणि इमारतीतील वीजेचा वापर करून चालवण्यात येणारं उपकरण यांच्यातील हस्तक्षेपामुळे किंवा ही उपकरणं एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे ही फ्रिक्वेन्सी आढळून येते.
या प्रकारची फ्रीक्वेन्सी आढळणं म्हणजे त्या ऑडिओमध्ये फेरफार किंवा छेडछाड झाली नसल्याचं स्पष्ट होतं.
इअरशॉटनं शेख हसीना यांच्या भाषणाचं देखील विश्लेषण केलं. त्यात त्यांनी शेख हसीना यांच्या आवाजाची लय, स्वर आणि श्वासांचे आवाज या बाबी लक्षात घेतल्या.
लीक झालेल्या ऑडिओमध्ये त्यांना शेख हसीना यांच्या आवाजाच्या पातळीत सुसंगतपणा आढळून आला.
ऑडिओमध्ये कोणताही कृत्रिम भाग जोडल्याचं किंवा कृत्रिम पद्धतीनं त्यात काही छेडछाड केल्याचा कोणताही पुरावा त्यांना या पडताळणीत आढळला नाही.
शेख हसीनांविरोधातील खटल्यात ऑडिओ हा महत्त्वाचा पुरावा
टॉबी कॅडमन ब्रिटनमधील आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांसाठीचे वकील (बॅरिस्टर) आहेत. ते बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगार लवादाचे (आयसीटी) सल्लागार आहेत.
या लवादासमोर किंवा न्यायालयासमोरच शेख हसीना आणि इतरांविरोधातील खटल्यांची सुनावणी सुरू आहे.
टॉबी कॅडमन यांनी बीबीसीला सांगितलं, "शेख हसीना यांच्या फोन कॉलचे ऑडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण या ऑडिओद्वारेच पोलीस हत्याकांडातील त्यांची भूमिका सिद्ध करता येणार आहे. हे ऑडिओ स्पष्ट आहेत आणि योग्यरित्या प्रमाणित करण्यात आलेले आहेत. तसंच त्यांना इतर पुराव्यांचं पाठबळ आहे."
अवामी लीगच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, "बीबीसी ज्या ऑडिओचा संदर्भ देतं आहे, ते रेकॉर्डिंग खरं आहे की नाही याची आम्ही खातरजमा करू शकत नाही."

फोटो स्रोत, Getty Images
बांगलादेशातील निदर्शकांच्या हत्याकांडाचे आरोप फक्त शेख हसीना यांच्यावरच नाहीत.
या हत्याकांडाचा ठपका माजी सरकारी अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना देखील ठेवण्यात आला आहे.
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगार लवादानं (आयसीटी) या हत्यांसाठी एकूण 203 जणांवर आरोप ठेवले आहेत. त्यातील 73 जण कोठडीत आहेत.
बीबीसी आयनं बांगलादेशातील आंदोलकांवरील कारवाईवर सखोल तपास केला आहे.
यात बीबीसी आयनं 36 दिवसांच्या कालावधीत निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्यांची तपशीलवार माहिती देणाऱ्या शेकडो व्हिडिओ, फोटो आणि कागदपत्रांचं विश्लेषण केलं आहे. तसंच त्याची पडताळणी देखील केली आहे.
जत्राबारीचा भीषण हिंसाचार
जत्राबारी हा ढाक्यातील वर्दळीचा भाग आहे.
बीबीसी आयच्या या तपासात आढळून आलं आहे की 5 ऑगस्टला जत्राबारी परिसरात झालेल्या पोलीस कारवाईत किमान 52 जण मारले गेले आहेत.
ही कारवाई इतकी हिंसक होती की ती बांगलादेशच्या इतिहासातील पोलीस हिंसाचाराच्या सर्वात वाईट घटनांपैकी एक बनली आहे.
त्यावेळी सुरुवातीला आलेल्या बातम्यांमध्ये त्या दिवशी जत्राबारीमध्ये 30 जण मारले गेल्याची माहिती समोर आली होती.
बीबीसीनं या घटनेचा तपास केल्यानंतर, ते हत्याकांड नेमकं कसं घडलं, याचे नवीन तपशील समोर आले.
बीबीसी आयनं त्यासाठी प्रत्यक्षदर्शीचं फुटेज, सीसीटीव्ही आणि ड्रोननं घेतलेले व्हिडिओ गोळा केले.
त्यातून बीबीसीनं सिद्ध केलं की लष्कराच्या जवानांनी निदर्शकांना पोलिसांपासून दूर केलं. हे जवान तिथून गेल्यानंतर लगेचच पोलिसांनी निदर्शकांवर अंदाधुंद गोळीबार केला.

फोटो स्रोत, Getty Images
जवळपास 30 मिनिटांहून अधिक काळ पोलीस निदर्शकांवर गोळीबार करत होते.
त्यावेळेस निदर्शक त्या गोळीबारापासून वाचण्यासाठी गल्लीबोळात आणि मुख्य रस्त्यावर पळण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर पोलिसांनी जवळच असलेल्या लष्कराच्या एका छावणीत आश्रय घेतला.
काही तासांनी संतापलेल्या निदर्शकांनी पोलिसांवर हल्ला करत जत्राबारी पोलीस ठाण्याला आग लावली.
या हिंसाचारात किमान सहा पोलीस अधिकारी देखील मारले गेले.
बांगलादेश पोलिसांच्या एका प्रवक्त्यानं बीबीसीला सांगितलं की गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या हिंसाचारातील सहभागाबद्दल 60 पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
"अशा काही घटना आहेत, ज्यात तत्कालीन पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बळाचा अत्यंत तीव्र वापर केला. या घटना दुर्दैवी होत्या. याबाबत बांगलादेश पोलीस सखोल आणि नि:पक्षपातीपणे तपास करत आहेत," असं त्या प्रवक्त्यानं सांगितलं.
शेख हसीनांवरील खटल्याची सुनावणी
गेल्या महिन्यात शेख हसीना यांच्यावरील खटल्याची सुनावणी सुरू झाली.
त्यांच्यावर मानवतेविरोधात गुन्हे करणं, जनतेचं सामूहिक हत्याकांड आणि नागरिकांना लक्ष्य करून हिंसाचार घडवून आणण्याचे आदेश देणं, चिथावणी देणं, कट रचणं आणि सामूहिक हत्याकांड रोखण्यात अपयशी ठरणं यासारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
बांगलादेशनं याआधीच भारताकडे शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करण्याची विनंती केलेली आहे. मात्र अजूनपर्यंत भारतानं हे प्रत्यार्पण केलेलं नाही.
बांगलादेशात सुरू असलेल्या या खटल्यासाठी शेख हसीना मायदेशी परतण्याची शक्यता फारच कमी आहे, असं कॅडमन म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
याबाबतीत अवामी लीगची भूमिका आहे की निदर्शकांविरोधात जो बळाचा वापर करण्यात आला, पोलिसांनी जी हिंसक कारवाई केली त्यासाठी त्यांचे नेते जबाबदार नाहीत.
"पंतप्रधानांसह (शेख हसीना) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जमावाविरोधात प्राणघातक बळाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या किंवा निदर्शकांवर झालेल्या गोळीबारासाठी ते जबाबदार होते, हे आरोप अवामी लीग स्पष्टपणे नाकारते," असं अवामी लीगचा प्रवक्ता म्हणाला.
प्रवक्ता म्हणाला की "वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी जे निर्णय घेतले होते, ते परिस्थितीनुसार होते, ते चांगल्या हेतूनंच घेतले होते आणि कमीत कमी जीवितहानी व्हावी हाच त्यामागचा उद्देश होता."
संयुक्त राष्ट्रसंघाचा देखील शेख हसीनांवर ठपका
संयुक्त राष्ट्रसंघानंदेखील यासंदर्भात तपास केला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निष्कर्षात म्हटलं आहे की शेख हसीना आणि त्यांच्या सरकारनं केलेली कृत्यं, मानवतेच्या विरोधातील गुन्हे ठरू शकतात, असं मानण्याएवढे योग्य पुरावे त्यांना सापडले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या तपासातून समोर आलेले निष्कर्ष देखील अवामी लीगनं फेटाळले आहेत.
यासंदर्भात बीबीसीनं बांगलादेशच्या लष्कराची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
शेख हसीना सत्तेतून पदच्युत झाल्यापासून, बांगलादेशमध्ये हंगामी सरकार आहे. नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस या सरकारचं नेतृत्वं करत आहेत.
मुहम्मद युनूस यांचं सरकार बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारी करतं आहे. या निवडणुकांमध्ये भाग घेण्याची परवानगी अवामी लीगला मिळेल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











